::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 10.12.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. गैरअर्जदाराचे अधिका-यांनी अर्जदारास सांगितले की, गैरअर्जदारानी ठाकूर सत्यप्रताप गिरजासिंग यांचेकडून टाटा 1612 ट्रक क्र.एम एच 17/ ए - 8870 हा जप्त करुन हनीफ लाला ला विकला आहे व त्यांना किस्त भरण्यास अडचण असल्याने त्यांच्याकडून ट्रक खरेदी करुन देतो. अर्जदाराने गैरअर्जदाराचे अधिका-यांवर विश्वास ठेवून ट्रकचा ताबा डिसेंबर 2008 मध्ये घेतला व त्यावेळी त्या ट्रकवर रुपये 1,50,000/- पुढील किस्त बाकी होती. अर्जदाराने डिसेंबर 2008 पासून सदर गाडीचे किस्त भरणे सुरु केले. अर्जदाराने वारंवार गाडी नावावर करुन देण्याची विनंती केली. गैरअर्जदाराने गाडी ट्रांसफर करुन देण्यास टाळाटाळ केली व गैरअर्जदाराने अर्जदारास वरील गाडीवर फायनांस करावे व वरील गाडी अर्जदाराचे नावाने ट्रासंफर करुन व करार करुन अर्जदाराचे नावाने कर्ज खाते सुरु करणार. अर्जदाराने गैरअर्जदाराचे अधिका-यांचे सांगण्यावरुन दि.15.7.2010 रोजी फायनांसकरीता कोरे प्रीटेंड 50 ते 100 फार्मवर व तसेच 15 ते 20 कोरे कागद रेव्ह्येनु तिकीट लावून त्याचेवर अर्जदाराची सही घेतली व वरील ट्रक करीता अर्जदाराचे नावाने रुपये 1,40,000/- चे कर्ज मंजुर केले. सदर कर्ज अर्जदारास 23 हप्त्यात रुपये 6,357/- प्रमाणे रुपये 2,10,383/- गैरअर्जदाराकडे भरावयाचे होते. अर्जदाराने कर्जाचे हप्त्याचा नियमितपणे भरणा केला. अर्जदाराने दि.20.7.2011 पावेतो रुपये 1,19,299/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला. अर्जदाराने आजपावेतो रुपये 1,99,792/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला. गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.25.10.2011 ला पञ पाठवून रुपये 46,530/- ची मागणी केली व अर्जदाराने रिफायनांसची तयार दर्शविली आहे. त्यामूळे तक्रारीत अर्जदाराने अशी मागणी केली कि, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली सेवा ही न्युनतापूर्ण सेवा आहे असे ठरविण्यात यावे. गैरअर्जदाराने अर्जदाराला ट्रक क्र.एम एच 17/ए-8870 ट्रांसफर करुन द्यावे व थकीत रक्कम व पुढील हप्त्याकरीता रिफायनांस करावे किंवा अर्जदाराने डिसेंबर 2008 ते ऑक्टोंबर 2010 कालावधीमध्ये जमा केलेली रक्क्म 80,792/- रुपये 15 टक्के व्याजासह परत करावे व गैरअर्जदाराने दि.15.7.2010 रोजी करार करुन फायनांस केले याच्यात अर्जदाराने जमा केलेली रक्कम 1,19,299/- रुपये 15 टक्के व्याजासह परत करावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व केसच्या खर्चापोटी रुपये 10,000/- अर्जदाराला द्यावे, अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 9 दस्ताऐवज, नि.क्र. 5 नुसार अंतरीम अर्ज दाखल केला. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.11 नुसार अंतरीम आर्जवर उत्तर व नि.क्र.12 नुसार 7 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. नि.क्र.5 अंतरीम अर्जावर दि.10.2.2012 ला अंतरीम आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.17 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.26 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.17 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे विनंतीवरुन दि.31.7.2009 मध्ये रुपये 1,07,000/- चे कर्ज दिले व त्या कर्ज रकमेवर रुपये 34,500/- फायनांस चार्जेस लागले असे मिळून अर्जदाराला रुपये1,41,580/- दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून टायर, इंशुरंसचे देखील कर्ज घेतले होते. अर्जदाराकडून रुपये 1,84,092/- कर्ज रक्कम गैरअर्जदाराला घेणे होते. त्यापैकी, अर्जदाराने फक्त रुपये 70,492/- चा भरणा केला होता. अर्जदार कर्ज थकीतदार होता. तसेच, अर्जदाराचे अर्जानुसार गैरअर्जदाराने अर्जदाराला करार करुन थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी अर्जदाराला दि.15.7.2010 मध्ये रुपये 1,40,000/- चे कर्ज दिले. त्यापैकी, कर्ज खात्यात रुपये 1,05,000/- जमा केले व कर्ज घेतेवेळी दस्ताऐवज रुपये 3,211/- वजा करुन उर्वरीत रक्कम रुपये 31,789/- चा चेक अर्जदारास दिला. सदर कर्जाची परतफेड पहिली किस्त रुपये 6,959/- व नंतर दरमहा रुपये 6,358/- प्रमाणे 33 किस्तीत व्याजासह रुपये 2,10,383/- परतफेड करावयाचे होते. अर्जदाराने सदर गाडीच्या कर्जा व्यतिरिक्त गैरअर्जदाराकडून 20,000/- व परत रुपये 20,000/- टायरसाठी, इंशुरंससाठी रुपये 8,402/- , क्रेडीट कार्ड सुविधामध्ये अर्जदाराने रुपये 20,000/- गैरअर्जदाराकडून घेतले आहे. अर्जदाराने असे एकूण कर्ज रक्कम रुपये 2,78,785/- गैरअर्जदाराकडून घेतले होत. अर्जदाराने आजापर्यंत रुपये 84,299/- गैरअर्जदाराकडे भरलेले आहे. याशिवाय अर्जदाराने गैरअर्जदाराकडून बुलेट लोन रुपये 35,000/- दि.23.3.2011 ला घेतले. अर्जदाराने सदर कर्जाचे रुपये 4,695/- गैरअर्जदाराकडे भरणा केला. अर्जदाराने सदर ट्रक अब्दुल हनीफ लाला मोहम्मद यांचेकडून खरेदी केला व ताबा घेतला. हनीफ लाला व अर्जदार यांनी परस्पर एकमेकांच्रूा संगनमताने हे विक्रीपञ केलेले आहे. अर्जदाराने थकीत कर्जाची रक्कम रुपये 92,774/- भरावी तसेच इतर क्रेडीट कार्ड व बुलेट लोनची रक्कम भरावी अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द चुकीचे, खोटे आरोप करुन मामला दाखल केला आहे. सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.26 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, ट्रक क्र.एम एच 17/ ए – 8870 ही गैरअर्जदार क्र.2 चे नावाने पंजीबध्द होती. गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.1 कडून 2005 मध्ये अर्थसहाय्य घेतले. सन 2006 पर्यंत गैरअर्जदार क्र.2 नियमितपणे कर्जाची परतफेड केली. गैरअर्जदार क्र.1 ने कायद्याचे पालन न करता व कोणत्याही प्रकारची नोटीस न देता गैरअर्जदार क्र.2 चा वरील ट्रक बेकायदेशिरपणे जप्त केला. सदर मामल्यात अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 ला पार्टी केले व गैरअर्जदार क्र.2 विरुध्द मागणी केलेली नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपञांवरुन स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र.1 ला आपल्या ग्राहकांना न्युनतापूर्ण सेवा देण्याची सवय पडलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने वरील ट्रक जप्त केल्यानंतर सदर ट्रक विकण्याचे आधी कोणतीच नोटीस गैरअर्जदार क्र.2 ला दिली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 ला न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने केलेल्या गैरव्यवहारामुळे गैरअर्जदार क्र.2 ला झालेल्या शारीरिक, मानसिक ञासापोटी रुपये 20,000/- द्यावे. गैरअर्जदार क्र.1 वर नुकसान भरपाई म्हणून 50,000/- ठोकून नुकसान भरपाईची रक्कम गैरअर्जदार क्र.2 ला द्यावी. गैरअर्जदार क्र.1 ला जास्तीत-जास्त दंड द्यावा असे गैरअर्जदार क्र.2 ने उत्तरात नमूद केले.
5. अर्जदाराने नि.क्र.41 नुसार रिजॉईन्डर शपथपञ दाखल केली. गैरअर्जदाराने नि.क्र.44 नुसार शपथपञ, नि.क्र.29 नुसार 8 व नि.क्र.30 नुसार 1 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे काय ? : होय.
(2) अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 2 चा ग्राहक आहे काय ? : नाही.
(3) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे :
काय ? होय.
(4) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा :
अवलंब केला आहे काय ? होय.
(5) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास ट्रक क्रं. एम एच 17/ए – 8870 गाडीवर कर्ज दिले होते. ही बाब अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 1 ला मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 2 मध्ये कोणताही करार किंवा व्यवहार झाला नसल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 2 चा ग्राहक नाही आहे असे सिध्द होते मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 व 4 बाबत ः-
8. गैरअर्जदार क्रं. 1 ने गैरअर्जदार क्रं. 2 ला तक्रारीत नमुद असलेला ट्रक वर कर्ज दिले होते ही बाब गैरअर्जदाराने दाखल नि. क्रं. 29 वर दस्त क्रं. ब – 1 वर करार नामा वरुन सिध्द होते. तसेच सदर ट्रक वर गैरअर्जदार क्रं. 1 ने हनिफ लाला यांनाही सुध्दा कर्ज दिले होते ही बाब गैरअर्जदाराने दाखल नि. क्रं. 29 वर दस्त क्रं. ब – 2, ब - 3 वर करारानामा वरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने दाखल नि. क्रं. 30 वर दस्त क्रं. ब- 1 वर दाखल करारनाम्या अनुसार अर्जदाराला सुध्दा सदर ट्रकवर कर्ज दिले होते असे सिध्द होते. कोणत्याही वाहनावर जर हायर परचेस कर्ज घेण्यात आले असेल तर सदर वाहनाचा मूळ मालक कर्ज देणारा असतो. गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास सदर ट्रकवर कर्ज देतांना गैरअर्जदार क्रं. 1 हे मूळ मालक असल्यामुळे गैरअर्जदार क्रं. 1 ची जबाबदारी ठरते कि, अर्जदाराच्या नावाने ट्रक ट्रान्सफर करुन दयावे आणि जो पर्यंत कर्जदार सदर वाहनावर कर्जाची परतफेड करत नाही तो पर्यंत वाहनाचे नोंदणी कार्डवर कर्ज देणारे कंपनीची एच. पी. म्हणून शेरा असतो. सदर ट्रकवर गैरअर्जदार क्रं. 1 नी अर्जदारास कर्ज देतांना गैरअर्जदार क्रं. 1 ला माहीती होती कि, सदर ट्रक अर्जदाराने श्री. अब्दुल अली हनिफ लाला मोहम्मद यांच्याकडून घेतला. सदर ट्रकचे नोंदणी कार्डवर गैरअर्जदार क्रं. 2 चे नाव नमुद आहे व त्यानंतर ती ट्रक श्री. अब्दुल अली हनिफ लाला मोहम्मद यांना देण्यात आला व त्यांना त्या ट्रकवर कर्ज ही देण्यात आले. त्याच्यानंतर अर्जदाराला सदर ट्रक देण्यात आला होता त्यांना ही ट्रकवर कर्ज देण्यात आले ही बाब अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन सिध्द होत आहे. मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 1 हे सदर ट्रकवर जोपर्यात कर्जाची परतफेड होत नाही तो पर्यंत ते मूळ मालक असून, सदर ट्रक विकत घेणाराच्या नाव नोंदणी करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रं. 1 वर आहे. तसेच सदर ट्रक गैरअर्जदार क्रं. 1 कडे गहाण असल्यामुळे सदर ट्रकचे मूळ दस्ताऐवज गैरअर्जदार क्रं. 1 कडे असले पाहिजे त्या दस्ताऐवजाची प्रत गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराला कर्ज देतेवेळी देणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास कर्ज देते वेळी कोणत्याही दस्तऐवजाची प्रत किंवा अर्जदाराचे नाव ट्रकचे नोंदणीकार्ड मध्ये नमुद करण्याचा प्रयत्न केला नाही हे स्पष्ट होत आहे सबब गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहारपध्दती व सेवेत ञुटी दिली आहे असे सिध्द होत आहे म्हणून मुद्दा क्रं. 3 व 4 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 5 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 ते 4 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास वादग्रस्त ट्रकची अर्जदाराच्या नावाने परिवहन
कार्यालयामध्ये नोंदणी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करुन दयावी.
(3) अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेले कर्ज नियमीत प्रमाणे परतफेड करावे.
(4) गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रु. 5,000/-
व तक्रारीचा खर्च रु. 2,500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या
आत करुन दयावी.
(5) गैरअर्जदार क्रं. 2 विरुध्द कोणताही आदेश नाही.
(6) उभयपक्षास आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 10.12.2014