तक्रारदार : वकील श्री. महेश कदम यांचे सोबत हजर.
सामनेवाले : एकतर्फा
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले ही राष्ट्रीयकृत बँक आहे, तर तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्या जोगश्वरी (पूर्व), या शाखेमध्ये बचत खाते क्रमांक 10264335104 होते. तक्रारदारांना सामनेवाले यांच्याकडून धनादेशाचे पुस्तक प्राप्त झाले, ज्यामध्ये धनादेश क्रमांक 370250 ते 370280 देण्यात आले होते. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे त्यांनी धनादेश क्रमांक 370277 हा रुपये 8,20,500/- या रक्कमेकरीता दिला नव्हता परंतु दिनांक 26/4/2010 रोजी त्यांना त्यांच्या खात्यामधून धनादेश क्रमांक 370277 हा रुपये 8,20,500/- चा एका अन्य व्यक्तीच्या खात्यामध्ये सामनेवाले यांनी जमा केल्याचे दिसून आले. तक्रारदाराचे तक्रारीत असेही कथन आहे की, तक्रारदारांनी धनादेश क्रमांक 370278 हा रक्कम रुपये 1,40,000/- चा कुठल्याही व्यक्तीस दिला नव्हता परंतु त्याही धनादेशाची रक्कम सामनेवाले यांनी एका अन्य व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा केली. याप्रकारे या दोन्ही धनादेशाच्या संदर्भात सामनेवाले यांच्या शाखेने अनाधिकाराने व्यवहार करुन अन्य व्यक्तीच्या खात्यामध्ये रुपये 8,20,000/- व रुपये 1,40,000/- जमा केल्याचे तक्रारदारांनी कथन केले. तसेच सामनेवाले यांना याबद्दल नोटीस दिली. सामनेवाले यांनी रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली, व त्यामध्ये दोन्ही धनादेशांची रक्कम अधिक नुकसानभरपाई रुपये 25,000/- त्यांच्या बचत खात्यात जमा व्हावेत अशी मागणी केली.
2. सामनेवाले बँकेच्या जोगेश्वरी शाखेचे व्यवस्थापक यांनी आपली कैफीयत दाखल केली आहे, व त्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनास नकार दिला, व स्वतःच्या कृतीचे समर्थन केले.
3. तक्रारीमध्ये तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व जादा शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
4. सामनेवाले यांनी सुनावणीच्या दरम्यान तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 8,20,500/- ही रक्कम जमा केली, व तक्रारदाराने ही बाब मान्य केली. याबद्दल सामनेवाले बँकेचे पत्र दिनांक 13/5/2011 तक्रारदारांनी दाखल केले, त्यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये रुपये 8,20,500/- ही रक्कम जमा केल्याची बाब नमूद आहे. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यामधून रुपये 8,20,500/- धनादेश क्रमांक 370277 द्वारे कमी करण्याचा व्यवहार अनाधिकाराचा होता, ही बाब मान्य केल्याचे दिसून येते. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यातून दिनांक 19/’4/2010 रोजी रुपये 8,20,500/- ही रक्कम कमी केली, व ती दुस-या एका अन्य व्यक्तीच्या खात्यात जमा केली व त्यानंतर तक्रार प्रलंबित असतांना दिनांक 13/5/2011 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये रुपये 8,20,500/- ही रक्कम जमा केली, याप्रकारे तक्रारदाराच्या बचत खात्यातून रुपये 8,20,500/- दिनांक 19/4/2010 ते दिनांक 13/5/2011 च्या दरम्यान अनाधिकाराने कमी केली गेली होती, ही बाब स्पष्ट होते. सामनेवाले यांनी त्याबद्दल बचत खात्यात दिल्या जाणा-या व्याजाच्या दराने रक्कम जमा करणे आवश्यक होते. तक्रारदाराच्या बचत खात्यास मॉड सुविधा असल्याने मुदत ठेवीचा दर लागू होतो. त्यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 8,20,500/- वर दिनांक 19/4/2010 ते 13/5/2011 या कालावधीचे 9 टक्के दराने व्याज जमा करावे असा आदेश देणे योग्य व न्याय्य ठरते.
5. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, त्यांनी त्यांच्या बचत खात्यामधून 370278 क्रमांकाचा धनादेश कधीही दिला नव्हता, परंतु त्यांच्या बचत खात्यामधून रक्कम रुपये 1,40,000/- ही अनाधिकाराने कमी करण्यात आली. तक्रारदारांनी तक्रारीसोबत धनादेश क्रमांक 370278 दिनांक 24/4/2010 ची छायांकित प्रत दाखल केलेली आहे, त्यातील नोंदीवरुन असे स्पष्ट दिसते की, तक्रारदारांनी सदरील धनादेश श्री. अनिल मळेकर या व्यक्तीस रुपये 9,000/- या रक्कमेचा दिलेला होता. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे जादा शपथपत्र दिनांक 12/10/2012 रोजी दाखल केले व त्यासोबत आपल्या बचत खात्याच्या पासबूकाची छायांकित प्रत दाखल केली. त्यामधील नोंदीवरुन असे स्पष्ट दिसून येते की, तक्रारदाराच्या खात्यामधून दिनांक 27/4/2010 रोजी 370278 क्रमांकाचा रक्कम रुपये 1,40,000/- चा धनादेश एका अन्य व्यक्तीच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आला. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये तसेच पुराव्याच्या शपथपत्रामध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी रुपये 1,40,000/- रक्कमेचा धनादेश त्या खात्यामध्ये दिलेला नव्हता. तक्रारदारांनी तक्रारीसोबत 370278 क्रमांकाच्या धनादेशाची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्यामधील नोंदीवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी दिनांक 24/4/2010 रोजी श्री. अनिल मळेकर यांना त्या धनादेशाद्वारे रुपये 9,000/- अदा केले, तथापि तक्रारदारांच्या पासबूकातील दिनांक 27/4/2010 रोजीची नोंद असे दर्शविते की, एका अन्य व्यक्तीच्या खात्यामध्ये रुपये 1,40,000/- रक्कमेचा धनादेश क्रमांक 370278 द्वारे वळती करण्यात आला.
8. सामनेवाले यांची कैफीयत ही शपथपत्रावर नाही तर केवळ निवेदनाच्या स्वरुपात आहे. सामनेवाले यांनी पुराव्याचे शपथपत्र देखील दाखल केलेले नाही. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनास शपथपत्रावर नकार दिलेला नाही.
9. तक्रारदारांनी ओशिवरा पोलीस स्टेशन येथे दिनांक 29/4/2010 रोजी तक्रार नोंदविली त्यामध्ये धनादेश क्रमांक 370278 हा रक्कम रुपये 1,40,000/- असा स्पष्ट उल्लेख असून ती रक्कम श्री. सुभाष चौधरी, राहणार कानपूर, उत्तर प्रदेश यांच्या खात्यामध्ये अनाधिकाराने जमा करण्यात आला असे कथन केले होते. यावरुन धनादेश क्रमांक 377278 रक्कम रुपये 1,40,000/- तक्रारदाराच्या खात्यामधून दिनांक 27/4/2010 रोजी कमी झाल्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक 28/4/2010 रोजी तक्रारदारांनी ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये श्री. सुभाष चौधरी यांच्याविरुध्द तक्रार दिल्याचे दिसून येते. वरील बाब तक्रारदारांच्या कथनास पुष्टी देते. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यामधील कमी झालेली रक्कम रुपये 8,20,500/- तक्रारदारांच्या खात्यामध्ये परत जमा केली परंतु रुपये 1,40,000/- ही रक्कम मात्र धनादेश क्रमांक 377278 मधील कमी केलेली तक्रारदारांच्या खात्यात परत जमा केल्याचे मात्र दिसून येत नाही.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षानुरुप असे दिसून येते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 8,20,500/- परत जमा करीत असतांना दरम्यानच्या काळाचे व्याज मात्र जमा केले नाही व तक्रारदारांना सेवा सुविधा देण्यात कसूर केली. त्याचप्रमाणे तक्रारदारांना सामनेवाले यांनी त्यांच्या खात्यामधून दिनांक 27/4/2010 रोजी धनादेश क्रमांक 370278 यामधील कमी केलेली रक्कम रुपये 1,40,000/- परत तक्रारदार यांच्या बचत खात्यात जमा केली नाही व त्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. वरील दोन्ही रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना व्याजासह परत करावीत असा आदेश करणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे. पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 400/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या शाखा जोगेश्वरी (पूर्व) येथील बचत
खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात
येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये रुपये 8,20,500/- या
रक्कमेवर दिनांक 19/4/2010 ते 13/5/2011 या कालावधीचे 9 टक्के दराने
होणा-या व्याजाची रक्कम जमा करावी असा आदेश सामनेवाले यांना देण्यात
येतो.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या जोगेश्वरी (पूर्व) येथील बचत खात्यामध्ये रुपये
1,40,000/- ही रक्कम व त्यावर दिनांक 27/4/2010 पासून ते रक्कम जमा
करीपर्यंत 9 टक्के दराने होणा-या व्याजासह खात्यात जमा करावी असाही
सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो.
5. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 10,000/- अदा
करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 18/07/2013
( एस. आर. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-