श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 10/03/2014) 1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, त्याची आई श्रीमती नारायणीबाई सत्यनारायण अग्रवाल हिने वि.प. बँक ऑफ महाराष्ट्र, वर्धमान नगर शाखा, नागपूर येथे खालीलप्रमाणे मुदत ठेवी गुंतविल्या होत्या. अ.क्र. | प्रमाणपत्राचा क्रमांक | मुदत ठेवीचा दि. | रक्कम | परिपक्वता दि. | परिपक्वता मुल्य | 1. | सीडीएस/ए1961037 | 11.06.1992 | रु.14,799.00 | 11.06.1997 | रु.29,910.25 | 2. | सीडीएस/बी066514 | 20.10.1992 | रु.2,732.16 | 20.10.1994 | रु.3,459.00 | 3. | बी 1065415 | 17.02.1992 | रु.54,121.32 | 17.08.1997 | रु.1,09,384. | 4. | बी 1065415 | 17.02.1992 | रु.4,537.06 | 17.08.1997 | रु.9,169.85 | 5. | बी 1065498 | 20.03.1992 | रु.16,525.00 | 20.09.1997 | रु.33,402.70 |
तक्रारकर्त्याची आई श्रीमती नारायणीबाई दि.12.07.1996 रोजी मरण पावली. तक्रारकर्ता लतेश अग्रवाल आणि श्रीमती संगीता चांदुका हे मृतक श्रीमती नारायणीबाई हिचे वारस आहेत. श्रीमती नारायणीबाई हिचे मृत्युनंतर तक्रारकर्त्याची बहीण संगीता चांदुका हिने श्रीमती नारायणीबाई हिचे नावाने असलेल्या ठेवीची मुदत पूर्ती रक्कम एकटया तक्रारकर्त्यास द्यावी असे संमतीपत्र लिहून दिले. तसेच तक्रारकर्त्याने वि.प.ला नुकसान भरपाईचा लेख शपथपत्रावर लिहून दिला. तसेच तक्रारकर्ता व त्याची बहीण यांनी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, नागपूर यांचे न्यायालयात वारसां याचिका क्र. 154/2007 दाखल केली व त्यात तक्रारकर्त्याची बहीण संगीता हिने मृतक श्रीमती नारायणीबाई हिच्या नावाने असलेली वि.प.कडील ठेव तक्रारकर्त्यास एकटयास देण्यासाठी ना हरकत दिल्याने न्यायालयाने दि.25.04.2011 च्या आदेशाप्रमाणे वारसा हक्क प्रमाणपत्र तक्रारकर्त्याच्या नावाने निर्गमित केले. त्यामुळे तक्रारकर्ता एकटाच वरील मुदत ठेवीची रक्कम आणि त्यावर मुदत पूर्तीनंतर देय झालेले व्याज मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने वि.प.बँकेकडे त्याच्या आईच्या नावाने असलेल्या मुदत ठेवींची रक्कम मिळण्यासाठी बरेचवेळा विनंती केली. परंतू वि.प. बँकेने मुदत पूर्तीची रक्कम व व्याज तक्रारकर्त्यास दिलेली नाही. शेवटी, दि.02.12.2011 रोजी तक्रारकर्त्याने वि.प.ला नोटीस पाठवून मुदत पूर्तीची रक्कम व त्यावर आजपर्यंतचे व्याज 7 दिवसाचे आत देण्याची मागणी केली. सदर नोटीस वि.प.ला मिळाला, परंतू त्यांनी अद्यापही मुदत ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज तक्रारकर्त्यास दिलेले नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली असून त्यात खालील मागणी केली आहे. 1) तक्रारकर्त्याच्या आईच्या नावाने असलेली वरील मुदत ठेवीची परीपक्वता रक्कम दिनांकापासून रक्कमेचे प्रत्यक्ष भुगतान करेपर्यंत 18 टक्केप्रमाणे व्याज देण्याचा वि.प.विरुध्द आदेश व्हावा. 2) शारीरीक व मानसिक त्रासाबाबत रु.50,000/-, तक्रारीचा खर्चाबाबत रु.5,000/- व सेवेतील त्रुटीबाबत रु.50,000/- देण्याचा वि.प.विरुध्द आदेश व्हावा. 2. वि.प.ने लेखी बयान दाखल करुन तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. 3. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याची आई श्रीमती नारायणीबाई हिचे वि.प.कडे मुदत ठेवी असल्याचे कबूल केले आहे. मात्र तक्रारकर्त्याने मागणी करुनही त्या ठेवीची रक्कम दिली नसल्याचे कबूल केले आहे. वि.प.चे म्हणणे असे आहे की, ठेवीदार मरण पावल्यानंतर त्या ठेवींची रक्कम मिळण्यासाठी वारसां कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात त्याची आई मरण पावल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केली नाही आणि बँकेकडे अर्ज केला नाही. तक्रारकर्त्याची आई जरीही 1996 मध्ये मरण पावली असली तरीही तक्रारकर्त्याने वारसां हक्क प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण सन 2007 मध्ये म्हणजे 10 वर्षानंतर दाखल केले आहे आणि सदर वारसा हक्क प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रथमच नोटीस पाठवून रकमेची मागणी केली आहे. परंतू बँकेत येऊन आवश्यक फॉर्म भरुन, तसेच मूळ ठेवी प्रमाणपत्र दाखल करुन रक्कम मिळाल्याबाबतचा अर्ज सादर केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास मुदत पूर्तीची रक्कम देण्यात आली नाही. यात वि.प.ने सेवेत कोणतीही त्रुटी किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. तक्रारकर्त्याने वि.प.वर खोटे आरोप लावून सदर तक्रार दाखल केली असून, ती खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे. 4. सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे. मुद्दे निष्कर्ष 1) तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यास पात्र आहे काय होय. 2) आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. -कारणमिमांसा-
5. मुद्दा क्र. 1 बाबत - सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची आई श्रीमती नारायणीबाई हिचे वि.प.बँकेत तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मुदत ठेवी होत्या, याबाबत उभय पक्षात वाद नाही. सदर ठेवींच्या प्रमाणपत्रांच्या प्रती तक्रारकर्त्याने यादीसोबत दस्तऐवज क्र. 4 ते 8 वर दाखल केलेल्या आहेत. मृतक श्रीमती नारायणीबाई हिचा मृत्यु दि.12.07.1996 ला झाला हे दर्शविण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याची बहीण संगीता चांदुका हिने ठेवीची रक्कम एकटया तक्रारकर्त्यास द्यावी, म्हणून दिलेले संमती पत्र दस्तऐवज क्र. 2 वर दाखल केले आहे. तसेच तक्रारकर्ता आणि त्याची बहीण संगीता चांदुका यांनी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, नागपूर यांचेकडे वारसां प्रकरण क्र. 154/07 अन्वये वारसां हक्क प्रमाणपत्र मिळण्यासाठी जो अर्ज केला होता. त्याबाबत तक्रारकर्त्याच्या नावाने वारसां प्रमाणपत्र मंजूर केल्याबाबतची आदेशाची प्रत, तसेच मिळालेल्या वारसां प्रमाणपत्र दस्तऐवज क्र. 9 वर दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्याने वि.प.ला 02.12.2011 रोजी दिलेला नोटीस दस्तऐवज क्र. 10 वर, पोस्टाची पावती दस्तऐवज क्र. 11 वर आणि वि.प.ला सदर नोटीस मिळाल्याबाबतची पोचपावती दस्तऐवज वर 12 वर दाखल केली आहे. 6. वरील सर्व दस्तऐवजांवरुन तक्रारकर्त्याच्या आईच्या नावाने वि.प.बँकेकडे ज्या ठेवी आहेत, त्यांची मुदत पूर्ती रक्कम, तसेच त्यावर रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत देय होणारे व्याज मिळण्यासाठी तक्रारकर्ती पात्र आहे. परंतू वारसां प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तक्रारकर्त्याने नोटीस देऊनही वि.प.ने तक्रारकर्त्यास सदर ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज अद्याप अदा केलेले नाही ही वस्तूस्थिती आहे. नोटीस मिळाल्यानंतर तक्रारकर्त्यास त्याचे उत्तर पाठवून रक्कम मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे हे कळविणे आणि अशी पूर्तता करुन घेतल्यानंतर तक्रारकर्त्यास मुदत पूर्तीची रक्कम व व्याज अदा करणे ही वि.प.ची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतू वि.प.ने ती पूर्ण केलेली नाही ही ग्राहकांप्रती सेवेतील न्यूनता आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे. 7. मुद्दा क्र. 2 बाबत - सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची आई मृतक नारायणीबाई हिचे नावाने असलेल्या मुदत ठेवींचे परीपक्वता मुल्य रु.1,85,325.80 आहे. त्यामुळे सदर रक्कम, तसेच परीपक्वता मुल्य देय झाल्यानंतर द्यावयाचे व्याज, वि.प.ने दाखल केलेल्या ‘ग्राहक सेवा नीतीयॉं’ 2011-2012’ च्या अनुच्छेद 5.1 प्रमाणे देय आहे. सदर तरतूद खालीलप्रमाणे आहे. “5.1 Interest Payable on Term deposit in Deceased Account i) In the event of death of the depositor before the date of maturity of deposit and amount of the deposit is claimed after the date of maturity, the Bank shall pay interest at the contracted rate till the date of maturity. From the date of maturity to the date of payment, the Bank shall pay simple interest at the applicable rate obtaining on the date of maturity, for the period for which the deposit remained with the Bank beyond the date of maturity; as per the Bank’s policy in this regard. ii) However, in the case of death of the depositor after the date of maturity of the deposit, the bank shall pay interest at savings deposit rate obtaining on the date of maturity from the date of maturity till the date of payment.” वरील तरतूदीप्रमाणे मुदत पूर्तीनंतर प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत जी रक्कम वि.प.कडे आहे, त्या रकमेवर मुदत पूर्तीच्या दिनांकास व्याजाचा जो दर होता, त्या दराप्रमाणे सरळ व्याजाने व्याजाची आकारणी करावयाची आहे. मुदतपूर्वीच्या दिवशी व्याजाचा दर काय होता, याबाबत उभय पक्षांनी पुरावा दिला नाही. बँकेचे सध्याचे व्याज दर लक्षात घेता त्यावेळचा व्याजदर द.सा.द.शे. 9 टक्के गृहित धरुन, त्या दराने सदर व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. 8. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने मृतक नारायणीबाई हिच्या मुदत ठेवींचे परीपक्वता मुल्य आणि व्याज मिळण्यासाठी कोणते दस्तऐवज द्यावयाचे आहे, याचा उल्लेख मृतकाचा दावा निपटारा करण्याची कार्यवाही या सदराखाली वि.प. बँकेने दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केली आहे. त्यातील अनुच्छेद क्र. 1.2 प्रमाणे खालीलप्रमाणे दस्तऐवज तक्रारकर्त्याने दाखल करणे आवश्यक आहे. 1. Application for deceased claim (Annexure 4) 2. Copy of Death Certificate 3. Proof of identification of legal heirs & proposed sureties wherever applicable such as Ration Card, Election ID Card, PAN Card or Passport or any other satisfactory proof of identification acceptable to the bank 4. Attested consent letter of legal heirs to pay the amount to any one or more of them (Annexure 5) (to be attested by Gazetted Officer or Executive Magistrate/Notary) 5. Affidavit from claimant (Annexure 6) 6. Letter of Indemnity signed by the claimants and all legal heirs with two sureties (Annexure 7) वरीलप्रमाणे दस्तऐवज यापूर्वी वि.प.कडे दाखल केल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही, म्हणून सदर तरतूदीप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.कडे आवश्यक दस्तऐवज दाखल केल्यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्यास वर उल्लेखित केलेल्या मुदत पूर्तीची रक्कम आणि त्यावर प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत अनुज्ञेय असलेले द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे सरळव्याज अदा करावे. 9. तक्रारकर्त्याने यापूर्वी योग्य ते दस्तऐवज दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्यास वि.प.कडून ठेवीची मुदत पूर्तीची रक्कम देण्यात आली नाही ही बाब लक्षात घेता तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी कोणतीही नुकसान भरपाई देणे मंचास उचित वाटत नाही. मात्र सदर तक्रारीचा खर्च रु.2,000/- तक्रारकर्त्यास मंजूर करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहे. वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.ने तक्रारकर्त्याची मृतक आई नारायणीबाई हिचे तक्रारीत नमूद केलेल्या मुदत ठेवींचे परीपक्वता मुल्य रु.1,85,325.80 मुदत पूर्तीच्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यं द.सा.द.शे. 9 टक्के सरळ व्याजासह द्यावे. 3) तक्रारीच्या खर्चादाखल वि.प.ने तक्रारकर्त्याने रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाची पूर्तता तक्रारकर्त्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे कागदपत्रे दाखल केल्यानंतर 15 दिवसाचे आत करावी. |