निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक असून त्याचे सदरील बँकेत पगारासाठीचे खाते आहे. अर्जदाराचा खाते क्र. 52175276268 असा आहे. अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचे मुखेड येथील ए.टी.एम. मशीनमधून दिनांक 23/02/2011 रोजी पैसे काढावयास गेला असता त्यावेळी खात्यातील शिल्लक पाहिली असता अर्जदाराच्या खात्यात रक्कम रु. 21,077/- शिल्लक असल्याचे दिसले. संध्याकाळी 6.25 वाजता रक्कम रु. 5,000/- काढीत असतांना ए.टी.एम. मशीन बंद पडल्याने अर्जदारास पैसे मिळालेले नाहीत. अर्जदाराने दुसरे दिवशी गैरअर्जदार बँकेशी संपर्क साधून विचारणा केली असता अर्जदाराच्या खात्यातून रु.5,000/- कमी झाल्याचे कळाले व गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम परत मिळेल असे आश्वासन दिले. दिनांक 26/02/2011 रोजी अर्जदार यांनी नांदेड येथील ए.टी.एम. मशीनवरुन सदर रक्कमेबाबत पाहिले असता सदर रक्कम अर्जदार यांच्या खात्यावर जमा झालेली नव्हती. दिनांक 03/03/2011 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेला लेखी अर्ज दिला परंतू गैरअर्जदार बँकेने आजपर्यंत सदरील रक्कम परत केलेली नाही. गैरअर्जदार यांच्याशी अर्जदाराने वेळोवेळी संपर्क साधला असता गैरअर्जदार बँकेने खालीलप्रमाणे उत्तरे दिली.
1) तुमच्या खात्यात रु. 5,000/- जमा करु.
2) तुम्हाला बँकर चेक देवू.
3) चेक तुमच्या पत्यावर पाठवू.
4) मुखेड शाखेवर जावून चौकशी करा.
5) मुखेड शाखेवर चौकशी केली तेंव्हा आम्ही कंधारला कार्यवाही पाठवली आहे तेथे पाहून घ्या.
अशी उत्तरे गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास देण्यात आली. दिनांक 04/03/2014 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेला लेखी स्मरणपत्र दिले परंतू गैरअर्जदार बँकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ए.टी.एम. मशीनचा वापर करतांना ग्राहकांना येणा-या समस्यांकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष वेधले असून नोटीफीकेशन नं. 2632/ 02-10-02/2010-2011 मे 27, 2011 जारी करुन बँकांना सुचित केले आहे की, एटीएम मधून रक्कम न मिळाल्याची तक्रार आल्यानंतर पूर्वीचे 12 दिवसांचा कालावधी कमी करुन 7 दिवसांच्या आत तकारीचे निवारण झाले नाही तर संबंधीत बँकेने प्रतिदिवस रु.100/- प्रमाणे दंडाची रक्कम तक्रार निवारण होईपर्यंत ग्राहकास भरपाई म्हणून दयावी. असे असून देखील गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतली नाही. दिनांक 23/02/2011 रोजी अर्जदार यांचे रु. 5,000/- ए.टी.एम. मशीनमधून मिळालेले नसतांनाही अर्जदार यांच्या खात्यातून रक्कम वजा झालेली आहे. परंतू गैरअर्जदार यांच्याशी वारंवार संपर्क करुनही गैरअर्जदार बँकेने रक्कम परत केलेली नाही त्या ऐवजी अर्जदार यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिलेला आहे. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे व तक्रारीद्वारे खालीलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
अ) ए.टी.एम. मधून न मिळालेले पैसे रक्कम रु. 5,000/-
ब) रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नोटीफीकेशनप्रमाणे तक्रार निकाली न काढल्यामुळे लागणारा दंड रु. 1,13,800/-
क) या सर्व प्रकारामुळे अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रु. 50,000/-
ड) दाव्यापोटी येणारा खर्च रु. 25,000/-
इत्यादी बाबींची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केला.
3. अर्जदाराचा अर्ज हा चुकीचा असून कोणत्याही प्रकारे मुदतीत नसल्यामुळे खारीज होण्याच्या लायकीचा आहे. अर्जदार यांच्या अर्जातील कलम 3 मधील मजकूर हा गैरअर्जदार यांना माहिती अभावी अमान्य आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 03/03/2011 रोजी लेखी अर्ज दिला ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. तसेच अर्जदाराच्या अर्जातील परिच्छेद क्र. 7 मधील मजकूर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी नोटीफीकेशन नं. 2632/ 02-10-02/2010-2011 मे 27, 2011 जारी केलेले नोटीफिकेशन हे गैरअर्जदारास मान्य आहे. दिनांक 23/02/2011 रोजी अर्जदार यांचे रु.5,000/- ए.टी.एम. मधून मिळाले नसतांनाही अर्जदाराच्या खात्यातून वजा झाले ही बाब गैरअर्जदारांना अमान्य आहे. अर्जदाराने दिनांक 04/03/2014 शेवटचे लेखी स्मणपत्र गैरअर्जदार यांना दिलेले आहे परंतू गैरअर्जदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले नाही. अर्जदाराने सदरचा अर्ज हा खोडसाळपणे जाणुनबुजून गैरअर्जदारास त्रास देण्याच्या उद्देशाने दिलेला आहे. दिनांक 23/02/2011 रोजी एटीएम मधून पैसे काढल्यानंतर दिनांक 22/08/2014 रोजी नांदेड जिल्हा ग्राहक न्यायालयात अर्जदाराने अर्ज दिलेला आहे. अर्जदारास दिनांक 23/02/2011 रोजी मुखेड बँकेच्या एटीएम मधून रु.5,000/- ही रक्कम मिळाली याबाबत शंका नाही कारण दिनांक 23/02/2011 रोजी मुखेड येथील ए.टी.एम. मशीनमध्ये जितकी रक्कम ठेवली होती त्या रक्कमेपेक्षा अतिरिक्त रक्कम निकाली नाही असा रिपोर्ट मुखेड बँकेने दिलेला आहे जो लेखी जबाबासोबत जोडला आहे. अर्जदारास 4 वर्षानंतर रिझर्व बँकेच्या नोटीफिकेशनची माहिती मिळाल्यानंतर जास्त पैशाच्या हव्यासापोटी बँकेकडून जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्यासाठी अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
5. अर्जदाराच्या तक्रारीतील प्रमुख तक्रार अशी आहे की, अर्जदाराने दिनांक 23/02/2011 रोजी गैरअर्जदार बँकेच्या मुखेड येथील ए.टी.एम. मशीनमधून संध्याकाळी 6.25 वाजता रक्कम रु. 5,000/- काढीत असतांना मशीन बंद पडली त्यामुळे अर्जदारास रक्कम मिळालेली नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे अर्जदारास रक्कम मिळाली नसल्याबद्दलची तक्रार करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 03/03/2011 रोजी अर्ज केलेला आहे. गैरअर्जदार यांना अर्जदाराने दिलेला अर्ज मान्य आहे. अर्जदाराने दिनांक 23/02/2011 रोजी ए.टी.एम. मशीनचा वापर केल्याबद्दलची स्लिप तकारीसोबत दाखल केलेली आहे. अर्जदार यांना दि. 03/03/2011 रोजी ए.टी.एम. मशीनमधून रक्कम प्राप्त न झाल्यासंबंधीची तक्रार गैरअर्जदार यांच्याकडे केलेली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी दिनांक 27/05/2011 रोजी काढलेल्या नोटीफिकेशननुसार गैरअर्जदार यांनी ए.टी.एम. मशीन बाबतच्या व्यवहारासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 7 कामकाजाच्या दिवसामध्ये तक्रारीचे निवारण करणे आवश्यक आहे. जर निवारण झाले नाही तर 7 दिवसानंतर रक्कम रु. 100/- प्रतीदिन प्रमाणे ग्राहकास नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. सदर नोटीफिकेशनच्या परिच्छेद क्र. 2 मधील पॅरा नं. 1 हा खालील प्रमाणे आहे.
a. The time limit for resolution of customer complaints by the issuing banks shall stand reduced from 12 working days to 7 working days from the date of receipt of customer complaint. Accordingly, failure to recredit the customer’s account within 7 working days of receipt of the complaint shall entail payment of compensation to the customer @ Rs. 100/- per day by the issuing bank.
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे वारंवार विचारणा करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तकारीबद्दल कुठलाही अहवाल दिलेला नाही. अर्जदार यांनी दिनांक 04/03/2014 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे पुन्हा स्मरणपत्र दिलेले आहे. अर्जदार यांनी मार्च 2014 मध्ये दिलेले स्मरणपत्रानंतरही गैरअर्जदार तक्रार दाखल तारीख 02/05/2014 पर्यंत अर्जदारास तक्रारीबद्दल काहीही कळविलेले नाही. गैरअर्जदार हे तक्रारीमध्ये हजर झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी लेखी जबाबासोबत शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा मुखेड यांनी असिस्टंट जनरल मॅनेजर, एस.बी.एच. रिजन, नांदेड यांनी दिनांक 20/08/2014 रोजी दिलेले पत्र दाखल केलेले आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता असिस्टंट जनरल मॅनेजर, एस.बी.एच. रिजन, नांदेड यांनी शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा मुखेड यांना दि. 14/08/2014 रोजी अर्जदाराच्या तक्रारीसंदर्भात पत्र दिलेले असल्याचे दिसून येते. शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा मुखेड यांनी अर्जदाराने ए.टी.एम. मशीनद्वारे व्यवहार केला तो दिनांक 23/02/2011 रोजी कुठलीही जास्तीची रक्कम रिपोर्टनुसार दिसून आलेली नसल्याचा रिपोर्ट दिलेला आहे. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराने दिनांक 03/03/2011 रोजी ए.टी.एम. मशीनच्या व्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीची दखल ही दिनांक 14/08/2014 रोजी घेतलेली असल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी सदरील तक्रार ही दिनांक 08/05/2014 रोजी दाखल केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीची मंचामार्फत नोटीस गेल्यानंतर गैरअर्जदार दिनांक 22/08/2014 रोजी प्रकरणात हजर झालेले आहेत म्हणजेच गैरअर्जदार यांना दिनांक 22/08/2014 पूर्वीच नोटीस प्राप्त झालेली असल्याचे दिसून येते. यावरुन गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस गेल्यानंतर अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली असल्याचे सिध्द होते. रिझर्व बँकेने काढलेले दिनांक 27/05/2011 चे नोटीफिकेशन गैरअर्जदार यांना मान्य आहे. सदर नोटीफिकेशननुसार गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीचे निराकरण हे दिनांक 03/03/2011 पासून 7 कामकाजांच्या दिवसांच्या आत करावयास पाहिजे होते परंतू गैरअर्जदाराने तसे केल्याचे दिसून येत नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या दि. 03/03/2011 रोजीच्या तक्रारीची दखल घेवून अर्जदारास दि. 22/08/2014 पूर्वी अहवाल दिलेला असल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दिलेला नाही त्यामुळे मंचाची नोटीस गेल्यानंतर अर्जदाराच्या तक्रारीची दखल गैरअर्जदार यांनी घेतलेली आहे, ही बाब सिध्द होते. गैरअर्जदार यांनी रिझर्व बँकेच्या नोटीफिकेशननुसार अर्जदाराची तक्रार 7 दिवसाच्या आत निकाली काढणे बंधनकारक असतांना गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार सुमारे 3 ते साडेतीन वर्षे प्रलंबित ठेवलेली आहे त्यामुळे अर्जदारास निश्चितच गैरअर्जदार यांनी सेवा त्रुटी दिलेली आहे. परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीचे निराकरण रिझर्व बँकेच्या नियमानुसार न केल्यामुळे सदरील रिझर्व बँकेच्या नोटीफिकेशननुसार गैरअर्जदार हे अर्जदारास 1 एप्रिल,2013 पासून दि. 20/08/2014 पर्यंत प्रतीदिन रक्कम रु.100/- प्रमाणे देण्यास जबाबदार आहेत.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 1 एप्रिल,2013 पासून दि. 20/08/2014 प्रतीदिन रक्कम रु.100/- प्रमाणे रिझर्व बँकेच्या नियमानुसार नुकसान भरपाई दयावी.
3. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.