Exh.No.9
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 06/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि. 25/03/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 18/07/2013
श्री रविंद्र गणपत वाडकर
वय 51 वर्षे, धंदा- सेवानिवृत्त,
राहा. कुडाळेश्वरवाडी, मु.पो.कुडाळ,
ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे शाखाधिकारी,
श्री अतुलकुमार कच्चप
शाखा कुडाळ, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारतर्फेः- विधिज्ञ कु. व्ही.एस. जाधव
विरुद्ध पक्षातर्फे- प्रतिनिधी
निकालपत्र
(दि.18/07/2013)
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः - तक्रारदार यांनी आपल्या कर्जासाठी अतिरिक्त सुरक्षा (Additional Security) म्हणून बँकेकडे ठेवलेले एक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बँकेने गहाळ केल्यामुळे तक्रारदार यांनी सदर प्रमाणपत्राची रक्कम मिळणेकरीता प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा-कुडाळ (यापुढे संक्षिप्ततेसाठी ‘बँक’ असे संबोधण्यात येईल) यांचेकडून घर बांधण्याकरिता कर्जाची मागणी केली होती. सदर कर्ज मंजूर करतांना बँकेने तक्रारदार यांचेकडून (Additional Security) म्हणून 13 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व 5 किसान विकासपत्रे रक्कम रु.1,00,000/- ची ताब्यात घेतली होती. त्यानंतर दि.12/08/2002 रोजी रु.4,50,000/- चे कर्ज वाटप केले. सदर कर्जाची परतफेड तक्रारदार यांनी दि.15/08/2010 रोजी केली आहे व तसे प्रमाणपत्रही घेतले आहे.
3) तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेने त्यांना दि.22/01/1999 रोजी फक्त 12 बचतप्रमाणपत्रे व 5 किसान विकासपत्रे परत केली परंतू एक राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र क्र.18DD775428 त्यांना परत दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी बॅकेस सदर प्रमाणपत्राची मागणी केली असता सदर प्रमाणपत्र गहाळ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. सदर प्रमाणपत्र देण्याबाबत त्यांनी अनेक वेळा बँकेस विनंती केली परंतू त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.12/05/2011 रोजी बँकेस लेखी पत्र देऊन गहाळ प्रमाणपत्राचा शोध घ्यावा आणि प्रमाणपत्राची मूळ मुद्दल रु.5,000/- व त्यावरील मुदत पूर्ण झालेचे दि.22/01/2005 पर्यंतचे व्याजाचे एकूण रु.9,870/- व त्यावर दि.22/01/2005 पासून व्याज द्यावे अशी मागणी केली; परंतू त्यांना काहीही कळवण्यात आले नाही.
4) तक्रारदार यांनी पुढे म्हटले आहे की, बँकेची कुडाळ शाखा त्यांचे अर्जाची दखल घेत नसल्याने त्यांनी बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरना दि.02/08/2011 रोजी पत्र दिले परंतू त्यांनीही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली सविस्तर माहिती मागवली. सदर अर्जाचे उत्तरात बँकेने त्यांना सदर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र नंबर 18DD775428 रु.5,000/- ची रक्कम अदा झालेली नाही. तसेच सदर प्रकरण हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गनगरी व पोस्ट कार्यालय ओरोस यांनी दि.20/12/2005 पासून घेतले आहे. तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांची दुय्यम प्रत मिळणेसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रधारकाने स्वस्वाक्षरीसह अर्ज आणि बँकेने Indemnity Bond करुन द्यावा लागतो अशी प्रक्रिया असल्याचे कळविले. परंतु बँकेने काहीच कार्यवाही केली नाही.
5) तक्रारदार यांनी नंतर बँकींग ओम्बडसमन, (Banking Ombudsman) मुंबई यांचेकडे सदर तक्रार केली परंतू त्यांनीही त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर दि.12/03/2012 रोजी बँकेने तक्रारदारास पत्र देऊन शाखेत हजर रहावे आणि अर्जावर सहया कराव्यात असे कळवले. तक्रारदार हे बँकेत स्वतः हजर झाले आणि कोणत्या अर्जावर सहया आवश्यक आहेत ? आपणास किती रक्कम देणार आहेत ? कोणत्या दराने व्याज आकारणी करणार आहात ? तसेच झालेल्या हलगर्जीपणाबद्दल काय कार्यवाही होणार ? याबाबत विचारणा केली असता त्यांना “ ते आता आम्ही काही सांगू शकत नाही कालांतराने पाहूया” असे सांगण्यात आले. त्यावर तक्रारदाराने दि.31/12/2012 रोजी बँकेस अर्ज देऊन प्रमाणपत्राची मुदत पूर्ण रक्कम रु.9,700/- व त्यावर दि.22/01/2005 पासून बँकेच्या प्रचलित व्याजदराने व्याज द्यावे अशी विनंती केली. परंतु बँकेने काहीही कळवले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले.
6) तक्रारदार यांनी शेवटी बँकेने मूळ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र गहाळ केल्यामुळे त्याची मुदतपूर्ण रक्कम रु.9,780/- व त्यावर दि.22/01/2005 पासून 10% दराने व्याजाची रक्कम रु.13,279.40, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- व सदर रक्कम वसुल होईपर्यंत त्यावर 14% दराने व्याज देण्याचा बँकेस आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
7) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र तसेच नि.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात कर्ज मागणी अर्ज, नादेय प्रमाणपत्र, दि.12/05/2011 चा अर्ज, पत्रव्यवहाराच्या प्रती, माहिती अधिकाराखालील उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
8) बँकेने दि.25/04/2013 रोजी हजर होऊन आपले लेखी म्हणणे सादर करणेसाठी मुदत मिळावी असा अर्ज दिला. तो मंजूर करण्यात आला परंतू नंतर बँकेचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत व खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे प्रकरण ‘विना खुलासा’ चालवणेचे आदेश करण्यात आले.
9) तक्रारदार यांची तक्रार व त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमचेसमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | बँकेने तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? | अंतीम आदेशानुसार |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
10) मुद्दा क्रमांक 1 – i) तक्रारदार यांनी बँकेकडून घर बांधणेसाठी कर्ज घेतले होते व सदर कर्जाची त्यानी परतफेड केली आहे हे बँकेच्या नादेय प्रमाणपत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदर कर्जाच्या तारणासाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व किसान विकासपत्रे दिली होती हे बँकेने दिलेल्या पत्रावरुन दिसून येते. तसेच तक्रारदाराचे एक प्रमाणपत्र बँकेकडून गहाळ झाले आहे, हे ही बँकेने मान्य केल्याचे पत्रव्यवहारावरुन दिसून येते. बँकेने हजर होऊन देखील खुलासा सादर केलेला नाही. यावरुनही बँकेस तक्रारदाराचे म्हणणे मान्य आहे असे दिसून येते.
ii) वास्तविक सदर बँक ही राष्ट्रीयकृत बँक आहे व कर्जदाराने दिलेली कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्याचे बँकेचे काम आहे. बँकेने तक्रारदार यांचे एक प्रमाणपत्र गहाळ करुन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
11) मुद्दा क्रमांक 2 - i) तक्रारदार यांनी बँकेने मूळ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र गहाळ केल्यामुळे त्याची मुदतपूर्ण रक्कम रु.9,780/- व त्यावर दि.22/01/2005 पासून 10% दराने व्याजाची रक्कम रु.13,279.40, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- व सदर रक्कम वसुल होईपर्यंत त्यावर 14% दराने व्याज देण्याचा बँकेस आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
ii) तक्रारदार यांचे गहाळ झालेले राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र रक्कम रु.5,000/- चे होते व त्याची मुदत संपल्यानंतर त्यांना रक्कम रु.9780/- दि.21/01/2005 रोजी मिळणार होती. सदर रक्कम अद्याप त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे तक्रारदार रक्कम रु.9780/- व त्यावर दि.22/01/2005 पासून रक्कम त्याना अदा करेपर्यंत त्यावर 9% दराने व्याज मिळणेस पात्र आहे. तक्रारदार यांनी मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. सदर रक्कम अवाजवी आहे असे आम्हांस वाटते. संचित दाखल कागदपत्रावरुन त्यांनी सदर प्रमाणपत्राबद्दल पहिल्यांदा दि.12/05/2011 रोजी मागणी केल्याचे दिसून येते. परंतू तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला आहे व पत्रव्यवहारासाठी खर्चही झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/- मिळणेस पात्र आहे. तसेच सदर गहाळ प्रमाणपत्राची रक्कम मिळावी यासाठी तक्रारदाराची सही व बँकेचा Indemnity Bond पोस्टाला दिल्याशिवाय रक्कम मिळू शकत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी असा आदेश करणे योग्य व न्यायाचे होईल असे आम्हांस वाटते.
12) मुद्दा क्रमांक 3 - वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) तक्रारदार यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 15 दिवसांचे आत विरुध्द पक्ष बँकेला, पोस्टाकडून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र क्र.18DD775428 ची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक अर्जावर सही द्यावी.
3) स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारदार यांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची रक्कम रु.9780/- (रुपये नऊ हजार सातशे ऐंशी मात्र) व त्यावर दि.22/01/2005 पासून पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून 45 दिवसांचे आत द्यावे.
4) आदेश क्र.2 नुसार कार्यवाही केल्यानंतर बचत प्रमाणपत्राची रक्कम तक्रारदार यांना पोस्टाकडून मिळाल्यास बँकेने सदर मिळालेली रक्कम वजा करुन आदेश क्र.3 नुसार उर्वरित रक्कम तक्रारदारास दयावी.
5) स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 45 दिवसांच्या आत द्यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः – 18/07/2013
सही/- सही/- सही/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.