तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : वकीलामार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे स्टेट बँक ऑफ इंडीया, विले-पार्ले (पूर्व) शाखा आहे, तर सा.वाले क्र.2 हे त्यांच बँकेची जिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील शाखा आहे. तक्रारदारांचे सा.वाले क्र.1 शाखेमध्ये बचत खाते हेाते. तक्रारदारांनी दिनांक 25.2.2008 रोजी चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील पोस्ट ऑफीसने दिलेले शाखेचे दोन धनादेश रक्कम रु.63,010/- व रु.15,706/- असे दोन धनादेश दिनांक 25.2.2008 रोजी सा.वाले क्र.1 शाखेकडे तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये वटवून जमा करणेकामी सुपूर्द केले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 शाखेमध्ये चौकशी केली परंतू धनादेश वटवून खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नव्हती. अतीमतः दिनांक 26.3.2008 रोजी म्हणजे एका महिन्यानंतर दोन्ही धनादेश वटवून तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. या संदर्भात तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांचे दोन्ही धनादेश योग्य वेळामध्ये वटवून खात्यामध्ये जमा झाले नाहीत. परीणामतः तक्रारदारांना त्यांचे गृह कर्जाचे हप्ते तसेच वाहन कर्जाचे हप्ते भरणेकामी तसेच घरगुती निकडी करीता रक्कम उपलब्ध होऊ शकली नाही. व तक्रारदारांची गैरसोय व कुचंबणा झाली. तक्रारदार असे कथन करतात की, या सर्व दिरंगाईस सा.वाले क्र.1 व 2 शाखेचे कर्मचारी कारणीभूत आहेत. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 27.3.2008 रोजी सा.वाले क्र.1 व 2 यांना नोटीस दिली व तक्रारदारांना रु.5 लाख नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी केली. त्यास उत्तर म्हणून सा.वाले क्र.1 यांचे शाखाधिका-यांनी दूरध्वनीवर अशी माहिती दिली की, तक्रारदारांच्या खात्यामध्ये रु.164/- जमा करण्यात येतील. तक्रारदारांनी हया रु.164/- ची आकारणी सा.वाले बँकेने कशारीतीने केलेली आहे याची माहिती सा.वाले क्र.1 शाखेकडे विचारली असता सा.वाले क्र.1 यांनी त्यास उत्तर दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला व नुकसान भरपाई रु.4 लाखाची मागणी केली.
2. सा.वाले क्र.1 व 2 यांनी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडीया, विले-पार्ले शाखा व स्टेट बँक ऑफ इंडीया, चिपळूण शाखा, यांनी एकत्रितपणे आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी जमा केलेला धनादेश हा जरी पोस्टाकडून दिलेला असला तरीही संबंधित शाखेने वटवून त्या बद्दलची सूचना सा.वाले क्र.1 शाखेला देणे आवश्यक असल्याने दोन्ही धनादेश चिपळूण शाखेकडे कुरीयरने पाठविले. परंतु सा.वाले क्र.2 यांनी ते स्विकारले नाहीत अशा शे-यासह धनादेशाचे पाकीट परत आले. त्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी कुरीयर कंपनीकडे सा.वाले क्र.2 शाखेकडे कुरीयर पाकीट का दिले गेले नाही याची माहिती घेतली, व त्यानंतर दोन्ही धनादेश रजिस्टर पोस्टाने सा.वाले क्र.2 यांचेकडे पाठविले ते सा.वाले क्र.2 शाखेने मंजूर केले व तशी सूचना सा.वाले क्र.1 यांना दिनांक 18.3.2008 रोजी फॅक्स संदेशाव्दारे दिली. त्यानंतर सा.वाले क्र.2 शाखेने पोस्टाने ती सूचना पाठविली. दरम्यान बँकेस सलग चार दिवस सुट्टी असल्याने सा.वाले क्र.1 शाखेकडे ती सूचना दिनांक 24 मार्च, 2008 रोजी प्राप्त झाली. व त्यानंतर दिनांक 26.3.2008 रोजी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली. सा.वाले क्र.1 यांनी असे कथन केले की, खाते धारकांनी धनादेश जमा केल्यानंतर मंजूरीची कार्यवाही 10 दिवसामध्ये पूर्ण करुन त्या धनादेशाची रक्कम खातेधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी असा आदेश असला तरीही सदर प्रकरणात सा.वाले क्र.2 शाखेकडे धनादेश कुरीयरचे पाकीट वेळेवर वेळेमध्ये पोहोचते न झाल्याने व बँकेस सुंटया असल्याने विलंब झाला. त्यामध्ये सा.वाले क्र.1 व 2 शाखेतील कर्मचा-यांचा निष्काळजीपणा नव्हता. सबब तक्रारदारांनी दोन्ही धनादेशाची रक्कम तक्रारदारांच्या खात्यामध्ये जमा करण्यास उशिर झाल्याने तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास नकार दिला.
3. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. त्यामध्ये सा.वाले यांचा निष्काळजीपणा होता असे पुन्हा कथन केले.
4. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच यादीसोबत कागदपत्रे दाखल केली. सा.वाले क्र.1 शाखेचे शाखाधिकारी श्री. मोहन अय्यर यांनी त्यांचे शपथपत्रासोबत कागदपत्रे दाखल केली. तक्रारदारांनी असे निवेदन केले की, त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व प्रति उत्तराचे शपथपत्र हाच त्यांचा तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा. सा.वाले युक्तीवादाकामी गैरहजर होते.
5. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले स्टेट बँक ऑफ इंडीया, विले-पार्ले (पूर्व) शाखा व चिपळूण शाखेने तक्रारदारांनी विले-पार्ले शाखेमध्ये बचत खात्यामध्ये जमा करणेकामी सूपुर्द केलेला दिनांक 25.3.2008 चे धनादेश तक्रारदारांच्या खात्यामध्ये वटवून जमा करणेकामी विलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रक्कम रु.10,000/- |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. सा.वाले क्र.1 म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडीया, विले-पाले(पूर्व) शाखा, यांचेकडे तक्रारदारांचे बचत खाते आहे व तक्रारदारांनी दिनांक 25.2.2008 रोजी चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील पोस्ट ऑफीसने स्टेट बँक ऑफ इंडीया, चिपळूण शाखेवर दिलेले (सा.वाले क्र.2) दोन धनादेश तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे दिनांक 25.2.2008 रोजी सुपूर्द केले. याबद्दल उभय पक्षकारामध्ये वाद नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तक्रारदारांच्या खात्यामध्ये त्या दोन धनादेशाची रक्कम दिनांक 26.3.2008 रोजी जमा करण्यात आली या बद्दलही वाद नाही. तक्रारदारांचे असे कथन आहे की, कोअर बँकींगमुळे तसेच जलद संपर्काची सुविधा उपलब्ध असल्याने एक महिन्याचा कालावधी धनादेश वटवून खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास लागणे योग्य नव्हते व केवळ सा.वाले क्र.1 व 2 यांच्या शाखेमधील कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांचा धनादेश वटवून तो खात्यामध्ये लौकर जमा होऊ शकला नाही व एक महिन्याचा कालावधी सा.वाले यांनी घेतला जो अप्रस्तुत व अन्यायकारक आहे. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.5 मध्ये सर्व घटनांचा क्रम दिलेला आहे व सा.वाले क्र.1 विले-पार्ले शाखा व सा.वाले क्र.2 चिपळूण शाखा यांनी त्या संबंधात काय कार्यवाही केली व ती कशी केली याचा तपशिल त्या तालीकेमध्ये नमुद करण्यात आलेला आहे. तो तपशिल पुढील प्रमाणे आहे.
Sr. No. | Event details | Imp.date | Time taken in taking action | Comments |
1 | Deposit of cheques at S.B.I. Vile-parle East Branch by the complainant. | 25.2.2008 | | |
2 | Preparation of envelopes for dispatch by DTDC | 1.3.2008 Saturday | 5 days | February 2008 being Of 29 days. |
3 | Collection of envelopes by DTDC | 3.3.2008 | 2 days | 1st and 2nd March being Saturday and Sunday. |
4 | The Envelope returned to sender by courier | 7.3.2008 | 4 days | |
5 | The Envelope sent back to Chiplun by Regd.Post. | 13.3.2008 | 6 days | Some time was taken to find out why the same was not delivered to chiplun branch |
6 | Cheques were received by Chiplun Branch | 17.3.2008 | 4 days | |
7 | Cheques paid by Chiplun Branch | 17.3.2008 | Immediate | |
8 | Realisation advise sent by Chiplun Branch by fax | 18.3.2008 | Immediate | Though FAX was received the same cannot be acted upon for crediting the account of the customer till the same is received actually as per the practice followed by the Bank. |
9 | Realisation advise sent by Chiplun Branch by courier | 19.3.2008 | Immediate | |
10 | Bank remained closed due to Holiday on account of Ed-E-Milad, Good Friday, Holi/Dhoolivandan and Sunday respectively | 20,21,22, and 23 March 2008 | bank holidays | Bank were closed |
11 | The Realisation advise received by Vild-Parle East Branch. | 24 25.3.2008 | | |
12 | The account of the complainant credited with the amount | 26.3.2008 | 1/2 day | |
13 | Total time taken from deposit of cheques to credit thereof in complainant’s account | 25.2.2008 To 26.3.2008 | 30 days | Delay of only 20 days beyond the allowance of 10 days as per the SBI guidelines |
7. वरील तालीकेमधील नोंदीचे काळजीपूर्वक अवलोकन केले असतांना असे दिसून येते की, सा.वाले क्र.1 शाखेने कुरीयर कंपनीकडे धनादेशाचे पाकीट देण्यास 5 दिवस घेतले. ती कार्यवाही निश्चितच विलंबाने झाली. त्यानंतर सा.वाले क्र.2 चिपळूण शाखेने कुरीयरचे पाकीट स्विकारण्यास नकार दिला. त्या कुरीयर पाकीटाची छायांकिम प्रत तक्रारदारांनी निशाणी ब तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. त्यावर पक्षकार स्विकारत नाहीत असे कुरीयर कंपनीचा शेरा आहे. पाकीटाचे डाव्या बाजूस सा.वाले क्र.1 शाखेचा शिक्का होता. यावरुन सा.वाले क्र.2 म्हणजे चिपळूण शाखेतील संबंधित कर्मचा-याना हे कुरीयरचे पाकीट सा.वाले क्र.1 विले-पार्ले शाखेने पाठविले आहे येवढे निश्चितच समजले असेल, तरी देखील आच्छर्याची बाब म्हणजे सा.वाले क्र.2 शाखेतील कर्मचा-याने ते पाकीट स्विकारण्यास नकार दिला. कुरीयर कंपनीकडे सा.वाले क्र.1 शाखेने चौकशी केली असता कुरीयर कंपनीने त्या बद्दलचे प्रमाणपत्र व घटणाक्रम दाखल केले. त्यामधील नोंदी देखील असे दर्शवितात की, सा.वाले क्र.2 शाखेने कुरीयर पाकीट स्विकारण्यास नकार दिल्याने ते पाकीट मुंबई शाखेमध्ये पुन्हा सुपुर्द करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या एकाद्या शाखेने पाठविलेले धनादेशाचे पाकीट दुसरी शाखा स्विकारण्यास नकार देते यामध्ये निश्चितच दुस-या शाखेतील कर्मचा-याचा निष्काळजीपणा दिसून येतो. हा केवळ निष्काळजीपणा नसून बेजबाबदारपणा आहे, व खातेदारांच्या हिता संबंधीची अनास्था व संवेदनाहिनता दाखविणारी बाब आहे. वरील घटणा घडल्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी कुरीयर कंपनीकडे चौकशी करणेकामी 6 दिवस खर्च केले. व त्यानंतर रजिस्टर पोस्टाने धनादेश सा.वाले क्र.2 शाखेकडे पाठविला. त्यानंतर लगेचच म्हणजे दुस-या दिवशी सा.वाले क्र.2 शाखेने धनादेश वटविण्याची सूचना सा.वाले क्र.1 शाखेला फॅक्स संदेशाव्दारे पाठविली. त्या संदेशाव्दारे कार्यवाही करुन सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली नाही व सा.वाले क्र.2 कडून टपालाने सूचना पत्र प्राप्त होण्याची प्रतिक्षा केली. ती सूचना सा.वाले क्र.1 यांना दिनांक 19.3.2008 रोजी प्राप्त झाली परंतू त्यानंतर 20,21,22, व 23/3/2008 रोजी बँकेस सुट्टी असल्याने खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची कार्यवाही होऊ शकली नाही. व सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून आलेले सूचना पत्र दिनांक 24.3.2008 रोजी फोडले व त्यानंतर दोन दिवसानंतर म्हणजे दिनांक 26.3.2008 रोजी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली. सा.वाले क्र.2 शाखेने धनादेशाचे पाकीट स्विकारण्यास नकार देण्यास चूक केली असल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फॅक्स संदेशाव्दारे प्राप्त झालेल्या सूचनेवरुन सा.वाले क्र.1 शाखा तक्रारदारांच्या खात्यामध्ये धनादेशाची रक्कम जमा करु शकले असते. परंतु सा.वाले क्र.1 शाखेने दिरंगाईचा मार्ग स्विकारला व फॅक्स संदेश प्राप्त झाल्यानंतरही पोस्टाव्दारे सूचनेची प्रत येण्याची प्रतिक्षा केली. दरम्यान चार सलग सार्वजनिक सुट्टया व पोस्टाव्दारे प्राप्त झालेल्या सूचना पत्रावर कार्यवाही यावर एक आठवडा खर्च झाला या सर्व प्रकारामध्ये सा.वाले क्र. 1 व 2 या दोन्ही शाखातील कर्मचा-यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांनी जमा केलेले दोन्ही धनादेश खाजगी व्यक्तींकडून दिलेले नव्हते तर पोस्ट ऑफीस, चिपळूण यांनी दिलेले होते. म्हणजे ते शासकीय धनादेश होते. तरी देखील त्या धनादेशावर विश्वास ठेवण्यास नकार देवून नेहमीची किचकट व वेळखाऊ पध्दत स्विकारण्याचे सा.वाले यांनी ठरविले व सा.वाले क्र.2 यांचेकडे ते धनादेश वटविणेकामी पाठविले. त्यातही फॅक्स संदेशाव्दारे मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्या ऐवजी प्रत्यक्ष लेखी संदेशाची प्रतिक्षा केली. या सर्व बाबी सा.वाले क्र.1 व 2 शाखेतील कर्मचा-यांचा निष्काळजीपणा दर्शवितात.
8. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत त्यांचे व्यवस्थापनाकडून या बाबत प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनाची प्रत दाखील केलेली आहे. महानगर व्यतिरिक्त इतर ठिकणी धनादेश 10 दिवसामध्ये वटण्यास, खात्यामध्ये जमा होण्यास व 10 दिवसापेक्षा जास्त दिवस कालावधी लागल्यास विनंतीची प्रतिक्षा न करता विलंबा बद्दल खातेदाराच्या खात्यामध्ये व्याजाची आकारणीकरुन व्याज जमा करावे अशा सूचना आहेत. त्यातही 45 दिवसापेक्षा जास्त उशिर झाल्यास त्या व्याजावर व्याज आकारावे अशा सूचना आहेत. या परिस्थितीमध्ये 10 दिवसामध्ये दोन शाखेमधे संपर्क प्रस्तापित होऊन खातेदारांच्या खात्यामध्ये धनादेशाची रक्कम जमा करण्यात यावी अशी अपेक्षा सा.वाले बँकेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केलेली दिसते. परंतू सा.वाले क्र.1 व 2 शाखेमधून व्यवस्थापनाचे आदेशाचे विपरीत वर्तन करुन 10 दिवसापेक्षा जास्त कालावधी धनादेश वटविण्यास विलंब लावला यामध्ये त्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो.
9. तक्रारदारांनी आपल्या कथनाचे पृष्टयर्थ मा.राज्य आयोग, मुंबई यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीया विरुध्द जयश्री हब्बू या प्रकरणातील न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्या प्रकरणामध्ये देखील सा.वाले यांच्या पुणे शाखेने एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीत धनादेशाची रक्कम वटवून खात्यामध्ये जमा करण्यास वेळ काढला होता. जिल्हा ग्राहक मंचाने सा.वाले बँकेस दोष ठरवून र.10,000/- ची नुकसान भरपाई तक्रारदारांना अदा करावी असा आदेश दिला. मा. राज्य आयोगाने सा.वाले बँकेचे अपील फेटाळले व नुकसान भरपाईचा आदेश कायम केला. त्या प्रकरणामध्ये देखील नुकसान भरपाईची रक्कम रु.10,000/- होती.
10. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या पुराव्याचे खंडण करणेकामी चिपळूण शाखेतील संबंधीत कर्मचा-याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. व चिपळूण शाखेने कुरीयर व्दारे प्राप्त झालेले पाकीट स्विकारण्यास नकार दिला या बद्दल खुलासा केलेला नाही. या वरुन सा.वाले यांच्या कैफीयतीमधील खुलासा समाधानकारक नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
11. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीत असे कथन केले आहे की, वरील घटणेपूर्वी तक्रारदारांनी इतर व्यक्तींना दिलेले धनादेश तक्रारदारांच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटले गेले नव्हते व तक्रारदार हे त्या प्रवृत्तीचे खातेदार आहेत. या प्रकारची घटणा ही प्रस्तुतचे व्यवहाराशी संबंधीत नाही. व त्या घटनांचा परीणाम प्रस्तुतचे व्यवहारावर होऊ शकत नाही. त्या बद्दल नियमाप्रमाणे सा.वाले यांनी कार्यवाही केलेली आहे व रु.75/- दंडात्मक रक्कम तक्रारदारांकडून वसुल केलेली आहे. सबब तो मुद्दा गौण ठरतो.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 288/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी एकत्रितपणे तक्रारदारांना त्यांच्या खात्यामध्ये धनादेशाची रक्कम जमा करण्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी एकत्रितपणे तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रु.10,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदारांना खर्चाबद्दल रु.5000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये ही रक्कम आदेशाच्या न्याय निर्णयाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत जमा करावी करावी. अन्यथा विहीत मुदतीनंतर नुकसान भरपाईची रक्कमेवर 12 टक्के व्याजसह रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.