तक्रारदारांतर्फे श्रीनिवासन अॅन्ड कं., अॅडव्होकेट्स
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 22 जानेवारी 2013
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार यू.एस. मध्ये रहातात. परंतू त्यांचे पुण्यामध्ये सुध्दा घर असल्यामुळे त्या घरात यु.पी.एस इन्व्हर्टर सिस्टीम बसवायची होती म्हणून जाबदेणार यांच्याकडून सिस्टीम विकत घेण्याचे ठरविले. दिनांक 31/7/2010 रोजी जाबदेणार यांनी 3000 व्ही.ए, 48 व्होल्टस, 12 व्होल्टच्या चार लो मेंटेनन्स बॅट-या प्रत्येकी 180 ए.एच असलेल्या एकूण रक्कम रुपये 58,500/- असलेले कोटेशन तक्रारदारांना दिले. तक्रारदारांनी कोटेशन स्विकारल्यानंतर जाबदेणार यांनी दिनांक 14/09/2010 रोजी तक्रारदारांच्या घरी सिस्टीम बसविली. सिस्टीम बसवितांना तक्रारदार परदेशी असल्यामुळे सिस्टीम तपासून बघू शकले नव्हते. सिस्टीम बसविल्यानंतर दिनांक 16/09/2010 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम अदा केली. दिनांक 7/12/2010 रोजी तक्रारदार पुण्यात आल्यानंतर सिस्टीम मधील कुलिंग फॅनचा आवाज येत असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. म्हणून जाबदेणार यांना त्याबाबत दुरुस्ती करण्याची तक्रारदारांनी विनंती केली. जाबदेणार यांनी दिनांक 8/12/2010 रोजी त्यांचा प्रतिनिधी तक्रारदारांच्या घरी पाठविला परंतू त्या प्रतिनिधीकडे आवश्यक साहित्य नव्हते. दिनांक 9/12/2010 रोजी प्रतिनिधी परत तक्रारदारांच्या घरी आला परंतू सदोष फॅन च्या जागी दुसरा फॅन न लावता फक्त फॅनची केबल कापून निघून गेला. त्याचवेळी जाबदेणार यांनी बसविलेल्या बॅट-या या कमी क्षमतेच्या असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. जाबदेणार यांनी प्रत्येकी 180 ए.एच च्या चार बॅट-या न बसविता, 120 ए.एच च्या तीन बॅट-या व 150 ए.एच ची एक बॅटरी बसविली होत्या. पेट्रोलिअम जेलीचा वापर न करताच बॅट-यांचे टर्मिनल जोडले होते त्यामुळे टर्मिनल्स वर अॅसिड जमा झालेले दिसून येत होते. तक्रारदारांनी बॅट-या कमी क्षमतेच्या असल्याचे व सदोष सिस्टीम बसविल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत तातडीने जाबदेणार यांना कळविले. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही, समस्यांबाबत कळवूनही उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदारांचे मेहूणे श्री. मुरुडेश्वर यांनी जाबदेणार यांच्याशी दिनांक 23/12/2010 रोजी संपर्क साधला असता जाबदेणार यांनी दुस-या दिवशी येण्याचे सांगूनही प्रत्यक्षात आले नाहीत, दोष काढून टाकले नाहीत. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 1/2/2011 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. जाबदेणार यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर जाबदेणार यांनी दिनांक 17/2/2011 रोजी इन्व्हर्टर बदलून दिले व सात दिवसात बॅटरीज बदलून देऊ असे सांगितले. त्यानुसार चार कमी क्षमतेच्या बॅटरीज बदलून दिल्या. परंतू बदलेल्या बॅटरीज वर टॅग नव्हता. तसेच चार बॅटरीज पैकी एका बॅटरीची बॉडी/शेल क्रॅक झालेली होती, त्यामुळे बॅटरीज नव्या नसून जुन्या असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. तसेच बॅटरीज बदलण्यासाठी जाबदेणार यांनी जी माणसे पाठविलेली होती त्यापैकी एक दारु प्यायलेल्या अवस्थेत होता व उगाचच वाद घालत होता. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याशी लगेचच संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली व टॅग सह बॅटरीज बदलून मिळाव्यात अशी मागणी केली. परंतू जाबदेणार यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून स्टॅन्डर्ड ब्रान्ड न्यू आय.एस.आय मार्क बॅटरीज बदलून मागतात. अन्यथा बॅटरीज ची किंमत रुपये 40,000/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. तसेच तक्रारदारांनी तज्ञाचा अहवाल दाखल केला.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्या विरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दिनांक 14/09/2010 रोजी रुपये 58,500/- देऊन जाबदेणार यांच्याकडून यु.पी.एस/इन्व्हर्टर सिस्टीम - 3500 व्ही.ए, 48 व्होल्टस सिस्टीम, 12 व्होल्टच्या चार लो मेंटेनन्स बॅट-या प्रत्येकी 180 ए.एच खरेदी केल्या. खरेदी केल्यापासून तीन महिन्यातच दिनांक 7/12/2010 रोजी सिस्टीम मध्ये दोष निर्माण झाल्याचे, बॅटरीज कमी क्षमतेच्या असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जाबदेणार यांनी दिनांक 17/2/2011 रोजी इन्व्हर्टर बदलून दिले व सात दिवसात बॅटरीज बदलून देऊ असे सांगितले. त्यानुसार चार कमी क्षमतेच्या बॅटरीज बदलून दिल्या. परंतू बदलेल्या बॅटरीज वर टॅग नव्हता. तसेच चार बॅटरीज पैकी एका बॅटरीची बॉडी/शेल क्रॅक झालेली होती, त्यामुळे बॅटरीज नव्या नसून जुन्या असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. तक्रारदारांनी यासंदर्भात श्री. सिध्दन्ना बी. आनंद, B.E. – Electronics and Communication या तज्ञाचा दिनांक 22/10/2012 रोजीचा अहवाल दाखल केला आहे. तज्ञांना यु.पी.एस युनिट्स या क्षेत्रामध्ये उत्पादन व विक्रीचा 15 वर्षाचा अनुभव आहे. श्री. सिध्दन्ना बी. आनंद यांनी तक्रारदारांची यु.पी.एस सिस्टीम व बॅटरीज यांची दिनांक 22/10/2012 रोजी पाहणी केल्यानंतर त्यांचा अहवाल दिला असून सदरहू अहवालामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे-
“ I examined on 22/10/2012, the UPS Inverter System of the Complainant and in the same I have found the following defects-
(a) Inverter makes unwanted loud humming/vibrating noise while working on battery which is scary.
(b) Charger is not operating consistently. It is charging at 9-11 Amps once in 20 seconds for a period of 2 seconds. As a result Electricity bill is increasing.
(c) Batteries are discharging very fast.
Ultimate conclusion:- Inverter is faulty and charger also is bad, it could have caused damages to the batteries.”
तज्ञांच्या अहवालातील निष्कर्षानुसार जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेले इन्व्हर्टर हे सदोष असल्याचे, चार्जर चांगले नसल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेली सिस्टीम सदोष असल्यामुळे तक्रारदारांना निश्चीतच मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल. म्हणून मंच जाबदेणार यांना असा आदेश देतो की त्यांनी तक्रारदारांना दिलेल्या बॅटरीजच्या बदल्यात ISI मार्क च्या स्टॅन्डर्ड ब्रान्डच्या बॅटरीज दयाव्यात तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- तक्रारदारांना दयावा.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेल्या बॅटरीजच्या बदल्यात ISI मार्क च्या स्टॅन्डर्ड ब्रान्डच्या बॅटरीज आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयाव्यात.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.