Maharashtra

Nagpur

CC/13/29

Chandabai wd/o Dilip Ramteke - Complainant(s)

Versus

State Bank of India - Opp.Party(s)

S.K.Paunikar

02 Feb 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/29
 
1. Chandabai wd/o Dilip Ramteke
r/o c/o Gulab Bagade, Near Milind Budha Vihar, Rambag, Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. State Bank of India
through its Asstt. General Manager, Region-II, Zonal Office, Railway Station Road, Civil Lines, Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:S.K.Paunikar , Advocate
For the Opp. Party:
ORDER

आ दे श  -

 (पारित दिनांक – 02 फेब्रुवारी, 2015)

 

                  तक्रारकर्तीने  ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे.

 

1.          तक्रारकर्तीचे मृतक पती दिलीप रामटेके हे मॉडेल मिल, नागपूर येथे नोकरीस होते. त्‍यांच्‍या हयातीत त्‍यांचे स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या मेडिकल शाखा, नागपूर येथे बचत खाते होते. मॉडेल मिल बंद झाल्‍यामुळे मिल व्‍यवस्‍थापनाकडून तक्रारकर्तीच्‍या पतीला दि.23.12.2003 रोजी रु.1,72,839/- चा धनादेश देण्‍यांत आला होता. तो त्‍यांनी वि.प.क्र. 2 स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या मेडिकल शाखेत आपल्‍या खात्‍यात जमा करण्‍यासाठी दिला. परंतु वि.प.क्र. 2 ने सदर धनादेशाची रक्‍कम वि.प.क्र.2 ने तक्रारकर्तीचे पती हयात असेपर्यंत त्‍यांच्‍या खात्‍यात जमा केली नाही.  तक्रारकर्तीचे पती आजारी असल्‍यामुळे त्‍यांना उपचारासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यांत आले होते, त्‍यावेळी तक्रारकर्तीने त्‍यांच्‍या कागदपत्रांची पाहणी केली असता तिला तिच्‍या पतीला वि.प.क्र. 2 ने दिलेले पासबुक व त्‍यांत त्‍यांनी वि.प.क्र. 2 कडे डिसेंबर 2003 च्‍या शेवटच्‍या आठवडयात जमा केलेल्‍या उपरोल्‍लेखित धनादेशाची झेरॉक्‍स प्रत मिळाली. तिने पासबुकातील नोंदी पाहिल्‍या असता सदर धनादेशाची रक्‍कम जमा केल्‍याची नोंद पासबुकात दिसली नाही.

 

                  तक्रारकर्तीच्‍या पतीला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधून डिस्‍चार्ज मिळाल्‍यावर त्‍यांनी आपल्‍या जावयाबरोबर वि.प.क्र. 2 कडे धनादेशाची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यात जमा न झाल्‍याबाबत चौकशी केली, परंतु वि.प.क्र. 2 ने त्‍यांना प्रतिसाद दिला नाही व त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याची दखल घेतली नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीने त्‍यांच्‍या हयातीत दोन वेळी अर्ज देऊन धनादेशाची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करण्‍याची वि.प.क्र. 2 ला विनंती केली, परंतु वि.प.ने त्‍याकडे लक्ष दिले नाही आणि धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या खात्‍यात जमा केली नाही. तक्रारकर्तीचे पती दि.28.12.2008 रोजी मरण पावले. त्‍यांचे पश्‍चात तक्रारकर्ती ही त्‍यांची वारस आहे.

 

                  तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या  मृत्‍यूनंतर तक्रारकर्ती स्‍वतः वि.प.क्र. 2 च्‍या कार्यालयात गेली आणि तिच्‍या पतीच्‍या धनादेशाचे पैसे कां जमा केले नाही याची विचारणा केली असता त्‍यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने पंजाब नॅशनल बँक, शाखा किंग्‍जवे, नागपूर यांचेकडून दि.20.6.2011 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने निर्गमित केलेला धनादेश क्र. 103730 दि.23.12.2003 रु.1,72,839/- ची झेरॉक्‍स प्रत प्राप्‍त केली आणि ती वि.प.क्र. 2 च्‍या कार्यालयात नेऊन दाखविली. त्‍यानंतर वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीस वारसान प्रमाणपत्र सादर करण्‍यांस सांगितले ते तक्रारकर्तीने सादर केल्‍यावर वि.प.क्र.2 ने तक्रारकर्तीच्‍या खात्‍यात दि.21.04.2011 रोजी रु.1,87,835/- जमा केले.

 

                  दि.23.12.2003 पासून वि.प.क्र. 2 ने धनादेशाची रक्‍कम रु.1,72,839/- तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या खात्‍यात जमा न करता स्‍वतः बेकायदेशीररित्‍या वापरली, म्‍हणून सदर रकमेवर व्‍याज देण्‍याची तक्रारकर्तीने वि.प. क्र.2 ला मागणी केली, परंतु त्‍यांनी दिली नाही. म्‍हणून सदर रकमेवर डिसेंबर 2003 पासून नोव्‍हेंबर 2011 पर्यंत द.सा.द.शे. 24 टक्‍केप्रमाणे येणारी व्‍याजाची रक्‍कम रु.3,28,392/- आणि  शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून तक्रारीत मागणी केली आहे.

 

                  तक्रारकर्तीने तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ धनादेशाची सत्‍यप्रत, मृतक दिलीप रामटेके यांच्‍या पासबुकची प्रत, मृत्‍यु प्रमाणपत्र, बँकर्स चेक, तक्रारकर्तीने वि.प.ला दिलेल्‍या पत्रांच्‍या प्रती व वि.प.ने माहितीच्‍या अधिकारांतर्गत दिलेले उत्‍तर इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.    

 

2.                मंचातर्फे विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 ला पाठविलेली नोटीस मिळून ते हजर झाले आणि लेखी जबाब दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. त्‍यांचा प्राथमिक आक्षेप असा कि, तक्रारकर्तीच्‍या पतीने वि.प.क्र. 2 कडे दि.23.12.2003 रोजी जमा केलेल्‍या धनादेशासंबंधाने सदरची तक्रार दि.01.01.2013 रोजी दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचा दि.28.12.2008 रोजी मृत्‍यू झाल्‍यानंतर मयताच्‍या मुलीने पहिल्‍यांदाच दि.05.02.2009 रोजी बॅकेला मयत दिलीप रामटेके याने जमा केलेल्‍या धनादेशाची रक्‍कम त्‍याच्या खात्‍यात जमा झाली नसल्‍याचे कळविले. तक्रारीस कारण 2003 मध्‍ये घडले असून तक्रार 2013 मध्‍ये दाखल केली असल्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 A प्रमाणे मुदत बाह्य असल्‍याने मंचाला सदर तक्रारीची दखल घेऊन चालविता येत नसल्‍याने तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

                  वि.प.चे पुढे म्‍हणणे असे कि, मृतक दिलीप रामटेके यांनी डिसेंबर 2003 मध्‍ये जमा केलेला रु.1,72,839/- चा पंजाब नॅशनल बॅकेने निर्गमित केलेला धनादेश “Dilip Raghojee” या नावाने होता मात्र मयताचे नांव सेव्हिंग बँक खात्‍यावर   “ Ramteke Dilip Rajhoji” असे होते. बॅंकेने मृतकाच्‍या नावातील चुक लक्षात आणून दिली आणि चुक दुरुस्‍तीबाबत आवश्‍यक कार्यवाही करण्‍यास सुचित केले होते, परंतु त्‍याने चुक दुरुस्‍तीची कार्यवाही केली नाही, म्‍हणून धनादेश मृतकाच्‍या खात्‍यात जमा करता आला नाही.

 

                  दिलीप रामटेकेच्‍या दि.28.12.2008 रोजी झालेल्‍या मृत्‍यूनंतर प्रथमच त्‍याच्‍या मुलीने 05.02.2009 रोजी मयताच्‍या नावाने जमा केलेल्‍या धनादेशाची रक्‍कम त्‍याच्‍या खात्‍यात जमा झाली नसल्‍याचे बॅकेला कळविले. बॅकेने पुन्‍हा नावातील चुकीबाबत तक्रारकर्तीस कळविले व  नांवातील चुकीच्‍या दुरुस्‍तीनंतर दि.10.02.2009 रोजी मयताच्‍या खात्‍यात रु.1,72,839/- जमा केले. नियमाप्रमाणे तक्रारकर्तीने वारसान प्रमाणपत्र सादर केल्‍यावर ती रक्‍कम व त्‍यावर प्रत्‍यक्ष अदायगीपर्यत व्‍याज मिळून रु.1,87,885/- तक्रारकर्तीस दि.18.04.2011 रोजी देण्‍यांत आले. त्‍यावेळी तक्रारकर्तीने 10.02.2009 पूर्वीच्‍या न दिलेल्‍या व्‍याजाबाबत कोणताही आक्षेप घेतला नव्‍हता. तक्रारकर्तीने तक्रार मुदतीत आणण्‍यासाठी दि.05.07.2011, 21.09.2011, 90.11.2011 रोजीचे खोटे पत्र तयार केलेले असून  ते वि.प. बॅकेला कधीही देण्‍यांत आलेले नव्‍हते. मृतकाच्‍या स्‍वतःच्‍या चुकीमुळे धनादेशाची रक्‍कम वेळीच त्‍याच्‍या खात्‍यात जमा होऊ शकली नाही, यांत वि.प.कडून सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब झाला नसल्‍याने तक्रारकर्तीच्‍या मागणीप्रमाणे व्‍याज व नुकसान भरपाई देण्‍यास वि.प.क्र. 1 व 2 जबाबदार नाहीत. जर तक्रारकर्तीला तिच्‍या पतीच्‍या हयातीत पासबुक बरोबर धनादेशाची प्रत मिळाली तर तिने ती वि.प.कडे सादर करुन रक्‍कम खात्‍यात जमा करुन घेण्‍यासाठी कां प्रयत्‍न केले नाही असा प्रश्न निर्माण होतो. तक्रारकर्तीचे पती आजारी असल्‍याने मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्‍ये उपचारासाठी भरती होते व त्‍यांचे कागदपत्र शोधले असता तक्रारकर्तीस पासबुक व धनादेशाची प्रत मिळाली आणि त्‍यानंतर तक्रारकर्तीचे पती दोनदा व त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारकर्ती बरेचदा वि.प.कडे आली व धनादेशाची रक्‍कम जमा न झाल्‍याबद्दल चौकशी केली, परंतु वि.प.ने त्‍याची दखल घेतली नाही  हे नाकबूल केले आहे. तक्रारकर्तीने बॅंकेकडून पैसे उकळण्‍यासाठी खोटी तक्रार दाखल केली असल्‍याने ती खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

 

                  आपल्‍या कथनाचे पुष्‍टयर्थ वि.प.बॅंकेने मृतक दिलीप रामटेके यांची मुलगी आम्रपाली हिचेकडून दि.05.02.2009 रोजी प्राप्‍त  पत्राची प्रत तसेच तक्रारकर्तीस दि.19.04.2011 रोजी दिलेल्‍या रु.1,87,835/- ची पावती दाखल केलेली आहे.

 

3.                प्रकरणाच्‍या निर्णितीसाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले, त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1) तक्रार मुदतीत आहे काय ?                                   होय.

2) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय ?         होय.

3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?          अंशतः.

4) आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

              

  •  कारणमिमांसा

4.        मुद्दा क्र. 1  बाबत -      सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्तीचे पती दिलीप रामटेके यांनी दि.23.12.2003 रोजी रु.1,72,839/- चा धनादेश  वि.प.क्र. 2 स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या मेडिकल शाखेत आपल्‍या खात्‍यात जमा करण्‍यासाठी दिला, परंतु वि.प.क्र. 2 ने सदर धनादेशाची रक्कम  दि.10.02.2009 पर्यंत  मृतकाच्‍या खात्‍यात  जमा केली नव्‍हती, याबाबत उभय पक्षात वाद नाही. तसेच दि.10.02.2009 रोजी मृतक दिलीप रामटेके यांच्‍या खात्‍यात जमा केलेली रक्‍कम  तक्रारकर्तीने वारसान प्रमाणपत्र सादर केल्‍यानंतर दि.10.02.2009 पासून व्‍याजासह एकुण रु.1,87,885/- दि.18.04.2011 रोजी  देण्‍यांत आली याबाबतही उभय पक्षात वाद नाही.

 

                  वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात असे सांगितले कि, दिलीप रामटेके याने दि.23.12.2003 रोजी धनादेश वि.प.क्र. 2 कडे जमा केला, परंतु ती रक्‍कम वेळीच त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली नाही, म्‍हणून सदर तक्रारीत व्‍याजाची मागणी तक्रारकर्तीने केली असल्‍याने  तक्रारीस कारण दि.23.12.2003 रोजी घडले असून दि.01.01.2013 रोजी दाखल केलेली सदर तक्रार 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर दाखल केली असल्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 A प्रमाणे मुदतबाह्य आहे. आपल्‍या युक्तिवादाचे पुष्‍टयर्थ त्‍यांनी खालील न्‍यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

 

1.II (2009) CPJ 29 (SC)

STATE BANK OF INDIA VS. B.S.agricultural industries(I)

 

वरील  प्रकरणात तक्रारकर्त्‍याने  बिलाची रक्‍कम वसुल करुन ती तक्रारकर्त्‍यास पाठविण्‍यासाठी वि.प. बॅंकेकडे बिल्‍स पाठविले होते. तसेच ज्‍यांच्‍याकडून बिलांची वसुली करावयाची होती, त्‍यांनी 7 जुन, 1994 पर्यंत बिलांची रक्‍कम  दिली नाही तर मुळ बिल तक्रारकर्त्‍यास परत करण्‍याच्‍या सुचना बॅकेला दिल्‍या होत्‍या. बॅंकेकडून वसुल केलेल्‍या रकमेचा धनाकर्ष किंवा मुळ बिलाचे दस्‍तावेज तक्रारकर्त्‍यास 7 जुन, 1994 रोजी परत करण्‍यांत आले नाही, तेंव्‍हाच बॅंकेविरुध्‍द तक्रारीस कारण घडले असल्‍याने 2 वर्षाच्‍या कालावधीनंतर 5 मे, 1997 रोजी  दाखल केलेली तक्रार मुदतबाह्य असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

 

   2. IV (2005) CPJ 10

       (Delhi State Consumer Disputes Redressal Commission,   New Delhi)

        SUMAN KABRA VS. MAHANAGAR TELEPHONE NIGAM LTD.  & OTHERS.

 

वरील प्रकरणांत ज्‍यावरुन सेवेतील न्‍युनतेबाबत तक्रार दाखल केली होती ती तक्रारकर्तीचा टलिफोन कनेक्‍शन खंडीत करण्‍याची घटना 1996 ते 1998 या कालावधीत घडली असून तक्रार 09.01.2002 रोजी दाखल केल्‍याने ती ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 A प्रमाणे मुदतबाह्य असून 1998 नंतरही तक्रारकर्तीने त्‍यासंबंधात वि.प.च्‍या अधिका-यांशी पत्र व्‍यवहार केला या कारणाने तक्रारदाखल करण्‍याची मुदत वाढत नसल्‍याने  खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचा निर्णय दिला  दिला आहे.

 

                  याउलट तक्रारकर्तीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात असे प्रतिपादन केले कि, तक्रारकर्तीचे  पतीने दि.23.12.2003 रोजी जमा केलेला धनादेश पंजाब नॅशनल बॅकेकडे वटविल्‍यानंतर ती रक्‍कम त्‍याच्‍या  खात्‍यात अविलंब जमा करण्‍याची कायदेशीर जबाबदारी वि.प.क्र. 2 ची होती. वि.प. क्र. 2 ने सदर रक्कम  देण्‍यास कधीही नकार दिलेला नाही. एवढेच नव्‍हे तर दिलीपच्‍या मृत्‍यूनंतर धनादेशाची रक्‍कम  रु.1,72,839/- दि.10.02.2009 रोजी त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली व त्‍या तारखेपासून  18.04.2011 रोजी सदर रक्‍कम तक्रारकर्तीस देईपर्यंत सदर रकमेवर व्‍याजदेखिल दिले आहे.  त्‍यामुळे सदर रकमेवर 23.12.2003 पासून 10.02.2009 पर्यंत व्‍याज देण्‍यांत आले नसल्‍याची माहिती तक्रारकर्तीस प्रथमतः दि.18.04.2011 रोजी झाल्‍याने न दिलेल्‍या व्‍याजाच्‍या मागणीसाठी तक्रारीस कारण दि.18.04.2011 रोजी प्रथमतः घडल्‍याने दि.01.01.2013 रोजी दाखल केलेली सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 24 A प्रमाणे निश्चित केलेल्‍या 2 वर्षाच्‍या कालमर्यादेत आहे.

 

                  सदर प्रकरणात दिलीप रामटेके यांनी वि.प.क्र. 2 कडे वसुलीसाठी दि.23.12.2003 रोजी जमा केलेल्‍या धनादेशाची रक्‍कम वि.प. बॅकेने पंजाब नॅशनल बॅकेकडून वसुल केली व ती 10.02.2009 रोजी खातेदार दिलीप रामटेकेचे खात्‍यात जमा केली आहे.  वि.प.ने दि.10.02.2009 रोजी मयताचे खात्‍यात जमा केलेली रक्‍कम त्‍या तारखेपासून दि.18.04.2011 रोजी व्‍याजासह तक्रारकर्तीस दिली, तेंव्‍हाच पहिल्‍यांदा सदर रकमेत 23.12.2003 ते 10.02.2009 या कालावधीचे व्‍याज दिले नसल्‍याची माहिती तक्रारकर्तीस झाली असल्‍याने सदर व्‍याजाच्‍या रकमेच्‍या मागणीसाठी कारण प्रथमतः दि.18.04.2011 रोजी घडले  असून  तेंव्‍हापासून सदरची तक्रार 2 वर्षाचे आंत दाखल केलेली असल्‍याने मुदतीत आहे.  सदर प्रकरणाच्‍या भिन्‍न वस्‍तुस्थितीमुळे वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांनी दाखल केलेला मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा मंचासमोरील  प्रकरणास लागू होत नाही.  म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

5.          मुद्दा क्र. 2 व 3 बाबतः-  तक्रारकर्तीचे  पतीने दि.23.12.2003 रोजी  वि.प.क्र. 2 कडे जमा केलेल्‍या धनादेशाची रक्‍कम पंजाब नॅशनल बॅकेकडून वसुल केल्‍यानंतर ती अविलंब  तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या खात्‍यात जमा करणे आवश्‍यक होते. सदर धनादेशाची रक्‍कम वि.प.क्र. 2 ने पंजाब नॅशनल बॅकेकडून वसुल केली परंतु ती  ती दिलीप रामटेके याच्‍या खात्‍यात 10.02.2009 पर्यत जमा केली नव्‍हती ही वस्‍तुस्थिती आहे.

 

                  तक्रारकर्तीचे अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, वेळेवर रक्‍कम जमा न करण्‍यासाठी  असे कारण सांगितले आहे कि,  धनादेशावर  नांव “Dilip Raghojee .....”   असे नमुद असून   खात्‍यावर    “RAMTEKE DILIP RAJHOJI” असे नांव नमुद आहे. धनादेश व खात्‍यावरील नांवात फरक असल्‍याने खातेदारास सदरची चुक लक्षांत आणून दिल्‍यावरही त्‍यानी चुकीची दुरुस्‍ती न केल्‍यामुळे खात्‍यात रक्‍कम जमा करता आली नव्‍हती.  खातेदार मरण पावल्‍यानंतर त्‍याची मुलगी आम्रपाली हिने दि.05.02.2009 रोजी  पहिल्‍यांदाच मयताचे नावाच्‍या धनादेशाची रक्‍कम त्‍याच्‍या बचत खात्‍यात जमा झाली नसल्‍याचे कळविले असता वि.प.ने  खातेदाराच्‍या नावातील चुक त्‍यांच्‍या लक्षात आणून दिली आणि सदर चुक दुरुस्‍त केल्‍यानंतर दि.10.02.2009 रोजी धनादेशाची रक्‍कम रु.1,72,839/- मयताचे बचत खात्‍यात जमा केली. धनादेशावरील नांव व बचत खात्‍यावरील दिलीपचे वडिलाचे नांव ‘’राघोजी’’ असेच आहे, मात्र सदर नावाचे इंग्रजी स्‍पेलिंग  वि.प.च्‍या कर्मचा-यांनी “RAJHOJI” असे चुकीचे लिहिले आहे त्‍यात खातेदाराची चुक नसतांना तेवढया  कारणाने दिलीप रामटेके यांच्‍या धनादेशाची वसुल केलेली रक्‍कम 5 वर्ष 1 महिना 10 दिवस खातेदाराच्‍या खात्‍यात जमा न करणे व त्‍याला सदर रकमेच्‍या उपभोगापासून आणि त्‍यावर मिळणा-या व्‍याजापासून वंचित ठेवण्‍याची वि.प.ची कृती सेवेतील न्‍युनता आहे. नावातील तथाकथीत चुक दुरुस्‍त करण्‍यासाठी खातेदारास कळविल्‍याबाबत  कोणताही पत्रव्‍यवहार वि.प.ने दाखल केलेला नाही. जर वि.प.ने सदरची चुक खातेदाराच्‍या निदर्शनास आणली असती तर कोणताही सुज्ञ व्‍यक्ति सदर चुक दुरुस्‍तीचा प्रयत्‍न न करता त्‍याची हक्‍काची रक्‍कम बॅकेकडे 5 वर्षाच्‍या दिर्घ कालावधीसाठी राहू देईल ही अशक्‍य कोटीतील गोष्‍ट असल्‍याने वि.प.चे म्‍हणणे  अविश्‍वासाहर्य  असल्‍याने   तक्रारकर्ती मागणी केलेली व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. आपल्‍या युक्तिवादाचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्तीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी खालील न्‍यायनिर्णयाचा दाखल दिला आहे.

 

I(2013) CPJ 473 (NC),

Sheela Wanti & Anr

 Vs.

State Bank of India & Ors.

वरील प्रकरणांत तक्रारकर्तीने बॅकेकडे जमा केलेला रु.4,00,000/- चा धनाकर्ष (Demand Draft)  बॅकेकडून गहाळ झाल्‍याने बॅकेने तक्रारकर्तीस 11 वर्षेपर्यंत धनाकर्षाची रक्‍कम दिली नाही. राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्‍या आदेशाच्‍या पुर्ततेदाखल बॅकेने धनाकर्षाची रक्‍कम रु.4,00,000/- आणि खर्चाची रक्‍कम रु.10,000/- तक्रारकर्तीस दिली. सदर आदेशाविरुध्‍द तक्रारकर्तीने केलेल्‍या अपिलात मा. राष्ट्रीय आयोगाने राज्‍य आयोगाच्‍या निर्णयावर  खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“9.   Appellants have been deprived of use of their money for about 11 years  and as such they are entitled to interest b3ing the normal accretion on the capital. Supreme Court of India in Alok Shanker Pandey V. Union of India & Ors., III(2007) 3 SCC 545, has held that interest is not a penalty or punishment at all, but normal accretion on capital; that in equity the person keeping the money is required to pay the interest being nor accretion on the principal amount.......

 

In Our considered view, State Commission has erred in not awarding interest on the awarded amount. Appeal is allowed and the Respondent Bank is directed to pay interest @ 6% p.a. to the Appellants from the date of deposit of demand draft till the date of payment, i.e. 4.06.2008 within a period of eight weeks from today failing which the amount shall carry interest @ 9% p.a. Respondent is also directed to pay further costs of 5]000 to the Appellants.”

 

 

                  याउलट वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्तिवाद असा कि, दिलीप रामटेके यांनी दि.23.12.2003 रोजी रु.1,72,839/- चा धनादेश  वि.प.क्र. 2 स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या मेडिकल शाखेत आपल्‍या खात्‍यात जमा करण्‍यासाठी दिल्‍यावर सदर धनादेशाची रक्‍कम धनादेशातील नांव व खात्‍यावरील नांवात असलेल्‍या फरकामुळे वेळीच त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करता आली नाही. नावातील चुक दुरुस्‍त  करण्‍यांस सांगूनही खातेदाराने ती दुरुस्‍त केली नाही. त्‍याच्‍या मरणानंतर सदर चुक दुरुस्‍त करण्‍यांत आल्‍यावर त्‍याच्‍या खात्‍यात दि.10.02.2009 रोजी धनादेशाची रक्‍कम रु.1,72,839/-  केली. त्‍यानंतर तक्रारकर्तीने वारसान प्रमाणपत्र सादर केल्‍यानंतर   दि.18.04.2011 रोजी  व्‍याजासह एकुण रु.1,87,885/- बँकर्स चेक क्र. 031191 प्रमाणे  तक्रारकर्तीस देण्‍यांत आली. त्‍यावेळी तक्रारकर्तीने पुर्वीच्‍या व्‍याजाबाबत कोणताही उजर केला नाही. मृतक दिलीप रामटेके याच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा होण्‍यास झालेल्‍या विलंबास वि.प.ची कोणतीही चुक कारणीभूत नसल्‍याने सदर रकमेवर व्‍याज देण्‍याची वि.प.ची जबाबदारी नाही व म्‍हणून त्‍या काळातील व्‍याज न दिल्‍यामुळे वि.प.कडून सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही.

 

                  उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल केलेल्‍या दस्‍तावेजांवरुन हे स्‍पष्‍ट आहे कि, तक्रारकर्तीचे पती दिलीप रामटेके यांनी वि.प.क्र. 2 कडे जमा केलेल्‍या 23.12.2003 च्‍या धनादेशाची रक्‍कम पंजाब नॅशनल बॅकेकडून वि.प.क्र. 2 ने वेळीच जमा केली मात्र ती दि.10.02.2009 पर्यंत त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली नाही. यासाठी वि.प.ने धनादेशातील दिलीपचे वडीलांचे नांव व खात्‍यावरील दिलीपच्‍या वडीलांच्‍या नांवातील स्‍पेलींगमध्‍ये चुक हे कारण दर्शविले आहे. मात्र ‘राघोजी’ नावाचे स्‍पेलिंग खात्‍यावर लिहितांचा वि.प.च्‍या कर्मचा-याच्‍या झालेल्‍या चुकीसाठी खातेदाराची  रु.1,72,839/- एवढी मोठी रक्‍कम रक्‍कम 5 वर्ष 1 महिना 10 दिवस एवढया दिर्घ कालावधीसाठी स्‍वतःजवळ ठेवण्‍याची  व खातेदारास  सदर रकमेच्‍या उपभोगापासून आणि त्‍यावर मिळणा-या व्‍याजापासून वंचित ठेवण्‍याची वि.प.ची कृती निश्चितच सेवेतील न्‍युनता या सदरात मोडणारी आहे.

 

                  वरीलप्रमाणे वि.प. ची कृती ही सेवेतील न्‍युनता असल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्ती धनादेशाची रक्‍कम रु.1,72,839/- वर दि.23.12.2003 पासून  दि.10.02.2009 पर्यंतच्‍या कालावधीसाठी द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्‍यास देखिल पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

वरील निष्‍कर्षास अनुसरुन  खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

                        -  आदेश -

 

      तक्रारकर्त्‍याची  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या खालिलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

 

1)    विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास तक्रारीत धनादेशाची रक्‍कम रु.1,72,839/- वर     दि.23.12.2003 पासून  दि.10.02.2009 पर्यंतच्‍या कालावधीसाठी  द.सा.द.शे.     9 टक्‍केप्रमाणे येणारी व्‍याजाची रक्‍कम दि.10.02.2009 पासून  प्रत्‍यक्ष      अदायगीपर्यंत द.सा.द.शे 9 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीस   अदा करावी.

2)    वि.प.नी तक्रारकर्तीस शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.

3)    वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 1 महिन्‍यांचे      आंत करावी.

4)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

5)    तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.