द्वारा- श्री. एस. के. कापसे , मा. सदस्य यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 13 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांच्या कै. पत्नीने व तक्रारदार क्र.2 – मुलाने जाबदेणार यांच्याकडे खाली नमूद तक्त्याप्रमाणे मुदतठेवी ठेवलेल्या होत्या.
अक्र | मुदतठेव पावती व दिनांक | रक्कम | व्याजदर टक्के | मॅच्युरिटी दिनांक | मॅच्युरिटी रक्कम |
1 | 517250/29.10.08 | 1400000 | 11 | 26.7.11 | 1885011 |
2 | 517251/29.10.08 | 1400000 | 11 | 26.7.11 | 1885011 |
3 | 517252/29.10.08 | 500000 | 11 | 26.7.11 | 673218 |
4 | 24.11.08 | 150000 | 11 | 21.8.11 | 202025 |
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मुदतठेव पावत्यांची मॅच्युरिटी रक्कम खालीलप्रमाणे येते
अक्र | रक्कम | SBIमॅच्युरिटी रक्कम | मॅच्युरिटी रक्कम RBI नुसार | फरक |
1 | 1400000 | 1885011 | 1892520 | 7509 |
2 | 1400000 | 1885011 | 1892520 | 7509 |
3 | 500000 | 673218 | 675900 | 2692 |
4 | 150000 | 202028 | 202700 | 672 |
| | | एकूण | 18287 |
जाबदेणार यांनी RBI यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार रक्कम दिली नाही. मॅच्युरिटी दिनांकास जाबदेणार यांच्या कॅल्क्युलेशन नुसार तक्रारदारांनी रक्कम अंडर प्रोटेस्ट स्विकारलेली आहे. जाबदेणार यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 18287/- व्याजासह मागतात, नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/-, खर्चापोटी रुपये 5,000/- मागतात. तसेच जाबदेणार यांनी RBI यांच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे अशी मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. RBI यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मॅच्युरिटी रक्कम काढण्यात आलेली आहे. क्वार्टरी कंपाऊंड व्याजानुसार रक्कम काढण्यात आलेली आहे. क्वार्टरमध्ये कितीही दिवस असले तरी मुदत ठेव पावती दिनांकापासून – तीन महिन्यांच्या क्वार्टरी बेसिसवर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यात येते. प्रस्तूतच्या तक्रारीमध्ये मुदतठेव पावती दिनांक 29/10/2008, रुपये चौदा लाख व 1000 दिवस होते. दिनांक 29/1/2009 रोजी कॅलेंडर महिन्यांनुसार क्वार्टर संपणारे होते. त्यानुसार व्याज देण्यात आलेले आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावत्यांचे मंचाने अवलोकन केले असता त्यावर जाबदेणार यांनी व्याजाची गणना क्वार्टरी बेसिसवर करण्यात येईल असा उल्लेख केल्याचे आढळून येत नाही. मुदतठेव 1000 दिवसांसाठी स्विकारण्यात आलेली होती. जाबदेणार यांनी लेखी जबाबामध्ये “The practice of the Bank compounding the interest on quarterly basis is taken three months from the date of issue/deposit irrespective of number of days in intervening months of a quarter.” असे नमूद केलेले असले तरी त्यासंदर्भात RBI यांच्या नेमक्या कोणत्या मार्गदर्शक सुचनांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्याची प्रत याकामी दाखल करण्यात आलेली नाही. व्याजाची गणना तीन महिन्यांच्या क्वार्टरी बेसिसवर करण्यात येईल याची माहिती मुदतठेव स्विकारतांना तक्रारदारांना देण्यात आलेली होती यासंदर्भातील पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 18287/- तक्रार दाखल दिनांक 19/12/2011 पासून 9 टक्के दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांची व्याजाची मागणी मंजुर केलेली असल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी अमान्य करण्यात येत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 18287/- दिनांक 19/12/2011 पासून 9 टक्के दराने संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- अदा करावे.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.