आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री. अतुल दि. आळशी
(पारित दि. 30 जुलै, 2015)
1. तक्रारकर्ता अशोक घनश्यामजी टेंभरे यांनी शेतीच्या कामाकरीता ट्रॅक्टर व ट्रॉली स्टार सोनालिका सेंन्टर मोदी ग्रुप यांच्याकडून विकत घेतले होते परंतु विरुध्द पक्षाने ट्रक्टर ट्रालीचा R.T.O. Registration करुन दिले नाही तसेच Registration book न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार R.T.O. Registration करुन देण्यासाठी व नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केली.
2. सदर तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे -
3. तक्रारकर्त्याने दिनांक 20/06/2012 ला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली रुपये 6,21,000/- एवढया किंमतीत विकत घेतले. तक्रारकर्त्याने मालकीची टाटासुमो गाडी एक्सचेंजसह डाऊन पेमेंट म्हणून रुपये 3,21,000/- व उर्वरीत रक्कम रुपये 3,00,000/- मॅग्मा फायनान्स कंपनीद्वारे दिले. तक्रारकर्त्याचा सोनलिका कंपनीचे ट्रॅक्टरचा इंजिन नंबर 3100, डीएलएफ 288378 एफ-3, चेचीस नं. एफ झेड क्यू एस डी 287404/35, रंग निळा, 35/एच.पी. 3 सिलेंडर तसेच तुलसी कंपनीच्या ट्रॉलीचा चेचीस नं. टीटीएस-12-10553 अशा वर्णनाची विकत घेतली.
4. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला सदरहू गाडी एक महिन्यानंतर R.T.O. Passing झाली काय ? असे विचारणा केली असता दोन-तीन दिवसांत करुन देतो असे सांगीतले. तक्रारकर्त्याने वेळोवेळी कुठलाही खंड न पाडता मॅग्मा फायनान्स कंपनीच्या कर्जाची परतफेड न चुकता केलेली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून रुपये 20,000/- ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या पासिंग करीता घेतले.
5. तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्द पक्ष यांना विचारपूस करुन सुध्दा विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचे R.T.O. Passing करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 30/01/2013 ला वकीलांमार्फत नोटीस पाठविली त्यावर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरची R.T.O. Passing झाले आहे असे तक्रारकर्त्याला दिलेल्या नोटीसच्या उत्तरात म्हटले आहे, परंतु वस्तूतः विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या गाडीची R.T.O. कार्यालयातून R.T.O. Passing केलेले नव्हते असे तक्रारकर्त्याला R.T.O. कार्यालयातून कळल्यानंतर तक्रारकर्त्याने तक्रारककर्त्याचे वाहन R.T.O. Passing करुन द्यावे अशा आशयाची तक्रार तक्रारकर्त्याने मंचात दाखल केलेली आहे.
6. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्यायमंचाने दिनांक 7/02/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 21/02/2014 ला मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दिनांक 27/03/2014 रोजी दाखल केला.
7. विरूध्द पक्ष यांनी आपला लेखीजबाबात म्हटले आहे की, विरुध्द पक्ष व तक्रारकर्ता यांच्यात सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व तुलसी कंपनीच्या ट्रॉलीचा सौदा सौंदड, जिल्हा गोंदिया येथे झाल्याचे कबूल केले तसेच तक्रारकर्ता हा शेतकरी आहे हे म्हणणे सुध्दा कबूल केलेले आहे. विरुध्द पक्ष हे सोनालिका ट्रक्टर चे अधिकृत विक्रेता आहे हे सुध्दा कबूल केले आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 20/06/2012 ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी करण्याचा सौदा रुपये 6,21,000/- तक्रारकर्त्याने मालकीची टाटासुमो गाडी व नगदी रुपये 3,21,000/- एक्सचेंजसह डाऊन पेमेंट म्हणून दिले होते तसेच उर्वरीत रक्क्म मॅग्मा फायनान्स कंपनी यांच्याकडून केली हे ही म्हणणे कबूल केले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास एक महिन्यात ट्रॅक्टर व ट्रॉलीची पासिंग करुन देऊ हे म्हणणे खरे आहे. तक्रारकर्त्यास टाटासुमो गाडीची एन.ओ.सी. देखील त्वरीत देण्याचे कबूल केले होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पासिंग करुन देण्याकरीता आवश्यक कागदपत्र R.T.O. गोंदिया येथे दाखल केले होते व त्यावरुन दिनांक 22/11/2012 ला पासिंग करण्यात आले त्याचा नं. एम.एच./35 जी-6197 आहे मात्र तक्रारकर्त्याने टाटासुमो ची N.O.C. दिनांक 24/09/2012 पर्यंत दिल्याने व R.T.O. च्या धोरणानुसार दिनांक 31/08/2012 नंतर ट्रॉली पासिंग बंद झाल्यामुळे तक्रारकर्त्याच्या ट्रॉलीचे पासिंग होऊ शकले नाही.
8. विरूध्द पक्ष ने तक्रारकर्त्यास दिनांक 02/02/2013 च्या नोटीस उत्तरात कळविल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरच्या नोंदणीचे कागदपत्र घेऊन जाण्यास कळविले होते. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष यांनी कुठल्याही प्रकारच्या सेवेतील त्रुटी केलेली नाही.
9. विरुध्द पक्ष यांनी कुठल्याही कराराचा भंग केलेला नाही. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याच्या ट्रॉलीच्या पासिंगकरीता टाटासुमोची N.O.C. दिनांक 31/08/2012 पर्यंत न दिल्याने व आर.टी.ओ. यांनी दिनांक 31/08/2012 पासून ट्रालीची पासिंग करणे बंद झाल्यामुळे तक्रारकर्ता हा ट्रॉलीचे पासिंग न होण्यासाठी जबाबदार असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
10. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत पान क्र. 11 ते 30 पर्यंतचे दस्त दाखल केलेले आहेत.
11. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. राहंगडाले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून ट्रॅक्टर व ट्रॉली विकत घेतांना रुपये 20,000/- R.T.O. Passing करीता दिले होते. विरुध्द पक्षाने R.T.O. यांचेकडून Passing करुन देण्याची जबाबदारी स्विकारली होती. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करुन देखील विरुध्द पक्षाने R.T.O. यांचेकडून Passing करुन दिले नाही ही बाब R.T.O. गोंदिया यांनी दाखल केलेल्या पत्रावरुन निष्पन्न होते. तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरचे R.T.O. Passing झाले असून, संबंधीत कागदपत्र विरुध्द पक्ष यांचेकडून घेऊन जावे असे तक्रारकर्त्याला पाठविलेल्या नोटीसच्या उत्तरात म्हटले आहे. वस्तुतः तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने ट्रॅक्टर व ट्रॉली विकत घेतल्यापासून R.T.O. Passing करण्याचे रुपये 20,000/- घेऊन सुध्दा तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचे R.T.O. Passing करुन दिलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता नुकसानभरपाई रुपये 2,00,000/- व R.T.O. Passing करीता घेतलेले रुपये 20,000/- व्याजासह व कोर्ट खर्च देण्यात यावा असा युक्तिवाद केला.
12. विरुध्द पक्षातर्फे ऍड. शरद बोरकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली R.T.O. Passing करण्यासाठी टाटासुमो गाडीची N.O.C. दिनांक 31/08/2012 पूर्वी न दिल्यामुळे तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची R.T.O. Passing यांच्याकडून होऊ शकली नाही. तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन दिनांक 22/11/2012 ला R.T.O. गोंदिया येथे करण्यात आला व त्याचा क्र. एम.एच./35-जी-6197 असा आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या कोणत्याही प्रकारची सेवेतील त्रुटी व सेवेमधील कमतरता नसून, तक्रारकर्त्याने दिनांक 31/08/2012 पर्यंत गाडीची N.O.C. न दिल्यामुळे व त्यानंतर ट्रॉलीची R.T.O. Passing बंद झाल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावा असा युक्तिवाद केला.
12. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच, दोन्ही पक्षांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून ट्रॅक्टर व ट्रॉली विकत घेतली. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते तसेच विरुध्द पक्ष हे R.T.O. Registration करण्यास जबाबदार असल्याचे सुध्दा नमूद केल्याने विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली विकत घेतली हे म्हणणे सिध्द होते. तक्रारकर्त्याने ट्रक्टर व ट्राली विकत घेतल्यानंतर मॅग्मा फायनान्स कंपनी यांचेकडून 36 हप्त्याच्या परतफेडीवर रुपये 3,02,377/- चे कर्ज घेतले होते हे तक्रारकर्त्याने दाखल केलेले कागदपत्र पान क्र. 19 वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने कर्जाची परतफेड केलेल्या मॅग्मा फिनक्राफ लिमी. यांच्या दिनांक 04/07/2013 च्या पावतीद्वारे परतफेड केलेली आहे हे सिध्द होते.
14. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांनी तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टर व ट्रॉली संबंधाने दिलेल्या अहवालानुसार तक्रारकर्त्याच्या ट्रक्टर नंबर एम.एच./35-जी-6197 दिनांक 22/11/2012 रोजी नोंदणी करण्यात आलेला असून, तक्राकर्त्याच्या ट्रॉली संबंधीचा नोंदणी अर्ज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांचे नावाने दिलेला नाही असा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांनी दिलेल्या दिनांक 17/12/2014 च्या लेखीजबाबत म्हटले आहे तसेच पुढे असेही म्हटले आहे की, वाहन विक्रेत्याने वाहन विकल्यानंतर वाहनाची नोंदणी करुनच वाहनाचा ताबा मालकाचे ताब्यात सोपविण्याची तरतूद मोटर वाहन नियम 1989 चे नियम 42 नुसार आहे व वाहनाची नोंदणी न करता विक्रेत्याने वाहन मालकास ताब्यात देणे हे मोटार वाहन नियमाचा भंग आहे तसेच सदरहू प्रकरणांत मोटार वाहन नोंदणी न करता मोटार वाहन मालकाच्या ताब्यात दिलेले आहे. वाहन विक्रेत्याने ट्रॉलीची नोंदणी न केल्यास मोटार वाहन नियम 1989 चे नियम 42 चा भंग केला आहे असे या प्रकरणांत सवस्वी जबाबदारी विरुध्द पक्षाची आहे असे मंचाचे मत आहे. वाहन विक्रेत्याने तक्रारकर्त्याकडून पैसे घेऊन सुध्दा तक्रारकर्त्याचा वाहन पासिंग न करता तक्रारकर्त्याच्या ताब्यात देणे हे मोटार वाहन कायद्याचा भंग केला आहे तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास टाटासुमोची N.O.C. दिनांक 31/08/2012 पूर्वी सादर करावे अन्यथा ट्रालीची पासिंग R.T.O. मार्फत होणार नाही अशा आशयाचे पत्र पुरावा म्हणून विरुध्द पक्षाने आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी दखल केलेले नाही तसेच इतर लेखी पुरावा सुध्दा सदरहू प्रकरणांत दाखल न केल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्ता ट्रालीचे R.T.O. Passing न होण्यास जबाबदार आहे या म्हणण्यास मंच सहमत नाही.
15. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरचे पासिंग दिनांक 22/11/2012 ला केले व त्याचा नं. एम.एच./35-जी-6197 असा आहे हे विरुध्द पक्षाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांनी दिलेल्या अहवालावरुन सिध्द होते. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याच्या ट्रॉलीची Passing उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांचेकडून करुन देण्यास बंधनकारक आहे व होणा-या नुकसानभरपाई देण्याकरीता बंधनकारक आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या ट्रॉलीची नोंदणी R.T.O. कार्यालयाकडून 30 दिवसाचे आंत करुन द्यावे व ट्रॉलीच्या नोंदणीचा संपूर्ण खर्च विरुध्द पक्षाने करावा.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास ट्रॉलीची नोंदणी न करुन देणे ह्या सेवेतील त्रुटीकरीता झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 25,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास रू. 10,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.