::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-30/11/2018)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल
केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्ता क्र.1 व 2 यांचे विरूध्द पक्ष बॅंकेत 10541956034 या क्रमांकाचे संयुक्त बचत खाते असून वि.प. यांनी 6220180690900021500 या क्रमांकाचे एटीएम कार्ड ची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तक्रारकर्ता स्वतः सदर कार्डचा वापर करतो. दिनांक 15/10/2017 रोजी तक्रारकर्त्याच्या खात्यातून अनुक्रमे रू.17,000/- रेल्वेस्टेशन, गुडगांव, तह.गुडगांव, रू.40,000/- एसबीआय मदनपूरी, गुडगांव तसेच रू.40,000/- श्री.अनंत देव यांच्या खात्यात बेकायदेशीरपणे ट्रांस्फर करून एकुण रू.97,000/- त्याच्या खात्यातून काढण्यांत आल्याचे संदेश त्याच्या मोबाईलवर आले. घटनेच्या दिवशी रविवार असल्यामुळे वि.प.बॅंक बंद होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने घटनेबाबत एस.बी.आय.शास्त्रीनगर येथे घटनेची तोंडी सुचना देवून पोलीस स्टेशन, रामनगर येथे लेखी तक्रार नोंदविली तसेच दिनांक 16/10/2017रोजी वि.प.यांच्याकडे दस्तावेजांसह लेखी तक्रार नोंदविली तसेच त्यांच्या सुचनेनुसार सायबर सेलला देखील तक्रार केली. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तक्रारीची पुर्तता करू असे सांगितले. वि.प.ने दि.29/10/2017 रोजी तक्रारकर्त्याला बोलावून दिनांक 15/10/2017 रोजी चंद्रपूर शहरात असल्याचा पुरावा दाखल करण्यांस सांगितले व तक्रारकर्त्याने तसा तो दाखलदेखील केला. वि.प.नी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची पुढे काहीही दखल घेतली नाही. तक्रारकर्त्यांनी सदर रक्कम त्यांच्या वृद्धापकाळासाठी ठेवली होती परंतु वरील घटनेमुळे त्यांच्यावर आर्थीक संकट निर्माण झाले. वि.प.ने एटीएम सेवा देतेवेळी सुरक्षेची खात्री दिली होती परंतु सुरक्षीततेची उपाययोजना करण्यांस वि.प. अपयशी ठरले. वि.प.ने सदर रक्कम परत दिली नाही व तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली.त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.29/12/2017 रोजी अधिवक्त्यामार्फत वि.प.ला नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त होवूनही वि.प.ने उत्तरही दिले नाही व पुर्तताही केली नाही. सबब तक्रारकर्त्यांनी मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांच्या खात्यातून अवैधरीत्या काढून घेण्यांत आलेली रक्कम रू.97,000/- त्यावर दिनांक 15/10/2017 पासून 18 टक्के दराने व्याजासह परत करावी, शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.25,000/- व तक्रारीचा खर्च रू.10,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांना द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्यांची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आला. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याचे त्यांचेकडे बचत खाते असून त्यावर एटीएम सुविधा उपलब्ध करून दिल्याचे तसेच तक्रारकर्त्याने त्याच्या खात्यातून दिनांक 15/10/2017 रोजी अज्ञात व्यक्तीमार्फत रू.97,000/- काढून घेण्यांत आल्याबाबत पोलीस स्टेशन, रामनगर येथे लेखी तक्रार नोंदविली तसेच दिनांक 16/10/2017रोजी वि.प.यांच्याकडे दस्तावेजांसह लेखी तक्रार नोंदविली आणी सायबर सेलला देखील तक्रार केली हया बाबी मान्य केल्या. त्यांनी आपल्या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्याने याबाबत पोलीस तक्रार नोंदविली असून सदर गुन्हा हा सायबर क्राईम अंतर्गत असल्याने सदर गुन्हयाचा पोलीस यंत्रणेमार्फत तपास सुरू आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त होताच सदर तक्रार त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाला कळवून सीएमएस मुंबई यांचेकडे चौकशीसाठी पाठविली असून त्याचा तक्रार क्रमांक 3843626432 हा आहे व त्यावर चौकशी सुरू आहे. यावरून यात वि.प.चा दोष नसल्याचे स्पष्ट होत असून त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. शिवाय सदर प्रकरण गुंतागूंतीचे असून विद्यमान मंचाचे कार्यक्षेत्रात बसत नाही. सबब तक्रार खारीज करण्यात यावी अशी वि.प.ने विनंती केली आहे.
4. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, लेखी उत्तरालाच रिजॉइंडर समजण्यांत यावे अशी नि.क्र.16 वर पुर्सीस दाखल, लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता क्र.1 व 2 विरूध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2 ः-
5. तक्रारदारकर्ता क्र.1 व 2 यांचे विरूध्द पक्ष बॅंकेत 10541956034 या क्रमांकाचे संयुक्त बचत खाते असून वि.प. यांनी 6220180690900021500 या क्रमांकाचे एटीएम कार्ड ची सेवा उपलब्ध करून दिली आहे. सदर बाब विरूध्द पक्ष यांनी मान्य केली आहे. यावरून तक्रारकर्ते हे विरूध्द पक्षाचे ग्राहक आहेत याबाबत वाद नाही. दिनांक 15/10/2017 रोजी तक्रारकर्त्याच्या उपरोक्त खात्यातून अनुक्रमे रू.17,000/- रेल्वेस्टेशन, गुडगांव, तह.गुडगांव, रू.40,000/- एसबीआय मदनपूरी, गुडगांव तसेच रू.40,000/- श्री.अनंत देव यांच्या खात्यात बेकायदेशीरपणे ट्रांस्फर करून एकुण रू.97,000/- त्याच्या खात्यातून काढण्यांत आल्याची तक्रारकर्त्याने वि.प. यांच्याकडे तसेच सायबर सेलकडे लेखी तक्रार केली. सदर तक्रार प्राप्त होताच वि.प. यांनी त्यांचे क्षेत्रीय कार्यालयाला त्वरीत कळवून एल.एच.ओ.मुंबईकडे सी.एम.एस तक्रार केली असून त्याचा क्रमांक 3843626432 हा आहे. सदर प्रकार हा सायबर क्राईमचा असल्यामुळे त्याबाबतची चौकशी वि.प.च्या टेक्नीकल टिमने केली. सदर तक्रारीचे चौकशीअंती विवादीत रक्कम तक्रारकर्त्यांनी नव्हे तर अनधिकृत व्यक्तीने काढल्याचे निष्पन्न झाल्यामुळे मंचामध्ये तक्रार प्रलंबीत असतांनाच वि.प.ने संपूर्ण रक्कम रू.97,000/- तक्रारकर्त्याचे खात्यात जमा केली व तक्रारकर्त्यांनी सदर रक्कम खात्यात जमा झाल्याबाबत आपल्या लेखी व तोंडी युक्तिवादात कबूली दिली आहे. यावरून वि.प.नी तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही असे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.16/2018 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 30/11/2018
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.