न्या य नि र्ण य
(दि.21-11-2024)
व्दाराः- मा. श्रीम. अमृता नि.भोसले, सदस्या.
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्याने दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी असून ते तक्रारीत नमुद पत्त्यावर राहतात. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे सामनेवाला क्र.3 यांचेमार्फत हेल्थ इन्शुरन्स पॉलीसी काढली होती. त्याचा हप्ता रक्कम रु.15,913/- चा भरला होता. सदर पॉलिसीचा नं.P/151129/01/2021/ 006105 असा होता व पॉलिसीचा कालावधी हा दि.23/02/2021 ते 22/02/2022 असा होता. पॉलिसीची Sum Assured Rs.10,00,000/- होती.
2. तक्रारदार क्र.1 यांना दि.08/12/2021 रोजीपासून दृष्टीबाबत त्रास जाणवू लागला. त्यामुळे तक्रारदार क्र.1 यांनी चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपचारासाठी तपासण्या केल्या असता त्यांना Right BG and Left Caudate Nucleus Sub acute Infarct हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. सदर हॉस्पिटलमध्ये तक्रारदार क्र.1 यांचेवर दि.13/12/2021 ते 19/12/2021 या कालावधीमध्ये ॲडमिट होऊन उपचार घेतले. त्यावेळी मेडिकल बीले, तपासण्यांचा खर्च व हॉस्पिटलचा खर्च असे एकूण रक्कम रु.70,114/- इतका खर्च झाला होता. तक्रारदार यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी त्यांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असलेबाबत चिरायु हॉस्पिटल यांना माहिती दिली होती. सदर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर अधिक उपचाराकरिता तक्रारदार क्र.1 यांना सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथे दि.27/12/2021 ते 01/01/2022 पर्यंत ॲडमिट करण्यात आले. त्यावेळी हॉस्पिटल, मेडिकल बीले व तपासण्यासाठी रक्कम रु.2,20,794/- इतका खर्च आला होता. त्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये दि.15/01/2022 रोजी ॲडमिट करुन दि.16/01/2022 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रक्कम रु.84,036/- इतका खर्च तक्रारदारास आला.
3. तक्रारदार यांनी दि.18/01/2022 रोजी विहीत नमुन्यात अर्ज व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून रक्कम रु.70,114/- चा क्लेम सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केला होता. त्याचा क्लेम इन्टीमेशन नंबर CIG/2022/151129/3750546 असा आहे. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.01/03/2022 रोजी पत्र पाठवून तक्रारदाराने आजारपणाचा योग्य कालावधी व आवश्यक कागदपत्रे सविस्तर पाठविली नसलेने तक्रारदाराचा क्लेम नाकारत असलेचे कळविले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथील वैदयकीय उपचारासाठी आलेल्या खर्च रक्कम रु.2,20,794/- मिळणेसाठी दि.17/01/2022 रोजी विहीत नमुन्यात अर्ज व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून क्लेम दाखल केला होता. त्याचा इंटीमेशन नंबर CIG/2022/151129/3663499 असा होता. सदर क्लेमबाबत सामनेवाला यांनी दि.01/03/2022 रोजी पत्र पाठवून डिस्चार्ज कार्डमध्ये अनेक नोंदीमध्ये छेडछाड केलेचे व रकमेसंबंधी चुकीची माहिती दिसून येत असलेने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदाराचा क्लेम नाकारत असलेबाबत कळविले आहे. तसेच तक्रारदाराने सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथील वैदयकीय उपचारासाठी आलेल्या खर्चाची रक्कम रु.84,036/- मिळणेसाठी दि.21/01/2022 रोजी विहीत नमुन्यात अर्ज व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून क्लेम दाखल केला होता. त्याचा इंटीमेशन नंबर CIG/2022/151129/3766807 असा होता. त्यानंतर सामनेवाला विमा कंपनीने दि.27/01/2022 रोजीच्या पत्राने माहिती व काही कागदपत्रे दाखल करणेबाबत तक्रारदारास कळविले. त्यावेळी तक्रारदार यांनी दि.24/02/2022 रोजीच्या पत्राने माहिती व आवश्यक कागदपत्रे दाखल केली असलेबाबत सामनेवाला विमा कंपनीला कळविले. परंतु सदर क्लेमबाबत सामनेवाला यांनी दि.01/03/2022 रोजी पत्र पाठवून आजारपणाचा योग्य कालावधी व आवश्यक कागदपत्रे सविस्तर पाठविली नसलेने तक्रारदाराचा क्लेम नाकारत असलेचे कळविले आहे. तक्रारदाराचे तीनही क्लेम नाकारलेबाबत सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास दि.14/06/2022 रोजीचे ई-मेल व्दारे कळविले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीला आवश्यक ती सर्व कागदपत्रे पाठवूनही सामनेवाला यांनी तक्रारदारास क्लेम चुकीच्या कारणाने नाकारुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदार क्र.1 च्या उपचारासाठी आलेल्या खर्चाची एकूण रक्कम रु.3,74,944/- सामनेवाला यांचेकडून मिळावी. तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारच्या खर्चाची रक्कम रु.20,000/- असे एकूण रक्कम रु.4,44,944/- सामनेवाला यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
4. तक्रारदाराचे त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडील कागदयादीमध्ये एकूण 15 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये सामनेवाला यांची पॉलिसी, सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेबाबतचे दि.01/03/2022 रोजीचे पत्र, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास दिलेले दि.25/01/2022, 27/01/2022,01/03/2022 रोजीचे पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीस दि.24/02/2022 रोजी दिलेले पत्र, सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.14/06/2022 रोजी पाठविलेला ई-मेल, चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी यांचे दि.13/12/21 ते 19/12/21 रोजी ॲडमीट असलेबाबतचे डिस्चार्ज कार्ड, सहयाद्री सुपर स्पेशालिटी,पुणे यांचे दि.27/12/21 ते 01/01/22 व दि.15/01/22 ते 16/01/22 या कालावधीत ॲडमीट असलेबाबतचे डिस्चार्ज कार्ड, चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपचार घेतलेबाबतचे हॉस्पिटलचे बीले व मेडिकल बीले, सहयाद्री सुपर स्पेशालिटी पुणे येथे उपचार घेतल्याबाबतचे हॉस्पिटलचे बील, तक्रारदार क्र.1 व 2 यांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.16 कडे तक्रारदार क्र.1 यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.17 कडे तक्रारदार क्र.2 यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.19 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल आहे. नि.24 कडे लेखी युक्तीवाद दाखल आहे.
5. सामनेवाला क्र.1 व 2 यांना सदर आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सामनेवाला क्र.1 व 2 हे वकीलांमार्फत हजर झाले. सामनेवाला क्र.2 यांनी नि.11कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नि.11कडे दाखल केलेल्या लेखी म्हणणे तक्रारदाराची पॉलिसी मान्य केलेली असून इतर कथने नाकारलेली आहेत. सामनेवाला यांचे कथनात पुढे सांगतात, तक्रारदार यांनी विमा क्लेम दाखल केल्यानंतर विमा कंपनीने ताबडतोब सदरचा क्लेम प्रोसेस करण्यासाठी घेतला होता. परंतु प्रोसेस करताना आणखी काही महत्वाचे कागदपत्रे त्यामध्ये नसल्याचे विमा कंपनीला आढळल्यानंतर विमा कंपनीने तक्रारदाराकडे मागणी करुनही तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीला आवश्यक ती कागदपत्रे व माहिती दिली नसल्याने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम दि.01/03/2022 रोजीच्या पत्राने नाकारला होता. त्यामध्ये विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे जर रेकॉर्डमध्ये विसंगती आढळली तर विमा कंपनी विमा दावा मंजूर करण्यास बांधील नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या डिस्चार्ज समरी मध्ये मोठया प्रमाणात अनधिकृतरित्या छेडछाड केल्याचे आढळून आले. त्यामुळे तक्रारदाराची डिस्चार्ज समरी ही अविश्वासनीय असल्याने विमा कंपनीच्या अटीप्रमाणे तक्रारदारास विमा दावा नाकारला आहे. विम्याचा करार हा परस्पर विश्वासावर अवलंबून असल्याने तक्रारदार यांचेकडून या विश्वासाची पूर्तता होत नसल्याने व तक्रारदाराचा विमा दावा संशयास्पद स्थितीत आल्याने विमा कंपनीने नियमाप्रमाणे तो नाकारला आहे. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीला तक्रारदाराचा दावा पुन्हा Re Consider करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीच्या Medical Panel ने पुन्हा तक्रारदाराच्या विमा दाव्याचा Review घेतला. त्यानंतरसुध्दा Medical Panel ने तक्रारदाराचा विमा दावा नाकारण्याच्या निर्णय घेतला व तसे तक्रारदारास दि.14/06/2022 रोजी ई-मेल व्दारे कळविले होते. विमा कंपनीच्या Medical Panelमध्ये तज्ञ डॉक्टरांचा समावेश असतो व ते डॉक्टर दिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करुनच विमा कंपनीला
Expert Opinion देत असतात. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 व 2 यांनी केली आहे.
6. तसेच नि.12 कडे पुरसिस दाखल करुन सामनेवाला क्र.1 व 2 ही एकच कंपनी असल्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे एकच असलेचे कथन केले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी नि.20 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.22 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी नि.23 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
7. सामनेवाला क्र.3 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली होती. सदर नोटीस मिळूनदेखील सामनेवाला क्र.3 हे आयोगासमोर हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द दि.15/01/2024 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
8. वर नमूद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.1 व 2 यांचे म्हणणे, लेखी युक्तीवाद व उभयतांचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
मुद्दा क्रमांकः 1 –
9. तक्रारदार यांनी नि.6/1 कडे सामनेवाला विमा कंपनीची पॉलिसी दाखल केली असून सदर पॉलिसीचे अवलोकन करता सदरची पॉलिसी तक्रारदाराचे पतीचे नांवे दिसून येते. तसेच Details of Dependent मध्ये तक्रारदाराचे नांव दिसून येते. पॉलिसीचा कालावधी दि.23/02/2021 ते 22/02/2022 असा दिसून येतो व Total Sum Insured Rs.10,00,000/- असलेचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने रक्कम रु.15,913/- चा प्रिमियम भरलेचा दिसून येतो. सदरची बाब सामनेवाला विमा कंपनीने त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला विमा कंपनी ही सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांकः 2 व 3 –
10. तक्रारदार क्र.1 यांनी दृष्टीबाबत त्रास जाणवू लागल्यामुळे चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दि.13/12/2021 ते 19/12/2021 या कालावधीमध्ये ॲडमिट होऊन उपचार घेतले. त्यावेळी उपचारापोटी एकूण रक्कम रु.70,114/- इतका खर्च झाला होता. त्यानंतर अधिक उपचाराकरिता तक्रारदार क्र.1हे सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथे दि.27/12/2021 ते 01/01/2022 पर्यंत ॲडमिट होते. त्यावेळी उपचाराचा रक्कम रु.2,20,794/- इतका खर्च आला होता. त्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये दि.15/01/2022 रोजी ॲडमिट होऊन दि.16/01/2022 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रक्कम रु.84,036/- इतका खर्च तक्रारदारास आला हे तक्रारदाराने नि.6 चे कागदयादीसोबत अ.नं.11ते 13 येथे दाखल केलेल्या मेडिकल बिलावरुन दिसून येते.
11. तक्रारदार यांनी दि.18/01/2022, 17/01/2022 व 21/01/2022 रोजी विहीत नमुन्यात अर्ज व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदर उपचारापोटी खर्च झालेल्या रक्कम रु.70,114/-, रु.2,20794/- व रु.84,036/- या तीनही बीलांच्या रक्कमेसाठी विमा दावा सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केला होता. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.01/03/2022, दि.25/01/2022 रोजीचे पत्र पाठवून तक्रारदाराने आजारपणाचा योग्य कालावधी व आवश्यक कागदपत्रे सविस्तर पाठविली नसलेने तसेच डिस्चार्ज कार्डमध्ये अनेक नोंदीमध्ये छेडछाड केलेचे व रकमेसंबंधी चुकीची माहिती दिसून येत असलेने व आजारपणाचा योग्य कालावधी व आवश्यक कागदपत्रे सविस्तर पाठविली नसलेने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदाराचा क्लेम नाकारत असलेबाबत कळविले आहे. सदरचे पत्र तक्रारदाराने नि.6/2, 6/3, 6/6 कडे दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराचा विमा दाव्यांवर फेरविचार करण्याच्या अर्जावर दि.14/06/2022 रोजी पत्र पाठवून सामनेवाला विमा कंपनीने सदरचे दावे नामंजूर करीत असलेबाबत पाठविलेला ई-मेल तक्रारदाराने नि.6/7 कडे दाखल केला आहे.
12. तक्रारदाराने नि.6/8 ते नि.6/13कडे दाखल केलेल्या हॉस्पिटलमधील उपचारांबाबतच्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार क्र.1 यांनी त्यांचे डोळयाचे उपचाराकरिता सदर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेचे दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी दि.01/03/2022 रोजीच्या पत्राने तक्रारदाराचा क्लेम नाकारताना In order to process the claim we had requested you to furnish the exact duration of present illness. We note that you have not furnished the required documents and details. In the absence of the above documents/details we are not able to further process your claim. असे कारण देऊन क्लेम नाकारला आहे. तसेच तक्रारदाराने सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे येथे घेतलेल्या उपचारांच्या क्लेमबाबत It is observed from the submitted discharged summary that there are multiple tampering noted. And misrepresentation of facts असे कारण देऊन क्लेम नाकारला आहे. परंतु तक्रारदाराने नि.6/5 कडे दाखल केलेल्या तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेल्या दि.24/02/2022रोजीच्या पत्राचे अवलोकन करता तक्रारदाराने सामनेवाला यांच्या आवश्यक असणारी माहिती व कागदपत्रे दिलेचे दिसून येते.तदनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास कागदपत्रांचे अनुषंगाने खुलासा मागवलेला नाही व तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केली ही बाब नाकारलेली नाही. तसेच तक्रारदाराने नि.6/9 कडे दाखल केलेल्या डिस्चार्ज समरीचे अवलोकन करता त्यामध्ये तक्रारदाराच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेचा दिनांक व डिस्चार्जचा दिनांक स्पष्टपणे दिसून येतो. तसेच डिस्चार्ज समरीमध्ये तक्रारदाराने कोणत्या स्वरुपाचा बदल अथवा छेडछाड केली आहे. याबाबतीत सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या तज्ञ व्यक्तींकडून अथवा मेडीकल पॅनेलकडून कोणताही खुलासा केलेला नाही व त्याबाबत कोणताही सबळ पुरावा याकामी आयोगासमोर दाखल केलेला नाही. याचा अर्थ तक्रारदाराने उपचाराबाबतच खोटी बीले सादर केली असा होत नाही.
13. सदरची बाब विचारात घेता तक्रारदाराने चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी व सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथे घेतलेले दृष्टीबाबतच्या उपचार घेतलेहोते ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सामनेवाला यांनी तक्रारदाराला दिलेले नि.6/3 येथील क्लेम नाकारल्याचे पत्र हे नि.6/9 येथे दाखल असलेल्या डिस्चार्ज समरीचे उपचाराविषयक आहे. नि.6/9 येथील कागदपत्रांमध्ये प्रथमदर्शनी कोणतेही छेडछाड tampering दिसून येत नाही. तक्रारदाराचा क्लेम नाकारण्याइतपत कोणती discrepancy अगर Misrepresentation of facts सामनेवाला यांनी गृहित धरणे याबाबत कोणताही खुलासा समाधानकारक स्पसष्टीकरण अगर पुरावा सामनेवालांनी दिलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या डिस्चार्ज समरीमध्ये काय छेडछाड केली याबाबतचा कोणताही खुलासा दिलेला नाही अथवा पुरावा याकामी दाखल केलेला नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारल्याची बाब याकामी स्पष्टपणे शाबीत झालेली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य विमा क्लेम नाकारुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
14. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र.3 या बँकेमार्फत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. सामनेवाला क्र.3 यांना मे. आयोगामार्फत याकामी नोटीस काढली होती. परंतुम दि.15/01/2024 रोजी तक्रार अर्जाचे कामी हजर न राहिल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे मार्फत तक्रारदाराची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याकारणाने सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
15. तक्रारदाराने याकामी त्यांचेवर उपचार करण्यात आलेल्या उपचारांची बीले दाखल केलेली आहेत. तक्रारदाराने विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म दाखल केलेबाबत पुरावा दाखल केलेला नाही, परंतु सामनेवालाने सदरची बाब म्हणण्यामध्ये कोठेळी नाकारलेली नाही. त्याकारणाने तक्रारदाराने शपथेवर नमूद केलेल्या विमा दाव्याच्या रकमा ग्राहय धरण्यात येत आहेत. त्यामुळे सदर विमा क्लेम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदरचे बीलांचे अवलोकन करता तक्रारदार हे विमा क्लेमपोटी रक्कम रु.3,74,944/- इतकी रकम सामनेवाला यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रक्कमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजदराने वसुल होऊन मिळणेस तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रकक्म रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांकः 4 –
16. सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा दाव्याची एकूण रक्कम रु.3,74,944/- (रुपये तीन लाख चौ-याहत्तर हजार नऊशे चव्वेचाळीस फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर विमा दावा नाकारले / तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.