जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच धुळे ग्राहक तक्रार क्र. 165/10 दाखल ता.05/05/10 निकाल ता.19/10/2010 श्री.दिपक आर. बाविस्कर, रा.11क, महात्मा फुले कॉलनी, पारोळा रोड, धुळे. तक्रारदार विरुध्द 1) श्री.खैरनार, श्रीराम अप्लायन्सेस, 169/ब, रामवाडी बंगला, रामवाडी, आस्था हॉस्पीटलसमोर, मालेगाव रोड, धुळे. 2) चंदु मोबाईल सर्व्हीस सेंटर, भगवा चौक, धुळे. विरुध्द पक्ष कोरमः-श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष, श्री.चंद्रकांत येशीराव, सदस्य तक्रारदारः- स्वतः विरुध्दपक्ष क्र.1 तर्फेः-अड.राजेश पवार निकालपत्र श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष, विरुध्दपक्ष श्रीराम अप्लायन्सेस यांनी सदोष मोबाईल विक्री करुन व विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तो दुरुस्त करुन न देवून सेवेत त्रुटी केली म्हणून प्रस्तुत तक्रार दाखल केली नाही.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी दि.06/11/09 रोजी श्रीराम अप्लायन्सेस यांचेकडून मायक्रोमॅक्स कंपनीचा क्यु थ्री मोबाईल रोख रक्कम रु.4000/- देवून खरेदी केला आहे. त्यांनी बिल बुक छापायला टाकले या सबबीवर बील दिले नाही. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी बील नसले तरी कच्च्या बिलामुळे सुध्दा काही बिघडत नाही. एक वर्षात काही खराब झाल्यास आम्ही या ठिकाणी बसलो आहोत असे सांगितले. 3. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, मोबाईल खरेदीनंतर आठच दिवसात हँडसेटची तक्रार घेवून ते विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे गेले असता त्यांनी चंदु मोबाईल येथे सर्व्हीस सेंटरकडे जाण्यास सांगितले. त्यावेळी विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आमच्याकडे अधिकृत सर्व्हिस सेंटर नाही असे सांगितले.
ग्राहक तक्रार क्र. 165/10 4. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांच्या हँडसेटमध्ये अनेक तांत्रीक बिघाड आहेत. त्यात लँडलाईनवरुन येणा-या कॉलसाठी डबल आवाज येतो, तसेच बॅटरी बँकअप विरुध्दपक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे मिडीया प्लेयर 3 तास चालून राहील, मात्र तो राहात नाही, मेमरी चीप असूनही मोठया फाईल साठवता येत नाहीत, फोटो कॅमे-याची व एफ एम रेकॉर्डची क्वॉलीटी बरोबर नाही, दहा मिनिटापेक्षा जास्त कॉल चालल्यास हँडसेट गरम होतो, ब्ल्यु टुथ सुविधा अकार्यक्षम असल्याने त्याद्वारे दुस-या हँडसेटमधील कोणत्याही व्हीडीओ फाईल योग्य मिळत नाही, त्या प्ले होत नाहीत तसेच कॉल रेकॉर्डींगची सुविधाही अयोग्य आहे. अशा अनेक तक्रारी सांगुनही विरुध्दपक्ष यांनी कोणतीही दखल घेतली नाही. 5. तक्रारदार यांनी दि.3/2/2010 रोजी लेखी विनंती अर्ज विरुध्दपक्ष क्र.1 कडे केला असता त्यांनी तो स्विकारला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी रजिस्टर पोष्टाद्वारे अर्ज पाठवला व पंधरा दिवसात हँडसेट दुरुस्त करुन द्यावा अथवा बदलून द्यावा अव तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. परंतु सदर रजिस्ट्री त्यांनी घेतली नाही.
6. तक्रारदार यांनी शेवटी तक्रार मंजूर करावी, मोबाईलची किंमत रु.4000/- देण्याचा हुकूम व्हावा, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/- देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
7. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.5 वर शपथपत्र तसेच नि.6 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.7 वर कच्ची पावती/बील, नि.8 वर अर्ज, नि.9 वर नोटीसची प्रतीक्षा आणि नि.10 वर विरुध्दपक्ष क्र.2 कडे हँडसेट दिल्याची पावती दाखल केली आहे.
8. श्रीराम अप्लायन्सेस यांनी आपला खुलासा नि.19 वर दाखल करुन तक्रार अर्जातील संपुर्ण मजकूर खोटा लबाडीचा व मंचाची दिशाभूल करणारा असल्याचे नमूद करुन अमान्य केला आहे. तक्रारदार यांनी रक्कम रु.4000/- चा मोबाईल खरेदी केल्याचे मान्य केले आहे. मात्र मोबाईलमध्ये दोष असल्याचे नाकारले आहे. 9. श्रीराम अप्लायन्सेस यांनी तक्रारदार यांनी दि.10/3/2010 रोजी लेखी अर्ज दिला तो त्यांनी स्विकारला नाही हा मजकूर नाकारला आहे. ग्राहक तक्रार क्र. 165/10 10. श्रीराम अप्लायन्सेस यांनी सत्यपरिस्थिती या सदरात असे नमूद केले आहे की, तक्रारदार मोबाईल दुरुस्तीसाठी त्यांचेकडे आले होते त्यावेळी मोबाईलची पाहणी केली असता असे लक्षात आले की तक्रारदार यांनी मोबाईल घरी किंवा दुसरीकडे उघडलेला असल्याने मोबाईलची कंपनीची गॅरंटी व वारंटी संपुष्टात आलेली आहे व तसा कंपनीचा नियमच आहे. तरी देखील सदर मोबाईल कंपनीचे अधिकृत सर्व्हीस स्टेशन म्हणजे विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे दाखवावा कारण मोबाईल रिपेअरींग त्यांच्या अखत्यारीत नाही. 11. श्रीराम अप्लायन्सेस यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी मोबाईल उत्पादक कंपनीला पार्टी करणे आवश्यक आहे कारण सदर वारंटी कंपनीची असते. सदर तक्रारीस योग्य पार्टीजचा समावेश न केल्याने नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. मोबाईल दुरुस्तीची कोणतीही जबाबदारी त्यांची नाही.
12. श्रीराम अप्लायन्सेस यांनी शेवटी तक्रार नामंजूर करण्यात यावी व त्यांना विनाकारण खर्चात व त्रासात टाकल्यामुळे कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रु.10,000/- देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे. 13. विरुध्दपक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.23 वर शपथपत्र दाखल केले आहे. 14. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे आणि विरुध्दपक्ष यांचा खुलासा आणि लेखी युक्तीवाद पाहिल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत. अ) तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते काय ?- नाही. ब) विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? – होय. क) तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? – अंतीम आदेशानुसार ड) आदेश काय ? – अंतीम आदेशानुसार. विवेचन 15. मुद्दा क्र.अ विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदार यांनी तक्रार दाखल करतांना विरुध्दपक्षपणात फक्त विरुध्दपक्ष यांनाच सामील केलेले असून उत्पादकास सामील केलेले नाही त्यामुळे तक्रारी अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते त्यामुळे तक्रार प्रथमदर्शनी रद्द होण्यास पात्र आहे असे म्हटलेले आहे. परंतु उत्पादकाला पक्षकार म्हणून सामिल केले नाही तरी उपभोक्त्याचा उत्पादकाशी बांधीलकीचा करार नसल्याने उत्पादक आवश्यक पक्षकार होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारीत आवश्यक पक्षकार करणे आवश्यक नाही असे आम्हांस वाटते. याबाबत आम्ही ब्ल्यु चिप इंडिया विरुध्द डॉ.चंद्रशेखर पाटील (2007) सी.पी.जे.पान क्र.69 (एन.सी.) या वरीष्ठ कोर्टाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेत आहोत. यात पुढील प्रमाणे तत्व विषद केलेले आहे. Defective-Liability of dealer vis-a-vis manufacturer-Impleadment of parties-Goods developed problems during warranty period-Dealer held liable-Contention, liability for refund that of manufacturer, who was not impleaded party-Rejected-Complainant had no privity of contract with manufacturer-Its joinder nof at all ned\cessary-liability up held. 16. वरील न्यायनिवाडयातील तत्व पहाता तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येत नाही असे आम्हांस वाटते. म्हणून मुद्दा क्र.अ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
17. मुद्दा क्र.ब- तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून दि.6/11/09 रोजी मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल रु.4000/- देवून खरेदी केला याबाबत वाद नाही. सदर मोबाईलची एक वर्षाची वारंटी होती याबाबतही वाद नाही. तक्रारदार यांनी सदर मोबाईल वारंटी कालावधीत बिघडल्यामुळे दुरुस्ती करुन देण्यासाठी विरुध्दपक्ष क्र.1 कडे गेले असता विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदर जबाबदारी त्यांची नाही म्हणून विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे पाठवले आणि विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तो दुरुस्त करुन दिला नाही अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे.
18. या संदर्भात विरुध्दपक्ष क्र.1 यांनी मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहेत व त्याची जबाबदारी त्यांची नाही असे म्हटले आहे. विरुध्दपक्ष क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झालेले नाहीत.
19. यावरुन असे दिसून येते की, मोबाईल वारंटी कालावधीत असतांना विरुध्दपक्ष क्र.1 यांनी त्याची दुरुस्तीची जबाबदारी सर्व्हीस सेंटरची आहे म्हणून नाकारली आहे. वास्तविक विक्रेत्याने मोबाईलची विक्री करतांना सर्व्हीसिंग किंवा दुरुस्तीसाठी इतर ठिकाणी जावे लागेल असे तक्रारदारास सांगितलेले नाही त्यामुळे विक्रेत्याने वारंटी कालावधीत मोबाईलची तक्रार आल्यानंतर तो ताब्यात घेवून स्वतः सर्व्हीसिंगसाठी पाठवणे आवश्यक असते. विक्री करुन रक्कम स्विकारल्यानंतर 1 वर्षभर (वारंटी कालावधीपावेतो) त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी विक्रेत्याची असते. याठिकाणी विरुध्दपक्ष क्र.1 यांनी मोबाईल दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्विकारलेली नाही व आपल्या खुलाशामध्येही मान्य केले ग्राहक तक्रार क्र. 165/10 आहे. आमच्या मते हँडसेटची तक्रार आल्यानंतर तो दुरुस्तीसाठी न स्विकारुन विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सेवेत त्रुटी केली आहे म्हणून मुद्दा क्र.ब चे उत्तर होकारार्थी देत आहोत. 20. विरुध्दपक्ष क्र.2 यांचेविरुध्द तक्रारदार यांची कोणत्याही प्रकारे मागणी नसल्याने त्यांचेविरुध्दची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल असे आम्हास वाटते. 21. मुद्दा क्र.क- तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली असल्यामुळे हँडसेटीची किंमत रु.4000/- मानसिक त्रासापोटी रु.15,000/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/-मिळावा अशी विनंती केली आहे. विरुध्दपक्ष तर्फे अड.पवार यांनी हॅण्डसेट बदलून देण्याची तयारी दर्शवली आहे तसेच सदरचे हॅण्डसेट जुन्या मॉडेलचे आहे त्यामुळे ते उपलब्ध नाहीत असे म्हटले आहे. या परिस्थितीत तक्रारदार यांनी वादातीत हॅण्डसेट विरुध्दपक्ष क्र.1 यांना परत करावा व विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारदारास खरेदी रक्कम रु.4000/-व त्यावर मोबाईल खराब झाल्याची तारीख 03/02/2010 पासून रक्कम परत करेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य व न्यायाचे होईल असे आम्हास वाटते. तसेच तक्रारदार मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.1500/- व तक्रार अर्जाचा खर्चाची भरपाई म्हणून रक्कम रु.500/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
22. मुद्दा क्र.ड- वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श 1) तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्दपक्ष श्रीराम अप्लायन्सेस यांनी तक्रारदार यांचेकडून वादातीत मोबाईल हँडसेट स्विकारुन त्या बदल्यात मोबाईल हॅण्डसेट खरेदी रक्कम रु.4000/- व त्यावर मोबाईल खराब झाल्याची तारीख 03/02/2010 पासून रक्कम परत करेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के दराने व्याज अशी एकूण रक्कम अदा करावी. 3) विरुध्दपक्ष श्रीराम अप्लायन्सेस यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.1500/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत द्यावेत. ग्राहक तक्रार क्र. 165/10 4) विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येत आहे. (चंद्रकांत येशीराव) (डी.डी.मडके) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच धुळे.424001 (महाराष्ट्र राज्य) भपंवा/
| HONABLE MR. C. M. Yeshirao, MEMBER | HONABLE MR. D. D. Madake, PRESIDENT | , | |