जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक :273/2012
तक्रार दाखल दिनांक:26/09/2012
तक्रार आदेश दिनांक :12/08/2013
निकाल कालावधी:0वर्षे10महिने17दिवस
श्री.मोहन रंगा रेड्डी
वय 38 वर्षे, धंदा-नोकरी,
रा.गोंधळवाडी.ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद ......तक्रारदार
विरुध्द
1) स्टेट बँक ऑफ इंडिया
बाळीवेस शाखा,रा-बाळीवेस,सोलापूर.
(नोटीस / समन्स मॅनेजर यांचेवर
बजावण्यात यावी.)
2) बँक ऑफ महाराष्ट्र,
तुळजापूर शाखा, रा.महादार रोड,तुळजापूर,
ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद ......सामनेवाला नं.1व2
गणपुर्ती :- श्री.दिनेश रा.महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फेअभियोक्ता: श्री.जी.एच.कुलकर्णी
सामनेवाला 1 तर्फे अभियोक्ता : श्री.एस.जी.पाटील
सामनेवाला 2 तर्फे अभियोक्ता:श्री.एम.व्ही.कोंडो
निकालपत्र
श्री.दिनेश रा.महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाला नं.1 व 2 विरुध्द तक्रारदार यांच्या बचत खात्यावरील रक्कम रु.3,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने परत मिळणेसाठी दाखल केला आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात कथन असे की, त्यांचे सामनेवाला नं.1 व 2 या बँकामध्ये बचत खाते आहे. सामनेवाला नं.1 बँकेने तक्रारदारास एटीएम कार्ड दिलेले आहे. दि.08/07/2012 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 बँकेच्या एटीएममध्ये सामनेवाला नं.1 बँकेने दिलेल्या
(2) 273/2012
एटीएम कार्डचा वापर करुन 15.13 वाजता रक्कम रु.2,000/- व त्यानंतर तक्रारदार सामनेवाला नं.2 यांचे एटीएम सेंटरमधून निघून गेला.
3. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारदारास रक्कमेची आवश्यकता भासल्याने सामनेवाला नं.1 यांचे एटीएममध्ये जाऊन शिल्लक रक्कमेबाबत विचारणा केलीअसता बचत खात्यातील रक्कम रु.3,000/- पेक्षा कमी दाखवली, त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 बँकेकडे चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून एटीएमद्वारा दि.08/07/2012 रोजी रक्कम रु.3,000/- काढल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले. तक्रारदार यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी सदरची रक्कम काढलेली नाही. त्याबाबत योग्य ती चौकशी करण्याची विनंती तक्रारदार यांनी सामनेवाला यांना केलीअसता उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून सदरची रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
4. सामनेवाला नं.1 स्टेट बँक ऑफ इंडिया व सामनेवाला नं.2 बँक ऑफ महाराष्ट्र यांनी आपले वेगवेगळे म्हणणे देऊन तक्रारदार हा त्यांचा “ ग्राहक ” नाही वतक्रारदार यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. या कारणास्तव तक्रार रद्द करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच या दोंन्ही बँकानी तक्रारदार यांनी मागितलेल्या रक्कमेची जबाबदारी एकमेकावर टाकली आहे.
5. सामनेवाला नं.1 व 2 यांचे म्हणणेप्रमाणे सदरची विवादीत रक्कम रु.3,000/- दि.08/07/2012 रोजी सामनेवाला नं.2 यांच्या तुळजापूर येथील एटीएम सेंटरमधून सामनेवाला नं.1 यांचेकडे असलेल्या बचत खात्यातून काढली होती व सदरची रक्कम तक्रारदार यांना मिळालेली आहे व त्यांचे म्हणण्याप्रमाणे त्या दिवशी 15.13 मिनीटांनी 2,000/- रुपये, 15.15 मिनीटांनी रु.3,000/- तक्रारदार यांनी काढले होते व या दोन्ही रक्कमा त्यांना मिळालेल्या आहेत. त्याबाबतची नोंद रजि.स्क्रोलमध्ये रिसपॉन्स कोड 000 ने झालेली आहे. त्यामुळे तक्रारदारास पुन्हा सदरची रक्कम मागण्याचा किंवा कोणतीही नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. म्हणून तक्रार रद्द करण्याची विनंती दोन्ही सामनेवालांनी केलेली आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, कागदपत्रे, सामनेवालाचे लेखी बयाण, सामनेवाला नं.1 व 2 यांचे शाखा प्रबंधकांचे प्रतिज्ञापत्र इ. कागदपत्रे, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला नं.1 व 2 चा लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले, त्याचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.
(3) 273/2012
मुद्दे उत्तर
1. सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्रुटीयुक्त सेवा दिली आहे का ? नाही
2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे का ? नाही
3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष
7. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचे सामनेवाला नं.1 स्टेट बँक ऑफ इंडिया सोलापूर शाखेत क्र.11558572427 हे बचत खाते आहे व सदरच्या खात्यात तक्रारदार नोकरी करीत असलेल्या एसटी महामंडळाकडून मिळणारा पगार जमा होतो व या खात्यातून रक्कम काढण्यासाठी सामनेवाला नं.1 बँकेने तक्रारदार यांना 6220180715600005139 या क्रमांकाचे एटीएम कार्ड दिले आहे याबाबत वाद नाही. सदरचे एटीएम कार्ड सामनेवाला नं.1 बँकेच्या एटीएम सेंटर शिवाय इतर दुस-या बँकेच्या एटीएम सेंटरमध्येसुध्दा वापरता येते. सामनेवाला नं.2 बँक ऑफ महाराष्ट्राचे तुळजापूर येथे एटीएम सेंटर आहे याबाबत उभयपक्षकारात वाद नाही.
8. दि.08/07/2012 रोजी एटीएम कार्डचा वापर तक्रारदार यांनी त्यांच्या सामनेवाला नं.1 बँकेच्या बचत खात्यातून रक्कम काढण्यासाठी सामनेवाला नं.2 बँकेच्या एटीएम सेंटरव्दारे केला याबाबतसुध्दा विवाद नाही. सामनेवाला नं.2 यांनी त्यांच्या लेखी बयाणात तक्रारदार याचे त्यांच्या कोणत्याही शाखेत खाते नसल्याचे व तक्रारदार हा त्यांचा खातेदार नसल्याचे म्हटंले आहे. पंरतू तक्रारदार यांनी त्यांच्या बचत खाते क्र.2015394 बँक ऑफ महाराष्ट्र तामलवाडी शाखेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. सदरच्या पासबुकात दि.31/03/2010 पासून दि.30/05/2012 पर्यंतच्या नोंदी आहेत. तसेच सदरचे खाते दि.11/06/2002 रोजी उघडल्याचे दिसून येते. दि.30/05/2012 पर्यंत सदरच्या खात्यात रक्कम रु.18,691/- शिल्लक असल्याचे दिसते. त्यानंतर सदरच्या खात्यातून रक्कम काढून खाते बंद केले किंवा नाही याबाबतचा उल्लेख तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत अथवा लेखी युक्तीवादात केलेला नाही. सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार पूर्वी त्यांचा खातेदार होता असा उल्लेखसुध्दा लेखी बयाणात केलेला नाही. परंतू सदरच्या पासबुकावरुन तक्रारदार हा सामनेवाला नं.2 यांचासुध्दा खातेदार होता हे दिसून येते. त्यामुळे व तक्रारदार यांनी पैसे काढण्यासाठी सामनेवाला नं.2 यांच्या एटीएम सेंटरचा उपयोग केला या कारणांमुळे तक्रारदार हा सामनेवाला नं.2 यांचा ग्राहक होतो. तसेच सामनेवाला नं.1 यांचेकडे तक्रारदार यांचे बचत खाते असल्याने त्यांचा सुध्दा तक्रारदार हा ग्राहक होता हे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला
(4) 273/2012
नं.1 व 2 यांनी तक्रारदार हा त्यांचा ग्राहक नाही असे केलेले विधान अमान्य करण्यात येत आहे.
9. सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्यांचे लेखी बयाणात उल्लेख केल्याप्रमाणे व तक्रारदार यांनी दि.08/07/2012 च्या सामनेवाला नं.2 यांच्या एटीएम सेंटरमधून झालेल्या तीन व्यवहाराबाबतची कागदपत्रे पाहता पथम व्यवहार हा 15.13 वाजता रक्कम रु.2,000/- चा झाला असून सदरची रक्कम काढल्यानंतर शिल्लक रक्कम रु.3617.77 दिसून येते. त्यानंतर दुसरा व्यवहार 15.15 वाजता रक्कम रु.3,000/- काढल्याबाबतचा व त्यानंतर शिल्लक रु.617.77 चा आहे. सदरचे दोन्ही व्यवहार एकाच बचत खात्याचे व एकाच एटीएम कार्डव्दारे झालेले आहे. या दोन्ही व्यवहारामध्ये दोन मिनीटाचा कालावधी गेलेला दिसतो. पहिल्या व्यवहाराचा TXN No.7448 व दुस-या व्यवहाराचा TXN No.7451 आहे. त्यावरुन या दोन्ही व्यवहारात दोन मिनीटाचे कालावधीत दोन इतर व्यवहार TXN No.7449 व TXN No.7450 झालेला दिसतो आहे. सामनेवाला नं.1 यांचे म्हणण्याप्रमाणे सदरचे दोन्ही व्यव्हार रिसपॉन्स कोड 000 ने झालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही व्यवहाराचे पैसे तक्रारदार यांना मिळाल्याचे सिध्द होते. सामनेवाला नं.2 यांचे म्हणण्याप्रमाणे एटीएमचा वापर केल्याशिवाय कोणतेही व्यवहार एटीएम सेंटरव्दारा होऊ शकत नाही. त्यामुळे दि.08/07/2012 रोजी तक्रारदार यांनीच 15.13 ते 15.17 या कालावधीत दोनवेळा त्यांचे एटीएम कार्ड वापरुन प्रत्येकी रक्कम रु.2,000/- व रु.3,000 काढलेले होते. व सदरच्या रक्कमा त्यांना मिळालेल्या आहेत हे सिध्द होते.
10. तक्रारदार यांचे बचत खात्यात रु.3,000/- कमी शिल्लक दाखविले गेल्याचे त्यांचे लक्षात कधी आले याचा स्पष्ट उल्लेख तक्रार अथवा प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराची सदरची रक्कम न मिळालेबाबतची तक्रार सामनेवाला नं.2 यांचेशी संपर्क साधून दि.16/07/2012 रोजी नोंदविली, यावरुन दि.16/07/2012 रोजी तक्रारदार यांनी तक्रार केली असल्याचे असे दिसते. परंतू तक्रारदार यांच्या सामनेवाला नं.1 बँकेतील बचत खात्याच्या नोंदीवरुन दि.14/07/2012 रोजी रु.400/- काढल्याचे दिसून येते. परंतू त्यादिवशी रु.3,000/- बाबतची तक्रार तक्रारदार यांनी केल्याचे दिसून येत नाही. रु.3,000/- बचत खात्यात कमी शिल्लक दाखविली असती तर त्याच दिवशी तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 यांचेकडे तक्रार केली असती. यावरुन दि.08/07/2012 रोजी विवादीत रक्कम रु.3,000/- तक्रारदार यांना मिळाली होती हे सिध्द होते.
11. एटीएम मशीनमधून पैसे काढतांना संबंधीत खात्यासाठी दिलेले एटीएम कार्ड व सदरच्या कार्डचा वापर करण्यासाठी दिलेला चार आकडी कोड नंबर याचा वापर केल्याशिवाय एटीएम सेंटरमधून पैसे मिळू शकत नाही. तक्रारदार यांचे एटीएम कार्ड दि.08/07/2012 रोजी
(5) 273/2012
15.13 वाजता रु.2,000/- काढल्यानंतर ते हरवले होते असे तक्रारदाराचे म्हणणे नाही. त्यामुळे सदरच्या एटीएम कार्डचा दुस-या इसमाने गैरवापर केला व तक्रारदार यांचे खात्यावरुन पैसे काढले असे म्हणता येणार नाही व त्यामुळे सामनेवाला नं.1 व 2 सदरच्या व्यवहारास जबाबदार होऊ शकत नाही. पहिला व्यवहार झाल्यानंतर त्वरीत दुसरा व्यवहार त्यापुढील TXN No. 7449 ने झाला असता तर कदाचित पहिल्या झालेल्या व्यवहाराचा गैरवापर दुस-या इसमाने केला असे म्हणता आले असते. परंतू या दोन्ही व्यवहारात दोन इतर व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे विवादीत रु.3,000/- चा व्यवहार तक्रारदार यांनी केला नाही हे अमान्य करण्यात येत आहे.
12. या सर्व विवेचनांवरुन तक्रारदार हा सामनेवाला नं.1 व 2 यांचा ग्राहक असूनही त्यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली हे सिध्द झालेले नाही. त्यामुळे तक्रारदार सदरची विवादीत रक्कम रु.3,000/- किंवा इतर कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही व सदरची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे. म्हणून सबब मुद्दा क्र.1 व 2 ची उत्तरे नकारार्थी देऊन आम्ही पुढील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना या निकालाची साक्षांकिंत प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दिलेला सदस्याचा सेट 30 दिवसांचे आत घेऊन जावा अन्यथा सदरचा सेट नष्ट करण्यात येईल.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री.दिनेश रा.महाजन)
सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
--0DPSO1207130----