अॅड किरण घोणे तक्रारदारांतर्फे
अॅड निशा रुईकर जाबदेणारांतर्फे
द्वारा- मा. श्री. मोहन पाटणकर, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 27/6/2014
[1] प्रस्तुत तक्रार ही तक्रारदार आणि बँकिंग सेवा देणारे जाबदेणार यांचेमधील असून, जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदार यांची मानसिक, शारिरीक व आर्थिक हानी झाली या कारणावरुन आहे. तक्रारदारांचे यासंबंधाने कथन आहे.
[2] तक्रारदारांचे जाबदेणार यांचे बॅंकेत सॅलरी सेव्हिंग खाते असून व्यवहारासाठी जाबदेणार यांनी तक्रारदारास ए.टी.एम कार्ड दिलेले आहे. तक्रारदारांनी दिनांक 6/1/2008 रोजी त्यांचेकडील ए.टी.एम कार्ड वापरुन त्यांचे खात्यातील रुपये 15,000/- ची रक्कम काढली. तसेच त्याचवेळी आणखी रुपये 15,000/- ची रक्कमही काढली. तक्रारदारांनी बँकेकडील व्यवहार पहाता तक्रारदारांचे नावे रुपये 30,000/- ऐवजी रुपये 15,000/- फक्त टाकले गेले आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी व्यवहार दुरुस्त करुन एकूण रुपये 30,000/- त्यांचे नावे टाकण्याची विनंती जाबदेणार यांनी केली. त्यानुसार जाबदेणार यांनी तक्रारदारांचे खात्यावरील शिलकीतून रुपये 30,000/- वजा केले. तक्रारदारांकडे आय.सी.आय.सी.आय या दुस-या एका बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. घटनेच्या दिवशी त्याच ए.टी.एम मशिन मधून
दुस-यांदा काढलेले रुपये 15,000/- या क्रेडिट कार्डचा वापर करुन काढले असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तक्रारदारांनी जादा वजावट झालेले रुपये 15,000/- त्यांचे खात्यावर जाम करुन देण्याची विनंती जाबदेणार यांना केली. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला व विनंतीपत्रे पाठविली. मात्र जादा वजावट झालेले रुपये 15,000/- पुर्नस्थापित करण्यासाठी जाबदेणार यांनी पाच ते सहा महिन्यांचा विलंब केल्यामुळे, तक्रारदारांना क्रेडिट कार्डवर घेतलेल्या रकमेच्या पुर्ततेसाठी मोठे व्याज भरावे लागले. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांचे आर्थिक, शारिरीक व मानसिक हानी झाल्यामुळे ते भरपाई आणि खर्चाची मागणी करतात.
[3] जाबदेणार यांनी त्यांचे कथनाद्वारे तक्रारदारांचे म्हणणे पूर्ण फेटाळले आहे. तक्रारदार यांनी अर्ज केल्यावरुनच त्यांचे खात्यावरुन रुपये 15,000/- वजावट केले आहेत. त्यानंतर व्यवहाराची पडताळणी करुन, तक्रारदारांची रक्कम परत केलेली आहे. त्यासाठी लागलेला कालावधी वाजवी आहे. सबब प्रस्तूतची तक्रार खर्चासह फेटाळण्याची मागणी केली आहे.
[4] या प्रकरणातील कथने, प्रतिज्ञापत्रे आणि अन्य कागदपत्रे विचारात घेता, मंचासमोर खालील मुद्ये उपस्थित होतात. सदरील मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणा-यांचे सेवेमध्ये त्रुटी आहेत काय | होय |
2 | जाबदेणार हे भरपाई देण्यासाठी पात्र आहेत काय | होय |
3 | आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 3-
[5] तक्रारदारांनी दुस-या बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करुन रुपये 15,000/- ची रक्कम जाबदेणार यांचे ए.टी.एम मशिन मधून काढलेली आहे. एकाच मशिन मधून त्याचदिवशी दोन वेगवेगळया बँकाकडील एकूण रक्कम रुपये 30,000/- काढलेली आहे. परंतू दुस-यांदा काढलेली रक्कम सुध्दा जाबदेणार यांचेकडील तक्रारदारांच्या खात्यातूनची काढली असा चुकीचा ग्रह करुन घेऊन, व्यवहार दुरुस्त करुन रुपये 15,000/- ऐवजी रुपये 30,000/- नावे टाकण्याची विनंती जाबदेणार यांना केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे विनंतीमुळे पुन्हा रुपये 15,000/- तक्रारदारांच्या नावे टाकले. जाबदेणार ही बँकींग सेवा देणारी जबाबदार संस्था आहे. व्यवहाराची पडताळणी, शहानिशा न करता केवळ विनंतीवरुन खातेदाराची रक्कम तत्परतेने नावे टाकण्याची कृती जाबदेणार बँकेची अधिकृत व नियमित कार्यपध्दती आहे काय ? याबाबत जाबदेणार यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. मात्र नावे टाकण्यात आलेली तक्रारदारांची अतिरिक्त रक्कम रीव्हर्स करण्यास लागलेला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी हा यथायोग्य आहे, कारण व्यवहाराची शहानिशा करणे आवश्यक आहे, कारण व्यवहाराची शहानिशा करणे आवश्यक होते हा जाबदेणार यांचा मुद्या तर्कसंगत नाही. याबाबत तक्रारदारांनी सातत्याने पत्रे पाठवून नावे टाकलेली रक्कम तात्काळ रीव्हर्स होणेबाबत विनंती केली आहे; यापोटी तक्रारदारास दुस-या बँकेस खूप मोठे व्याज दयावे लागलेले आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांची रुपये 15,000/- ची रक्क्म पाच ते सहा महिन्यांसाठी बिनव्याजी वापरली असून सदर बाब जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे निष्कर्ष आहेत. सबब तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांची रक्कम रुपये 15,000/-
नावे टाकल्याच्या दिनांकापासून ही रक्कम रीव्हर्स करेपर्यन्तच्या कालावधीसाठी बचत बँकेच्या व्याजदरानुसार तक्रारदार यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. वरील आदेशाप्रमाणे देय रक्कम दिलेल्या मुदतीत जाबदेणार यांनी प्रदान न केल्यास त्यावर द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याज दयावे.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ-पुणे
दिनांक-27/6/2014