निकालपत्र :- (दि.16.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांचे सामनेवाल बँकेमध्ये बचत खाते आहे, सदर खात्याचा नं. 11271996565 असा आहे. सदर बचत खात्यासाटी तक्रारदारांना एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणेत आली आहे. दि.18.04.2009 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला बँकेच्या एटीएम मधून रुपये 3,800/- काढण्यासाठी एटीएम सुविधेचा वापर केला असता एटीएम मशिनमध्ये बिघाडामळे तक्रारदारांना सदरची रक्कम अथवा रक्कम अदा झालेबाबतची पावती मिळाली नाही. त्याबाबत सामनेवाला बँकेस त्याच दिवशी लेखी कळविले. परंतु, सामनेवाला बँकेने सदर रक्कम एटीएम यंत्राद्वारे अदा केल्याची चुकीची व तथाकथित नोंद तक्रारदारांच्या खाती होवून एकूण रक्कमेतून सदर रक्कम वजा झाल्याचे समजले. याबाबतची वस्तुस्थिती सामनेवाला बँकेच्या निदर्शनास आणून दिली असता तक्रारदारांच्या खात्यातून वजावटहोवनू अदा न झालेली रक्कम रुपये 3,800/- दिली नाही. सबब, सदरची कृती सामनेवाला यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे रक्कम रुपये 3,800/-, दि.18.04.2009 रोजी पासून तक्रार दाखल करेपावेतो दर दिवसास रुपये 100/- प्रमाणे होणारी नुकसान भरपाई, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/-, अर्जाचा खर्च रुपये 1,250/- इत्यादी देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचेकडे दि.11.10.2009 रोजी केलेली लेखी तक्रार, सामनेवाला क्र.1 चे दि.21.04.2009 रोजीचे पत्र, बचत खात्यातील संबंधित पानाची प्रत, एटीएम वापरलेबाबत सुरक्षा रक्षकाने दिलेली चिठ्ठी, सामनेवाला क्र.2 ने तक्रारदारांचे दि.26.11.2009 रोजीचे नोटीसीस खुलासा, सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी तक्रारी उल्लेख केलेल्या दिवशी एटीएम चा वापर केल्याने त्यांच्या खात्यातून रुपये 3,800/- कमी झाली आहे. सदरची बाब सामनेवाला बँकेने त्यांच्या हेड ऑफिसला कळवून दि.21.05.2010 रोजी तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये सदरची रक्कम जमा केली आहे. एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे तक्रारदारांची सदरची रक्कम त्यांचे नांवे पडली. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदारांच्या नांवे रक्कम ट्रान्स्फर केलेबाबतचे व्हौचर व बचत खात्याचा उतारा दाखल केला आहे. (6) सामनेवाला क्र.2 बॅकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांना ज्या एटीएम सेंटरमधून पैसे मिळाले नाहीत, ते सेंटर ऑफ साईट असून त्याचे नियंत्रण प्रस्तुत बँकेच्या अखत्यारीत येत नाही. जर एखाद्या ग्राहकाला एटीएम मधून पैसे मिळाले नाहीत तर तो ज्या बँकेचा ग्राहक आहे त्या बँकेकडे अर्ज करणेची आवश्यकता आहे. सदरचे न मिळालेले पैसे देणेची जबाबदारी स्टेट बँकेची असून प्रस्तुत बँकेची नाही. (7) तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकणेत आला. तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे तक्रारदारांच्या बचत खात्यासाठी एटीएम सुविधा दिली होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. दि.18.04.2010 रोजी रुपये 3,800/- एटीएममधून काढताना रक्कम अथवा सदरची रककम मिळाली याबाबची पावती तक्रारदारांना मिळाली नाही. सदरची वस्तुस्थिती सामनेवाला क्र.1 बँकेने त्यांच्या म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. (8) सामनेवाला क्र.1 बँकेने दि.21.05.2010 रोजी तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये रक्कम रुपये 3,800/- जमा केल्याचे कथन म्हणण्यात केले आहे. दि.25.05.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे अर्ज देवूनसदरची रक्कम कोणत्या कारणाने जमा केली आहे याची विचारणा करणेकरिता पत्र दिले. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे दि.21.04.2009 रोजी अर्ज दिला आहे. सदरची रक्कम तक्रारदारांच्या बचत खात्यावर दि.21.05.2010 रोजी जमा केली आहे. तक्रारदारांनी एटीएम सुविधेचा वापर केल्यानंतर अयोग्यरित्या सदरची रक्कम तक्रारदारांच्या खात्यावर नांवे टाकल्यानंतर पुन्हा तक्रारदारांच्या खात्यावर जमा करणेस 13 महिन्यांचा कालावधी सामनेवाला बँकेने लावला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी सदरची रक्कम त्यांच्या खात्यावर कोणत्या कारणासाठी जमा करणेत आली याबाबतचा तपशील सामनेवाला बँकेकडे मागितली. त्याबाबत सामनेवाला बँकेने तपशील दिलेला नाही. तक्रारदारांच्या खात्यावर सामनेवाला यांनी रक्कम जमा करणेस विलंब लावलेला आहे. सबब, सदरची वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला क्र.1 बँकेने सेवेत त्रुटी झाली या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या रक्कम रुपये 3,800/- वर दि.21.04.2009 ते दि.21.05.2010 या कालावधीकरिता द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत. (9) तसेच, तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे दि.17.07.2009 रोजीचे परिपत्रक दाखल केले आहे. सदर परिपत्रकाचे अवलोकन केले असता ‘‘ग्राहकाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये तक्रार मिळालेपासून 12 दिवसांमध्ये जमा करणेस बँक असफल झालेस बँकेने प्रत्येक दिवशी रुपये 100/- प्रमाणे नुकसान भरपाई ग्राहकास अदा करणेची आहे’’ असे निदर्शनास येते. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार केला असता सदरची रक्कम बचत खात्यावर जमा करणेस 13 महिन्यांचा विलंब केलेला आहे. त्याचा तपशील तक्रारदारांनी मागितला असता सामनेवाला क्र.1 बँकेने दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार हे सदर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.1 बँकेने तक्रारदारांना रक्कम रुपये 3,800/- वर दि.21.04.2009 ते दि.21.05.2010 या कालावधीकरिता द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला क्र.1 बँकेने तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 39,600/- (रुपये एकोणचाळीस हजार सहाशे फक्त) द्यावी. 4. सामनेवाला क्र.1 बँकेने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- द्यावेत. 5. सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |