नि.22
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. 2224/2009
------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 06/11/2009
तक्रार दाखल तारीख : 13/11/2009
निकाल तारीख : 14/02/2012
-----------------------------------------------
श्री चंद्रकांत किसन डिगे
वय वर्षे 50, धंदा– कॉन्ट्रॅक्टर
रा.सी-8, मिरा हौसिंग सोसायटी, माधवनगर रोड,
सांगली ता.मिरज जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
1. सिनियर डिव्हीजनल इंजिनियर (दक्षिण)
सेंट्रल रेल्वे, पुणे – 411001
2. डिव्हीजन ऑफिस,
कमर्शियल व वर्क्स ब्रँच, हुबळी (कर्नाटक) ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड ए.आर.विसापूरकर
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड एस.व्ही. खाडे
जाबदारक्र.2 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज सिक्युरिटी डिपॉझीटपोटी जमा केलेली रक्कम मिळणेसाठी दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशील पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सांगली येथील रहिवासी असून तक्रारदार हे रेल्वे खात्याचे विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. तक्रारदार यांनी मिरज सातारा या मार्गावरील झोनल कामाचे टेंडर भरले होते त्याप्रमाणे तक्रारदार यांना रेल्वे स्टेशनवरील कलर काम करणे तसेच पेंटींग व पॉलिश करणे तसेच पाण्याची गळती काढणे व जाहिरातीची स्वच्छता करणे इ. कामाचे टेंडर भरले होते. सदर कामाचा कालावधी दि.1/7/1994 ते 30/6/1995 असा होता. सदरचे काम तक्रारदार यांनी वेळेत पूर्ण केले. सदरचे काम करीत असताना तक्रारदार यांचेकडून जाबदार क्र.2 यांनी सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून रक्कम रु.12,125/- जमा करुन घेतले होते. काम पूर्ण झाले परंतु सेक्युरिटी डिपॉझिटपोटी जमा केलेली रक्कम जाबदार यांनी परत केली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी सदरची रक्कम व्याजासह परत मिळावी या मागणीसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.3 ला शपथपञ व नि.5 च्या यादीने 8 कागद दाखल केले आहेत.
3. जाबदार क्र.1 यांनी याकामी नि.11 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात तक्रारदारांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार हे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदार यांनी भरलेली निविदा जाबदार यांनी स्वीकारली व त्याआधारे केलेल्या कामासंदर्भात तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज केला असल्याने तक्रारदार हा ग्राहक होत नाही. तक्रारदार यांनी सदरची निविदा ही हुबळी येथील कार्यालयात भरली असल्याने सदर तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येत नाही त्याकारणे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज चालण्यास पात्र नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतीत नाही तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाही. प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा जाबदार यांनी म्हणण्याचे पुष्ठयर्थ नि.12 ला शपथपञ दाखल केले आहे.
4. जाबदार क्र.2 यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली होती परंतु सदर नोटीसबाबत कोणताही अहवाल प्राप्त न झाल्याने व जाबदार यांचा पत्ता योग्य व बरोबर असल्याचे शपथपत्र तक्रारदार यांनी नि.21 ला दाखल केलेने जाबदार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला.
5. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का याबाबत तक्रारदार यांचे विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांचे विधिज्ञ तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक कसा होतो याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा करु शकले नाहीत. ग्राहक संरक्षण कायदयातील ग्राहक या शब्दाची व्याख्या लक्षात घेता मोबदला देवून एखादी वस्तू अगर सेवा घेतली असेल व अशी वस्तू अगर सेवा व्यापारी कारणासाठी घेतली नसेल तर वस्तू अगर सेवा घेणारी व्यक्ति ग्राहक होते. प्रस्तुत तक्रारअर्जातील मजकुराचे अवलोकन केले असता जाबदार रेल्वे खात्याने तक्रारदार यांना कलर काम करणे, पेंटींग काम करणे इत्यादी कामे करण्यासाठी तक्रारदार यांची सेवा घेतली असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात असे जरी मानले तरी तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेतील व्यवहार हा व्यापारी कारणासाठी झालेला दिसून येतो. त्याही कारणास्तव तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या व्याख्येमध्ये येत नाहीत त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नसल्याने तक्रारअर्ज काढून टाकणे योग्य ठरेल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. 14/02/2012
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.