Exh.No.19
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.21/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि. 01/08/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 26/03/2014
श्री सिताकांत वामन तिरोडकर
वय वर्षे 83, धंदा- पेन्शनर,
रा.नाबरवाडी, पो.कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग, पिन- 416 520 ... तक्रारदार
विरुध्द
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कुडाळ शाखा
तर्फे श्री अतुल कुमार कच्छप
पत्ता- पानबाजार, कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग ... सामनेवाला
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती सावनी सं .तायशेटे सदस्य
3) श्री. कमलाकांत ध.कुबल, सदस्य.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री एस. एन. भणगे
निकालपत्र
(दि.26/03/2014)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांच्या मातोश्री कै. ताराबाई तिरोडकर यांनी सामनेवाला बँकेमध्ये ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची रक्कम दिली नाही म्हणून सामनेवालाकडून मिळणा-या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे.
2) तक्रारीचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणेः-
3) तक्रारदार तसेच कै.ताराबाई वामन तिरोडकर हे गेले अनेक वर्षे स्टेट बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेचे ग्राहक होते. ताराबाई यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार व त्यांचे बंधू गजानन यांच्या वारसांनी सामनेवाला बँकेला सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन मुदत ठेव पावत्यांची रक्कम व्याजासह मागणी केली. तथापि सामनेवालांनी ब-याच कालावधीनंतर Revised form सादर करा अशी तोंडी सूचना दिली. त्यानुसार ता.16/12/2005 रोजी तक्रारदाराने सर्व पुर्तता केली. तथापि सामनेवालाने वेळोवेळी काही ना काही कारणे सांगून अर्जदारांचे मुदत ठेव प्रकरण निकाली काढले नाही तक्रारदाराने त्यांचे बंधू गजानन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस यांने Disclaimer Form बँकेला भरुन देऊन तक्रारदार यांना रक्कम देण्याचे अधिकारपत्र दिले. तथापि तक्रारदारांनी सर्व पूर्तता करुन देखील सामनेवालांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांनी सामनेवालाबरोबर बराच पत्रव्यवहार केला. ता.15/12/2012 च्या पत्राने सामनेवालाचे शाखाधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त करुन मुदत ठेव प्रकरणाला लवकरच मंजूरी मिळेल असे लेखी आश्वासन दिले. तथापि सामनेवाला बँकेने तक्रारदारांना पैसे देणेबाबत काहीही पूर्तता केली नाही म्हणून तक्रारदाराने 27/04/2013 रोजी सामनेवालांना पत्र पाठविले. तथापि सामनेवालाने कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच मुदत ठेव प्रकरणही निकालात काढले नाही. त्यामुळे तक्रारदार व इतर हिस्सेदार यांचे आर्थिक नुकसान झाले तसेच तक्रारदार यांचे वय 83 वर्षांचे असून त्यांना देखील आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदाराने मुदत ठेव रक्कम रु.46,843.84 व त्यावरील व्याज तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.800/- सामनेवालाकडून देववावेत असे आदेश होणेबाबत सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
4) सामनेवालाने नि.10 कडे म्हणणे दाखल करुन अर्जातील सर्व मजकूर नाकारलेला आहे. विरुध्द पक्षाच्या शाखाधिका-यांनी तक्रारदार यांना कोणत्याही त-हेचे आश्वासन दिलेले नव्हते. विरुध्द पक्षाचे शाखाधिकारी हे तक्रारदार व कै.ताराबाई हिच्या इतर वारसांनी कायदेशीर पूर्तता करुन दिल्यानंतर विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा असलेली रक्कम देण्यास तयार होते; परंतू कै.ताराबाई वामन तिरोडकर हिच्या वारसांनी कायदेशीर पूर्तता न केल्यामुळे सदरची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.
5) सामनेवालांच्या म्हणण्यानुसार कै.ताराबाई वामन तिरोडकर हिच्या मुदत ठेवीतील रक्कमेबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Account No. | Date | Amount | Maturity Date | Maturity Amt. with accrued interest up to 31/03/2012 |
905675 | 16/02/1990 | 24843.84 | 14/09/1991 | 187386 |
460222 | 28/11/1989 | 12000.00 | 18/11/1991 | 94342 |
580448 | 08/12/1986 | 10000.00 | 08/12/1989 | 86787 |
11353318792 | SB A/C | - | - | 16543 |
| Total | 385058 |
5) सामनेवालांच्या म्हणण्यानुसार सदरची रक्कम कायदेशीर वारसांना देण्यास तयार होते; परंतु त्यांच्या वारसांमध्ये वाद निर्माण झाला. शिवाय Letter of Disclaim मध्ये प्रदीप गजानन सावंत व सौ. माया देऊ पडते यांच्या सहया दिसत होत्या. मात्र प्रतिज्ञापत्रामध्ये तीच नावे प्रदिप गजानन तिरोडकर व मीरा गजानन तिरोडकर अशी दिसत होती. सदरच्या नावात बदल झाल्याचे राजपत्र जोडले नव्हते. विशेष म्हणजे कै. ताराबाई वामन तिरोडकर हिचे वारस असलेले श्री प्रदिप गजानन तिरोडकर उर्फ प्रदिप गजानन सावंत यांनी दि.17/08/2013 रोजी विरुध्द पक्ष यांना एक पत्र देऊन असे कळविले की, त्यांनी दि. 18/01/2011 रोजी Disclaimer चे प्रतिज्ञापत्र विरुध्द पक्ष यांना दिलेले आहे, ते रद्द समजण्यात यावे. कारण सदर रक्कमेबाबत कौटुंबिक वाद निर्माण झालेले आहेत. एवढेच नव्हेतर त्यांनी असेही कळविलेले आहे की, श्री सिताकांत वामन तिरोडकर यांना सदरची रक्कम अदा करु नये. म्हणून विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार वारसांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी सक्षम न्यायालयाकडून ‘वारसा प्रमाणप्रत्र आणणे उचित ठरेल तसेच ताराबाई वामन तिरोडकर यांच्या सर्व वारसांना पक्षकार केलेले नाही म्हणून सदरचा अर्ज कायदयाने चालणारा नाही म्हणून सदरचा अर्ज रद्द करणेत यावा तसेच रक्कम रु.10,000/- Compensatory Cost म्हणून तक्रारदाराकडून मिळावी, अशी विनंती केली आहे.
6) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.4 सोबत एकूण 9 कागद दाखल केले आहेत. याउलट सामनेवालाने नि.13 सोबत एकूण 5 कागद दाखल केले आहेत. तसेच तक्रारदाराने नि.15 कडे त्यांचे शपथपत्र व युक्तीवाद नि.16 कडे दाखल केले आहेत. सामनेवालाने या कामी कोणताही तोंडी पुरावा दाखल केलेला नाही.
7) तक्रारीचा आशय, एकूण पुरावा, युक्तीवाद यांचा विचार करता या मंचाच्या विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | अंशतः होय |
3 | काय आदेश ? | मंजूर |
8) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांच्या मातोश्री कै.ताराबाई यांनी सामनेवाला बँकेकडे तीन वेगळया मुदत ठेव पावत्या करुन रक्कमेची ठेव ठेवली होती ही गोष्ट सामनेवालाच्या नि.10 मधील पॅरा 11 तील मजकुरानुसार सिध्द होते. तक्रारदार हे ताराबाई यांचे वारस असल्याने सदर मुदत ठेवीची रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहेत. सबब, तक्रारदार हे सामनेवालाचे ‘ग्राहक’ आहेत हे सिध्द होते. सबब मुद्दा नं.1 चे उत्तर होकारार्थी देणेत येते.
9) मुद्दा क्रमांक 2 व 3 – एकंदरीत पुरावा पाहता तक्रारदाराने ता.16/12/2005 रोजी पत्र पाठवून Revised Form सादर करुन जुने प्रकरण लवकर निकालात काढण्याची विनंती केली होती. तसेच ता.16/12/2005 रोजी Revised Form देखील पाठवले होते. त्यांनतर तक्रारदारांनी ता.22/07/2006, 25/08/2008, 20/09/2012, 24/01/2012, 12/03/2013 व 27/04/2013 रोजी बँकेला वेळोवेळी पत्रे पाठविली. त्या सर्व पत्रांच्या नकला तक्रारदांरांनी हजर केलेंल्या आहेत व त्या प्रत्येक पत्रावर सामनेवाला बँकेची पत्रे मिळालेबाबतची पोच आहे. म्हणजेच तक्रारदारांनी सदर रक्कम मिळावी म्हणून बँकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे दिसून येते तसेच ता.15/12/2012 रोजी सामनेवाला बँकेचे पत्र पाहता सामनेवाला बँकेने उशीर झालेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी सदरचे प्रपोझल कंट्रोलरकडे पाठवलेबाबतही कळविले आहे आणि लवकरच कंट्रोलरकडून मंजूरी मिळेल असे कळविलेले आहे. म्हणजेच सामनेवाला बँकेने तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करणेबाबत उशीर झाल्याचे मान्य केले आहे.
10) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या पुराव्यानुसार गजानन यांचे वारसांने 17/08/2011 ला पत्र पाठवून त्यांनी 18/01/2011 ला दिलेले अधिकारपत्र रद्द केलेबाबत कळवले आहे. सामनेवालाच्या म्हणण्यानुसार गजानन यांच्या वारसांनी तक्रारदारांना रक्कम देण्यास हरकत घेतली म्हणून तक्रारदारांना रक्कम दिली नाही तथापि सामनेवाला बँकेने सदरच्या पत्राबाबत तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली याबाबत कोणतेही कागदपत्र किंवा पुरावा दाखल केलेला नाही. या ही उपर 2011 साली Disclaimer Form भरुन दिल्यानंतर देखील 2013 पर्यंत बँकेने रक्कम देणेबाबत काय कार्यवाही केली ? याबाबत कोणताही पुरावा बँकेने दाखल केलेला नाही. सामनेवाला बॅंकेने सन 1991 पासून सन 2013 पर्यंत तक्रारदारास रक्कम देणेबाबत कोणतिही कार्यवाही केली नाही. म्हणजेच सामनेवाला यांनी त्यांच्या कैफियतीत घेतलेला मजकूर की वारसांमध्ये वाद निर्माण झाला व पुर्वीचे Disclaimer Form वारसांनी रद्द केला म्हणून रक्कम देणेस विलंब झाला हा मुद्दा पटण्यासारखा नाही. कारण वारसांनी कोणतेही हरकत घेतली असेल तर ते कळवण्याची जबाबदारी सर्वस्वी बँकेवर होती ती जबाबदारी बँकेने योग्यरित्या पार पाडलेली नाही. या ही उपर नि.14/1 चे पत्र पाहता गजानन यांच्या वारसांनी तक्रारदारास 50% रक्कम देणेबाबत संमती दिली आहे. तसेच त्यांनी 25% रक्कम प्रदीप सावंत आणि 25% रक्कम माया देऊ पडते यांच्या नावे ट्रान्सफर करणेबाबत संमती दिली आहे. पुढे असे दिसून येते की, इतक्या दीर्घ कालावधीत बँकेने केव्हाही तक्रारदाराला व इतर वारसांना ‘वारसा सर्टीफिकेट’ दाखल करा असे कळवलेले नाही. सबब बँकेने सदरचे प्रकरण हाताळण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचे दिसून येते. तसेच सदरच्या मुदत ठेव पावत्यांची रक्कम ही तक्रारदाराच्या आईची म्हणजेच त्यांच्या घराण्याची आहे. सबब सदरची रक्कम ताराबाई यांच्या वारसांना मिळणे क्रमप्राप्त आहे. सबब, सदरची रक्कम बँकेने स्वतःकडे ठेऊन त्याचा वापर स्वतःच्या व्यवसायासाठी केल्याचे दिसून येते. एकंदरीत पुरावा पाहता बँकेने तक्रारदारांना या व्यवहारात सदोष सेवा तसेच सेवेमध्ये त्रुटी केल्याचे तक्रारदार यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेले आहे, या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदारांची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
आदेश
- तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवालांने तक्रारदाराला 50% रक्कम म्हणजे रु.1,92,529/- (रुपये एक लाख ब्यान्नव हजार पाचशे एकोणतीस मात्र) (मुदत ठेव रक्कम अधिक व्याज नि.10 पॅरा.11 मध्ये नमूद केल्यानुसार) तसेच दि.31/03/2012 पासून पूढील पूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% प्रमाणे दयावेत. तसेच उरलेली रक्कम व पुढील व्याज गजानन तिरोडकर यांचे वारसांना कायदेशीर पुर्तता केलेनंतर दयावी.
3) तक्रारदारांना झालेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.3,000/-(रुपये तीन हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.800/- (रुपये आठशे मात्र) सामनेवाला यांनी दयावा.
4) सदरच्या आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेश झालेपासून 60 दिवसांत करावी. अन्यथा तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार योग्य ती कार्यवाही करु शकतील.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या सत्यप्रती विनामुल्य पाठवण्यात यावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 26/03/2014
(सावनी सं. तायशेटे) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.