तक्रारदार : वकील रमाकांत राऊत यांचे मार्फत सोबत हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.एन.डी.कदम, सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही बँकिंग कंपनी असून त्यांचे शाखा कार्यालय मालाडा, मुंबई येथे आहे. तर तक्रारदार हे मालाड मुंबई येथील रहीवासी असून सा.वाले यांच्या सदर शाखेत त्यांचे बचत खाते आहे.
2. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथना नुसार त्यांनी दिनांक 14.3.2008 रोजी एकाच पेइंग स्लीपमध्ये रु.42,734/- इतकी रक्कम समावेश असलेले दोन धनादेश आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी सा.वाले यांनी त्यांच्या शाखेमध्ये ठेवलेल्या धनादेश पेटीमध्ये टाकले. तथापी या दोन धनादेशापैकी रु.25,000/- रक्कमेचा धनादेश तक्रारदारांच्या खात्यामध्ये जमा झाला. परंतू रु.17,734/- रक्कमेचा धनादेश त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सा.वाले यांना अनेक वेळा पत्रे लिहून सदर अनियमितता निदर्शनास आणून दिली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांनी नमुद केलेला धनादेश आपल्या शाखेमध्ये जमा केलाच नव्हता असे उत्तर देऊन आपली जबाबदारी टाळल्याने, सदर बाब ही सा.वाले यांच्या सेवा सुविधा पुरविल्यामधील कसुर असल्याचे जाहीर करुन सदर धनादेशाची रक्कम रु.17,734/- , 18 टक्के व्याजासह आपल्या खात्यावर जमा करण्यात यावी. तसेच नुकसान भरपाई रु.50,000/- 18 टक्के व्याजासह मिळावी अशा मागण्या केल्या आहेत.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत तसेच शपथपत्र दाखल केले. तथापी सा.वाले यांनी तदनंतर आपला लेखी युक्तीवाद दाखल केला नाही व तोंडी युक्तीवादही केला नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतमध्ये तक्रारदारांचे तक्रारीमधील आरोप नाकारताना असे नमुद केले आहे की, तक्रारदारांनी नमुद केलेल्या व त्यांच्या खात्यावर जमा न झालेला तथाकथीत धनादेश सा.वाले यांच्या शाखेत जमा केला नसल्याने असा जमा न केलेला धनादेश क्लीयरिंग व वसुलीसाठी पाठविण्याचा प्रश्न येत नाही. तरीसुध्दा तक्रारदारांनी त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीस अनुसरुन सा.वाले यांनी सदर धनादेशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना असे आढळून आले की, तो धनादेश बँक ऑफ इंडिया, महेश्वरी उद्यान शाखेशी संबंधित होता व धनादेश देणा-या व्यक्ती/संस्थेने त्याचे अधिदान न करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे हा धनादेश अधिदानासाठी सादर करण्यात आला नाहीच, शिवाय धनादेश देणा-या व्यक्ती/संस्थेच्या खात्यामधून त्याची वसुलीही झालेली नाही.
4. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांनी आपली तक्रार, तक्रारीचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद दाखल केला आहे तर सा.वाले यांनी आपली कैफीयत व शपथपत्र दाखल केले आहे. यानंतर वेळोवेळी संधी देऊनसुध्दा सा.वाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला नाही. तसेच मंचा समक्ष कबुल केल्याप्रमाणे, प्रस्तुत तक्रारदारांनी धनादेशा बरोबर सा.वाले यांचेकडे जमा केलेली पेइंग स्लीप निरीक्षणासाठी उपलब्ध केली नाही.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तसेच सा.वाले यांनी दाखल केलेली कैफीयत व शपथपत्र यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांच्या शाखेमधील धनादेश संकलन पेटीमध्ये तक्रारदारांनी त्यांचे खात्यावर जमा करण्यासाठी टाकलेला धनादेश गहाळ करुन सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | सा.वाले यांच्या शाखेतील धनादेश संकलन पेटीमध्ये जमा केलेला परंतु तक्रारदारांच्या खात्यावर जमा न केलेल्या धनादेशामधील रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | तक्रारदार नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
4 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराने सा.वाले यांचे शाखेमधील धनादेश संकलनासाठी ठेवलेल्या पेटीमध्ये आपले रु.25,000/- व रु.17,734/- रक्कमेचे दोन वेग वेगळे धनादेश एकाच पेइंगस्लीपमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टाकल्याचे तक्रारदारांनी दाखल केलेल्या पेइंगस्लीपच्या कौंटरस्लीपवरुन दिसून येते. या दोन धनादेशापैकी रु.25,000/- रकमेचा एक धनादेश तक्रारदारांच्या खात्यामध्ये जमा झाला व दुसरा धनादेश क्र. 424 मधील रक्कम रु.17,734/- तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली नसल्याचे त्यांनी कथन केले आहे.
या संदर्भात प्रस्तुत मंचास असे नमुद करावेसे वाटते की, तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये अथवा सा.वाले यांचेशी गहाळ झालेल्या धनादेशाबाबत पत्रव्यवहार करतांना सदर धनादेश त्यांना कोणाकडून प्राप्त झाला होता हे व इतर तपशिल नमुद करण्याचे टाळले आहे. शिवाय धनादेशाची रक्कम आपल्या खात्यावर जमा न झाल्याचे समजल्यानंतर, तक्रारदारांनी ज्या व्यक्ती/संस्थेकडून धनादेश प्राप्त झाला त्यांचेशी गहाळ धनादेशा बाबतची मौखीक चर्चा अथवा लेखी पत्र व्यवहार केला किंवा कसे या बद्दलसुध्दा मौन बाळगले आहे. यापुढे जाऊन असे नमुद करणे अनिवार्य आहे की, तक्रारदारास ज्या व्यक्ती संस्थेकडून धनादेश प्राप्त झाला त्या धनादेशाची रक्कम रु.17,734/- , दिनांक 14.3.2008 पासून तक्रार दाखल करेपर्यत म्हणजे दिनांक 5.3.2010 पर्यत तक्रारदारांना मिळाली नसल्याने प्रस्तुत तक्रारीमध्ये सा.वाले यांचेसह ज्या व्यक्ती/संस्थेकडून धनादेश प्राप्त झाला होता. त्यांचे विरुध्दसुध्दा दाद मागणे कायदेशीर व न्यायोचित असतांना त्यांना का सम्मीलीत केले नाही, ही बाबसुध्दा आक्षेपार्ह वाटते. या संदर्भात तक्रारदारांनी परिशिष्ट ब पृष्ट क्र.10 वरील दिनांक 19.11.2008 रोजी सा.वाले यांना पाठविलेल्या पत्राचे शेवटी आपले नांव अॅटव्होकेट एस.के.कलाल असे नमुद केले आहे. त्यामुळे सकृत दर्शनी तक्रारदार हे वकील असल्याचे दिसून येते. ही बाब विचारात घेता उपरोक्त नमुद केलेल्या त्रृटी जास्त गंभीर वाटतात.
7. प्रस्तुत प्रकरणामध्ये सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये, तक्रारदारांनी नमुद केलेला धनादेश आपल्या शाखेत जमा केलाच नव्हता असे कथन केले. तसेच तक्रारदारांनी या बाबत तक्रार केल्यानंतर सदर गहाळ धनादेशाबाबत चौकशी चालु केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की, हा धनादेश बँक ऑफ इंडिया , महेश्वरी उद्यान शाखेवर काढलेला असून धनादेश देणा-या व्यक्ती/संस्थेने, तक्रारदारांनी सदर तथाकथीत धनादेश सा.वाले यांच्या शाखेत दिनांक 14.3.2008 रोजी जमा करण्यापूर्वीच एक दिवस अगोदर म्हणजे दिनांक 13.3.2008 रोजी, सदर धनादेशाचे अधिदान थांबविण्याचे आदेश उपरोक्त शाखेस दिले होते व त्यामुळे सदर धनादेश अधिदानासाठी दाखल झाला नव्हता व धनादेश देणा-या व्यक्ती/संस्थेच्या खात्यावर नावे झाला नव्हता. शिवाय ही माहिती शपथपत्राव्दारे नमुद करतांना सदर धनादेश क्लीयरिंगसाठी आपल्या मार्फत गेला नसल्याचे सा.वाले यांनी नमुद केले आहे.
8. या संदर्भात प्रस्तुत मंचास असे नमुद करणे क्रमप्राप्त वाटते की, तक्रारदारांचा गहाळ झालेला धनादेश दिनांक 14.3.2008 रोजीचा असल्याचे मान्य केले तरी सदर धनादेशाची कायदेशीर चलनक्षमता सहा महिन्यांनी म्हणजे उशिरात उशिरा दिनांक 15.9.2008 पर्यत संपुष्टात आली होती व तो पर्यत या धनादेशाचे पैसे आपल्या खात्यावर जमा न झाल्याचे तक्रारदारास चांगल्या प्रकारे माहित झाले होते. त्यामुळे तक्रारदारांनी ज्या कुणा कडून त्यांना धनादेश मिळाला होता त्यांचेकडून नविन धनादेश घेणे आवश्यक होते कारण त्यांना पूर्वी दिलेल्या धनादेशाचे मुल्य शुन्य झाले होते. तथापी तक्रारदारांनी अशी कोणतीही कार्यवाही न करता सा.वाले यांचेकडूनच बाद/रद्द झालेल्या धनादेशामधील रक्कम मिळावी असा अट्टाहास धरलेला दिसतो. या बाबत तक्रारदारांनी कागदोपत्री पुरावा म्हणून पेइंगस्लीपचा कौटरपार्ट दाखल केलेला आहे. परंतु तक्रारदारांचा धनादेश तक्रार दाखल करेपर्यत वटला नसल्याने धनादेश देणा-याचे खात्यामधून तेवढी रक्कम नांवे झाल्याचे उपलब्ध कागदपत्रावरुन दिसून येत नाही. शिवाय तक्रार दाखल करतेवेळी तक्रारदारांचा तो धनादेश कायदेशीरदृष्टया चलनक्षम नसल्यामुळे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याचे तक्रारदार सिध्द करण्यास पूर्णतः अपयशी ठरले आहेत.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 141/2010 रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले यांच्या धनादेश संकलन पेटीमध्ये, तक्रारदारांनी
जमा केलेला धनादेश सामनेवाले यांनी गहाळ करुन सेवा
सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द
करु शकले नाहीत असे जाहीर करण्यात येते. त्यामुळे
धनादेशाची रक्कम,नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास
तक्रारदार अपात्र आहेत.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 18/06/2013