जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –44/2011 तक्रार दाखल तारीख –01/03/2011
सिद्यीकी असदुल्ला खयुम सिद्यीकी
वय 70 वर्षे,धंदा मजूरी ..तक्रारदार
रा.मंगळवारपेठ ता.अंबाजोगाई, जि.बीड
विरुध्द
1. माधव एकनाथ केंद्रे,
वाहक बॅच क्रमांक 22415
अहमदपूर आगार रा.प.महामंडळ,अहमदपूर
ता.अहमदपुर जि.लातूर ...सामनेवाला
2. आगार प्रमुख
अहमदपूर आगार रा.प.महामंडळ,अहमदपूर
ता.अहमदपुर जि.लातूर
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- अँड.जी.बी.कोल्हे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार अंबाजोगाई येथील रहिवासी असून दि.28.10.2010 रोजी अंबाजोगाई बसस्थानकावरुन बीडला येण्याकरिता बस क्र.एम.एच.-20-बी.एल.-0486 औरंगाबाद अंबाजोगाई या बसमध्ये सकाळी 8 वाजता बसला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांचेकडे फेस्कॉम या सरकार मान्य व प्राधिकृत संघामार्फत महाराष्ट्र शासनाने तहसिलदार यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र क्रमांक ऐबीजे 83-382 दि.18.01.2005 अन्वये दिले आहे. ते ओळखपत्र तक्रारदाराने सामनेवाला यांना दाखवून सवलतीच्या तिकीटाची मागणी केली असता सामनेवाला यांनी हे पत्र तहसीलदाराचे सहीचे आहे ते आता बंद झाले आहे, निवडणूकीच्या कार्डाशिवाय कोणतेही कार्ड चालत नाही. ते असेल तर दाखवा नसता गाडीचे खाली उतरा, अशी अरेरावीची भाषा वापरुन तक्रारदारास अपमानास्पद वागणूक दिली व गाडीचे खाली उतरविण्याची धमकी दिल्यामुळे तक्रारदाराला नाईलाजाने पूर्ण तिकीट रु.74/- घेणे भाग पडले. तिकीट नंबर 035643 आहे.
तक्रारदाराने सामनेवाला यांस त्यांचे नांव व नंबर विचारला असता सामनेवाला यांनी ते दिले नाही. तिकीटावर सर्व काही आहे त्यावरुन तूम्हाला काय करावयाचे ते करा, माझे कोणीच काही वाकडे करु शकत नाही. वाटल्यास माझी तक्रार करा अशी धमकी दिली. बस वाहकाच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी दि.29.11.2010 रोजी आगार प्रमूख यांचेकडे तक्रार दिली. पण काहीच उत्तर न मिळाल्यानेदि.17.12.2010 रोजी विभाग नियंत्रक लातूर यांना तोच अर्ज दिला.
सामनेवाला यांचे विरुध्द काहीच कार्यवाही न झाल्याने तक्रारदारांनी दि.29.12.2010 रोजी ग्राहक पंचायत अंबाजोगाई कडे अर्ज करुन सामनेवाला यांनी तिकीटाचे आगाऊ पैसे घेतले आहेत ते व नूकसान भरपाई देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी दि.3.2.2011 रोजी सामनेवाला यांनी रु.40/- ग्राहक पंचायतमध्ये जमा केले पण नुकसान भरपाई बददल काहीच उत्तर न दिल्याने तक्रार दाखल केली आहे.
एसटी प्रवाशांचे सेवेसाठी आहे. बहूजन सूखाय बहूजन हिताय हे एसटी चे मुख्य ध्येय असताना, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असताना त्यांना दिल्या जाणा-या सवलतीच्या दरापासून त्यांना वंचित ठेऊन त्यांना तिकीट घेण्यास भाग पाडले. तक्रारदारास अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे सामनेवालेकडून एकूण रु.10,000/- नूकसान भरपाई देण्या बाबत आदेश व्हावेत. तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळावा.
सामनेवाल क्र.1 व 2 यांनी त्यांचा खुलासा नि.10 दि.7.5.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सदरील तक्रारदाराने दि.28.11.2010 रोजी आगार प्रमुख कडे अर्ज दिला हे त्यांना मान्य आहे. तक्रारदाराने तहसील कार्यालय अंबाजोगाई येथून जेष्ठ नागरिक ओळखपत्र काढलेले आहे. त्यात तक्रारदाराचा जन्म दिनांक नमूद केलेला नाही.तक्रारदाराने स्वतःचे जेष्ठ नागरिक ओळखपत्रावर वय 65 असे लिहीलेले आहे. त्यावर तहसीलदार अंबाजोगाई यांची स्वाक्षरी दिसून येत नाही.
दि.23.12.2010 रोजी बनावट ओळखपत्राचे रॅकेट दैनिक लोकमतमध्ये बातमी आली होती. तक्रारदार हे दि.28.11.2010 रोजी प्रवास करीत असताना त्यांनी जेष्ठ नागरिक ओळखपत्र दाखवील्यानतर सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना 65 वर्षाचे वाटत नव्हते, संशय असल्याने तक्रारदाराकडे ओळखपत्राशिवाय भारत सरकारचे मतदान कार्ड नसल्याने सामनेवाला क्र.1 ने एसटी महामंडळाच्या नियमानुसार तक्रारदाराकडून पूर्ण तिकीटाचे पैसे घेतलेले आहेत. तक्रारीसोबत सामनेवाला क्र.1 यांनी कोणतेही गैरवर्तन केलेले नाही.
तक्रारदारांनी दि.3.1.2011 रोजी ग्राहक पंचायत अंबाजोगाई येथे ग्राहकाची फसवणूक, नूकसान भरपाईची मागणी असा अर्ज दिला होता. या अर्जात तक्रारदाराने जेष्ठ नागरिकास अपमानास्पद वागूणक दिली व रु.37/- चे नूकसान झाले. ग्राहकास मानसिक त्रास झाला. नूकसान भरपाई म्हणून रु.5,000/-ची मागणी केली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सिटीलॅड एक्सप्रेस कूरिअर अहमदपूर जि.लातूर मार्फत दि.3.2.2011 रोजी ग्राहक पंचायत अंबाजोगाई येथे रु.40/-दिले आहेत. सामनेवाला क्र.1 तक्रारदारांना अपमानास्पद वागूणक दिलेली नाही किंवा अरेरावीची भाषा केलेली नाही. तक्रारदार आजपर्यत खोटे व बनावट जेष्ठ नागरिक आधारे प्रवास करीत होते. तक्रारदारांनी अशा प्रकारचा नूकसान भरपाईचा खोटा दावा एसटी महामंडळ अंबाजोगाई विरुध्द 43/11 केला असून तो प्रलंबित आहे. दि.1.10.2010 रोजी जेष्ठ नागरिकांचे परिपत्रक काढण्यात आले होते ते परिपत्रक एसटी लातूर यांना पाठविण्यात आले होते. त्यात नमूद केले आहे की, बनावट पासेसचा वापर होऊ नये म्हणून संबंधीत सर्व कर्मचा-यांना दक्षता घेणे आवश्यक असून त्याप्रमाणे तपासणी पथकांना दक्षतेबाबत सूचना देणे आवश्यक आहे. तसेच सर्व आगारातील सर्व वाहकांना, संबंधीत कर्मचा-यांना पासेस हाताळताना दक्ष राहणेबाबत सुचित करावे.वाहकांनी मूळ ख-या पासेसचे स्वरुप, रंगसंगती व बनवाट पास यातील फरक तसेच प्रवास करणारे जेष्ठ नागरिक ज्यांचे वय किमान 65 वर्षावरील असणे अपेक्षित आहे. त्यांच्या वयाचा अंदाज (प्रवाशांना न दुखावता) घ्यावा.
सदर परिपत्रका आधारे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार हे 65 वर्षाचे पेक्षा कमी वयाचे असल्याचा संशय आल्याने सदरचे ओळखपत्र खोटे बनावट असल्याकारणाने त्यांचेकडून पूर्ण तिकीट काढून घेतले. तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचा खुलासा, सामनेवाले यांचे आगार प्रमुख रमेश शंकरराव देशमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,अहमदपुर यांचे शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. सामनेवाले यांचे वकील श्री.कोल्हे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्र पाहता तक्रारदारा जवळ तहसीलदार यांचे स्वाक्षरीचे ओळखपत्र ऐबीजे 83-382 दि.18.1.2005 चे आहे. सदर ओळखपत्रावर तक्रारदाराचे जन्म तारीखेच्या कलमात वय 65 वर्ष नमूद केलेले आहे.
दि.28.10.2010 रोजी अंबाजोगाई बसस्थानकावरुन बीडला येण्याकरिता बस क्र.एम.एच.-20-बी.एल.-0486 औरंगाबाद अंबाजोगाई या बसमध्ये सकाळी 8 वाजता बसला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांचेकडे फेस्कॉम या सरकार मान्य व प्राधिकृत संघामार्फत महाराष्ट्र शासनाने तहसिलदार यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र क्रमांक ऐबीजे 83-382 दि.18.01.2005 अन्वये दिले आहे. ते ओळखपत्र तक्रारदाराने सामनेवाला यांना दाखवून सवलतीच्या तिकीटाची मागणी केली सामनेवाला क्र.1 यांनी सदरचे ओळखपत्रावर जन्म तारीख नमूद नाही, त्याठिकाणी वय वर्ष 65 हाताने लिहीलेले असल्याने व त्यावर तहसीलदार यांची सही नसल्याने तक्रारदार ओळखपत्राआधारे तक्रारदारांना ज्येष्ठ नागरिक सवलत देण्याचे नाकारले. तसेच तक्रारदाराशी अरेरावीची भाषा केली. तिकीट पूर्ण घ्या नाही तर खाली उतरा अशी धमकी सामनेवाला क्र.1 ने दिली. त्यामुळे तक्रारदारांना पूर्ण तिकीट घ्यावे लागले अशी प्रमुख तक्रारदाराची तक्रार आहे.
या संदर्भात सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार सदर दिनांकाला तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अहमदपूर-औरंगाबाद बसमधून प्रवास करीत असल्याचे मान्य केलेले आहे व तसेच त्यांचेकडून पूर्ण तिकीट घेतल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. तक्रारदाराजवळ असलेल्या ओळखपत्रात जन्म तारीख नमूद नसून सदर कलमात 65 वर्ष नमूद केलेले आहे. त्यामुळे वाहकाला सदर पत्राबाबत शंका आली व तसेच तक्रारदार हे 65 वर्षापेक्षा कमी दिसत असल्याचा संशय आला व तसेच दि.01.10.2010 रोजीचे पत्र वाहकांनी लातूर डेपोचे वाचलेले असल्याने त्यानुसार वाहकाने कार्यवाही केलेली आहे.
सदर ओळखपत्राचे संदर्भात तक्रारदाराने तहसिलदाराच्या सहीचे दिलेले वयाचे प्रमाणपत्र वापरु नका असा कोणताही आदेश एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने दिलेला नाही. या संदर्भातील बातमी सकाळ औरंगाबाद मध्ये दि.02.12.2010 रोजीचे पेपरचे कात्रण दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदारांना देण्यात आलेले ओळखपत्र हे सत्य असल्याबाबत व त्यावर कोणतीही दूरुस्ती केलेली नसल्याबाबतचे दि.1.1.5.2011 रोजीचे जेष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई यांचे पत्र यावरुन तक्रारदाराच्या जेष्ठ नागरिक पत्रात तक्रारदारांनी त्यांचे हस्तांक्षरात कोणताही बदल केल्याचे दिसत नाही. जरी जन्म तारीखेच्या कलमात तक्रारदाराची जन्म तारीख नाही परंतु वय टाकलेले आहे. सदरचे वय हे नंतर टाकण्यात आलेले नाही असे वरील जेष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईचे पत्रावरुन स्पष्ट होते. या संदर्भात सामनेंवाला क्र.1 यांनी, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 कडे तक्रार केल्यानंतर दि.10.01.2011 रोजी त्यांचा जवाब दिलेला आहे व त्यात त्यांनी वरील ओळखपत्र प्रथमच पाहण्यात आले. तक्रारदाराकडे निवडणूक आयूक्ताचे कार्डाची मागणी केली असता ते दाखवू शकले नाहीत.त्यामुळे शंका आल्याने त्यांनी त्यांचे पूर्ण तिकीट घेतलेले आहे. यात तक्रारदारांना अरेरावीची भाषा वापरली हे खोटे आहे. परिपत्रकाचा आधार घेऊन कार्यवाही केलेली आहे तरी त्यांचा सहानूभूतीपूर्वक विचार व्हावा.
तसेच दि.25.01.2011 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी अर्धा तिकीटाचे पैसे परत केलेले आहेत व त्या पत्रात केवळ एसटी महामंडळाच्या प्रसारित परिपत्रकाप्रमाणे तिकीट दिले यात त्रास देण्याचा मूळीच हेतू नव्हता, झालेल्या त्रासाबददल दिलगिरी व्यक्त केली आहे.
सदरचे पैसे आगार प्रमुखांनी कूरिअर मार्फत अंबाजोगाई ग्राहक पंचायत कडे पाठविल्याचे खुलाशात नमूद आहे व तक्रारदारांची तिकीटाची पैशाची मागणी नाही.
वरील सर्व परिस्थिती वरुन सामनेवाला क्र.1 यांनी परिपत्रकाप्रमाणे कारवाई केलेली असली तरी त्यांनी अर्धा तिकीटाचे पैसे तक्रारदारांना परत करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. यामध्ये सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना अरेरावीची भाषा वापरली व त्रास दिला या बाबत सामनेवाला क्र.1 चे वरील पत्र स्वयस्पष्ट आहे. त्यांनी नमूद केले आहे की, तिकीटाचे संदर्भात तक्रारदारांना त्रास देण्याचा त्यांचा हेतू नव्हता. झालेल्या त्रासाबददल दिलगीरी व्यक्त केलेली असल्यामुळे सामनेवाला क्र.1 ने तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे अर्धे तिकीटाचे पैसे व संबंधीत वाहकाची दिलगिरीचें पत्र दाखल केलेले असल्याने सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांनी दिलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही केल्याची बाब स्पष्ट होत असल्याने त्यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केंल्याचे स्पष्ट न झाल्याने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही रक्कम देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड