(निकालपत्र सदस्य, श्रीमती. कविता जगपती, यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सामनेवाल्याने सेवेत कमतरता केली म्हणून दाखल केली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तक्रारदार हे चाळीसगांव येथील रहीवासी आहे. सामनेवाला नं.1 ही वॉटर स्टोरेज टँक बनविणारी कंपनी असून सामनेवाला नं. 2 हे त्यांनी बनविलेल्या वॉटर स्टोरेज टँक ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम होत असतांना दि. 02/08/2006 रोजी वॉटर स्टोरेज टँक रु. 3300/- व त्यासाठी लागणारे साहीत्य असे रु. 4535/- चे सामान सामनेवाला नं. 2 यांचे कडून विकत घेतले. त्यापोटी सामनेवाला नं. 2 यांनी 10 वर्ष टिकणारे टँक म्हणुन गँरटी कार्ड देखील दिले. दि. 20/05/2009 रोजी अचानक तक्रारदार यांनी घेतलेल्या वॉटर स्टोरेज टँकला तडा जावून त्यातील सर्व पाणी वाहून जावू लागले. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला नं. 2 यांना याबाबत माहिती दिली. पंरतु सामनेवाला नं. 2 यांनी तक्रारदारास वॉटर स्टोरेज टँक विकल्याबाबत नकार दिला व गँरटी प्रमाणे ते बदलवून देण्यास व स्विकारण्यास नकार दिला म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वॉटर स्टोरेज बदलवून मिळावा व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- तसेच तक्रार खर्च रु. 5,000/- मिळावा अशा मागण्या तक्रारदार यांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
03. तक्रारदारा यांनी तक्रारी सोबत नि.2 लगत अॅफिडेव्हीट, नि. 4 लगत तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडुन माल खरेदी केल्याचे बिल, गँरटी कार्ड, सामनेवाला यांनी पाठविलेली नोटीस, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
04. सामनेवाला क्र. 2 यांनी आपला खुलासा नि. 13 वर दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, सामनेवाला क्र. 2 हे वॉटर स्टोरेज टँक फिट करुन देत नाही ते नळी फिटींग वाल्याचे काम आहे तसे गँरटी कार्डचे मध्ये नमूद केलेले आहे. तक्रारदार यांच्या चुकीच्या वापरामुळे टँकला तडा गेलेला आहे. त्याची जबाबदारी सामनेवाला यांची नाही तरी देखील एक ग्राहक सेवा म्हणुन सामनेवाला क्र. 2 तर्फे तक्रारदारास कळविण्यात आले की, तुम्ही सदरचा टँक माझे दुकानावर घेवून आल्यास त्याची योग्य ती दुरुस्ती करुन देण्यास तयार आहे. त्याप्रमाणे सामनेवाला क्र. 1 हे मला उत्पादक या नात्याने सुचना करतील अगर पुर्तता करण्यास सांगतील त्या करुन देण्यास मी तयार आहे असे सामनेवाला क्र. 2 यांनी आपल्या खुलाष्यात नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मंचाकडे केलेली आहे.
05. सामनेवाला क्र. 1 हे हजर होवूनही त्यांनी आपला खुलासा न दिल्याने दि. 24/02/2010 रोजी नि. 15 वर त्यांच्या विरुध्द नो से चा आदेश पारीत करण्यात आला.
06. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकील सातत्याने मंचासमोर गैरहजर आहेत. त्यामुळे तक्रार गुणवत्ते वर निकाली करण्यात येत आहे.
07. उपलब्ध कागदपत्रे व वकीलांचा युक्तीवाद यावरुन मंचाने खालील मुदे विचारात घेतले.
08. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील मंचाचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार यांनी तक्रार मुदतीत दाखल केली आहे काय ? होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कसूर
केला आहे काय ? होय(सा.वा.क्र.1 साठी)
3. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
09. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 डिलर यांच्याकडून घरासाठी पाणी साठविण्यासाठी वॉटर टँक घेतलेला होता. सदर वॉटर टँक हे सामनेवाला क्र. 1 कंपनी बनवितात तक्रारदार यांनी दाखल केलेल्या बिला वरुन वॉटर टँक खरेदी केल्याचा दि. 02/08/2006 दिसते. तसेच तक्रारदाराच्या कथनाप्रमाणे वॉटर स्टोरेज टँक ही अडीच ते पावणेतीन वर्षात म्हणजेच दि.20/05/2009 ला तडा जावून सदर स्टोरेज टँक निकामी झाली. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांना अॅड.एस.रफीक अहमद यांच्या मार्फत कायदेशीररित्या दि. 01/06/2009 रोजी नोटीस पाठविली यावरुन असे स्पष्ट होते की, सदर तक्रार दाखल करण्यात कोणताही विलंब झालेला नाही. सदर तक्रार ही मुदतीत दाखल केलेली दिसते असे आमचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
10. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 डीलर यांच्याकडून सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेली वॉटर स्टोरेज टँक खरेदी केलेली होती. यात कोणताही वाद नाही तक्रारदारांनी दाखल केलेल्या नि. 4 व दस्ताऐवज यादी मधील नं. 1 दस्त बिल दाखल केलेले आहेत. सदर वॉटर स्टोरेज टँक ही रक्कम रु. 3300/- व सोबत दुसरे सामान खरेदी केल्याची एकूण रक्कम रु. 4535 चे बिल दाखल केलेले आहेत. नि.2 लगत गँरटी कार्डा वरुन सदर स्टोरेज टँक ची 10 वर्षाची गँरटी दिसत आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना 10 वर्षा चे गँरटी कार्ड दिलेले आहे. सामनेवाला क्र. 1 वॉटर स्टोरज उत्पादन करणा-या कंपनी यांनी मुदतीत खुलासा दाखल केलेला नाहीत म्हणुन त्यांच्या विरुध्द नो से चा आदेश पारीत केलेले आहेत. म्हणुन वरील गँरटी कार्ड संबंधीत पुराव्यास सामनेवाला यांनी सदर तक्रारीस आव्हानीत केलेले नाही. संपुर्ण कागदपत्रांचे निरीक्षण केले असता तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन मंचाला असे वाटते की, सामनेवाला यांनी तक्रारदारास 10 वर्षाचे गँरटी कार्ड दिलेले होते. त्यानुसार त्यांनी तक्रारदारास लिकेज झालेली वॉटर स्टोरेज टँक रिपेअर किंवा बदलुन दयायला पाहिजे होती. पंरतु सामनेवाला यांनी तसे करुन दिलेले दिसत नाही.
सामनेवाला क्र. 2 हे डिलर असल्याने त्यांना स्टोरेज वॉटर टँक लिकेजसाठी जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाला क्र. 1 वॉटर टँक उत्पादन करणारी कंपनी आहे. तक्रारदारास वॉटर टँक घेते वेळी गँरटी कार्ड सामनेवाला क्र. 1 कंपनीने दिलेले आहे. म्हणुन सदर कंपनी ही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे असे मंचाचे मत आहे. यास्तव मुदा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवालाक्र. 1 करीता होकारार्थी देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांची वॉटर स्टोरेज टँक 30 दिवसांच्या आत बदलुन दयावी.
3. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 1000/- व तक्रार अर्ज खर्च रु. 1000/- तक्रारदार यांना अदा करावीत.
4. सामनेवाला क्र. 2 यांच्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
5. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक – 23/12/2014
(श्रीमती. कविता जगपती) (श्रीमती. नीलिमा संत)
सदस्या अध्यक्षा