मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या. - आदेश - (पारित दिनांक – 24/08/2011) 1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्ता हा गैरअर्जदार यांचा इंटरनॅशनल कार्ड क्र. 431757502436067 चा धारक होता. दि.30.05.2004 रोजी तक्रारकर्त्याला सदर कार्ड प्राप्त झाले. त्यानंतर तक्रारकर्त्याने रु.200/- च्या वस्तू खरेदी केल्या, त्याचे पेमेंट गैरअर्जदार यांनी पाठविलेल्या प्रतिनीधीमार्फत तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांना अदा केले. तशी पावती गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास दिली. त्यानंतर तक्रारकर्त्याने ए.टी.एम.द्वारे रु.3,000/- काढले. त्याबाबतचे स्टेटमेंट तक्रारकर्त्यास दि.19.09.2004 रोजी मिळाले. तक्रारकर्त्याने एस.बी.आय. कार्डच्या नियमावलीनुसार त्यांच्या जवळच्या एस.बी.आय. शाखा छावणी, नागपूर येथे दि.04.10.2004 रोजी रु.3,502/-चा चेक टाकला. त्यानंतर तक्रारकर्त्याला पैसे न मिळाल्याचे मंथली स्टेटमेंट मिळाले. तक्रारकर्त्याने सदर बाबीसंदर्भात चौकशी केली असता गैरअर्जदार यांच्या ग्राहक सेवा केंद्रातील व्यक्तीद्वारे चेक मिळाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. गैरअर्जदार यांच्या सदर कार्डचा नियम व नियमावली मधील नियम क्र. 6/3 व 6/5 नुसार मंचाने स्टेटमेंट मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत शिल्लक रक्कम खात्यामध्ये जमा करणे आवश्यक असते. त्यानुसार तक्रारकर्त्याने सदर चेक सदर दिवशी म्हणजेच 04.10.2004 रोजी टाकला. सदर चेक दि.04.01.2004 रोजी गैरअर्जदार यांच्या खात्यात जमा झालेला आहे. सदर प्रकरणामुळे तात्काळ तक्रारकर्त्याने दि.23.11.2004 रोजी सदर कार्डची सेवा बंद करण्याकरीता यू.पी.सी.द्वारे गैरअर्जदारांना पत्र पाठविले. त्यांनी सुचति केले की, तक्रारकर्त्याने सदर कार्डाचे तुकडे करुन वापर टाळावा. गैरअर्जदार यांनी त्यानंतरही वारंवार मंथली स्टेटमेंट पाठविले. 19.09.2010 रोजी शिल्लक रकमेबाबत स्टेटमेंट पाठवून तक्रारकर्त्यावर लेट फी व दंड म्हणून रु.12,077/- आकारले. वास्तविक तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडे पूर्ण पैसे अदा केलेले होते असे असतांना देखील वारंवार मंथली स्टेटमेंट पाठवून गैरअर्जदार तक्रारकर्त्यांना मानसिक व शारिरीक त्रास देतात ही गैरअर्जदार यांची सेवेतील कमतरता आहे, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन मंथली स्टेटमेंट नाकारावे, नोटीसचा खर्च मिळावा, मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई मिळावी, प्रकरणाचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना प्राप्त झाली. गैरअर्जदार क्र. 1 हे मंचात हजर झाले नाही व प्रकरणात लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून त्यांचेविरुध्द मंचाने दि.01.04.2011 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र. 2 हे मंचात हजर झाले व मंचाने त्यांना लेखी उत्तर दाखल करण्याकरीता वारंवार संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द विना लेखी जवाब कारवाई चालविण्याचा आदेश दि.24.05.2011 रोजी पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यानंतर उभय पक्ष व त्यांचे वकील गैरहजर, म्हणून मंचाने सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्याचे ठरविले. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. निर्विवादपणे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार यांचा इंटरनॅशनल कार्ड क्र. 431757502436067 चा धारक होता हे दस्तऐवज क्र. 8 वरुन स्पष्ट होते. दस्तऐवज क्र. 10 वरील मंथली स्टेटमेंट पाहता गैरअर्जदारांकडून दि.19.09.2004 रोजी तक्रारकर्त्याला एकूण बाकी (टोटल आऊटस्टँडीग) पोटी रु.3501.16 चे स्टेटमेंट मिळाल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याचे शपथपत्र, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेशी केलेला पत्रव्यवहार, नोटीस वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने सदर एकूण बाकी (टोटल आऊटस्टँडीग) पोटी रु.3501/- चा चेक क्र.599271, दि.04.10.2004 ला एस.बी.आय. शाखा छावनी, नागपूर येथे टाकला होता. पासबुकच्या प्रतीवरील नोंदीवरुन सदर रक्कम दि.04.11.2004 रोजी गैरअर्जदार यांचेकडे वळती झाल्याचे दिसून येते. 5. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याचे सदर कथन नाकारण्यासाठी आपला जवाब सादर केला नाही. तसेच कुठलाही कागदोपत्री पुरावाही या मंचापुढे दाखल केला नाही. तक्रारकर्त्याकडे एकूण देय रकमेची थकबाकी दर्शविण्याकरीता गैरअर्जदारांनी कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथन की, त्यांनी दि.19.09.2004 रोजीच्या देय थकबाकीपोटी रु.3,502/- चा चेक क्र.599271, एस.बी.आय.च्या नियमाप्रमाणे 30 दिवसाच्या आत दि.04.10.2004 ला एस.बी.आय. शाखा छावनी, नागपूर येथे टाकला होता हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंच मान्य करते. तसेच दाखल दस्तऐवजांवरुन सदर रक्कम गैरअर्जदार यांचेकडे वळती झाल्याचेही निदर्शनास येते. गैरअर्जदार यांनी सदरचा चेक वेळेत कार्यवाही करुन जमा केला नाहीतर, त्यासाठी तक्रारकर्त्यास जबाबदार धरता येणार नाही. असे असतांना गैरअर्जदार यांना देय रक्कम अदा करुनही वारंवार आऊटस्टँडीग पोटी तक्रारकर्त्यास रकमेचे स्टेटमेंट पाठविणे व त्या संदर्भात वारंवार तक्रारकर्त्याने स्पष्टीकरण देऊनही त्याची दखल न घेणे ही गैरअर्जदार यांची कृती निश्चितच तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे व गैरअर्जदार यांच्या सदरच्या कृतीमुळे निश्चितच तक्रारकर्त्यांना मानसिक व शारिरीक त्रास झाले आहे व त्याकरीता गैरअर्जदार हे जबाबदार आहे असे या मंचाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास पाठविलेले दि.19.12.2004 ते 19.09.2010 या कालावधीचे या प्रकरणात सादर केलेले मंथली स्टेटमेंट या आदेशांन्वये रद्द करण्यात येते. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना वैयक्तीक वा संयुक्तीक रीत्या रु.3,000/- मानसिक व शारिरीक त्रासाबाबत व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तीक रीत्या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |