रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 143/2012
तक्रार दाखल दि. 18/12/12
तक्रार निकाली दि. 16/02/2015
श्री. मंगेश एकनाथ मोहिरे,
रा. नांगलवाडी फाटा, ता. महाड,
जि. रायगड. ...... तक्रारदार.
विरुध्द
1. स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा एम. आय.डी.सी.,
महाड, ता. महाड, जि. रायगड.
2. मा. शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एम. आय.डी.सी.,
महाड, ता. महाड, जि. रायगड. ..... सामनेवाले क्र. 1 व 2
समक्ष - मा. अध्यक्ष श्री. उमेश वि. जावळीकर,.
मा. सदस्या श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती- तक्रारदार तर्फे ॲड. मंगेश मोहिरे
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे ॲड. अरुण सावंत
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनवेाले यांचेकडून वैयक्तिक बँकींग सेवा सुविधा घेतलेली आहे. सदर सेवा सुविधा वापर करीत असताना तक्रारदार यांनी दि. 25/06/11 रोजी दि. सातारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक शाखा, कुंभरोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा या बँकेचा रक्कम रु. 70,000/- चा धनादेश क्र. 733066 वटविण्यासाठी जमा केला होता. सदर धनादेश जमा न झाल्यामुळे सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्याकडे चौकशी केली असता, कोणतेही संयुक्तिक उत्तर सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास दिले नाही. तसेच तक्रारदारास अदाकर्ता बँकेशी संपर्क साधण्यास सांगितले. तक्रारदारांनी त्यांचे विवाहासाठी सदर रकमेचा विनियोग करण्याचे निश्चित केले होते. परंतु सदरील रक्कम तक्रारदारांस प्राप्त न झाल्याने तक्रारदारास आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागले. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास धनादेश वटता अथवा अनादरीत झाल्याबाबत कोणतीही सत्यमाहिती न दिल्याने तक्रारदारांनी दि. 21/02/12 रोजी माहिती अधिकार अन्वये अर्ज सामनेवाले क्र. 1 व 2 यांना दिला असता सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी अनादरीत झालेला धनादेश व दि. 09/09/11 रोजीचा मेमो यांची प्रत दि. 22/02/12 रोजी तक्रारदारास दिली. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास दि. 09/09/11 रोजी अनादरीत झालेल्या धनादेशाचा मेमो तात्काळ दिला असता तर त्याबाबत पुढील योग्य ती कायदेशीर उपाययोजना तक्रारदाराने विहीत मुदतीत केली असती. परंतु सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी विहीत मुदतीत तक्रारदारास लेखी सूचना न देऊन व कागदपत्रे हस्तांतरीत न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने नुकसानभरपाईच्या मागणीसह प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले क्र. 1 व 2 यांना लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी जबाबात तक्रारीमधील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदार यांना कोणतीही सेवा सुविधा पुरविण्यात केला नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी असे कथन केले आहे. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी अनादरीत धनादेश दि. सातारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक, जि. सातारा यांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे न पाठवता “महेड” येथे पाठविल्याने सदरच्या निष्काळजीपणाबद्दल सामनेवाले क्र. 1 व 2 यांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही असे कथन केले आहे. धनादेश रक्कम अदाकर्ता बँकेने धनादेश अनादरीत झाल्याचे सूचनापत्र “महाड” ऐवजी “महेड” येथे पाठविल्याने सदर सूचनापत्र विहीत कालमर्यादेत तक्रारदारास पोच करता आले नाही. सबब, त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी अदाकर्ता बँकेची असून तक्रारदाराने अदाकर्ता बँके विरुध्द योग्य ती कारवाई न करता प्रस्तुत सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेविरुध्द तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी हेतूपुरस्सरपणे प्रस्तुत सामनेवाले क्र. 1 व 2 यांचे विरुध्द तक्रार दाखल केली असून सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केला नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी केली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारास
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार
सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास अदाकर्ता बँकेकडून प्राप्त अनादरीत धनादेशाचे सूचना पत्र “महेड” येथे पाठविल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांना तक्रारदारास विहीत कालावधीत धनादेश अनादरीत सूचनापत्र देता आले नाही. तसेच तक्रारदारांनी सदर सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर परक्राम्य चलन अधिनियम कलम 138 अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई दाखल न करता सामनेवाले क्र. 1 व 2 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांना विलंबाने धनादेश अनादरीत सूचनापत्र देण्यामध्ये केवळ धनादेश अदाकर्ता बँकेच्या निष्काळजीपणाचा संबंध असल्याने त्याबाबत सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी सेवेत कसूर केल्याबाबत निष्कर्ष काढणे न्यायेाचित नाही असे कथन सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी केले आहे. परंतु सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांस अनादरीत धनादेश सूचना पत्र दि. 22/02/12 रोजी दिले. सदर पत्रासोबत सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराने दिलेला धनादेश अदाकर्ता बँकेने “Refer to Drawer” या कारणाने अनादरीत करुन दि. 09/09/11 रोजीचे सूचनापत्र “महेड” या ठिकाणी पाठविल्याबाबत केवळ सदर सूचनापत्रावर नमूद आहे. परंतु प्रत्यक्षात सदर सूचनापत्र पाठविलेल्या लिफाफ्यावर “महेड” लिहिल्याबाबत व ते “महेड” या ठिकाणासाठी पोस्ट ऑफीसमध्ये नोंदणीकृत केल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी त्याबाबत इतर कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी “महेड” या नांवाचे गावी सामनेवाले क्र. 1 व 2 यांची शाखा असल्याची माहिती देखील मंचात दाखल केलेली नाही. प्रस्तुत तक्रारीत सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी केवळ तांत्रिक मुद्दयांचा आधार घेत तक्रारदारांना सूचनापत्र विहीत कालमर्यादेत न देता विलंबाने दिले असल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी कथन केलेले मुद्दे कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होत नसल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांचे आक्षेप न्यायोचित नाहीत असे मंचाचे मत आहे.
सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांस अनादरीत धनादेशाबाबतचे सूचनापत्र दि 22/02/12 रोजी दिले आहे. धनादेश अनादरीत दि. 09/09/11 ते दि. 22/02/12 पर्यंत तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे याबाबत विचारणा केली असता, तसेच लेखी नोटीसद्वारे उत्तर मागितले असता सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी कोणतेही संयुक्तिक उत्तर तक्रारदारांस दिले नाही. त्यावरुन तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब उपरोक्त निष्कर्षावरुन सिध्द होते. तसेच सदर रक्कम तक्रारदारांच्या विवाह सोहळ्यासाठी नियोजित असताना वापरता न आल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सबब, सामनेवाले क्र. 1 व 2 वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षांवरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 143/12 अंशत: मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस रक्कम रु. 70,000/- (रु. सत्तर हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांचे आत द्यावेत.
4. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस मानसिक व शारिरिक त्रासाच्या नुकसानभरपाईपोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. 50,000/- (रु. पन्नास हजार मात्र) आदेशप्राप्ती पासून 30 दिवसांचे आत द्यावेत.
5. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 3 ची पूर्तता विहीत मुदतीत न केल्यास दि. 09/09/11 पासून सदर रक्कम तक्रारदारांस अदा करेपर्यंत 6% व्याजासह अदा करावी.
6. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 16/02/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.