( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 25 आक्टोबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडुन रुपये 4,00,000/- एवढे गृहकर्ज दिनांक 9/10/2006 ला घेतले होते. करारानाम्यात व्याजाचा दर 8.50 दर्शविला होता. तक्रारदाराच्या माहितीस पडले की, पीएलआर मधुन 2.50 टक्के व्याज कमी करुन उर्वरित रक्कमेवर व्याज लावले. जेव्हा की तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे पीएलआर मधुन 3 टक्के दराप्रमाणे कमी करुन उर्वरित रक्कमेवर व्याज घेणे गरजेचे होते. त्यासंबंधी त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु गैरअर्जदाराने योग्य उत्तर दिले नाही म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल केली आणि ती द्वारे गैरअर्जदाराने 0.50 टक्के व्याज कमी करुन केलेल्या व्याजाची राशी, शारिरिक व मानसिक त्रासामुळे रुपये 75,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी विनंती केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदाराने आपले जवाबात तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली व असा आक्षेप घेतला की, तक्रारदाराने यासंबंधी त्यांना दिनांक 18/4/2007 ला पत्र पाठविले त्यांचे उत्तर दिलेले आहे आणि तेथुन ही तक्रार 2 वर्षाचे आत दाखल करण्यात आलेली नाही म्हणुन ही तक्रार मुदतबाहय आहे. पुढे त्यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 9/10/2006 ला तक्रारदाराचे कर्ज मंजूर केले त्यावेळेस व्याजाचा दर 2.50 टक्के प्रतीवर्ष पीएलआर वगळता ठरविण्यात आला होता. 0.50 टक्के रिबेट हा व्याजाचा बोनांन्झा योजनेत विशिष्ठ कालावधीसाठी दिनांक 23/09/2006 ते 31/12/2006 देण्यात आलेला होता. यासंबंधी तक्रारदाराने विचारणा केल्यामुळे तक्रारदाराला दिनांक 18/7/2007 चे पत्राद्वारे उत्तर देण्यात आले. तक्रारदाराची तक्रार चुकीची आहे व मुदतबाहय असल्यामुळे खारीज करावी असा उजर गैरअर्जदाराने घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 5 कागदपत्रे दाखल केलीत. तक्रारदार व त्यांचे वकीलांनी युक्तिवाद केला नाही. गैरअर्जदाराचा युक्तिवाद एैकला.
-: का र ण मि मां सा :-
यातील गैरअर्जदाराचा मुदतबाहय तक्रारी संबंधीचा आक्षेप हा सर्वात महत्वाचा आक्षेप आहे. याचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे. गैरअर्जंदाराने यात असा आक्षेप घेतला आहे की, गैरअर्जदाराने यासंबंधी त्यांना दिनांक 18/4/2007 रोजी पत्र देऊन खुलासा केलेला आहे आणि यानंतर तक्रारदारास जर तसा काही वाद होता तर 2 वर्षाचे आत तक्रार करणे गरजेचे होते. तक्रारदाराने तसे केले नाही म्हणुन ही तक्रार मुदतबाहय आहे. गैरअर्जदार ज्या 18/4/2007 चे पत्राचा उल्लेख करतात ते पत्र तक्रारदाराने स्वतः तक्रारीसोबत दाखल केलेले आहे. त्यामुळे ते तक्रारदारास मिळाले ही बाब स्पष्ट आहे आणि तक्रारदाराने ही तक्रार सन 2011 मध्ये दाखल केलेली आहे. त्यामुळे ही तक्रार मुदतबाहय आहे ही बाब उघडपणे सिध्द होते. तक्रारदाराने गैरअर्जदाराचे जवाबाला कोणत्याही प्रकारे प्रतीउत्तर देऊन त्यांचे म्हणणे खोडुन काढलेले नाही. वरील परिस्थिती पाहता आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार मूदतबाहय असल्यामुळे निकाली काढण्यात येते.
2. खर्च ज्याचा त्यांने सोसावा.