::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैद्य) मा. कार्य. अध्यक्षा )
(पारीत दिनांक :- 07.12.2016)
अर्जदार ही गृहीणी असुन गैरअर्जदार क्रं 1 ही फायनान्स कंपनी आहे. गै.क्रं 1 हे जड वाहन खरेदी करण्याकरिता फायनान्स करतात. गै.क्रं 2 हा गै.क्रं 1 चा एजेन्ट असुन तो गै.क्रं 1 चे काम पाहतो. अर्जदार बाईने स्वतःच्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणुन तिने एक जेसीबी विकत घेऊन स्वयं रोजगार सुरू करण्याकरिता श्री. श्रीकांत गुळघाणे यांच्या कडुन जुना जेसीबी क्रं एम एच 32-पी 1949 हा रूपये 14,60,000/- ला विकत घेऊन दिनांक 21/01/2014 रोजी लेखी सौदा करून इसारा बाबत रूपये 5,00,000/- गुळघाणे यांना दिले व उरवरीत रक्कम दिल्यानंतर जेसीबी चा ताबा घेण्याचे ठरले. अर्जदाराजवळ तेवढी रक्कम नसल्यामुळे तिने गै.क्रं 1 चे चंद्रपुर येथील एजेन्ट गै.क्रं 2 कडे चौकशी करून गै.क्रं 1 तर्फै कर्जा करिता अर्ज सादर केला. त्यावेळेस कागद पत्राचा खर्च म्हणुन अर्जदाराकडुन रूपये 37,250/- गै.क्रं 2 ने घेतले. अर्ज सादर केल्यानंतर गै.क्रं 1 ने अर्जदार बाईला 10,72,000/- चे कर्ज दिनांक 10/02/2014 चे पत्रान्वये कर्ज मंजुर केल्याची माहिती श्री. गुळघाणे यांना दिली. तसेच गै.क्रं 1 ने दिनांक 10/02/2014 रोजी पत्रान्वये कर्ज वितरनाच्या पुर्वी सदर जेसीबी ची नोंदणी प्रमाणपत्रावर आरटीओ ऑफिस मधे व इंन्शुरन्स प्रमाणपत्रावर अर्जदार बाईचे नाव चढवुन गैरअर्जदाराच्या नावावर एचपी चढवल्यावर पाच सहा दिवसानी कर्जाचे वितरण केले जाईल अशी अट घातली आणि त्याबाबतचे पत्र श्री. गुळघाणे यांना दिले. अर्जदार बाईने वरील प्रकारचे सर्व कागद पत्रांची पुर्तता केल्यावर दिनांक 18/02/2014 रोजी गै.क्रं 1चे कार्यलयात सादर केले तेव्हा गै.क्रं 1 ने दिनांक 25/02/2014 रोजी कर्ज वितरीत करण्याचे आश्वासन दिले. परंतु 25/02/2014 पर्यन्तही कर्ज वितरीत केले नाही. अर्जदार बाईने गै.क्रं 2 कडे व गै.क्रं 1 च्या कार्यलयात जाऊन वारंवार विचार पुस केली असता काहीही उत्तर मिळाले नाही. परंतु दिनांक 22/03/2014 रोजी गै.क्रं 1 ने कोणतीही पुर्व सुचना न देता अर्जदाराला मंजुर झालेले कर्ज रद्द केले अशी माहिती अर्जदाराला दिली. गै.क्रं 1 चे सदर पत्र पाहुन अर्जदार बाईला धक्का पोहचला. अर्जदार बाईने ईसाराची रक्कम वाचविण्याकरिता दुस-यांकडुन जास्त व्याजाने रक्कम घेऊन दिनांक 08/04/2014 रोजी जेसीबी च्या मालकाला पुर्ण रक्कम देऊन जेसीबी घरी आणला, जर अर्जदार बाईने इतरान कडुन रक्कम घेऊन जेसीबी आणला नसता तर अर्जदार बाईची इसाराची रक्कम परत मिळाली नसती. अर्जदार बाईने गै.क्रं 2 व 1 च्या मदतीने लोन घेण्याकरिता कर्ज मंजुर केले असते तर जेसीबीचा ताबा 25/02/2014 रोजी मिळाला असता आणि तिला त्यापासुन 1,00,000/- प्रती महिना उत्पन्न मिळाले असते गै.क्रं 1 ने अर्जदार बाईचे मंजुर झालेले कर्ज रद्द करून ग्राहक म्हणुन फसवणुक केली असुन सेवेत न्युनता दिली आहे. अर्जदार बाईने गै.क्रं 1 ला वकीला मार्फैत नोटीस पाठवली परंतु नोटीस मिळूनही नोटीसचे उत्तर त्यांनी दिले नाही.
अर्जदाराची मागणी आहे की, गै.क्रं 1 व 2 यांनी दिलेल्या न्युनता पुर्ण सेवेमुळे झालेल्या आर्थिक, शारीरीक, मानसिक त्रासा बद्दल रूपये 1,87,250/- अर्जदाराला दयावे तसेच तक्रारीचा खर्च रूपये 5000/- देण्यात यावा.
गै.क्रं 1 व 2 ला नोटीस काढण्यात आली. गै.क्रं 1 ला नि.क्रं 7 नुसार नोटीस प्राप्त होऊन सुध्दा ते प्रकरणात हजर न झाल्यामुळे गै.क्रं 1 विरूध्द दिनांक 01/07/2015 रोजी प्रकरण एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
गै.क्रं 2 ला नोटीस प्राप्त होऊन त्यांनी नि.क्रं 9 वर त्यांचे लेखी उत्तर दाखल करून नमुद केले की अर्जदाराने लावलेले सर्व आरोप खेाटे आहेत. सदर तक्रार वस्तु स्थिती नुसार कायदयाच्या चौखटीत बसणारी नाही ही तक्रार न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील आहे. तक्रारीतील कारण कधीच घडले नाही. अर्जदाराने खरी बाब मंचा पासुन लपवुन ठेवलेली आहे. अर्जदार ही स्वतः गै.क्र 2 कडे गै.क्रं 1 कडुन वाहन कर्ज घेण्याकरिता आली होती. गै.क्रं 2 यांनी पुर्ण माहिती देऊन तिला अर्ज भरून आणण्यास सांगितला व आणतांना दोन जमानत दारांची स्वाक्षरी आणण्यास सांगितले त्यानुसार अर्जदाराने फॉर्म भरून आणला फॉर्म ची पडताडणी करतांना गै.क्रं 1 च्या लक्षात आले की, दोन पैकी एका जमानत दाराचे स्वाक्षरी आहे. तो जमानतदाराचे नाव सेबी मधे नाव नमुद आहे. त्यामुळे तो जमानतदार राहु शकत नाही. याबद्दल अर्जदाराला सांगण्यात आले होते. परंतु अर्जदाराने दुसरा फॉर्म भरून आणला नाही म्हणुन गै.क्रं 1 ने शेवटी अर्जदाराचा प्रस्ताव फेटाळुन लावला, भारत शासनाच्या नियमानुसार जर एखादया व्यक्तीचे नाव सेबी मधे असेल तर तो जमानतदार म्हणुन कर्ज देण्याच्या अर्जावर स्वाक्षरी करून शकत नाही. ही परिस्थिती अर्जदाराने गैरअर्जदारापासुन लपवुन ठेवली त्यामुळे तिला न्याय मांगण्याचा कोणताच अधिकार नाही. गै.क्रं 2 ने कर्जाची कार्यवाही करण्यासाठी अर्जदाराकडुन कोणतीही रक्कम घेतली नाही उलट तिलाच अर्ज पाठविण्याकरिता 20,000/- रूपये दिले म्हणुन सदर अर्ज खर्चासहीत खारीज करण्यात यावा.
अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्र.2 चे लेखीउत्तर, आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय ? होय
गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय किंवा ? होय
अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंशतः
आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
५. अर्जदार बाईने गैरअर्जदार क्र.2 च्या मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे तिच्या कुटूंबाच्या उदरनिर्वार्हाकरीता स्वयंरोजगार म्हणून श्री. श्रिकांत गुळघाणे यांच्याकडून जूना जे.सी.बी. रू.14,60,000/- ला विकत घेण्याचा लेखी करारनामा केला. सदर करारनामा निशाणी क्र.1 दस्त क्र.1 वर तक्रारीत दाखल आहे. सदर इसाराबाबत अर्जदार बाईने श्री. श्रिकांत गुळघाणे यांना रू.5,00,000/- दिले व उर्वरीत रक्कम जवळ नसल्यामुळे तिने गैरअर्जदार क्र.2 च्या मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडून कर्ज घेण्याचे ठरवून कागदपत्रांसाठी लागणारा खर्च रू.37250/- गैरअर्जदार क्र.2 ला दिला. गैरअर्जदार क्र.1 कडे तसा कर्जविषयक अर्ज सादर केल्यावर श्री.श्रिकांत गुळघाणे यांना दिनांक10/2/2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी पत्र पाठवून अर्जदाराचे कर्ज मंजूर केल्याची माहिती दिली. सदर पत्र तक्रारीत नि.क्र.4 सह दस्त क्र.2 वर दाखल आहे, उपरोक्त दस्तावेजाची पडताळणी करतांना असे निदर्शनांस येत आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी पत्रान्वये अर्जदार बाईला कर्ज मंजूर करण्याची माहिती श्री.गुळघाणे यांना देवून बाकीचे दस्तावेज तयार करून गैरअर्जदार क्र.1 कडे दाखल केल्यावर 5-6 दिवसांनी अर्जदार बाईला कर्जवाटप करण्यांत येईल असे कळविले. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या लेखीउत्तरात ते गैरअर्जदार क्र.1 चे एजेंट असून त्यांनी अर्जदार बाईला कर्ज घेण्यांस मदत केली हे नमूद केलेले असल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रंमाक 1 चे उत्तर होकारार्थी नमुद करण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
अर्जदार बाईने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन करतांना निदर्शनांस येते की, गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार बाईला गैरअर्जदार क्र.1 च्या दिनांक 10/2/2014 च्या पत्रानुसार जेसीबीचे आर टी ओ ऑफिसमध्ये नोंदणी पत्रांवर अर्जदार बाईचे नांव चढवून व त्यावर गैरअर्जदार क्र.1 च्या नांवाने बोजा चढवला तसेच इन्श्युरन्स प्रमाणपत्रावर अर्जदार बाईचे नांव चढवून सदर कागदपत्र गैरअर्जदार क्र.1 कडे दाखल केले. अर्जदार बाईने कर्जाबाबत गैरअर्जदार क्र.1 कडे विचारणा केल्यास कर्जवाटप 2-3 दिवसांत करण्यांत येईल असे आश्वासन गैरअर्जदार क्र.1 ने दिले. परंतु दिनांक 22/4/2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनीअर्जदार बाईला मंजूर झालेले कर्ज तिच्या पत्रानुसार रद्द करण्यांत आले, असे कळविले. अर्जदार बाईने तक्रारीत व तिच्या शपथपत्रात, असे कोणतेही पत्र गैरअर्जदार क्र.1 ला पाठविले नाही असे नमूद केले आहे.
सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस तामील होवूनसुध्दा ते तक्रारीत उपस्थित राहिले नाहीत व अर्जदार बाईचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 विरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 1/7/2015 रोजी करण्यांत आला.
गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या बचावात कथन केले आहे की, अर्जदार ही गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे कर्ज घेण्याकरीता आली होती व त्याप्रमाणे तिला कर्ज मिळण्याचा अर्ज भरून आणण्यांस सांगितले व त्यावर दोन जमानतदारांची स्वाक्षरी आणण्यांस सांगितले. त्याप्रमाणे अर्ज भरून दिल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यावर असलेल्या एका जमानतदाराची स्वाक्षरीबद्दल आक्षेप घेवून त्या व्यक्तिचे नांव सेबी मध्ये नमूद आहे त्यामुळे तो जमानतदार राहू शकत नाही अशी तोंडी माहिती अर्जदार बाईला देवून दुसरा जमानतदार आणण्यांस सांगितले. अर्जदार बाईने दुसरा जमानतदार न आणल्यामुळे तिचे कर्ज रद्द करण्यांत आले परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी घेतलेला सदर बचाव हा ग्राहय धरण्यासारखा नाही कारण तक्रारीत दाखल नि.क्र.4 सह वरील दस्त क्र.5 वरील अर्जदार बाईला गैरअर्जदार क्र.1 ने पाठविलेल्या पत्रात कोठेही नमूद नाही की अर्जदार बाईचे कर्ज कोणत्या कारणाने नामंजूर केले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी त्याबद्दल कोणताही लेखी पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. सबब गैरअर्जदारक्र.2 यांचे कथन ग्राहय धरण्यासारखे नाही.
अर्जदार बाईला गैरअर्जदार क्र.1 यांनी पहिल्यांदा पत्रान्वये कर्ज मंजूर झाल्याचे कळवून तिच्याकडून पूर्ण दस्तावेजांचा खर्च करवून काहीही ठोस कारण नसतांना कर्ज रद्द करून अर्जदाराच्या प्रती सेवेत न्युनता पूर्ण व्यवहार केला तसेच अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. म्हणुन मुद़्दा क्रंमाक 2 व 3 चे उत्तर होकारार्थी दर्शीविण्यात आहे.
९.मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार बाईला झालेल्या आर्थीक नुकसान तसेच शारिरीक मानसीक ञासाबदल रक्कम रूपये 20,000/ व तक्रारीचा खर्च 5000/ आदेशाची प्रत प्राप्त झाल्या तारखेपासुन गैरअर्जदाराने अर्जदाराला 45 दिवसाचे आत दयावी.
- गैरअर्जदार क्र.2 विरूध्द कोणताही आदेश देण्यांत येत नाही.
- आदेशची प्रत विनामुल्य उभय पक्षाला विनामुल्य देण्यात यावी.
- सदर आदेश संकेतस्थळावर टाकण्यात यावे.
चंद्रपूर
दिनांक - 07/12/2016