जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 649/2007 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 01/09/2007.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-23/07/2015.
श्री.दिलीप तुकाराम शिंदे,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.मु.पो.रोटवद,ता.धरणगांव,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. शाखाधिकारी, भारतीय स्टेट बँक, धरणगांव,
ता.धरणगांव,जि.जळगांव.
2. रिजनल मॅनेजर,भारतीय स्टेट बँक,सिडको,
औरंगाबाद.
3. चिफ रिजनल मॅनेजर,भारतीय स्टेट बँक,
13 वा मजला, कॉर्पोरेट सेंटर,मादाम कामा रोड,
पो.बॉ.नं.12, मुंबई 21. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.
सामनेवाला तर्फे श्री.आर.एच.गाडगीळ वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे मौजे रोटवद,ता.धरणगांव,जि.जळगांव येथील रहीवाशी आहेत. तक्रारदाराचे भारतीय स्टेट बँक, धरणगांव या शाखेत खाते आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र. 1 यांचे ग्राहक आहेत. दि.13/6/2005 रोजी तक्रारदार हे बँकेत सामनेवाला क्र.1 शाखेत रक्कम रु.12,600/- घेऊन जमा करण्यासाठी गेले होते त्यासाठी रक्कम रु.500/- च्या दोन = रु.1,000/- रु.100/- च्या 116 = 11,600/- अशी एकुण रक्कम रु.12,600/- होते. तक्रारदाराचे खात्यात सदरची रक्कम जमा करतांना रु.100/- नोटांचे बंडल अनवधनाने लिहीण्याचे राहुन गेले व नजरचुकीने रक्कम रु.12,600/- भरली असली तरी केवळ स्लिपवर रु.2,600/- एवढा आकडा लिहीला गेला. प्रत्यक्ष काऊंटरवर रु.12,600/- भरणा केला तथापी स्लिपवर अनवधनाने रु.2,600/- एवढी रक्कम लिहीली गेल्यामुळे तक्रारदाराचे खात्यात तेवढीच रक्कम जमा करण्यात आली. दि.20/6/2005 रोजी तक्रारदार हे शासकीय भरणा करण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यात रक्कम रु.26,880/- शिल्लक असल्याचे समजले. दि.24/6/2005 रोजी तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडे अर्ज दिला व रु.10,000/- परत करण्यात यावे अशी विनंती केली. सामनेवाला यांनी रक्कम दिली नाही. सामनेवाला यांचेकडील स्क्रोल रजिस्ट्ररला व शॉर्ट अण्ड असेसमेंट रजिस्ट्ररला रक्कम रु.10,000/- असल्याचे त्याच दिवशी लक्षात आले. दि.25/6/2005 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उत्तर देऊन त्यांचा विनंती अर्ज रद्य केला तदनंतर तक्रारदार यांनी अर्ज देऊन चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली व माहितीच्या अधिकारात कागदपत्रे मिळण्यासाठी अर्ज केला. तसेच अपिलही दाखल केले. दि.9/5/2006 रोजी मा.राज्यपाल साहेब व लोकआयुक्त यांच्याकडे अपिल अर्ज पाठविले आहेत. मा.राज्यपाल यांचे सचिव यांनी तक्रारदारास पत्र देऊन अर्ज उचित कार्यवाहीसाठी वित्त विभागाकडे पाठविल्याचे कळविले आहे. तसेच दि.21/6/2006 रोजी मा.लोकआयुक्त यांनी तक्रारदारास पत्र पाठवुन राज्य मुख्य माहिती आयुक्ताचा पत्ता दिला. तक्रारदार यांनी मा.राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्याकडे अर्ज दिला. सामनेवाला बँकेने कागदपत्र देता येत नाहीत असे कळविले. तक्रारदार यांनी मा.चिफ जनरल मॅनेजर, बँकीग ऑपरेशन,मुंबई यांचेकडे अपिल दाखल केले. तक्रारदाराने सामनेवाला यांना रजिस्ट्रर पोष्टाने नोटीस पाठविली. सदरील नोटीस मिळुनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.10,000/- दिले नाहीत. तक्रारदारास आर्थिक त्रास सोसावा लागला तसेच सदरील तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास झाला. सबब तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन त्यांनी भरलेली रक्कम रु.10,000/- व्याजासह परत देण्याचे आदेश व्हावेत, तक्रारदारास करावा लागलेला खर्च, मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाला हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा सादर केला. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील कथन नाकारलेले आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. सदरील तक्रार चालु शकत नाही. तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा धरणगावं यांचेशी जो व्यवहार केला आहे तो व्यवहार बँकेच्या वतीने केला आहे. बँकेतील व्यक्ती त्यास व्यक्तीशः जबाबदार नाहीत. सदरील तक्रार ही व्यक्तीशः केलेली असल्यामुळे चालु शकत नाही. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे खात्यात दि.13/6/2005 रोजी रक्कम भरली नाही अथवा काही रक्कम अनवधनाने लिहील्याचे राहीले ही बाब चुकीची आहे. तक्रारदाराने दि.13/6/2005 रोजी रक्कम रु.2,600/- चा भरणा केलेला आहे व तीच रक्कम त्यांचे खात्यात जमा केली आहे. तक्रारदारांना त्यांचे व्हाऊचर व डिपॉझीट पावतीवरील सही दाखवुन समाधान करुन दिलेले आहे. सामनेवाला यांनी पुढे असेही नमुद केलेले आहे की, तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त क्र. 1 चे स्लिपवर तक्रारदाराने स्वतः दोन आकडयाचे आधी एकचा आकडा लिहुन खोटा दस्त तयार केला व रक्कम रु.2,600/- चे रक्कम रु.12,600/- केलेले आहेत. तक्रारदाराने अधिक रक्कम रु.10,000/- दि.13/6/2005 रोजी भरलेले नाहीत. सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रद्य करण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत कॅश क्रेडीट जमा पर्चीची झेरॉक्स प्रत, तसेच सामनेवाला यांच्याकडे दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी रोकड रक्कम प्राप्ती उतारा दाखल केलेला आहे तसेच तक्रारदाराने दाखल केलेली खाता जमा पर्ची हजर केलेली आहे व शॉर्ट एक्सेस रजिस्ट्ररचा उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदाराने कॅश क्रेडीट खाते जमा पर्चीची मुळ प्रत दाखल केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे चालु खाते जमा पर्चीची मुळ प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदार व सामनेवाला यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराचे वकील श्री.भंगाळे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील श्री.गाडगीळ यांचा युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत
त्रृटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत
काय ? नाही.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 व 2 ः
5. तक्रारदार यांचे वकील श्री.भंगाळे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी दि.13/6/2005 रोजी सामनेवाला क्र. 1 शाखेत भरण्यासाठी रक्कम रु.12,600/- आणले होते. सदरील रक्कम ही रु.500/- च्या दोन नोटा व रु.100/- च्या 116 नोटा अशी होती. परंतु अनवधनाने तक्रारदार यांनी भरणा स्लिपवर रु.2,600/- एवढा आकडा लिहीला. प्रत्यक्षात रु.12,600/- कॅश काऊंटरवर दिले. सामनेवाला यांचे अधिका-यांनी ती रक्कम जमा करुन घेतली परंतु तक्रारदाराचे खात्यात सदरील रक्कम जमा दाखविली नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही व रितसर अर्ज देऊनही सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच श्री.भंगाळे यांनी असाही युक्तीवाद केला की, दि.13/6/2005 च्या सामनेवाला यांचे कॅशीयर यांचे प्राप्ती सारणी मध्ये तक्रारदाराने रक्कम रु.2,600/- भरल्याचे दर्शविलेले आहे परंतु सामनेवाला यांचे शॉर्ट असेसमेंट रजिस्ट्रर मध्ये दि.13/6/2005 रोजी रु.10,000/- कॅश रिसीट काऊंटरवर जास्त असल्याचे आढळुन आलेले आहे. सदरील रक्कम ही तक्रारदारांचीच आहे ती देण्यास सामनेवाला यांनी टाळाटाळ करुन सेवेत त्रृटी ठेवली आहे.
6. सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी या मंचासमोर खाता जमा पर्ची दाखल केली आहे त्यामध्ये स्वतःच्या हाताने दोन अक्षरापुढे एक लिहीला आहे व खाडाखोड करुन जणुकाही त्यांनी बँकेत रक्कम रु.12,600/- भरलेले आहेत असे दर्शविले आहे. सदरील खाडाखोड ही मुळ दस्तऐवजात खोटयापणाने केलेली आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी भरलेल्या मुळ जमा पर्चीवर वेधले व तक्रारदार यांनी त्यांचे स्वतःच्या हस्ताक्षरात नोटांचे वर्णन लिहीलेले आहे तसेच अक्षरी व शब्दामध्ये किती रक्कम भरली आहे हे स्पष्ट नमुद केलेले आहे. जर तक्रारदाराने रक्कम रु.12,600/- खात्यात जमा करण्यासाठी भरले असते तर सर्व ठिकाणी एकच रक्कमेचा उल्लेख आला नसता तसेच नोटांचे वर्णनामध्ये सारखेपणा आला नसता. तक्रारदाराने रु.500/- च्या दोन नोटा व रु.100/- च्या 16 नोटा अशा एकुण रु.2,600/- त्याच्या खात्यात भरले आहेत व सदरील रक्कम तक्रारदाराच्या खात्यावर जमा आहे त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली नाही.
7. वरील नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले दस्त लक्षात घेतले. तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार दि.13/6/2005 रोजी त्यांनी त्यांचे खात्यामध्ये रक्कम जमा केली. दि.24/6/2005 रोजी त्यांना त्यांचे खात्यात रु.10,000/- कमी भरल्याचे निर्दशनास आले. सदरील बाब लक्षात घेता तक्रारदाराच्या ताब्यात जमा पर्चीची पावती होती त्यावर तक्रारदाराने रु.2,600/- लिहीलेले होते. तक्रारदार यांना सदरील बाब उशिराने कळली याबाबत कोणतेही स्पष्टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही. जमा पर्ची पावत्या तक्रारदाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीलेल्या आहेत. तसेच नोटांचे वर्णन स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीलेले आहे. तसेच एकुण रक्कमेचा आकडा स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीलेला आहे., सर्व ठिकाणी जी माहिती भरलेली आहे ती तक्रारदार यांनी स्वतः भरलेली आहे व तक्रारदाराने जेवढी रक्कम जमा पर्ची मध्ये दर्शविली आहे तेवढी रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा केली आहे. तक्रारदार यांनी अतिरिक्त रक्कम रु.10,000/- जर भरले असते तर त्यांनी ज्या 100/- रु च्या नोटा बँकेत भरण्यासाठी आणल्या होत्या त्या मोजुन त्यांची संख्या निश्चितच जमा पर्चीमध्ये लिहीली असती परंतु जमा पर्ची मध्ये रु.100/- च्या 16 नोटाच भरल्या आहेत हे तक्रारदाराने लिहीलेले आहे तसेच तक्रारदाराकडे सदरील रक्कम रु.10,000/- शिल्लक होते व ते त्यांनी कोठुन आणले होते याबाबतही तक्रारदार यांनी खुलासा केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत तक्रारदार हे जरी सामनेवाला यांचे ग्राहक असले तरी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे ही बाब शाबीत करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी त्यांचे जवळ असलेल्या जमा पर्ची मध्ये अनधिकृतपणे दोन अक्षराच्या पुढे एक अक्षर लिहून जणुकाही त्यांनी रु.12,600/- भरलेले आहेत हे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु प्रत्यक्षात मुळ रेकॉर्ड समोर आले असता त्यामध्ये तक्रारदार यांनी रु.500/- च्या दोन नोटा व रु.100/- च्या 16 नोटा अशी रक्कम रु.2,600/- भरलेली आहे असे निर्दशनास येते व तेवढीची रक्कम त्यांचे खात्यावर जमा केली आहे त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रृटी ठेवलेली नाही. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे खात्यात अधिक रु.10,000/- भरण्यासाठी सामनेवाला यांचे अधिका-याकडे दिले होते ही बाबही शाबीत केलेली नाही केवळ शॉर्ट असेसमेंट रजिस्ट्रर मध्ये श्री.बी.एन.पाटील यांचे काऊंटरवर रु.10,000/- अधिक रक्कम आढळुन आली यावरुन सदरील रक्कम तक्रारदारांचीच आहे असे निष्कर्ष काढता येत नाहीत तसेच सदरील रक्कमेबाबत समरी डिपॉझीट यांचे व्हेरीफीकेशन करण्यात आले आहे व सदरील फरक आढळुन आला नाही अशी नोंद केली आहे.
8. वरील नमुद केलेल्या विवेचनावरुन तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 23/07/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.