जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-सौ.वी.वी.दाणी. मा.सदस्या-सौ.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – २४९/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १८/०८/२०१०
तक्रार निकाली दिनांक – १३/०६/२०१३
वासुदेव रंगराव पाटील. ----- तक्रारदार.
उ.व.३४,धंदा-काहीनाही.
रा.मु.पो.सौंदाणे,ता.जि.धुळे.
विरुध्द
भारतीय स्टेट बॅंक. ----- सामनेवाले.
म.मॅनेजर साो.
ट्रेझरी ब्रॅंच,धुळे ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.बी.खलाणे.)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.एम.एस.पाटील.)
---------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून चुकीचा धनादेश दिल्याने झालेल्या सेवेतील ञृटीमुळे नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी विकास, आदिवासी विकास भवन, गडकरी चौक, नाशिक यांच्या सहा प्रकल्पा अंतर्गत शासकीय वसतिगृहातील रिक्त पदा करिता जाहीरातीप्रमाणे ग्रंथपाल या पदासाठी अर्ज केला होता. सदर पदासाठी आवश्यक असलेली कागदपञे जोडून अर्जासोबत राष्ट्रीय बॅंकेचा, प्रकल्प अधिकारी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास. नाशिक यांचे नावे धनादेश काढून जोडने आवश्यक होता. तक्रारदार हे इतर मागासवर्ग या प्रवर्गातील असल्यामुळे सदर पदासाठी रु.१००/- चा धनादेश जोडावयाचा होता. या प्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवालेंच्या बॅंकेत धनादेश मिळण्यासाठी रक्कम रु.१००/- व त्याकामी कमिशन रु.३०/- अशी एकूण रु.१३०/- ची पावती जमा केली.
(३) धनादेश पाठविल्यानंतर तक्रारदार यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी पञ देऊन कळविले की, त्यांनी सदर ग्रंथपाल पदासाठी केलला अर्ज नाकारण्यात येत आहे. नाकारण्याचे कारण, Demand Draft not in favour / invalid D D (D.D Enclosed ) असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी धनादेश काढण्याचा अर्ज व्यवस्थीत भरुन दिलेला असतांना देखील सामनेवाले यांनी “विकास” या शब्दा ऐवजी “विभाग” असा शब्द टाकून चूक केली आहे व सेवेत कमतरता दर्शविली आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान होऊन त्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. याकामी सामनेवाले हे रक्कम रु.१५,००,०००/- देण्यास जबाबदार आहेत. या बाबत सामनेवाले यांना नोटिस पाठविली आहे. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी पुर्तता केलेली नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.
(४) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, स्पर्धा परीक्षेस बसणेकामी त्यांची आवश्यक वयोमर्यादा पुर्ण झाल्याने भविष्याचे संपूर्ण नुकसान सामनेवालेंच्या चुकीमुळे झाले आहे. त्यामुळे नुकसानीपोटी रु.१५,००,०००/- व अर्जाचा खर्च रु.१५,०००/- या रकमा द.सा.द.शे.२४ टक्के व्याजासह मिळाव्यात.
(५) सामनेवाले यांनी नि.नं.१४ वर कैफीयत दाखल केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी पावती भरुन मागणी केली त्याप्रमाणे धनादेश दिला आहे. बॅंक नियमाप्रमाणे तो तपासून खाञी करण्याची जबाबदारी तक्रारदार यांची होती. धनादेशावर विकास या शब्दाऐवजी विभाग असा शब्द टाकून सामनेवाले यांनी चुक केली हे सामनेवाले यांना मान्य नाही. नोटिस बोर्डवर धनादेशाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, धनादेश हा तपासून घेण्यात यावा. या सूचनेची अंमलबजावणी न करता तक्रारदारांनी स्वत: चुक केली आहे. बॅंकेने कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करावा अशी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.
(६) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.३, कागदपञ नि.नं.५ वरील एकूण १ ते ७, तसेच सामनेवाले यांचा खुलासा नि.नं. १४, शपथपञ नि.नं.१५ पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे धनादेश मिळणेकामी रु.१००/- व त्याकामी लागणारी कमिशन रु.३०/- ची पावती भरुन धनादेशाची मागणी केली आहे. त्यानंतर सामनेवाले यांनी क्र.९८०९१९ या क्रमांकाचा धनादेश तक्रारदारास अदा केलेला आहे ही बाब सामनेवाले यांनी मान्य केलेली आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारादार यांना, महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास भवन, यांच्या आश्रमशाळा व शासकिय वसतिगृहातील रिक्त पदावरील ग्रंथपाल या पदा करिता जाहीरात दि.०१-०८-२००९ रोजी प्रमाणे अर्ज करावयाचा होता. या जाहीरातीप्रमाणे राष्ट्रीय बॅंकेकडे, तक्रारदार हे इतर मागासवर्गीय असल्यामुळे त्यांनी रु.१००/- चा धनादेश, मिळण्याकामी सामनेवाले बॅंकेकडे मागणी केली आहे. त्या बाबतची पावती तक्रारदार यांनी नि.नं.५/३ वर दाखल केली आहे. सदर पावती पाहता यामध्ये तक्रारदारांनी प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक शाखा यांच्या नांवे धनादेश रु.१००/- ची मागणी केलेली आहे. सदर पावती ही दि.१२-०८-२००९ ची असून त्यावर रोख रक्कम रु.१००/- व रु.३०/- कमिशनचे अदा केल्याची नोंद आहे व त्यावर बॅंकेचा शिक्का आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक शाखा यांच्या नांवे धनादेश मिळणेकामी सामनेवाले यांच्याकडे अर्ज केलेला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना धनादेश दिलेला असून सदर धनादेश नि.नं.५/४ वर दाखल आहे. याचे अवलोकन केले असता त्यावर प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग नाशिक यांच्या नांवे दि.१२-०८-२००९ रोजी रकम रु.१००/- चा धनादेश दिलेला आहे असे दिसते.
तक्रारदार यांनी दाखल केलेली पावती व सामनेवाले यांनी अदा केलेला धनादेश या दोन्ही कागदपञांवरुन असे लक्षात येते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे धनादेश दिलेला नाही. सदर धनादेशावर “विकास” या शब्दाऐवजी “विभाग” हा शब्द लिहून सामनेवाले यांनी चुक केलेली आहे हे स्पष्ट होत आहे.
(९) त्यानंतर तक्रारदार यांचा अर्ज संबंधीतांनी नाकारलेला आहे. त्या बाबतचे पञ नि.नं.५/५ वर दाखल आहे. सदर पञ पाहता त्यामध्ये अर्ज नाकारण्याचे कारण हे Demand Draft not in favour / invalid D D (DD Enclosed ) असे नमूद केलेले आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, सदरच्या धनादेशामध्ये चुक झालेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाहिरातीप्रमाणे संबंधीत पदाचे प्रवेश परिक्षेसाठी पाञ होऊ शकलेले नाहीत. या बाबत सामनेवाले यांनी दिलेल्या धनादेशामध्ये चुक केली आहे, त्यामुळे सामनेवाले हे जबाबदार आहेत असे स्पष्ट होत आहे.
तक्रारदार यांचे वय अर्ज करतेवेळी ३४ वर्ष होते व सदरचा अर्ज नाकारल्याने अर्जदारांची वयोमर्यादा पुर्ण होत असल्याने त्यांना यापुढे कोणत्याही पदासाठी अर्ज करता येणार नाही किंवा त्यांना नोकरीस लागता येणार नाही. या कामी सामनेवाले हे जबाबदार असल्याने, त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीबद्दल रु.१५,००,०००/- ची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
आमच्या मते, सामनेवाले यांनी सदरच धनादेश देण्यात निश्चितच चुक केली आहे. परंतु त्याच बरोबर तक्रारदार यांनी आपण नमूद केलेल्या पावती प्रमाणे योग्य तो धनादेश मिळाला आहे किंवा नाही ? त्यावरील मजकूर, नाव, रक्कम इत्यादी माहिती काळजीपूर्वक तपासणी करुन धनादेश ताब्यात घेण्याची जबाबदारी आहे. सदरची तपासणी न करता तक्रारदार यांनी धनादेश ताब्यात घेतला ही बाब सुध्दा निष्काळजीपणाची आहे. त्यामुळे या बाबतची संपूर्ण जबाबदारी तक्रारदार हे सामनेवाले यांच्यावर लादू शकत नाहीत. याचा विचार होता तक्रारदार यांनी सदरची नोकरी गमावल्याकामी केवळ सामनेवाले यांना जबाबदार धरुन त्यांचेकडून रक्कम रु.१५,००,०००/- ची मागणी केली आहे, ती योग्य वाटत नाही. कारण योग्य मागणी प्रमाणे धनादेश देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची आहे. परंतु त्याच बरोबर अशा धनादेशाची योग्य तपासणी करुन तो ताब्यात घेण्याची जबाबदारी प्रत्येक ग्राहकाची आहे.
सामनेवाले यांनी सदर धनादेश देतांना निश्चितच चुक केली आहे. ही बाब लक्षात घेता अर्जदारांचे नुकसान झालेले आहे. त्याकामी रक्कम रु.१०,०००/- नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांका पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारांना, सेवेतील ञृटी बददल रक्कम १०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार मात्र) द्यावेत.
सदर रक्कम मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याजासह रक्कम द्यावी.
(२) तक्रारदारांना, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम ५००/-(अक्षरी रु.पाचशे मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः १३/०६/२०१३
(सौ.एस.एस.जैन.) (सौ.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.