द्वारा सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या –
अर्जदार सलीम अब्दुल अन्सारी यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........................
1. अर्जदार हे आमगांव येथे राहतात. अर्जदार यांनी त्यांच्या वडिलांना फिरोजाबाद येथे गैरअर्जदार क्रं. 1 मार्फत डिमांड ड्राफ्ट पाठविला. अर्जदार यांनी दि. 5-7-05 रोजी घेतलेला डिमांड ड्रॉफ्ट रु.9965/- चा असून त्याचा नं. 181469 असा आहे.
2. अर्जदार यांनी डिमांड ड्राफ्ट फिरोजाबाद येथे गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडे पाठविला. परंतु डिमांड ड्राफ्ट गहाळ झाल्यामुळे अर्जदार यांच्या वडिलांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे दि. 13-08-05 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 1 यांना अर्ज करुन डुप्लीकेट डिमांड ड्राफ्ट ची मागणी केली. गैरअर्जदार क्रं.1 यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांना डिमांड ड्राफ्ट गहाळ झाल्याची सूचना देवून ति-हाईत व्यक्तीस पैसे न देण्यासंबधी कळविले.
3. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडे फिरोजाबाद येथे जावून चौकशी केली असता डिमांड ड्राफ्ट हा विड्राल झाला नसल्याचे सांगितले. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी गैरअर्जदार क्रं. 1 यांना पत्र पाठवून दि. 6-9-05 पर्यंत डिमांड ड्राफ्ट विड्राल झाला नसल्याचे सांगितले. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी डुप्लीकेट डिमांड ड्राफ्ट दिल्यानंतर अर्जदार यांच्या वडिलांनी बँकेतून पैसे घेतले.
4. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दि. 12-09-07 रोजी पत्र पाठवून क्रं. 181469 चा ओरिजनल डिमांड ड्राफ्ट देवून कोणीतरी रु.9965/-विड्राल केल्याचे अर्जदार यांना सांगितले. अर्जदार मागणी करतात की, रु.9965/- ची मागणी करणारे दि.12-09-07 चे गैरअर्जदार क्रं. 1 यांचे पत्र रद्द करण्यात यावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.5000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च रु.2000/- गैरअर्जदार यांनी द्यावेत.
5. गैरअर्जदार क्रं. 1 हे आपल्या लेखी बयानात नि.क्रं. 6 वर म्हणतात की, अर्जदार यांची तक्रार ही खोटी व खारीज करण्या योग्य आहे. तसेच ही तक्रार दिवानी न्यायालयात दाखल करण्यासारखी आहे. अर्जदार यांनी दि. 5-7-05 रोजी क्र 181469 व क्रं. 181470 चे दोन डिमांड ड्राफ्ट रु.9965/- चे घेतले. परंतु क्रं. 181470 चा डिमांड ड्राफ्ट हा त्यांच्या मित्राने घेतला हे खोटे आहे.
6. अर्जदार यांनी रु.9965/- चा बॉंड लिहून दिलेला आहे. त्यामुळे बँकेचे रु.9965/- चे नुकसान झाले म्हणून अर्जदार हे रु.9965/- भरुन देण्यास जबाबदार आहेत. गैरअर्जदार क्रं. 1 यांच्या सेवेत कोणतीही न्यूनता नाही. अर्जदार यांची तक्रार ही रुपये 5000/- नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
7. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांचे नाव तक्रारीतून वगळण्यासाठी अर्ज दिला होता. अर्ज मंजूर करण्यात आला. त्यामुळे गैरअर्जदार क्रं. 2 यांचे नांव तक्रारीतून वगळण्यात आलेले आहे.
कारणे व निष्कर्ष
8. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, डुप्लीकट डिमांड ड्राफ्ट जारी करण्यापूर्वी गैरअर्जदार क्रं. 1 यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांना दि. 18-08-05 रोजी पत्र लिहून पहिल्या डिमांड ड्राफ्टचे पैसे देण्यात आले अथवा नाही याबद्दल विचारणा केली होती. त्याचे उत्तर गैरअर्जदार क्रं. 2 यांचकडून आल्यानंतरच गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदार यांना डुप्लीकेट डिमांड ड्राफ्ट जारी केला होता. मुळ डिमांड ड्राफ्ट ची रक्कम ति-हाईत व्यक्तिला कधी देण्यात आली याबद्दलचा पुरावा रेकॉर्डवर नाही.
9. गैरअर्जदार क्रं. 2 यांना दि. 18-08-05 च्या पत्राद्वारे अर्जदार यांचा डिमांड ड्राफ्ट हरविला असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी दि. 6-9-05 पर्यंत डिमांड ड्राफ्टचे पैसे दिले नसल्याचे गैरअर्जदार क्रं. 1 यांना कळविले होते. तरी सुध्दा त्यानंतर जर का गैरअर्जदार क्रं. 2 यांनी हरविलेल्या डिमांड ड्राफ्टचे पैसे ति-हाईत व्यक्तिला दिले असतील तर त्यासाठी अर्जदार यांनी Indemnity Bond लिहून दिला असेल तरी सुध्दा अर्जदार यांना जबाबदार धरता येवू शकत नाही. तसेच गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दि. 7-9-05 चे पैसे दिले न गेल्याबद्दलचे सर्टिफिकेट गैरअर्जदार क्रं. 1 यांना पाठविले आहे. त्यामुळे जर कां गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दिनांक 7-9-05 चे पूर्वी मुळ डिमांड ड्राफ्टचे पैसे दिले असतील व नंतर पैसे न दिल्या गेल्याबद्दलचे प्रमाणपत्र जारी केले असेल तर ती गैरअर्जदार क्रं. 2 यांची चूक आहे. अश्या स्थितीत सुध्दा अर्जदार जबाबदार असू शकत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. गैरअर्जदार क्रं. 1 यांचे अर्जदार यांना रुपये9965/- ची मागणी करणारे दि.12-09-07 चे मागणीपत्र रद्द करण्यात येत आहे.
2. त्रासाबद्दल व ग्राहक तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.