श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
* निकालपत्र*
दिनांक 19/10/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हिचे जाबदेणार यांच्या तासगांव शाखेत पगाराचे खाते क्र 11315587411 आहे. दिनांक 14/7/2010 रोजी जाबदेणार यांच्या नरपतगीर चौकातील ए.टी.एम मधे पैसे काढण्यासाठी तक्रारदार गेल्या असता पहिल्या मशिनमधून सिक्रेट कोड टाकूनही पैसे न आल्याने कॅन्सलचे बटन दाबून, तेथीलच दुस-या ए.टी.एम मधून त्यांनी एकूण रुपये 7000/-काढले. पैसे काढण्यापुर्वी त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम रुपये 15,593/- होती. पैस काढल्यानंतर शिल्लक रुपये 8593/- ऐवजी रुपये 3593/- आली. तक्रारदारांनी रुपये 7000/-काढले असता रुपये 12000/- खात्यावर डेबिट पडले. तक्रारदार हिने लगेचच व वारंवार जाबदेणार यांच्याकडे त्यासंबंधात दुरध्वनीद्वारे, लेखी पत्रांद्वारे पाठपुरावा केला असता तक्रारदार हिच्या खात्यावर दिनांक 7/8/2010 रोजी रुपये 5000/- जमा करण्यात आले. दिनांक 28/9/2010 रोजी पासबुक अपडेट करुन घेतले असता रुपये 56/- शिल्लक होते. दिनांक 2/10/2010 रोजी खाते चेक केले असता रुपये 4993/- शिल्लक होते. तक्रारदारांचा दिनांक 5/10/2010 रोजी पगार झाला रुपये 30,840/- जमा झाले. ए.टी.एम मधून त्यांनी रुपये 15,000/- काढले. परंतू शिल्लक रक्कम रुपये 15,040/- एवेजी रुपये 10,887/- होती. त्यातून रुपये 10,000/- काढल्यानंतर रुपये 5000/- शिल्लक असावयास हवे होते. तक्रारदार हिने याबाबत जाबदेणारांकडे विचारणा केली असता त्याच ए.टी.एम मधून दिनांक 3/7/2010 रोजी एकाचे पैसे कमी असल्याची तक्रार आली म्हणून तक्रारदार हिच्या खात्यातून रुपये 5000/- काढून त्या व्यक्तीला देण्यात आल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे सी.सी.कॅमेरा इमेज दाखविण्याबाबत लेखी मागणी करुनही तक्रारदारांना इमेज दाखविण्यात आल्या नाहीत. म्हणून सदरील तक्रार तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. तक्रारदार हिने प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदेणारांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी ए.टी.एम मशिन मध्ये रुपये 5000/- ची मागणी केल्यावर ती पुर्ण झाली. तक्रारदारांनी रुपये 12000/- काढल्याने त्यांच्या खात्यात रुपये 3593/- शिल्लक होती. तक्रारदारांनी तासगांव शाखेत तक्रार केली असती तर त्यांच्या समस्येचे तात्काळ निराकरण झाले असते. तक्रारदारांचा ए.टी.एम मधील व्यवहार पुर्ण झाला होता. तक्रारदारांनी हमीपत्र दिल्यानंतरच त्यांच्या खात्यात दिनांक 7/8/2010 रोजी रुपये 5000/- जमा करण्यात आले होते. तक्रारदारांना इमेज दाखविण्यात आल्या नाहीत कारण इमेजेस प्राप्त करण्यासाठी जाबदेणारांना त्यासाठी चार्जेस दयावे लागतात. सदरहू इमेज फक्त तीन महिने कालावधीसाठीच जतन करण्यात येतात. जाबदेणारांकडे इमेज उपलब्ध नाहीत. जाबदेणारांनी तक्रारदारांच्या खात्यातून रुपये 5000/- काढून घेतलेले नाहीत. तक्रारदारांच्या तक्रारीची चौकशी पुर्ण झालेली नसल्याने त्यावर बँकेचा होल्ड होता, त्यामुळे खात्यातील शिल्लक रुपये 5000/- ने कमी दाखविण्यात येत होती. चौकशी पुर्ण झाल्यावर रुपये 5000/- ए.टी.एम च्या सिक्युरिटी गार्डनेच घेतले असल्याचे निदर्शनास आले ती रक्कम संबंधित कंपनीकडून ज्यांनी सिक्युरिटी गार्ड दिलेला होता, त्यांच्याकडून वसूल करण्यात आली. नंतर तक्रारदारांशी संपर्क साधूनही ते जाबदेणार यांच्या शाखेत आले नाहीत व प्रस्तूत तक्रारअर्ज दाखल केला. तक्रारदारांच्या खात्यात रुपये 5000/- जमा केल्यानंतर जाबदेणार यांनी ते काढुन घेतलेले नसल्याने तक्रारदारांचे नुकसान झालेले नाही, ज्या दिवसापासून रकमेवर बँकेने होल्ड ठेवला होता त्या दिवसापासून तक्रारदारांना त्यावर व्याज मिळत आहे. वरील कारणांवरुन तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी जाबदेणार यांनी विनंती केली. सोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला आहे.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांच्या पगार खात्यातून दिनांक 14/7/2010 रोजी त्यांनी 7000/-काढले असता प्रत्यक्षात रुपये 12000/- खात्यावर डेबिट पडले. तक्रारदारांनी यासंबंधी जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर, तक्रारी केल्यानंतर जाबदेणार यांनी रुपये 5000/- तक्रारदारांच्या खात्यावर जमा केले. यासंदर्भात तक्रारदारांनी दाखल केलेल्या पासबुकचे मंचाने अवलोकन केले असता दिनांक 28/9/2010 रोजी रुपये 5000/- वर बँकेने होल्ड ठेवल्याचे निदर्शनास येते. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबामध्ये परिच्छेद 8 मध्ये “It is further submitted that after the investigation of complaint of complainant it was concluded that the amount of Rs.5000/- which was dispensed by the ATM was collected by the guard who was present at the time of said transaction” असे नमूद केलेले आहे. जाबदेणार यांनी नियुक्त केलेल्या ए.टी.एम च्या सिक्युरिटी गार्डनेच ते पैसे घेतलेले असल्याचे जाबदेणार यांनी मान्य केलेले असल्यामुळे जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा सिध्द होतो. जाबदेणार यांनी दिनांक 29/9/2011 चे त्यांच्या वकीलांना लिहीलेले पत्र मंचासमोर दाखल केलेले आहे. त्यात जाबदेणार यांनी दिनांक 10/9/2011 रोजी रुपये 5000/- वरील होल्ड काढून घेतल्याचे नमूद केलेले आहे. दिनांक 28/9/2010 ते 10/9/2011 या कालावधीत सदरहू रकमेवर 4 टक्के दराने तक्रारदारांना व्याज दिल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. परंतु तक्रारदारांचे सदरहू बचत खाते हे पगाराचे खाते होते. जाबदेणार यांच्या चुकीमुळे तक्रारदार सदरहू रक्कम रुपये 5000/- दिनांक 14/7/2010 पासून दिनांक 10/9/2011 पर्यन्त वापरु शकले नाहीत. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी, investigation साठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी घेतल्याचे दिसून येते. तक्रारदारांना जरी 4 टक्के व्याज देण्यात आलेले असले तरी मुळ रक्कम मिळविण्यासाठी तक्रारदारांना जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा लागला, तक्रारी कराव्या लागल्या, त्यांनी विनंती करुनही त्यांना ए.टी.एम मधील इमेजेस दाखविण्यात आलेल्या नाहीत, त्या इमेजेस जाबदेणार यांनी नष्ट केल्या हया सर्वांवरुन जाबदेणार यांच्या सेवेतील निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 9,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 1,000/- तक्रारअर्ज खर्चापोटी दयावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.