तक्रारदार : स्वतः वकीलासोबत हजर. सामनेवाले 1 व 2 : एकतर्फा. सामनेवाले 3 : वकील श्री.दिलीप महाडीक यांचे मार्फत हजर -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 हे स्टेट बँक ऑफ इंडीया आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 चा क्रेडीट कार्ड विभाग आहे. सा.वाले क्र.3 हे विमा कंपनी आहे. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना डिसेंबर, 2006 मध्ये क्रेडीट कार्डची सुविधा पुरविली होती. व त्याचा वापर तक्रारदार करीत होते. तक्ररदारांना दिनांक 10.1.2007 ते 10.2.2007 या कालावधीच्या क्रेडीट कार्डचे विवरणपत्र प्राप्त झाले व त्यामध्ये रु.5,220/- येवढी रक्कम तक्रारदारांचे नांवे दाखविली होती. तक्रारदारांना असे दिसून आले की, सा.वाले यांनी तक्रारदारांची संमती घेतल्याशिवाय विमा करार उतरविला व विमा कराराचा हप्ता परस्पर सा.वाले क्र.3 विमा कंपनीकडे पाठविला. तक्रारदारांनी करारनाम्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यावर अनाधिकाराने व्यवहार करुन काही रक्कम नांवे टाकली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडे आपले आक्षेपाचे पत्र पाठविले. सा.वाले क्र.3 यांनी विमा हप्त्यापैकी निम्मी रक्कम रुपये 2,166/- तकारदारांचे खात्यामध्ये जमा केले. परंतु बाकी रक्कम तक्रारदारांचे खात्यामध्ये जमा केली नाही. या बाकी रक्कमेवर सा.वाले क्र.1 व 2 यांनी व्याज आकारले. व येणे बाकी रक्कम दाखविली. तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हे सा.वाले क्र.1 व 2 यांनी क्रेडीट कार्डबाबत कुठलीही रक्कम देणे नाही. या प्रमाणे तक्रारदारांनी प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड वापराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांकडून क्रेडीट कार्डचे संदर्भात कुठलीही बाकी वसुल करु नये व तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी केली. 2. सा.वाले क्र.1 व 2 यांना नोटीस बजावल्यानंतरही सा.वाले गैरहजर राहीले व त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले. 3. सा.वाले क्र.3 विमा कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये सा.वाले क्र.1 व 2 यांच्या सूचनेप्रमाणे विमा करार करण्यात आला होता व सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडून विम्याचा हप्ता प्राप्त झाला होता. तथापी तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना विमा करार रद्द करण्याची विनंती केल्याने सा.वाले क्र.3 यांनी तो करार रद्द केला. तथापी तक्रारदारांनी ही विनंती विमा पॉलीसी प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यानंतर केलेली असल्याने फक्त 50 टक्के रक्कम परत करण्यात आली. या प्रमाणे सा.वाले क्र.3 यांनी विमा कराराचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला. 4. तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. त्यामध्ये सा.वाले क्र.3 यांच्या कैफीयतीमधील कथने नाकारली. तक्रारदार व सा.वाले क्र.3 यांनी त्यांचा नकार व कैफीयतीसोबत जोडलले शपथपत्र हेच पुराव्याचे शपथपत्र समजावे असे निवेदन दिले. दोन्ही बाजुंनी आवश्यक ती कागदपत्रं दाखल केली व लेखी युक्तीवाद दाखल केला. 5. प्रस्तुतचे मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले व त्यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे व्यवहाराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तकारदार तक्रारीमध्ये दिलेले निर्देश प्राप्त करण्यास पात्र आहेत काय ? | होय. | 3 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई व खर्चाची रक्कम प्राप्त करण्यास पात्र आहेत काय ? | होय- खर्चा बद्दल रुपये 10,000/- | 4 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत जानेवारी, 2007 रोजीचे क्रेडीट कार्डचे विवरणपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये दिनांक 29.12.2007 रोजी सा.वाले क्र.3 यांना रु.4,331/- अदा केल्याबद्दल नोंद आहे. सा.वाले क्र.3 यांनी असे कथन केले आहे की, सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर व कराराप्रमाणे विम्याची पॉलीसी तक्रारदारांना पाठविण्यात आलेली होती. तथापी सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांची विमा कराराबद्दल संमती होती असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. या उलट सा.वाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना दिनांक 30 जुलै, 2007 रेाजी ई-मेल संदेश पाठविला आहे त्यामध्ये असे नमुद केले आहे की, टेलीफोनवरील संभाषणावरुन तक्रारदारांचे नांवे विमा पॉलीसी काढण्यात आली. सा.वाले क्र.3 यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये देखील याच प्रकारचे कथन केलेले आहे. या प्रकारे तक्रारदारांनी विमा कराराचे संदर्भात लेखी संमती दिली होती असा कुठलाही पुरावा सा.वाले दाखल करु शकले नाहीत. विम्याची पॉलीसी हा करार असल्याने त्या बद्दल विमा धारकाची संमती असणे आवश्यक असते. केवळ दूरध्वनीवरील चर्चेमुळे या प्रकारची पॉलीसी देण्यात आली हे सा.वाले यांचे कथन संयुक्तीक वाटत् नाही. त्यातही तक्रारदारांनी सा.वाले यांना दूरध्वनीवर या प्रकारची सूचना दिली होती असे कथन नाकारलेले आहे. मुळातच तक्रारदारांची विमा कराराबद्दल संमती असतीतर तक्रारदारांनी विम्याचा करार रद्द करण्याचे काही कारण नव्हते. परंतु सा.वाले यांचेकडून क्रेडीट कार्डचे विवरणपत्र प्राप्त झाले व तक्रारदारांना विमा कराराची माहिती प्राप्त झाली व त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडे विमा करार रद्द करण्याबद्दल अर्ज पाठविला. 7. सा.वाले क्र.3 यांनी विमा करारापोटी प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम रु.2,166/- तक्रारदारांना परत केली. व क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये त्याबद्दलची जमा नोंद दाखविण्यात आली. मुळातच तक्रारदारांनी विमा कराराबद्दल संमती दिलेली नसल्याने विमा करार रद्द करण्याची तक्रारदारांची विनंती एक महिन्यानंतर प्राप्त झाली असे समजून सा.वाले क्र.3 यांनी 50 टक्के रक्कम कमी करावयास नको होती. कारण मुळातच तक्रारदाराची विमा कराराबद्दल संमती नव्हती. व त्यांच्या समंतीशिवाय सा.वाले क्र.1 व 2 यांनी विमा कराराची प्रक्रिया पूर्ण केली. सा.वाले क्र.3 यांनी निम्मी रककम परत केल्यानंतर शिल्लक रक्कमेवर सा.वाले क्र.1 व 2 यांनी व्याज आकारले. त्यामुळे येणे बाकी रक्कम रु.4,160/- दिसून आली. हा सर्व व्यवहार सा.वाले यांनी तक्रारदारांचे संमतीशिवाय व अनाधिकाराने केलेला असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना पूर्ण रक्कम परत द्यावयास पाहीजे होती परंतु केवळ 50 टक्के रक्कम परत करण्यात आली. दरम्यान शिल्लक रक्कमेवर सा.वाले क्र.1 व 2 यांनी व्याज आकारले. त्यामुळे देय रक्कमेत वाढ होत राहीली. 8. वरील परिस्थितीमध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डच्या वापराचे संदर्भात सुवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. त्याच प्रमाणे सा.वाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांनाकडून क्रेडीट कार्डच्या बाकी बद्दल कुठलीही रक्कम परत मागू नये असा निर्देश देणे योग्य राहील असे मंचाचे मत झाले आहे. 9. तक्रारदारांना वरील निष्कर्षा व्यतिरिक्त सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई रक्कम रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु नुकसान भरपाईबद्दल दाद देणे जाचक होईल असे प्रस्तुत मंचाचे मत झाले असल्याने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रक्कम रु.10,000/- सा.वाले यांनी अदा करावेत असा आदेश देणे योग्य राहील असे मंचाचे मत झाले आहे. 10. वरील निष्कर्ष व चर्चेवरुन पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 438/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांचे क्रेडीट कार्ड क्रमांक 5264 8654 2404 2586 च्या खाते बाकी बद्दल काहीही रक्कम तक्रारदारांकडून वसुल करु नये असे निर्देश सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना देण्यात येतात. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 व 3 यांनी एकत्रितपणे तक्रारदारांना खर्चाबद्दल रुपये 10,000/- म्हणजे प्रत्येकी रुपये 5000/- अदा करावेत असे निर्देश सामनेवाले क्र.1 व 3 यांना देण्यात येतो. 3. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता प्रस्तुत आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत अदा करावी असा आदेश देण्यात येतो. अन्यथा मुदत संपल्यानंतर त्या रक्कमेवर 9 टक्के व्याज द्यावे. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |