निकाल
पारीत दिनांकः- 30/07/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी दि. 19/11/2009, रोजी संध्या. 7.55 वा. जाबदेणारांच्या फ्लाईट क्र. SG-804 मुंबई ते कलकत्ता प्रवास केला. बोर्डिंग पास घेताना तक्रारदारांनी त्यांचे सामान मुंबई एअरपोर्टच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री 10.35 वा. तक्रारदार कलकत्ता एअरपोर्टवर पोहचले व त्यांनी त्यांच्या सामानाबाबत विचारणा केली असता ते हरविल्याचे त्यांना समजले. त्यामुळे तक्रारदारांनी एअरपोर्टवरील जाबदेणारांच्या ऑफिसमधील कर्मचार्यांकडे याविषयी विचारणा केली, त्यांनीही सामानाची शोधाशोध केली, परंतु त्यांना सामान मिळाले नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, तेथील कर्मचार्यांनी योग्य तर्हेने सामानाचा शोध घेतला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी एअरपोर्टवरील जाबदेणारांच्या ऑफिसमध्ये तक्रार नोंदविली, त्यावेळी मुंबई एअरपोर्टवरुनच त्यांचे सामान पाठविले नसल्याचे सांगितले व मुंबई एअरपोर्टवर संपर्क साधून दुसर्या दिवशी सांगतो, असे तेथील कर्मचार्याने तक्रारदारांना सांगितले. दुसर्या दिवशी तक्रारदारांनी जाबदेणारांच्या कार्यालयामध्ये फोनवरुन विचारणा केली असता, त्यांना कोणीही योग्य माहिती दिली नाही, म्हणून त्यांनी स्पाईसजेट कस्टमर केअर सेंटर येथे फोन करुन तक्रार नोंदविली. त्यानंतर बर्याचदा तक्रारदारांनी एअरपोर्टवरील जाबदेणारांच्या ऑफिसमध्ये विचारणा केली, परंतु ते सामान शोधत आहेत, असे उत्तर दिले. शेवटी तक्रारदारांनी त्यांच्या हरविलेल्या सामानाविषयी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रारदारांना दि. 25/11/2009 रोजी
पुन्हा कलकत्त्याहून मुंबई येथे यावयाचे होते, म्हणून त्यांनी पुन्हा त्यांच्या हरविलेल्या सामानाविषयी चौकशी केली, परंतु काहीही उपयोग झाला नाही, त्यांना सामान न घेताच परतावे लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दि. 27/11/2009 रोजी जाबदेणारांच्या मुंबई ऑफिसमधून त्यांना फोन आला व त्यांनी हरविलेल्या सामानाचे वर्णन विचारले व त्या वर्णनाशी मिळते-जुळते सामान मुंबई ऑफिसमध्ये असल्याचे सांगितले आणि त्यांचे सामान संध्याकाळ पर्यंत मिळेल असेही सांगितले. त्यानुसार जाबदेणारांनी तक्रारदारांचे हरविलेले सामान पुण्यास तक्रारदारांकडे आणून दिले व सामान चांगल्या स्थितीमध्ये असल्याबद्दल त्यांची सही घेतली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दि. 28/11/2009 रोजी जाबदेणारांनी रक्कम रु. 1,400/- चा दि. 25/11/2009 रोजीचा चेक त्यांना पाठविला, परंतु ही रक्कम तक्रारदारांना मान्य नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकरणामध्ये त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, पाच दिवस त्यांना त्यांच्या सामानाशिवाय रहावे लागले, म्हणून जाबदेणारांकडून रक्कम रु. 99,000/- नुकसान भरपाईपोटी व रक्कम रु. 500/- तक्रारीच्या खर्चापोटी मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ त्यांचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] दोन्ही जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या सामाईक लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी महत्वाच्या बाबी मंचापासून दडवून ठेवल्या आहेत, तसेच प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकार मंचास नाही, कारण तक्रारदारांचा प्रवास हा मुंबई ते कलकत्ता असा होता, या कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
तक्रारदारांचे सामान हे जाबदेणारांच्या मुंबई ऑफिसमध्ये आहे, ही बाब तक्रारदारांना सांगण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी त्यांचे सामान कोणतीही हरकत न घेता स्विकारले आहे (without any protest) त्यामुळे त्यांना आता त्याविषयी तक्रार करण्याचे कुठलेही अधिकार नाहीत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी ई-तिकिटावरील तसेच त्यांच्या वेबसाईटवरील अटी व शर्ती स्विकारल्यानंतरच तिकिट काढलेले आहे. या अटी व शर्ती म्हणजे दोन्ही बाजूंमधील करार आहे, त्यामुळे त्या दोघांवरही बंधनकारक आहे व त्यानुसार प्रस्तुतची तक्रार ही दंडासह फेटाळण्यात आली पाहिजे. परंतु जाबदेणारांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 1,400/- चा दि. 25/11/2009 रोजीचा चेक पाठविला. तक्रारदारांचे इतर आरोप अमान्य करीत जाबदेणार तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबा पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी मुंबई येथून कलकत्ता पर्यंत जाबदेणारांच्या फ्लाईटने प्रवास केला, प्रवास करतेवेळी त्यांनी त्यांचे सामान मुंबई येथील एअरपोर्टच्या ताब्यात दिले. तक्रारदार जेव्हा कलकत्त्याला पोहचले, तेव्हा त्यांना त्यांचे सामान मिळाले नाही व चौकशी केल्यानंतर जाबदेणारांच्या मुंबई ऑफिसने त्यांचे सामान लोड केले नाही असे समजले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पाच दिवस त्यांच्या सामानाशिवाय रहावे लागले, त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 99,000/- नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारांनी रक्कम रु. 99,000/- साठी कोणताही स्वतंत्र पुरावा मंचामध्ये दाखल केलेला नाही, तसेच जे सामान हरविले होते त्यामध्ये कोणत्या आवश्यक वस्तु होत्या याबद्दलही कोणतेच स्पष्टीकरण दिलेले आढळून येत नाही. तक्रारदार स्वत:च त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांना दि. 27/11/2009 रोजी त्यांचे सामान मिळाले असे म्हणतात व त्यांनी सामान चांगल्या स्थितीमध्ये असल्याबद्दल जाबदेणारांना सहीही दिली, असे नमुद करतात. त्याचप्रमाणे तक्रारदार हे ही कबुल करतात की, जाबदेणारांनी त्यांना रक्कम रु. 1,400/- चा चेक पाठविला होता. परंतु त्यांनी तो स्विकारला नाही. जाबदेणारांनी त्यांच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत, त्यामध्ये “The Carrier’s liability for loss or damage is limited to Rs. 200/- per kg. with a maximum of Rs. 3000/- only.” असे नमुद केले आहे. सदरच्या अटी व शर्ती या जाबदेणार तथा तक्रारदार, दोघांनाही बंधनकारक आहेत. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये जाबदेणारांनी तक्रारदारास यानुसारच रक्कम रु. 1,400/- चा चेक पाठविलेला होता. तक्रारदारांना त्यांचे सामान चांगल्या स्थितीमध्ये मिळाले असल्यामुळे नुकसान भरपाईपोटी वर नमुद केलेली रक्कम योग्य आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी रक्कम रु. 99,000/- नुकसान भरपाई मागितलेली आहे, परंतु त्याचे कोणतेही विवरण/स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा त्यासाठी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. वास्तविक पाहता, तक्रारदारांनी मुंबई ते कलकत्ता जाबदेणार यांच्या फ्लाईटने प्रवास केला. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास पुणे येथील कार्यक्षेत्र नाही, परंतु जाबदेणार रक्कम रु. 1,400/- देण्यास तयार असल्यामुळे ती रक्कम तक्रारदारांनी घ्यावी.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 1,400/-
(रु. एक हजार चारशे फक्त) या आदेशाची प्रत
मिळाल्या पासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.