नि. 15 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 197/2010 नोंदणी तारीख – 24/8/2010 निकाल तारीख – 28/10/2010 निकाल कालावधी – 64 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री बापूसाहेब शंकरराव यादव 2. सौ जयश्री बापूसाहेब यादव दोघे रा.चैतन्य हॉस्पीटल, ग्रामपंचायत कार्यालयाचे मागे, लोणंद, ता.खंडाळा जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एम.डी.गाडे) विरुध्द चंद्रसेन बी.बर्गे, चीफ मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा सातारा प्रतापगंज पेठ, सातारा ता.जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री विलास देशपांडे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे लोणंद येथील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार क्र.1 व 2 हे चैतन्य एग्रो हायटेक प्रा.लि. या दुग्धव्यवसाय करणा-या संस्थेचे अनुक्रमे चेअरमन व संचालक होते. सदरचे संस्थेसाठी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून सन 2001 मध्ये रु.67,00,000/- या रकमेचे कर्ज घेतले होते. सदरचे कर्जाची परतफेडे अर्जदार यांनी मुदतीत न केलेमुळे जाबदार यांनी अर्जदार यांचेविरुध्द डी.आर.टी.पुणे यांचेसमोर कर्जवसुलीसाठी खटला दाखल केला होता त्याचा निकाल जाबदार यांचे बाजूने झाला आहे. त्याविरुध्द अर्जदार यांनी अपिल केले असून त्याचे काम अद्यापी चालू आहे. अर्जदार व जाबदार यांचेमध्ये तडजोड होवून त्यानुसार अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे रक्कम जमा केली आहे. त्यानंतर अर्जदारकडून जाबदार यांना कोणतीही रक्कम येणे नाही. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे बोजाची नोंद कमी करणेचे व कर्जखाती काही येणेबाकी नाही असा दाखला मागितला असता जाबदार यांनी तो दिलेला नाही. सबब अर्जदार यांचे विनाकारण झालेल्या नुकसानीपोटी, मानसिक त्रासापोटी व बदनामीपोटी रु.2 लाख मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. सदरचा अर्ज हा चैतन्य एग्रो हायटेक प्रा.लि. यांनी करणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांनी वैयक्तिकपणे तो दाखल केला आहे. सामनेवाला यांनी चैतन्य एग्रो हायटेक प्रा.लि. यांना कर्ज दिलेले होते त्याबाबत डी.आर.टी.मुंबई येथे चार अपिल चालू आहेत तसेच सातारा कोर्टात एक दावा चालू आहे. सदरच्या केसेस निकाली निघालेशिवाय जाबदार यांना नो डयूज प्रमाणपत्र देता येत नाही. अर्जदार यांना अर्ज करण्याचा अधिकार आहे का याबाबत प्राथमिक मुद्दा काढणेत यावा. सदरचे कर्जापोटी तडजोडीप्रमाणे रु.30 लाखाचा चेक त्यावेळचे चेअरमन श्री निगडे यांनी भरलेला आहे त्यामुळे ते याकामी आवश्यक पक्षकार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री गाडे यांनी व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील मुख्य कथन असे आहे की, त्यांनी जाबदार यांचेकडे कर्जाची संपूर्ण रक्कम तडजोडीप्रमाणे भरुनही जाबदार यांनी अर्जदार यांना योग्य तो दाखला दिलेला नाही. सबब झालेल्या नुकसानीपोटी रु. 2 लाखाची मागणी अर्जदार यांनी केली आहे. 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी चैतन्य एग्रो हायटेक प्रा.लि. यांना दिलेल्या कर्जाबाबत मा.डी.आर.टी.मुंबई येथे चार अपिल प्रलंबित आहेत तसेच सातारा येथील न्यायालयात एक दावा प्रलंबित आहे. सदरच्या दाव्यांचा निर्णय झालेशिवाय त्यांना कर्जखाते बंद केलेचा दाखला देता येत नाही. जाबदार यांचे सदरचे कथन पाहता अर्जदार यांनी ज्या कर्जविषयाबाबत प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे, त्याच कर्जाबाबत जर अपिल दाखल असेल तर सदरचे अपिलाचा निर्णय होण्यापूर्वी अर्जदार यांना जाबदार यांचेकडून कर्ज खाते बंद केलेबाबतचा दाखला मागता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचे कथनानुसार त्यांनी जरी तडजोडीप्रमाणे कर्जाची थकबाकीची रक्कम जाबदार यांचे भरली असली तरी सदरचे कर्जाबाबत मा.डी.आर.टी.मुंबई यांचेसमोर दाखल असलेल्या अपिलाचा निर्णयही महत्वाचा ठरणारा आहे. सदरचा निर्णय होण्यापूर्वी जाबदार यांनी अर्जदार यांचे मागणीप्रमाणे दाखला दिला तर कायेदशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जाबदार यांनी ज्या संस्थेला कर्जपुरवठा केला त्या संस्थेच्या वतीने अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल करणे आवश्यक होते. परंतु संस्थेला पक्षकार न करता वैयक्तिक पातळीवर दाखल केलेला प्रस्तुतचा अर्ज फेटाळणेतस पात्र आहे. वरील सर्व कारणांचा विचार करता कर्ज खाते बंद करण्याचा दाखला न देण्याची जाबदार यांची कृती ही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर आहे, सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केली नाही असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.28/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |