जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 683/2009. तक्रार दाखल दिनांक : 15/12/2009. तक्रार आदेश दिनांक : 07/04/2011. श्री. राजेंद्र विष्णू कांबळे, वय 40 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. इंदापूर रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर. 2. मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, आर.सी.पी.सी., सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.बी. जोशी / पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.एन. देशपांडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांच्या मुलगा संदिप याने औरंगाबाद येथील श्री. दहानेश्वर मानव विकास मंडळ कॉलेज ऑफ अग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी येथे बायो-टेक्नॉलाजी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षिप्त रुपामध्ये ‘बँक’) यांच्याकडे रु.1,50,000/- कर्ज मिळण्यासाठी दि.15/6/2009 रोजी अर्ज देऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तक्रारदार स्वत: जामीनदार झाले आणि त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आले. त्यांनी मुलास औरंगाबाद येथे शिक्षणासाठी पाठविले. परंतु बँकेने दि.6/10/2009 रोजी कर्ज नामंजूर केल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे कर्ज नाकारल्यामुळे रु.30,000/-, मुलाचे शैक्षणिक नुकसान रु.20,000/- व नोटीस खर्च रु.550/- अशी नुकसान भरपाई बँकेकडून मिळावी, अशी विनंती केली आहे. 2. बँकेने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या मुलाने कर्ज प्रस्ताव दाखल केल्यामुळे तक्रारदार यांना तक्रार करण्याचा अधिकार नाही. जरी त्यांनी कर्ज नाकारले असले तरी त्यांनी बँक नियमाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या मुलाने विरुध्द पक्ष बँकेकडे विद्यार्थी कर्ज योजनेंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या मुलाने कर्ज प्रकरण केले असले तरी तक्रारदार हे नात्याने त्याचे वडील असल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करण्यास बाधा येत नाही. 5. विरुध्द पक्ष बँकेने तक्रारदार यांचे कर्ज प्रकरण नामंजूर केल्याविषयी विवाद नाही. त्यामागील कारण देताना विद्यार्थी पहिल्या सेमिस्टरमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे कर्ज नामंजूर केल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचे परफार्मन्स रेकॉर्ड व बोनाफाईड सर्टिफिकेट दाखल केले आहे. त्याचे अवलोकन करता, त्यांचा मुलगा संदीप हा पहिल्या व दुस-या सेमिस्टरमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास येत नाही. 6. आमच्या मते, कर्जदारांना कर्ज मंजूर किंवा नामंजूर करणे हा निर्विवादपणे बँकेचा स्वेच्छाधिकार आहे. परंतु आवश्यक पूर्तता करवून घेऊन सबळ कारणाशिवाय कर्ज नामंजूर केले असल्यास त्यांचे सदर कृत्य निश्चितच अनुचित व सेवेतील त्रुटी ठरते. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार यांच्याकडून कर्ज प्रकरणासाठी आवश्यक पूर्तता करवून घेतलेली आहे. बँकेने कर्ज देण्यास नकार देण्याकरिता दिलेले कारण सिध्द होऊ शकत नाही. बँकेने तक्रारदार यांना कर्ज देणे अशक्य असल्यास कर्ज प्रकरण दाखल होताच त्यांचा निर्णय कळविणे आवश्यक व अपेक्षीत होते. परंतु तशाप्रकारे कार्यवाही न करता बँकेने तक्रारदार यांना खर्च करण्यास भाग पाडले असून त्याशिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे सिध्द होते. 7. वरील सर्व विवेचनावरुन बँकेने तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार हे आर्थिक खर्च व नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/7411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |