तक्रारदारातर्फे वकील ः श्री. प्रभु
सामनेवालेतर्फे वकील ः श्रीमती. आशीता परमार
विलंबमाफीच्या अर्जाखाली आदेश
1. तक्रारदार त्यांची बहिण नामे श्रीमती. निर्मला हयानी सामनेवाले यांच्याकडून घेतलेल्या मेडिकल इंन्शुरन्स पॉलीसीच्या अंतर्गत केलेल्या दाव्यामधून निर्माण झालेल्या वादाकरीता ही तक्रार दाखल केली.
2. मयत श्रीमती. निर्मला यांनी दिनांक 13/07/2010 ते 02/08/2010 पर्यंत बॉम्बे हॉस्पीटलमध्ये व त्यानंतर दि. 02/08/2010 ते 16/09/2010 पर्यत पी.डी. हिंदुजा हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले. दिनांक 16/09/2010 “अॅटो इंम्यून लिवर डिसीजच्या” आजाराने मयत झाल्या. तक्रारदारांनी त्याबाबत रू. 5,00,000/-(पाच लाख) चा दावा दिनांक 28/09/2010 ला सामनेवाले यांचेकडे दाखल केला. परंतू, सा.वाले यांनी त्यांच्या दिनांक 08/11/2010 च्या पत्रान्वये तो नामंजूर केला. त्याविरूध्द तक्रारदारांनी ओंम्बडस-मॅन कडे दिनांक 22/03/2011 ला तक्रार दाखल केली. ती दिनांक 25/09/2014 च्या पत्राप्रमाणे फेटाळण्यात आली. त्यानंतर, तक्रारदारांनी ही तक्रार या मंचात दि. 16/07/2015 ला दाखल केली व विलंब झाल्यामूळे विलंबमाफीचा अर्ज दाखल केला. या अर्जाची नोटीस सामनेवाले यांना देण्यात आली. त्याप्रमाणे सा.वाले हजर झाले व त्यांनी सविस्तर जबाब दाखल केला. तक्रारदारांना 907 दिवसाचा विलंब झालेला आहे. असे अर्जात नमूद केले.
3. तक्रारदाराच्या वतीने श्री. प्रभु व सा.वाले यांचे वतीने श्रीमती. आशीता परमार यांना ऐकण्यात आले.
4. अर्जाप्रमाणे 907 दिवसाचा विलंब झालेला आहे. तो क्षमापीत करण्याकरीता सा.वाले यांनी तिव्र आक्षेप घेतलेला आहे. अर्जाप्रमाणे ओंम्बडस मॅन कडे दाखल केलेल्या तक्रारीचा निपटारा करण्याकरीता भरपूर अवधी लागल्यामूळे हा विलंब झालेला आहे व तो हेतूपुरसर केलेला नाही. तेव्हा तो क्षमापीत करण्यात यावा. तक्रारदारांनी आपल्या निवेदनाच्या पृष्ठर्थ मा. बॉम्बे उच्च न्यायालयानी रिट पिटीशन नं. 8538/2015 संजय सदाशिव जाधव विरूध्द जॉईन्ड डॉयरेक्टर हॉयर एज्यूकेशन औरंगाबाद मध्ये दि. 25/08/2015 ला दिलेल्या न्यायनिर्णयाचा आधार घेतला आहे.
5. सामनेवाले यांनी दि. 08/11/2010 ला तक्रारदार यांचा दावा नामंजूर केला व ही तक्रार दि. 16/07/2015 ला या मंचात दाखल करण्यात आली आहे या परिस्थितीत 960 दिवसापेक्षा जास्त विलंब झालेला आहे. तक्रारदार यांची तक्रार ओंम्बडस मॅन यांनी फेटाळल्यानंतर सुध्दा तक्रारदारानी या मंचात ही तक्रार अंदाजे 10 महिन्यानंतर दाखल केली आहे. आमच्या मते ओंम्बडस-मॅन कडे प्रलंबीत असलेल्या तक्रारीचा निपटारा करण्याकरीता लागलेल्या अवधीचा तक्रारदारांना ही तक्रार दाखल करण्याकरीता मुदत वाढविण्याकरीता सहाय्यक ठरत नाही.
6. याकरीता आम्ही मा. राष्ट्रीय आयोगानी ग्राहक तक्रार क्र. 174/2013 श्री. सोमेश्वर जी विरूध्द आयसीआयसीआय बँक व इतर मध्ये दि. 19/07/2013 ला दिलेल्या निर्णयांचा आधार घेत आहोत. तक्रारदारांनी दिलेले स्पष्टीकरण हे समाधानकारक व पुरेसे नाही. ते मोघम व सर्वसाधारण स्वरूपाचे आहे. सबब, आमच्या मते झालेला विलंब क्षमापीत करता येत नाही. तक्रारदारांनी दाखल केलेला न्यायनिर्णय या प्रकरणात लागु होत नाही. ग्रा.सं.कायदामध्ये विशेष तरतुद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे ही तक्रार दोन वर्षाचे आत दाखल करणे आवश्यक होते. ग्राहक/पक्षकाराला इतर नियमीत न्यायालय/व्यासपीठ/न्यायधिकरणाच्या व्यतिरीक्त ग्राहक मंच हे अतिरीक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्राहक/पक्षकार नियमित माध्यमाचा आपल्या अधिकाराकरीता उपयोग करू शकतो. झालेला विलंब हा 960 दिवसापेक्षा जास्त असल्याने व समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यामूळे तो क्षमापीत करता येत नाही. सबब, खालील आदेश.
आदेश
1) तक्रारदार यांचा विलंबमाफीचा अर्ज फेटाळण्यात येतो.
2) तक्रार क्र 251/2015 ग्रा.सं.कायदा 24(अ), प्रमाणे दाखल करून घेता येत नाही व ती फेटाळण्यात येते.
3) खर्चाबाबत आदेश नाही.
4) या आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना निःशुल्क देण्यात/पाठविण्यात याव्या.
5) अतिरीक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावे.