ग्राहक तक्रार अर्ज क्र.1162/2007
दाखल दिनांक. 29/12/2007
अंतीम आदेश दि. 24/02/2014
कालावधी 07 वर्ष, 01 महिने, 26 दिवस
नि. 24
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
रविंद्र रामचंद्र चौधरी, तक्रारदार
उ.व.43 वर्ष, धंदा-शेती, (अॅड.राजेंद्र व्ही निकम)
रा. मौजे कोथडी,
ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव.
विरुध्द
1. स्टॅंन्डर्ड हार्डवेअर, सामनेवाला
मेनरोड, मुक्ताईनगर, ता.मुक्ताई नगर, (अॅड.दिलीप बी.मंडोरे)
जि. जळगांव.
2. मॅनेजर, गोल्ड सेम, सिमेंट पेंट पिगमेटस इंडीया,
532, डेअर खुर्द, सातारा – 415002.
(निकालपत्र अध्यक्ष, मिलींद.सा.सोनवणे यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सामनेवाल्याने सेवेत कमतरता केली म्हणून दाखल केली आहे.
02. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, दि. 24/01/2007 रोजी त्यांनी सामनेवाला क्र. 1 यांच्या कडून रु. 3735/- इतक्या किंमतीस पिंच कलर पिशवी विकत घेतली, त्याचा बिल क्र. 380 असा आहे. पिशवी विकत घेतांना त्या रंगाची प्रत व गुणवत्ता याबाबत सामनेवाल्यांनी हमी दिलेली होती. रु. 12,000/- खर्च करुन तो रंग त्यांनी त्यांच्या घरास दिला. रंगकाम पुर्ण झाल्यावर सदरचा रंग पांढरा होवून गेला. तसेच, त्याची चकाकी देखील राहिली नाही. त्यांनी सामनेवाल्यांकडे सदर बाब सांगून पिंच कलरची नविन थैली उपलब्ध करुन दयावी, अशी विनंती केली. मात्र सामनेवाल्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे सामनेवाल्यांनी नुकसान भरपाई म्हणून रु. 30,000/-, मानसिक त्रासापोटी रु. 5,000/-, व अर्ज खर्चापोटी रु. 3,000/- दयावे, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
03. तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ तक्रारदारांनी नि. 3 लगत रंग खरेदीचे बिल व सामनेवाल्यांना वकीलांमार्फत दिलेली नोटीस यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत.
04. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी जबाब अनुक्रमे नि. 11 व 15 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, त्यांनी तक्रारदारास विकलेल्या रंगात कोणताही दोष नव्हता. रंग देण्या अगोदर रंग दयावयाचा भाग ओला करुन त्यावर सिमेंट रंग मारण्यास तक्रारदारास त्यांनी सांगितले होते. तसे न केल्यामुळे रंग कालांतराने फिका होण्याची शक्यता असते. तक्रारदारांनी चुकीच्या पध्दतीने रंग दिलेला असल्यामुळे झालेल्या नुकसानीस ते जबाबदार नाहीत. शिवाय 25 कि.लो सिमेंट पेंट देण्यास रु. 12,000/- मजूरी लागत नाही. तक्रारदारांच्या मागण्या निराधार आहेत. केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने तक्रारदारांनी खोटी तक्रार केलेली असल्यामुळे ती खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी मंचाकडे केलेली आहे.
05. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाल्यांनी तक्रारदारांना निकृष्ठ
दर्जाचा रंग विकला काय ? -- नाही.
2. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
06. आपण सामनेवाल्यांकडून दि. 24/01/2007 रोजी, घराला देण्यासाठी 25 कि.ग्रॅ ची पिंच कलर पिशवी रु. 3750/- इतक्या किंमतीस विकत घेतली. रु. 12,000/- मजूरीवर खर्च करुन तो रंग घरास दिला. मात्र, रंगकाम पुर्ण झाल्यानंतर तो रंग पांढरा होवून गेला. त्याचप्रमाणे त्यास चकाकी राहीली नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यांनी त्या संदर्भात पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि. 14, तसेच त्यांच्या घरास रंग देणारा व्यक्ती भगवान निंबाळकर यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि. 17 दाखल केलेले आहेत. सदर साक्षीदाराला उलटतपासणी करण्यासाठी सामनेवाल्यांनी दि. 26/03/2009 रोजी पासून प्रश्नावली दिलेली आहे. प्रस्तुत केस त्या दिनांकापासून प्रश्नावलीच्या उत्तरांसाठी प्रलंबित आहे. तक्रारदारांनी त्यांच्या साक्षीदारास सदर प्रश्नावली सादर केलेली नाही. तसेच, त्यांचा पुरावाही त्यांनी बंद केलेला नाही. त्यामुळे या मंचाने तक्रारदार यांचा पुरावा ते सातत्याने गैरहजर असल्यामुळे बंद करण्याचे आदेश केले. सामनेवाल्यांनी त्यांनी दाखल केलेला जबाब हाच त्यांचा पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस नि. 23 दाखल केलेली आहे.
07. वरील परिस्थीतीत उपलब्ध पुराव्याच्या आधारावर या मंचास सामनेवाल्यांनी तक्रारदारास विकलेल्या रंगात दोष होता किंवा नाही, याचे उत्तर शोधावयाचे आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 13 (1) (सी) च्या तरतूदीनुसार विकण्यात आलेल्या वस्तू मध्ये दोष असल्यास, ती वस्तू अथवा तिचा नमूना मंचासमोर हजर करुन ती वस्तू किंवा नमूना योग्य अशा प्रयोगशाळे कडे पाठवावा. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे एैकूण निर्णय करावा, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी रंगाचा नमूना मंचासमोर हजर केलेला नाही, किंवा ते शक्य नव्हते, असेही त्यांचे म्हणणे नाही. त्यांनी एक्सपर्ट म्हणून रंगकाम करणा-याचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. आमच्या मते, सदर बाब पुरेशी नाही. त्यातही सदर साक्षीदारास उलटतपासणीसाठी तक्रारदारांनी प्रश्नावली सादर केलेली नाही. त्यामुळे सामनेवाल्यांनी तक्रारदारास सदोष रंगाची विक्री केली, या बाबत ठोस असा निष्कर्ष देता येणार नाही. यास्तव मुदा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
08. मुदा क्र. 1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 13 (1) (सी) ला अभिप्रेत असलेली पध्दती अवलंबलेली नाही. त्यांनी रंगाचा नमूना मंचासमोर सादर करुन योग्य त्या प्रयोगशाळेकडून तपासून घेतलेला नाही. एक्सपर्ट म्हणून ज्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्याची उलटतपासणीची प्रश्नावली तक्रारदारांनी साक्षीदारास सादर केलेली नाही. त्यामुळे सामनेवाल्यांनी विकलेला रंग सदोष होता, या बाबत ठोस असा निष्कर्ष देता येत नाही. परिणामी तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. प्रस्तुत केस च्या फॅक्टस विचारात घेता उभय पक्षांनी ज्याचा त्याचा खर्च सोसण्याचा आदेश न्यायसंगत ठरेल. यास्तव मुदा क्र. 2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. उभयपक्षकारांनी ज्याचा त्याचा खर्च सोसावा.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक – 24/02/2014
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष