तक्रारदारातर्फे : स्वतः
सामनेवालेतर्फे : श्रीमती प्रज्ञा लादे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले ही बँक असून तक्रारदारांचे सामनेवाले यांच्या बोरीवली शाखेमध्ये बचत खाते होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक 8/6/2009 रोजी रुपये 9,500/- अनाधिकाराने नांवे टाकले. तक्रारदारांनी त्याबद्दल दिनांक 10/6/2009 रोजी आक्षेप अर्ज दाखल केला. त्यानंतर सामनेवाले यांनी ती नोंद रद्द करुन रुपये 9,500/- जमा दाखविले. त्यानंतर पुन्हा रुपये 9,500/- तक्रारदारांच्या नांवे दाखविले याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये रुपये 9,500/- च्या संदर्भात अनाधिकाराने नांवे नोंदणी करुन व इतर काही नोंदी करुन तक्रारदारांना मनस्ताप दिला, व सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 29/10/2010 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांचा तक्रार दाखल सुनावणीकामी युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे असे मत झाले की, तक्रारदाराने सदरील तक्रार दाखल करण्यापूर्वी एक अन्य तक्रार दाखल केली होती, त्याचा तक्रार क्रमांक 450/2009 असून त्यामध्ये सदरील आक्षेपाचा मुद्दा उपस्थित केलेला नसल्याने प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्या आदेशाच्या विरुध्द तक्रारदारांनी मा. राज्य आयोगाकडे अपिल क्रमांक 1287/2010 दाखल केले. मा. राज्य आयोगाने दिनांक 21/11/2012 रोजीच्या न्याय निर्णयाद्वारे तक्रारदारांचे अपिल मान्य केले व प्रस्तुत मंचाचा दिनांक 29/10/2010 रोजीची तक्रार रद्द करण्याचा आदेश रद्द केला व तक्रार परत सुनावणीकामी प्रस्तुत मंचाकडे पाठविली. त्यानंतर तक्रारदारांनी मा. राष्ट्रीय आयोगाकडे रिव्हीजन अर्ज क्रमांक 4944/2012 दाखल केला. परंतु मा. राष्ट्रीय आयोगाने मा. राज्य आयोगाचा आदेश कायम केला व प्रस्तुत मंचास विशिष्ट कालावधीमध्ये तक्रार निकाली करावी असा आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे तक्रार दाखल करुन घेण्यात आली, व प्रकरणामध्ये तातडीने सुनावणी घेण्यात आली.
3. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली, व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या बोरीवली शाखेमध्ये बचत खाते 2008 मध्ये उघडले होते, ज्यामध्ये कमीत कमी जमा रुपये 10,000/- आवश्यक होते. त्यानंतर ही मर्यादा रुपये 25,000/- पर्यंत वाढविण्यात आली, त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना विनंती केली व तक्रारदाराचे बचत खाते हे तीन उद्देशांचे म्हणजेच बचत खाते अधिक डिमॅट खाते अधिक ट्रेडिंग खाते असा एकाच खात्यातून 3 प्रकारचा व्यवहार करता येईल असे सुविधा असणारे व शून्य बॅलन्सवर वापरता येणा-या खात्याची सुविधा तक्रारदारांना करुन दिली. तक्रारदाराचे खाते डिमॅट व शेअर्स व्यवसायाचे देखील खाते असल्याने तक्रारदारांनी वाणिज्य व्यवसायाकामी सदरील खात्यामध्ये सेवा स्विकारली असल्याने तक्रारदार ग्राहक होऊ शकत नाहीत असे कथन केलेले आहे.
4. प्रस्तुत व्यवहाराच्या संदर्भात सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी अॅक्सीस बँकच्या ए.टी.एम. मधून दिनांक 28/5/2009 रोजी रुपये 9,500/- काढले. परंतु तक्रारदारांनी पैसे मिळाले नसल्याबद्दल तक्रार केल्याने अॅक्सीस बँकेकडे संपर्क साधण्यात आला व दरम्यान रुपये 9,500/- रुपये तक्रारदारराच्या खात्यात जमा दाखविण्यात आले. त्यानंतर अॅक्सीस बँकेकडून माहिती प्राप्त झाली की, तक्रारदाराच्या दिनांक 8/6/2009 रोजी ए.टी.एम. मधून रुपये 9,500/- काढण्याचा व्यवहार यशस्वी झालेला आहे त्यावरुन दिनांक 8/6/2009 रोजी तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 9,500/- नांवे टाकण्यात आले. याप्रकारे सामनेवाले यांनी अॅक्सीस बँकेकडून आलेल्या अहवालाचा संदर्भ देऊन तक्रारदाराच्या खात्यामधून रुपये 9,500/- नांवे टाकण्याच्या कृतीचे समर्थन केले.
5. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या कैफीयतीला आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले. सामनेवाले यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, शपथपत्र व कागदपत्रे, तसेच कैफीयत, शपथपत्र व कागदपत्र यांचे वाचन केले. तक्रारदार तसेच सामनेवाले यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीच्या निकाल कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना बचत खात्यामध्ये रुपये 9,500/- ची नोंद अनाधिकाराने नांवे टाकून सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून त्या नोंदीच्या संदर्भात दाद मिळणेस व नुकसानभरपाई वसूल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी प्रस्तुतच्या तक्रारीत बचत खात्याच्या नोंदीच्या संदर्भात तक्रार क्रमांक 450/2009 प्रस्तुतच्या सामनेवाले बँकेच्या विरुध्द दाखल केली होती. परंतु त्यामध्ये सामनेवाले गैरहजर राहील्याने एकतर्फा निर्णय देण्यात आला व तक्रार अंशतः मंजूर करण्यात आली. त्या आदेशाचे विरुध्द तक्रारदारानी मा. राज्य आयोगाकडे अपिल क्रमांक 394/2010 दाखल केले होते. परंतु ते अपिल रद्द करण्यात आले, व प्रस्तुतच्या तक्रारदाराने/अपिलकाराने सामनेवाले बँकेस खर्चाबद्दल 2500/- अदा करावेत असा आदेश देण्यात आला. परंतु तक्रारीतील व्यवहार भिन्न होता.
8. प्रस्तुतच्या तक्रारीत तक्रारदारांचे असे कथन आहे की, त्यांचे बचत खाते सामनेवाले बँकेकडे होते. ज्यामध्ये सामनेवाले यांनी रुपये 9,500/- ची अनाधिकाराने नोंद केलेली आहे. सामनेवाले यांच्या कैफीयतीच्या परिच्छेद क्रमांक 5 मधील कथन असे दर्शविते की तक्रारदाराने बचत खात्याचा व्यवहार 2009 मध्ये 3 उद्देशीय (थ्री इन वन) या स्वरुपाचे खाते उघडण्यात आले व तक्रारदारांनी एकाच खात्यामधून बचत खाते, डिमॅट खाते व ट्रेडिंग खाते अशा तिन्ही सुविधा असल्यामुळे त्या दृष्टीकोनातून तक्रारदारांनी सदरच्या खात्याद्वारे शेअर ट्रेडिंग करण्याकामी म्हणजेच वाणिज्य व्यवसायाकामी सेवा स्विकारल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे “ग्राहक” होत नाही. तक्रारदारांच्या तक्रारीमध्येच असे कथन आहे की, ते निवृत्ती वेतन धारक आहेत व त्यांना निवृत्ती वेतन प्राप्त हाते. तक्रारदारांचा डिमॅट व ट्रेडिंग व्यवसाय स्वयंरोजगाराकामी व उपजिविकेचे साधन म्हणून करण्यात येत आहे असे तक्रारदारांचे तक्रारीमध्ये कथन नाही. सबब तक्रारदार या खात्याच्या संदर्भात सामनेवाले यांचे “ग्राहक” होत नाहीत. तरी देखील तक्रारदारांचा वादग्रस्त व्यवहार रुपये 9,500/- ची नोंद हा व्यवहार बचत खात्याच्या संदर्भात असल्याने तक्रारदार सामनेवाले यांचे “ग्राहक” होतात या समजुतीवर पुढील विवेचन करण्यात येत आहे.
9. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्रमांक 7 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रादारांनी अॅक्सीस बँकेचे ए.टी.एम.मधून रुपये 9,500/- त्यांच्या खात्यामधून काढण्याचा व्यवहार दिनांक 28/5/2009 रोजी केला. परंतु तक्रारदारांनी त्या व्यवहाराबद्दल आक्षेप नोंदविला. तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 9,500/- जमा दाखविण्यात आले, व अॅक्सीस बँकेशी संपर्क प्रस्तापित करुन त्यांचेकडून अहवाल मागविण्यात आला. त्यानंतर अॅक्सीस बँकेकडून अहवाल प्राप्त झाला ज्यामध्ये तक्रारदाराचे दिनांक 28/5/2009 रोजी रुपये 9,500/- उचल करण्याचा व्यवहार यशस्वी झाला अशी माहिती देण्यात आली. त्यावरुन तक्रारदाराच्या खात्यामध्ये दिनांक 8/6/2009 रोजी रुपये 9,500/- नांवे टाकण्यात आले.
10. या घटनेच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी प्रकरणाच्या पृष्ठ क्रमांक 45 वर आपल्या कैफीयतीसोबत अॅक्सीस बँकेकडून आलेला अहवाल/प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये दिनांक 28/5/2009 रोजी तक्रारदाराच्या नांवे करण्यात आलेला व्यवहार रुपये 9,500/- यशस्वी झाल्याची नोंद आहे. यावरुन सामनेवाले यांच्या कथनात तथ्ये असल्याचे दिसून येते.
11. ए.टी.एम कार्ड धारक यांचे ए,टी.एम. कार्ड वेगवेगळया कंपनीकडून दिले जाते. तक्रारदाराचे ए.टी.एम. कार्ड नोडल सेल मुंबई यांनी जारी केले होते. ए.टी.एम. कार्डद्वारे पैस उचल करण्याबद्दलची कार्यपध्दती स्पष्ट करणारे पत्र सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत पृष्ठ क्रमांक 43 वर दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या ए.टी.एम.मशिनचा वापर केला नाही तर अॅक्सीस बँकेच्या ए.टी.एम.मशिनचा वापर केला. एखादी ए.टी.एम. कार्ड धारक व्यक्ती जेव्हा ए.टी.एम.कार्डचा वापर करुन पैसे काढण्याचा व्यवहार यशस्वी झाला नाही व कार्ड धारकाला पैसे मिळाले नाहीत अशी तक्रार घेऊन येतो, तेव्हा त्या प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्याचे दोन मार्ग असतात. 1) ए.टी.एम.कार्ड धारकाला ए.टी.एम. मधून प्राप्त झालेल्या स्लिपवरुन झालेल्या नोंदीप्रमाणे कार्यवाही करणे. 2) ए.टी.एम.कार्ड धारकाने स्लिप हजर केली नसेल तर ज्या बँकेच्या मालकीचे ए.टी.एम.मशिन आहे त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करुन त्या रकमेबद्दल अहवाल मागविणे. जर ए.टी.एम.कार्ड धारकाच्या ए.टी.एम.मधून पैसे मिळाले नाही तर कार्ड धारकास ए.टी.एम.मधून जी स्लिप प्राप्त होते, त्यावर ट्रॅन्झॅक्शन डिक्लाईन अशी नोंद असते. ज्यावरुन व्यवहार यशस्वी झाला नाही असा निष्कर्ष काढता येतो. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदाराने ए.टी.एम.मशिन मधून प्राप्त होणारी स्लिप हजर केली नाही. त्यामुळे त्याद्वारे तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण करण्याचा मार्ग संपृष्टात आला. सबब सामनेवाले बँकेने संबंधित बँकेकडे (अॅक्सीस बँकेकडे) संपर्क प्रस्थापित केला व सामनेवाले बँकेस अॅक्सीस बँकेकडून अहवाल प्राप्त झाला, ज्यामध्ये तक्रारदाराचे दिनांक 28/5/2009 रोजीचे रुपये 9,500/- ए.टी.एम.कार्ड द्वारे उचल करण्याचा व्यवहार यशस्वी झाला आहे अशी माहिती सामनेवाले बँकेला मिळाली. त्यानंतर सामनेवाले बँकेने तक्रारदाराच्या खात्यामध्ये दिनाक 8/6/2009 रोजी रुपये 9,500/- रकमेची नावे बाजूस नोंद केली. अॅक्सीस बँकेकडून प्राप्त झालेला अहवाल सही शिक्यासह असून मूळचा अहवाल तोंडी युक्तीवाद दरम्यान सामनेवाले यांच्या वकीलांनी मंचास दाखविला, ज्याची प्रत कैफीयतीसोबत पृष्ठ क्रमांक 45 व 46 वर दाखल केली आहे, व प्रत सामनेवाले यांना पुरविण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर अॅक्सीस बँकेकडून दिनांक 28/5/2009 रोजी चारकोप कांदिवली ए.टी.एम.मध्ये किती रक्कम टाकण्यात आली होती याचा अहवाल कैफीयतीच्या पृष्ठ क्रमांक 32 वर आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराचा ए.टी.एम. व्यवहार 7203 या क्रमांकाच्या होता. अॅक्सीस बँकेचे चारकोप कांदीवली येथील ए.टी.एम. कार्डच्या नोंदी पृष्ठ क्रमांक 33 असे दर्शवितात की दिनांक 28/5/2009 रोजी नोंदणी क्रमांक 7200, 7203, 7206 व 7207 या सर्व नोंदीचा व्यवहार यशस्वी झालेला आहे त्यामध्ये तक्रारदाराचा व्यवहार 7203 क्रमांकाचा असून तो रुपये 9,500/- चा आहे. यावरुन अॅक्सीस बँकेचे सर्टिफीकेट पृष्ठ क्रमांक 45 व 46 च्या ए.टी.एम.मधील नोंदीची प्रत पृष्ठ क्रमांक 33 असून यावरुन पुष्टी मिळते.
12. वर उल्लेख केल्याप्रमाणे तक्रारदारांनी ए.टी.एम.मशिनमधून प्राप्त झालेली स्लिप जपून ठेवली नाही व हजर केली नाही. तक्रारदाराने तोंडी युक्तीवादाच्या दरम्यान या संदर्भात विचारणा केली असता तक्रारदारांनी उत्तर दिले की, ही स्लिप महत्वाची नसल्याने किंवा त्याची आवश्यकता वाटली नसल्याने तक्रारदाराने ती जपून ठेवली नाही. तक्रारदाराचा या स्वरुपाचा खुलासा तर्कास पटत नाही. कारण तक्रारदारांना जर ए.टी.एम. मशिनमधून पैसे प्राप्त झाले नसते तर मशिनमधून येणा-या स्लिपवर ट्रॅन्झॅक्शन डिक्लाईन असा शेरा असणार. तक्रारदारांना बँकेच्या व्यवहाराचा, एवढेच नव्हे तर बँकींग कोडचे ज्ञान आहे, व त्यांनी तक्रारीमध्ये बँकिंग कोड व रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक यांचा संदर्भ देखील दिलेला आहे. त्यातही तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेविरुध्द दोन तक्रारी, मा. राज्य आयोगाकडे दोन अपिल व मा. राष्ट्रीय आयोगाकडे दोन रिव्हीजन अर्ज असे प्रकरणे हाताळली असल्याने त्यांना ग्राहकाच्या अधिकाराची जाण आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. ही कार्यपध्दती अवलंबणारी व्यक्ती ए.टी.एम. मशीनमधून प्राप्त होणारी स्लिप सांभाळून ठेवणार नाही असे तर्कास पटत नाही. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये कुठेही दिनांक 28/5/2009 रोजीच्या ए.टी.एम. व्यवहाराचा उल्लेख केलेला नाही. एवढेच नव्हे तर दिनांक 28/5/2009 रोजी चारकोप कांदीवली येथील अॅक्सीस बँकेचे ए.टी.एम.मधून पैसे काढण्याच्या प्रयत्न करुन देखील मशिन मधून पैसे निघाले नाहीत असे देखील कथन केले नाही. तक्रारदारांनी फक्त एवढेच कथन केले आहे की, सामनेवाले बँकेने दिनांक 8/6/2009 रोजी अनाधिकाराने त्यांच्या खात्यामधून रुपये 9,500/- कमी केले, व त्याबद्दल तक्रारदारांनी दिनांक 10/6/2009 रोजी आक्षेप नोंदविला व स्मरणपत्र पाठविले. याप्रकारे तक्रारीमध्ये दिनांक 28/5/2009 रोजीच्या ए.टी.एम.चा संदर्भ नाही व त्याबद्दल कथन नाही. तक्रारदारांनी हे कथन जाणीवपूर्वक टाळलेले आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. अन्यथा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये ए.टी.एम. व्यवहारासंबंधीचे कथन निश्चितच तक्रारीमध्ये नोंदविले गेले असते. यावरुन तक्रारदाराची तक्रार प्रामाणिकपणाची नाही असे दिसून येते.
13. तक्रारदाराने बचत खात्याचा खातेउतारा दाखल केलेला आहे, त्यातील नोंदी असे दर्शवितात की, दिनांक 28/5/2009 रोजी रुपये 9,500/- ची नोंद नांवे टाकण्यात आली, व त्याच दिवशी ती रक्कम जमा दाखविण्यात आली. त्यानंतर दिनांक 8/6/2009 रोजी दिनांक 28/5/2009 रोजीच्या व्यवहाराचा संदर्भ देवून तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 9,500/- नांवे टाकण्यात आले. निश्चितच सामनेवाले यांनी अॅक्सीस बँकेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 9,500/- दिनांक 8/6/2009 रोजी नांवे टाकले आहेत. ज्याचा खुलासा सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्रमांक 7 मध्ये केलेला आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले यांच्या चैन्नई येथील कार्यालयाने तक्रारदारांना दिनांक 19/8/2009 रोजी दिलेले पत्र तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 9 वर दाखल केलेला आहे. या पत्राद्वारे सामनेवाले यांच्या चैन्नई कार्यालयाने दिनांक 28/5/2009 रोजी ए.टी.एम. व्यवहाराबद्दल व तक्रारदारांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्या पत्राचे मंचाने वाचन केलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे चैन्नई कार्यालयाने तक्रारदारांना दिनांक 19/8/2009 रोजी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये अॅक्सीस बँकेकडून प्राप्त झालेले कागदपत्र व अहवाल यांचा संदर्भ नाही. सहाजिकच तो संदर्भ नसल्याने चैन्नई कार्यालयाने व्यक्त केलेल्या दिलगिरीस फारसे महत्व देणे शक्य नाही.
14. तक्रारदाराने आपल्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये त्याच्या खात्याच्या दिनांक 8/6/2009 रोजीच्या संक्षिप्त उता-याची (मिनी स्टेटमेंट) ची प्रत दाखल केलेली आहे, व त्यामध्ये रुपये 9,500/- नांवे टाकल्याबद्दलची नोंद नाही असे कथन केले. तथापि तक्रारदारानीच त्यांच्या खात्याचा जो सविस्तर खातेउतारा तक्रारीसोबत पृष्ठ क्रमांक 5, 6, व 7 मध्ये दाखल केलेला आहे. त्यामध्ये रुपये 9,500/- दिनांक 8/6/2009 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या खात्यामध्ये नांवे टाकण्याची नोंद आहे. त्यामुळे मिनी स्टेटमेंटची नोंद पुरेशी नाही. त्यातही दिनांक 8/6/2009 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 9,500/- नांवे टाकले ही बाब तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्येच मान्य केलेली असल्याने त्याबद्दल वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
15. वर चर्चा केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचे दिनांक 28/5/2009 रोजीच्या ए.टी.एम. व्यवहाराच्या संदर्भात अॅक्सीस बँकेकडून अहवाल मागितला व अॅक्सीस बँकेकडून व्यवहार यशस्वी झालेला आहे असा अहवाल मिळाल्याने दिनाक 8/6/2009 रोजी तक्रारदाराच्या खात्यामध्ये रुपये 9,500/- नांवे टाकण्यात आले व शिल्लक रक्कम कमी करण्यात आली. सामनेवाले यांची ही कृती अनाधिकाराची आहे, व खोडसाळपणाची आहे असे दिसून येत नाही. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्या नोंदीचे अथवा ए.टी.एम. व्यवहाराच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
16. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 509/2010 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 28/08/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-