श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या Spicejet Flight No.219 मधून दिनांक 9/7/2010 रोजी पुणे ते चेन्नई प्रवास केला होता. चेन्नई विमानतळावर उतरल्यावर तक्रारदारांना त्यांचे बॅगेज जाबदेणार यांनी प्रवासात हरविल्याचे कळले. चेन्नई येथून तक्रारदारांना कोलंबो येथे जाण्यासाठी लगेचच दुसरी Flight होती. बॅगेज शिवाय तक्रारदारांना पुढील प्रवास करावा लागला. तक्रारदार कोलंबो येथे दिनांक 10/7/201 ते 18/7/2010 या कालावधीत होते. तक्रारदारांकडे क्रेडिट कार्ड नव्हते. जीवनावश्यक दैनंदिन उपयोगी वस्तू, कपडे यांच्या खरेदीसाठी तक्रारदारांना त्यांच्या मित्रांकडून पैसे घ्यावे लागले. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 2651/- चा दिनांक 19/7/2010 रोजीचा चेक नुकसान भरपाई पोटी देऊ केला परंतू तो तक्रारदारांनी घेतला नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 4/8/2010 रोजी नोटीस पाठवून वाजवी नुकसान भरपाई मिळण्याची विनंती केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना देऊ केलेली नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदारांना मान्य नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून बॅगेजची किंमत रुपये 32,000/-, नुकसान भरपाई, मानसिक त्रास, श्रीलंका येथे गेल्यावर बॅगेज अभावी सहन करावी लागलेली गैरसोय, आवश्यक वस्तूखरेदीसाठी रुपये 1,50,000/- एकूण रुपये 1,82,000/- ची व्याजासह मागणी तक्रारदार करतात. तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. तक्रारदारांच्या हरवलेल्या बॅगेजची किंमत रुपये 2000/- पेक्षा जास्त नसावी. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 2651/- चा चेक दिला होता. कॅरेज बाय एअर अॅक्ट, 1972 नुसार एअरलाईन्स ची जबाबदारी लिमिटेड आहे. ई-तिकीटावरील अटी व शर्ती तक्रारदारांवर बंधनकारक आहेत, त्याची प्रत लेखी जबाबासोबत दाखल करण्यात आलेली आहे. लेखी जबाबात मा. वरिष्ठ न्यायालयांचे काही निवाडे नमूद करण्यात आलेले आहेत. त्यानुसार प्रस्तूत तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. लेखी जबाबासोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. जाबदेणार यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे दाखल केले.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. जाबदेणार यांनी लेखी जबाबा सोबत दाखल केलेल्या अॅनेक्सचर ए चे अवलोकन केले असता त्यात “terms of carriage – 19. The Carrier’s liability for loss or damage to baggage is limited to Rs.200 per kg with a maximum of Rs.3000 only. The carrier assumes no liability for fragile or perishable articles.” असे नमूद करण्यात आलेले आहे. जाबदेणार यांनी टर्मस ऑफ कॅरेज तक्रारदारांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या. कॅरेज बाय एअर अॅक्ट, 1972 नुसार एअरलाईन्स ची जबाबदारी लिमिटेड होती. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 2651/- देऊ केले होते, परंतू ही रक्कम कशा प्रकारे काढण्यात आली, तक्रारदारांच्या हरवलेले बॅगेज किती किलोचे होते यासंदर्भात जाबदेणार यांनी खुलासा केलेला नाही. म्हणून वरील अटी व शर्तीनुसार जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 3000/- अदा करावेत असा मंच आदेश देत आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे बॅगेज हरविल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या, कपडयांच्या अभावी तक्रारदारांना परदेशात नक्कीच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 10,000/- अदा करावी असा आदेश जाबदेणार यांना देण्यात येत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून एकूण रक्कम रुपये 1,82,000/- मागितली आहे ती अवास्तव आहे, सबब तक्रारदारांची ही मागणी अमान्य करण्यात येत आहे.
यासंदर्भात जाबदेणार यांनी दाखल केलेले खालील निवाडे प्रस्तूत प्रकरणी तंतोतंत लागू पडतात असे मंचाचे मत आहे.
[A] मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, श्रीमती हेलेन वालिया विरुध्द कॅथे
पॅसिफिक एअरवेज लि. III (2002) CPJ 190 (N.C.)
[B] मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, एअर इंडिया लि. विरुध्द राकेश वैद First Appeal No. 571 of 1994
[C] मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, कटक First Appeal No. 991 of 2007 सहारा एअरलाईन्स लि. विरुध्द डॉ. जयंता राथ
तसेच तक्रारदारांनी अपील क्र. 441/2009 मे. स्पाईस जेट लिमिटेड, 319, उदयोग विहार, फेज चार, गुरगांव, हरयाणा विरुध्द श्रीमती रोहिणी चड्डा, एच.नं.1139, सेक्टर 8 सी, चंदिगड निवाडा दाखल केलेला आहे. प्रस्तूतचा निवाडा प्रस्तूत प्रकरणी तंतोतंत लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन, दाखल कागदपत्रांवरुन व मा. वरिष्ठ न्यायालयांच्या निवाडयांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रुपये 3,000/- [रुपये तीन हजार मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[3] जाबदेणार 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 10,000/- [रुपये दहा हजार मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.