(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 17 एप्रिल 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून व्यक्तीगत उपयोगाकरीता दोन भ्रमणध्वनीची सेवा घेतली, ज्याचा क्रमांक 9823857080 व 9823460164 असा आहे. तक्रारकर्ता हे 40 % टक्के अपंग आहे. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला भ्रमणध्वनी वापराचे बिल दिल्यानंतर तक्रारकर्त्याने त्याचा भरणा दिनांक 13.8.2010 रोजी डिमांड ड्राफ्टव्दारे भरण्यात आला. परंतु, दिनांक 23.11.2010 रोजी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याचा भ्रमणध्वनी सेवा कोणतीही सुचना न देता खंडीत केली. तक्रारकर्ता यांनी दिनांक 28.11.2010 चा भरणा केला, परंतु विरुध्दपक्षाने पुन्हा दिनांक 20.12.2010 रोजी तक्रारकर्त्याला वकीला मार्फत नोटीस पाठविली. तक्रारकर्त्याने वापरलेल्या भ्रमणध्वनी सेवेचे येणारे बिल नियमीतपणे भरुन सुध्दा तक्रारकर्त्याला पाठविलेल्या नोटीसमुळे अतिशय मानसिक ञास झाला. सदरची प्रतिकृती ही विरुध्दपक्ष यांची अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून विरुध्दपक्षा मार्फत तक्रारकर्त्याला सेवेत ञुटी झाली आहे. त्यामुळे, तक्रारकर्त्याने दिनांक 30.1.2011 रोजी विरुध्दपक्षाला वकीला मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याव्दारे पाठविलेली नोटीसचा कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन त्याने खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याबरोबर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करावे.
2) तसेच, तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक ञास व शारिरीक ञासापोटी रुपये 75,000/- देण्याचे आदेशीत व्हावे व तक्रार खर्च म्हणून रुपये 25,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारीला आपले उत्तर सादर करुन प्राथमिक आक्षेपात नमूद केले की, तक्रारकर्त्याची सदारची तक्रार मंचाचे कार्यक्षेञात येत नसल्यामुळे तक्रार रद्द करावी. पुढे विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याची सदरच्या तक्रारीचा मजकूर खोटा व बनावटी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला कधीही डी.डी. व्दारे देयकाचा भरणा केला नाही. तसेच, धनादेशाव्दारे सुध्दा विरुध्दपक्षाकडे भरणा केला नाही. तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश बँकेत वटविण्याकरीता टाकला असता, तक्रारकर्त्याच्या खात्यात पैस नाही त्यामुळे पैसे वटण्यात आले नाही, उलट खात्यात पैस नसून सुध्दा धनादेश देवून विरुध्दपक्षाची फसवणूक केली आहे. तसेच, दिनांक 23.11.2011 ला विरुध्दपक्षाने सेवा खंडीत करण्याबाबतची सुचना दिली. तसेच, पावती क्रमांक 558801 व 558802 नुसार विरुध्दपक्षाकडे रुपये 1894/- व रुपये 406/- च्या रोख रकमचा भरणा केला हे म्हणणे चुकीचे आहे. यालउट, या रकमेचा धनादेश क्रमांक 822277 स्टेट बँक ऑफ इंडिया, किंग्सवे, नागपूर चा धनादेश विरुध्दपक्षाला दिला, परंतु खात्यात पैसे नसल्यामुळे तो वटल्या गेला नाही. तक्रारकर्ता यांनी दिनांक 20.12.2011 ला कायदेशिर नोटीस बजाविली असता, त्याचे वकीला मार्फत खोटे उत्तर विरुध्दपक्षाला पाठविले व मोबाईलचे बिल सुध्दा भरले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची खोटी तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
4. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर प्रामुख्याने 1 ते 10 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने दिनांक 5.11.2010 ते 4.12.2010 व 5.7.2010 ते 4.8.2010 च्या दरम्यानचे भ्रमणध्वनीचे बिल दाखल केलेले आहे. डिमांड नोट, बी.एस.एन.एल. चे पञ, पावत्या, खात्याचा उतारा, बी.एस.एन.एल. ला पाठविलेला लिगल नोटीस व त्याच्या पोहचपावत्या इत्यादी दस्ताऐवज दाखल केले आहे. तसेच, सरते शेवटी तक्रारकर्त्याने प्रकरणात दस्ताऐवज दाखल करण्याची परवानगी मागून दिनांक 25.1.2011 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे बिलाचा भरणा केला, त्याबाबतच्या पावत्या अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. विरुध्दपक्ष यांनी आपल्यात उत्तराबरोबर भारतीय स्टेट बँक, कारंजा (घाडगे), जिल्हा – वर्धा चा धनादेश क्र.822277 रुपये 2300/- चा धनादेशाची छायाप्रत दाखल केली, तसेच धनादेश बँकेतून न वटल्यामुळे त्याची पावती दाखल केलेली असून त्यावर ‘Funds Insufficient’ चा शेरा आहे.
5. सदर प्रकरणात दोन्ही पक्षाने लेखी युक्तीवाद, प्रतिज्ञापञ दाखल केले. तसेच, दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्तीस अनुचित व्यापार प्रथेचा : होय
अवलंब किंवा सेवेत ञुटी झाल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष यांचेकडून भ्रमणध्वनी सेवा घेतलेली असून विरुध्दपक्षाने भ्रमणध्वनी क्रमांक 9823857080 व 9823460164 या क्रमांकाची सेवा पुरविली. तक्रारकर्त्याने दोन्ही क्रमांकाचे सेवेचे बिलाचा भरणा नियमीत भरुन सुध्दा तक्रारकर्त्याची भ्रमणध्वनी सेवा विरुध्दपक्षाने कोणतीही सुचना न देता खंडीत केली, अशी तक्रारकर्त्याची तक्रार आहे. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याची तक्रार खोट्या स्वरुपाची असून ती बिनबुडाची आहे, तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्दपक्षाला तक्रारकर्त्याने कोणताही धनादेश दिला नाही व डी.डी.व्दारे कोणतीही रक्कम विरुध्दपक्षाला दिली नाही. याउलट, तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश विरुध्दपक्षाच्या खात्यात वटला नाही, कारण तक्रारकर्त्याच्या खात्यात पुरेशे पैसे नसल्यामुळे तक्रारकर्त्याने दिलेले चेक अनादरीत झाले व खात्यात पैसे नाही, असा शेरा आला. मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या संपूर्ण दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दिनांक 13.11.2010 रोजी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला पाठविलेली डिमांड नोटीसवरुन तक्रारकर्त्यावर रुपये 2294/- थकीत आहे असे दिसून येते व सदरच्या नोटीसमध्ये 7 दिवसाचे आत थकीत रक्कम जमा करावी असे दिसून येते. त्याचबरोबर दिनांक 23.11.2010 रोजी व दिनांक 28.11.2010 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे बिलाचा भरणा केल्याबाबतच्या पावती क्रमांक 558801 व 558802 दिल्याचे दिसून येते. तसेच, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दिनांक 25.5.2011 च्या पावत्याचे अवलोकन केले असता, दोन्ही क्रमांकाच्या बिलाचा भरणा एकूण रुपये 2790/- भरल्याचे दिसून येते. तसेच, दिनांक 13.11.2010 च्या नोटीसची मुदत 7 दिवसाची होती व तक्रारकर्त्याने दिनांक 25.1.2011 ला बिलाची रक्क्म भरल्याबाबतच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, उशिरा का होईना तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या बिलाचा भरणा केला, ही बाब स्पष्ट होते. तसेच, तक्रारकर्त्याचा भ्रमणध्वनी सेवा ही दिनांक 23.11.2010 रोजी खंडीत करण्यापूर्वी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाकडून लेखी सुचना देणे आवश्यक होते, परंतु तसे कोणतेही पाऊल न उचलता विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा भ्रमणध्वनी सेवा खंडीत करणे योग्य वाटत नाही. तसा लेखी पुरावा सुध्दा विरुध्दपक्षाने अभिलेखावर दाखल केला नाही, फक्त दिनांक 13.11.2010 च्या मागणी नोटीसमध्ये तक्रारकर्त्यावर दिवाणी अथवा फौजदारी कार्यवाही करण्याबाबत तागीद दिली.
7. सदरच्या प्रकरणात दोन्ही पक्षानी दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्दपक्षाच्या वर्तणूकीमुळे तक्रारकर्त्याला शारीरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 1,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 1,000/- विरुध्दपक्षाने द्यावे.
(3) तसेच, तक्रारकर्ता याला निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे प्रत्येकवेळी येणारे भ्रमणध्वनी बिलाचा भरणा वेळेच्या आत करावा व विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे दोन्ही भ्रमणध्वनीची सेवा सुरळीतपणे सुरु ठेवावी.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 17/04/2017