तक्रारदार : वकील श्री.पी.के.पाटील मार्फत हजर.
सामनेवाले : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही विमान प्रवास वाहतुक करणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 ही प्रवासाचे नियोजन करणारी कंपनी आहे. सा.वाले क्र.3 देखील त्याच क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. तक्रारदारांनी 2006 चे उन्हाळयामध्ये आपल्या कुटुंबा समवेत काश्मीरची सहल करण्याचे ठरविले व सा.वाले क्र.2 यांचे मदतीने त्यांनी सहलीचा कार्यक्रम ठरविला. त्या प्रमाणे सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 विमान प्रवास कंपनीकडे 4 व्यक्तींची मुंबई ते दिल्ली श्रीनगर व श्रीनगर ते दिल्ली मुंबई अशी तिकिटे आरक्षीत केली होती. त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 कंपनीस रु.1,02,402/- दोन हप्त्यामध्ये अदा केले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सा.वाले क्र.1 यांचे विमान दिनांक 14.5.2006 रोजी सकाळी 3.5 मिनिटांनी मुंबई विमानतळावरुन सुटणार होते व दिल्ली येथे सकाळी 6.00 वाजता पोहचणार होते. व दिल्ली विमानतळावरुन सा.वाले क्र.1 कंपनीच्या दुस-या विमानाने तक्रारांचे कुटुंबीय दिल्ली ते श्रीनगर असा प्रवास करणार होते.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय दिनांक 14.5.2006 रोजी सकाळी 1.30 वाजता विमान तळावर पोहोचले व विमान सुटण्याची वेळ 3.05 मिनिटांनी अशी असल्याने ते जवळपास दिडतास पूर्वी पोहोचले होते. तथापी विमान तळावर पोहचल्यानंतर तक्रारदारांना असे समजले की, सा.वाले कंपनीचे श्रीनगर येथे जाणारे विमान सकाळी 1.20 मिनिटांनी उडाले. व या प्रमाणे तक्रारदारांना ते विमान मिळू शकले नाही व तक्रारदारांचे आरक्षण रद्द झाले. तक्रारदारांना विमानतळावर सा.वाले यांनी कुठलीही मदत केली नाही किंवा त्यांच्या पुढील आरक्षणासाठी मदत केली नाही. तक्रारदारांनी बराच प्रयत्न करुन एअर डेक्कन या विमानाची 4 तिकिटे मिळविली व त्या विमानाने ते मुंबईहून 5.15 मिनिटांनी निघाले व दिले येथे 7.15 मिनिटांनी पोहचले. बॅगा वगैरे ताब्यात घेणे बाबतीत सकाळचे 7.30 वाजले व तो पर्यत सा.वाले कंपनीचे दिल्ली ते श्रीनगर हे विमान उडाले हेाते व या मध्ये तक्रारदारांचे आरक्षण होते. त्यानंतर तक्रारदारांना दिल्ली येथे दोन दिवस रहावे लागले व वेगवेगळया विमान कंपन्यांच्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या व ब-याच प्रयत्नानंतर व कष्टानंतर तक्रारदारांना दिनांक 16.5.2006 रोजीचे दिल्ली ते श्रीनगर असे आरक्षण प्राप्त झाले. व त्या विमानाने तक्रारदार श्रीनगर येथे पोचले. दरम्यान सहल सुरु झाली होती व तक्रारदार श्रीनगर व पहेलगाम येथे जावू शकले नाही. तक्रारदारांना बराच मानसीक त्रास, छळ, व दगदग करावी लागली. नविन विमानाची तिकिटे काढणेकामी व दिल्ली येथे देान दिवस मुक्कामास राहणेकामी ज्यादा खर्च करावा लागला. तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले विमान प्रवास कंपनी यांनी तक्रारदारांना विमानाच्या बदललेल्या वेळा पत्रकाची कुठलीही सूचना दिली नाही व निष्काळजीपणा दाखविला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन सा.वाले क्र.1 विमान कंपनी यांचे विरुध्द तक्रार दाखल केली.
3. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, विमान वाहतुक नियामक अधिकारी ( DGCA ) यांच्या सूचनेप्रमाणे विमानाची वेळ बदलावी लागली व 3.5 मिनिटाचे ऐवजी बदललेली वेळ सकाळी 1.20 मिनिटांची होती या बदलाची सूचना सर्व प्रवाशांना दूरध्वनीवरुन देण्यात आली होती. तथापी तक्रारदारांचे आरक्षणाचे माहितीवर तक्रारदारांचा कुठलाही दूरध्वनी क्रमांक नसल्याने तक्रारदारांना सा.वाले क्र.1 प्रत्यक्षपणे सूचना देवू शकले नाही. तथापी सा.वाले क्र.3 ट्रॅव्हर कंपनी व त्यांचे सब एजंट सा.वाले क्र.2 ज्यांचे मार्फत सूचना देण्यात आली होती. बदललेली विमानाची वेळ सा.वाले यांना दिनांक 13.4.2007 रोजी कळविण्यात आली होती. व त्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी प्रवाशांना व विमान कंपन्यांना बदललेल्या वेळेची सूचना दिली होती. या प्रमाणे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या तक्रारदारांच्या आरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला.
4. सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केलें की, तकारदारांच्या सूचनेप्रमाणे केवळ सहलीचे नियेाजन सा.वाले क्र.2 यांनी केलेले होते व त्यामध्ये सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना कुठलीही सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली नाही. सा.वाले क्र.2 असे कथन करतात की, विमानाचे आरक्षण केल्यानंतर सहलीचे वेळापत्रक तकारदारांना देण्यात आले होते व त्यानंतर सा.वाले क्र.2 यांचा काही संबंध नव्हता. व विमानाचे वेळापत्रक बदलल्याने यावर सा.वाले क्र.2 यांचे नियंत्रणही नव्हते.
5. सा.वाल क्र.3 यांनी आपली कैफीयत दाखल केलेली नाही.
6. मुळ तक्रार अर्जामध्ये सा.वाले क्र.2 व 3 हे पक्षकार नव्हते. परंतु तक्रारदारांनी तक्रार प्रलंबीत असतांना अर्ज दिला व सा.क्र.2 व 3 यांना पक्षकार करुन घेतले.
7. सा.वाले क्र.1 व 2 यांचे कैफीयतीनंतर तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सेाबतच पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केली. तसेच तक्रारदारांनी आपला लेखी युक्तीवादही दाखल केला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रं, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. सा.वाले क्र.1 यांनी. |
2 | तक्रारदार तक्रारीमध्ये मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.4,54,876/- सा.वाले यांचेकडून वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. परंतु रुपये 50,000/- सा.वाले क्र.1 यांचेकडून. |
4. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. सा.वाले क्र.2 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असा मुद्दा उपस्थित केला की, तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 व 3 यांचे विरुध्द तक्रार क्रमांक 370/2006 हे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ठाणे, बेलापूर येथे दाखल केलेली होती. व त्या ग्राहक मंचाने दिनांक 3.11.2007 रोजीचे आदेशाप्रमाणे ती तक्रार रद्द केली. त्या आदेशा विरुध्द तक्रारदारांनी एफ.ए.क्रमांक 1646/2007 मा.राज्य आयोगाकडे दाखल केला असून अपील प्रलंबीत आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबतच अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांनी दिनांक 3.11.2007 रोजी दिलेल्या निकालाची प्रत सोबत हजर केलेली आहे. त्या निकालाच्या प्रतीचे वाचन केले असताना असे दिसून येते की, तक्रारदारांचा तक्रार क्रमांक 370/2006 ही प्रस्तुत सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द नुकसान भरपाईकामी दाखल केलेली होती. व जिल्हा ग्राहक मंचाने ती तक्रार स्पाईस जेट विमान प्रवासी कंपनी प्रस्तुत तक्रारीतील सा.वाले क्र.1 हे त्या तक्रारीत प्रक्षकार नसल्याने रद्द केली होती. त्या निकालानंतर तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार स्पाईस जेट विमान प्रवास कंपनी यांचे विरुध्द दाखल केलेली आहे. या प्रमाणे तक्रार क्रमांक 370/06 ही त्याच कारणाकरीता ( Cause of action ) जारी दाखल करण्यात आली होती तर त्या तक्रारीमध्ये सा.वाले क्र.1 स्पाईस जेट विमान कंपनी ही पक्षकार नव्हती. सबब सा.वाले क्र.1 यांचे विरुध्द दाखल केलेल्या प्रस्तुतच्या तक्रारीत 370/06 या तक्रारीची बाधा येणार नाही. तक्रार घटणा घडल्यापासून म्हणजे दिनांक 14.5.2006 पासून दोन वर्षाच्या मुदतीत दाखल करण्यात आलेली आहे. सबब सा.वाले क्र.1 यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार वैध आहे व त्यावर सुनावणी घेवून निर्णय देण्याचा प्रस्तुतच्या मंचास संपूर्ण अधिकार आहे.
10. तथापी सा.वाले क्र.2 यांच्या विरुध्द प्रस्तुत तक्रार चालु शकणार नाही कारण सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द तक्रारदारांनी तक्रार क्रमांक 370/06 दाखल केलेली होती. व अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांनी ती रद्द केलेली आहे, व त्या आदेशाचे विरुध्द तक्रारदारांनी दाखल केलेले अपील मा.राज्य आयोगाकडे प्रलंबीत आहे. अर्थात प्रस्तुत मंच सा.वाले क्र.2 यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जबाबदार धरणार नसल्याने तो प्रश्न निर्माण होत नाही. या प्रकारच्या तांत्रिक मुद्यांवर सा.वाले क्र.1 याचे विरुध्द तक्रार बाधीत होऊ शकत नाही.
11. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 विमान प्रवास कंपनी यांचे दिनांक 14.5.2006 चे तिकिटाचे आरक्षण केले होते या बद्दल वाद नाही. तक्रारदारांनी त्या विमान तिकिटाची प्रत तक्रारीच्या निशाणी क व ड वर हजर केली आहे. त्यावरील नोंदीवरुन असे दिसते की, तिकिटाचे आरक्षण दिनांक 20.2.2006 रोजी केले होते. व विमान प्रवासाची तारीख 14.5.2006 अशी होती. व विमान सुटण्याची वेळ सकाळी 3.05 मिनिटांची होती. व दिल्ली येथे पोहचण्याची वेळ सकाळी 6.00 होती. तक्रारदारांचे तक्रारीत व शपथपत्रात असे कथन आहे की, ते दिनांक 14.5.2006 रोजी ठरल्याप्रमाणे 1.30 मिनिटांनी सकाळी विमान तळावर पोहचले व विमान तळावर पोहोचल्यानंतर त्यांना असे समजले की, मुंबई ते दिल्ली जाणारे विमान 1.20 मिनिटांनी सुटले होते. विमानाच्या वेळेत बदल करण्यात आलेला होता व तक्रारदारांची तिकिटे ज्या विमानामध्ये आरक्षित होती. ते विमान 1.20 मिनिटांनी मुंबई विमान तळावरुन निघाले या तक्रारदारांच्या कथनास सा.वाले यांनी नकार दिला नाही. सा.वाले क्र.1 यांचे असे कथन आहे की, विमान वाहतुक नियामक अधिकारी ( DGCA ) यांच्या निर्देशाप्रमाणे विमानाच्या वेळेत बदल करावा लागला. सा.वाले क्र.1 यांनी विमान निघण्याचे वेळेत DGCA याचे सूचने प्रमाणे बदल केला. ते जरी मान्य केले तरी तरी बदललेल्या वेळापत्रकाची सूचना प्रवाशांना देणे हे सा.वाले क्र.1 विमान प्रवास कंपनीची जबाबदारी होती. सा.वाले आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन करतात की, तक्रारदारांचा त्यांचेकडे दूरध्वनी क्रमांक नसल्याने प्रत्यक्षपणे तक्रारदारांच्या दूरध्वनीवर सूचना देवू शकले नाहीत. परंतु सा.वाले क्र.3 ज्यांचे मार्फत तक्रारदारांनी तिकिटाचे आरक्षण केले होते त्यांना बदललेल्या वेळेची सूचना देण्यात आली होती. व त्यांनी सा.वाले क्र.2 यांना ती माहिती पुरविली असेल यावरुन तक्रारदारांना सा.वाले क्र.2 यांनी सूचना दिलेली असेल. तक्रारदारांची तिकिटे आरक्षीत झालेले विमान अगदी पहाटे सुटणारे असल्याने तक्रारदार विमान तळावर उशिरा आल्याची शक्यता नाकरता येत नाही असे सा.वाले यांनी कथन केले. या प्रकारे तक्रारदारांना विमानाची वेळ बदलल्याने सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला.
12. या संदर्भात येथे महत्वाची बाब नोंदवावी लागते की, सा.वाले 1 यांच्या कथना प्रमाणे सा.वाले 1 यांनी दिनांक 14.5.2006 रोजीच्या विमानाचे तक्रारदारांच्या आसनाचे आरक्षण केले होते. त्याची वेळ बदलल्याची सूचना दिनांक 13.4.2006 रोजी म्हणजे तक्रारदार प्रवासाला निघण्याचे एक महिना पूर्वी प्राप्त झाली होती. सा.वाले क्र.1 असे कथन करतात की, तक्रारदारांचा दूरध्वनी क्रमांक सा.वाले यांचेकडे उपलब्ध नव्हता व त्यामुळे सा.वाले क्र.1 तक्रारदारांशी संपर्क साधू शकले नाहीत. तक्रारदारांची तिकिटे सा.वाले क्र.3 व त्यांचे सब एजंट सा.वाले क्र.2 यांचे मार्फत आरक्षीत करण्यात आलेली होती. सा.वाले असे म्हणतात की, त्यांनी सा.वाले क्र.3 यांना विमानाचे वेळेमध्ये झालेल्या बदलाची सूचना दिली असेल तर सा.वाले क्र.3 यांचेकडून तो तक्रारदारांचा दूरध्वनी प्राप्त करुन घेऊ शकले असते. या प्रकारचे काही प्रयत्न सा.वाले क्र.1 यांनी केले या बद्दलचे कथन सा.वाले क्र.1 यांच्या कैफीयतीमध्ये दिसून येत नाही. या वरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, केवळ सा.वाले क्र.3 यांना विमानाच्या वेळेच्या बदलाबद्दल जी सूचना दिली. तीच सूचना सा.वाले क्र.3 यांनी दिली व त्या व्यतिरिक्त सा.वाले क्र.1 यांनी वेळ बदलाची सूचना कुणालाही दिलेली नव्हती. मुळातच तक्रारदारांच्या विमानाचे तिकिटाचे आरक्षण होत असतांना तक्रारदारांचा दूरध्वनी क्रमांक त्यांचे माहितीसोबत त्यांचे नांवासोबत पुरविण्यात आला नसेल हे शक्य दिसत नाही. क्षणभर असे गृहीत धरले की, सा.वाले क्र.1 यांचेकडे तक्रारदारांचा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध नव्हता तरी देखील सा.वाले क्र.2 अगर 3 यांचे मार्फत तक्रारदारांचा दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल क्रमांक प्राप्त करुन करुन घेवू शकले असते. परंतु त्या प्रकारचा प्रयत्न सा.वाले क्र.1 यांनी केला नाही. तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.2 व 3 यांना वेळेच्या बदलाची सूचना दिली होती या कथनास नकार दिला. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी प्रवासात निघण्याचे आदले दिवशी सा.वाले क्र.3 यांचेकडे विमानाचे वेळेबद्दल माहिती घेतली होती. व काही बदल झाले होते ही सूचना सा.वाले क्र.3 यांनी दिली नाही असे कथन केलेले आहे. या वरुन तक्रारदारांना विमानाचे वेळेमध्ये झालेल्या बदला बाबत काही माहिती होती असे दिसून येत नाही.
13. विमानाच्या सुटण्याच्या वेळेमध्ये जर बदल झाला असेल तर तो बदल प्रवाशांना कळविणे ही विमान कंपनीची जबाबदारी ठरते. विमान प्रवास कंपनी केवळ तो बदल DGCA यांचे आदेशाप्रमाणे झालेला आहे असे कथन करुन त्यांची जबाबदारीतून मुक्तता होऊ शकत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये सा.वाले क्र.1 विमान कंपनी यांनी तक्रारदारांना दिनांक 14.5.2006 रोजी सकाळी 3.05 मिनिटांनी मुंबई ते दिल्ली जाणा-या विमानाच्या वेळेत झालेल्या बदलाची सूचना दिली नाही व त्याव्दारे सुवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
14. तक्रारदार हे आपल्या कुटुंबियासमवेत दिनांक 14.5.2006 रोजी विमानतळावर 1.30 वाजता पोहोचले. परंतु सा.वाले क्र.1 विमान प्रवास कंपनी यांचे विमान 1.20 मिनिटांनी सुटले असल्याने तक्रारदारांना त्याच दिवसीच्या दुस-या विमानाची तिकिटे विकत घ्यावी लागली. ती तिकिटे विमान तळावर विकत घेतल्याने जास्तीचे भाडे द्यावे लागले. त्या विमानाने तक्रारदार दिल्ली येथे पोहोचल्यानंतर तक्रारदारांचे ज्या विमानाचे आरक्षण होते ते दिल्ली ते श्रीनगर हे विमान पूर्वीच सुटले होते. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये शपथपत्रामध्ये व लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांना दिल्ली येथे दोन दिवस रहावे लागले. त्यानंतर तक्रारदारांना दिनांक 16.5.2006 रोजीचे दिल्ली ते श्रीनगर या विमान प्रवासाचे तिकिट उपलब्ध झाले. तक्रारदारांना दिल्ली येथे रहाणेकामी व दिल्ली ते श्रीनगर या विमान प्रवासाचे कामी ज्यादा खर्च करावा लागला. त्याचा तपशिल तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये दिलेला आहे. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे मुंबई ते दिल्ली विमान प्रवास ज्यादा भाडे रु.13,780/- व दिल्ली ते श्रीनगर विमान प्रवास ज्यादा भाडे रु.26,096/- व दिल्ली येथे दोन दिवस राहण्याचा खर्च रु.15,000/- (या बद्दल कागदोपत्री पुरावा नाही) परतु निश्चीतच तक्रारदारांना काहीतरी खर्च करावा लागला असेल. असे एकूण तक्रारदारांना रु.54,876/- ज्यादा खर्च करावा लागला. तक्रारदार असे कथन करतात की, सा.वाले यांच्या विमान प्रवास कंपनीमुळे तक्रारदारांना मानसीक त्रास व कुचंबणा सहन करावी लागली. त्या बद्दल नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारांना रु.4 लाख द्यावेत अशी मागणी केलेली आहे. प्रकरणातील एकूण कथने तक्रारदारांना झालेला मानसीक त्रास, कुचंबणा व तक्रारदारांनी दाखल केलेला पुरावा याचा विचार करता सा.वाले यांनी एकत्रितपणे रु.50,000/- नुकसान भरपाई तक्रारदारांना अदा करावी असा आदेश देणे योग्य राहील असे मंचाचे मत झाले आहे.
15. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केलेली आहे. ती कैफीयत शपथपत्रा प्रमाणे प्रमाणित नाही. त्या कैफीयतीसोबत शपथपत्र असा मथळा दिलेले एक निवेदन दाखल आहे. परंतु ते देखील प्रमाणीत नाही. या वरुन असे म्हणावे लागते की, सा.वाले क्र.1 यांनी शपथपत्राव्दारे पुरावा देवून तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली नाही. ही बाब देखील सा.वाले क्र.1 यांच्या बचावातील दुबळेपणा दाखविते.
16. वर उल्लेख केल्याप्रमाणे सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द तक्रारदारांनी पुर्वीच तक्रार दाखल केलेली होती, ती रद्द करण्यात आलेली आहे. सा.वाले क्र.2 व 3 हे तक्रारदारांना झालेल्या गैरसोयीबद्दल व कुचंबणेबद्दल जबाबदार आहेत असा पुरावा तक्रारदार हजर करु शकले नाहीत. सबब अंतीम आदेश केवळ सा.वाले क्र.1 विमान प्रवास कंपनी यांचे विरुध्द करण्यात येतो.
17. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 254/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेंवाले क्र.1 विमान प्रवास कंपनी यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे वेळेमध्ये झालेला बदल न कळविल्याने सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो. या व्यतिरिक्त सा.वाले क्र.1 यांनी तक्रारीच्या खर्चाबद्दल तक्रारदारांना रुपये 5000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले क्र.1 यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत करावी. अन्यथा त्या रक्कमेवर विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.