तक्रारदार : वकील श्री.ए.बी. साळुंके यांचे मार्फत हजर.
सामनेवाले : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. प्रस्तुतच्या दोन्ही तक्रारीमध्ये घटना, तक्रारीतील कथने, तसेच सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथने समान आहेत. दोन्ही भिन्न तक्रारीमधील तक्रारदार सा.वाले यांच्या एकाच विमानाने प्रवास करणार होते व त्यांची तक्रार समान स्वरुपाची असल्याने दोन्ही तक्रारी प्रस्तुतच्या न्याय निर्णयाने निकाली कारण्यात येतात. यापुढे दोन्ही तक्रारदारांना केवळ तक्रारदार असे असे संबोधीले जाईल. सा.वाले क्र.1 हे इच्छूक प्रवाशांना विमानसेवा पुरविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे प्रवास व पर्यटन याचे तिकिटाचे आरक्षण करणारी कंपनी आहे.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांनी विशाखापट्टनम ते मुंबई या विमान प्रवासाकामी दिनांक 6.1.2010 रोजी तिकिटाचे आरक्षण केले व विमान प्रवास दिनांक 9.1.2010 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता विशाखापट्टनम ते मुंबई असा करावयाचा होता. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे विशाखापट्टनम येथून सा.वाले यांचे विमान संध्याकाळी 7.00 वाजता सुटणार होते व मुंबई येथे रात्री 9.00 वाजता पोहचणार होते. तक्रारदार हे आरक्षीत तिकिटाप्रमाणे विशाखापट्टनम विमानतळावर दिनांक 9.1.2010 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता पेाहोचले व तक्रारदारांच्या बॅगची तपासणी होऊन तक्रारदारांना बोर्डींग पास देण्यात आला. व तक्रारदार विमानामध्ये बसण्याची घोषणा होण्याची प्रतिक्षा करीत होते.
3. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे विमान सुटण्याची वेळ संध्याकाळी 7.00 अशी असतांना देखील 7.00 वाजेपर्यत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. व त्यानंतर संध्याकाळी 7.00 वाजता निघणारे विमान विशाखापट्टनम ते मुंबई हे विमान एक तासाने उशिराने निघणार अशी घोषणा दिली. संध्याकाळी 8.00 चे सुमारास देखील त्याच स्वरुपाची घोषणा दिली. तक्रारदार व अन्य 150 प्रवासी विमान सुटण्याचे प्रतिक्षेत विमानतळावर बसून राहीले.
4. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे परीच प्रतिक्षा केल्यानंतर रात्री 10.30 वाजता सा.वाले यांनी अशी घोषणा केली की, विशाखापट्टनम ते मुंबई एसजी 402 ही विमानफेरी रद्द करण्यात आलेली आहे. व प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात येतील असे कळविण्यात आले. त्यानंतर तक्रारदार व अन्य प्रवासी यांनी परीच चौकशी केल्यानंतर व पाठपुरावा केल्यानंतर सा.वाले यांनी एसजी 402 हे विमान विशाखापट्टनम ते हैदराबाद इथपर्यत जाइल व मुंबई येथे जाणार नाही अशी घोषणा केली. तक्रारदारांना दुसरे दिवशी मुंबई येथे पोहोचणे आवश्यक असल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांच्या विमानाने विशाखापट्टनम ते हैदराबाद हा प्रवास करण्याचे ठरविले. व तक्रारदारांना पूर्वी देण्यात आलेले बोर्डींग पास परत घेण्यात येऊन विशाखापट्टनम ते हैदराबाद असे नविन बोर्डींग पास देण्यात आला.
5. तक्रारदार व अन्य प्रवासी हैदराबात येथे मध्यरात्री नंतर 1.00 वाजता पोहोचले. तेथे सा.वाले यांनी तक्रारदार व अन्य प्रवाशांना कुठलीही मदत केलेली नाही. हैदराबाद ते मुंबई येथे जाणारे इतर विमानांचे आरक्षण पूर्ण झाल्याने तक्रारदारांना हैदराबाद येथे रात्री मुक्काम करावा लागला व दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 10.1.2010 रोजी एअर इंडीयाचे दुपारचे 4.00 वाजताचे विमानाचे तिकिट तक्रारदारांना कशीबशी मिळू शकली. त्यातही सर्वसामान्य वर्गातील विमानाची तिकिटे उपलब्ध नसल्याने प्रथम वर्गाची ज्यादा पैसे देऊन हैदराबाद ते मुंबई अशी तिकिटे तक्रारदारांना खरेदी करावी लागली. व त्याकामी तक्रारदारांना एअर इंडीया या विमान कंपनीला रु.15,000/- प्रत्येकी असे अदा करावे लागले. त्यानंतर तक्रारदार मुंबई येथे दिनांक 10.1.2010 रोजी संध्याकाळी पोहोचले.
6. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे विशाखापट्टनम येथे विमानाची फेरी रद्द करण्याची ही सेवा सुविधा पुरविण्यात कसुर होय. सा.वाले यांनी तक्रारदार व अन्य प्रवाशांच्या सोई सुविधेकडे अजीबात लक्ष दिले नाही. त्यामुळे तक्रारदारांना प्रचंड मनस्ताप, गैरसोय, ज्यादा आर्थिक खर्च सोसावा लागला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून रु.1,23,753/- वसुल होणेकामी दिनांक 22.3.2010 रोजी नोटीस दिली व त्या नोटीसीला सा.वाले यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी वकीलामार्फत दिनांक 22.7.2010 रोजी कायदेशीर नोटीस दिली व ज्यादा खर्चाबद्दल रु.23,753/- व नुकसान भरपाई रु. 1 लाख असे एकत्रित रु.1,23,753/- ची मागणी केली. सा.वाले यांनी त्या नोटीसीला दिनांक 5.8.2010 रोजी उत्तर दिले व तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 22.12.2012 रोजी दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे, रु.23,753/- ज्यादा खर्चाबद्दल वसल होऊन मिळावेत व नुकसान भरपाई र.1 लाख वसुल होऊन मिळावी अशी दाद मागीतली.
7. सा.वाले क्र.1 विमान प्रवास कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये Carriage by Air Act 1972 मधील तरतुदीच्या संदर्भ दिला व विमान प्रवासास उशिर झाला व विमान सेवा फेरी रद्द झाल्यास सा.वाले हे नुकसान भरपाई अदा करण्यास जबाबदार असणार नाही या कलमाचा उल्लेख केला आहे. त्याच प्रमाणे विशाखापट्टनम ते मुंबई ही विमान फेरी काही तांत्रीक कारणामुळे व विमानामध्ये तांत्रीक बिघाड दिसून आल्याने प्रवाशांच्या व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेलचा विचार करुन रद्द करण्यात आले होते असे कथन केले. सा.वाले यांनी असेही कथन केले की, संबंधित प्रवाशांना तक्रारदारांसह तिकिटाचे पैसे परत करण्यात आलेले असून सा.वाले क्र.2 एजंटचे खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तक्रारदारांना या सर्व बाबींची माहीती असतांना विशाखापट्टनम ते हैदराबाद हा प्रवास सा.वाले यांच्या विमानाने केला. सबब तक्रारदार ही अर्धवट प्रवासफेरीबद्दल अथवा हैदराबाद विमानतळावरील गैरसोई बद्दल अथवा ज्यादा आर्थिक खर्चाबद्दल तक्रार करु शकत नाहीत, असेही कथन सा.वाले यांनी केले. या प्रकारे सा.वाले यांचा निष्काळजीपणा नसून विमानातील तांत्रीक बिघाडामुळे ती विशिष्ट विमान फेरी रद्द करावी लागली असे सा.वाले क्र.1 यांनी कथन केले आहे. व तक्रारदारांना विमान प्रवासाच्या दरम्यान सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
8. सा.वाले क्र.2 प्रवास आरक्षीत करणारे एजंट यांना नोटीस बजावण्यात आली. परंतु ते गैरहजर राहीले. त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
9. यापुढे सा.वाले क्र.1 यांना केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल.
10. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीला आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.विजयकुमार रॉय यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सा.वाले यांचे वकीलांनी असे निवेदन केले की, त्यांचा तोंडी युक्तीवाद हा लेखी युक्तीवादाप्रमाणे आहे.
11. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे व कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | त.क्र.681/2010 व त.क्र.682/2010 यातील तक्रारदारांना विशाखापट्टनम ते मुंबई या विमान फेरीचे प्रवासाचे दरम्यान सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून त्या बद्दल नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय रु.35,000/- |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
12. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या विशाखापट्टनम ते मुंबई या विमान फेरीचे दिनांक 9.1.2010 रोजीचे वेळ संध्याकाळी 7.00 वाजता सुटणा-या विमानाचे आरक्षण केले होते ही बाब सा.वाले यांनी मान्य केली. त्याच प्रमाणे संध्याकाळी 7.00 वाजता सुटणारे विमान विशाखापट्टनम विमानतळावरुन सुटु शकले नाही व तक्रारदारांचा प्रवास त्या एकाच विमानाने विशाखापट्टनम ते मुंबई असा पूर्ण होऊ शकला नाही ही बाब देखील सा.वाले यांनी मान्य केली आहे. या संबंधात सा.वाले यांच्या कैफीयतीमधील परिच्छेद क्र.4 मधील बचाव असा आहे की, काही तांत्रिक कारणाने विमान उड्डाण घेण्यास उशिर झाला व जेव्हा विमान उड्डाण करणार होते त्या वेळेस वैमानिकास विमानामध्ये काही तांत्रिक दोष आढळून आले त्यामुळे प्रवाशांच्या व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन सा.वाले यांनी ती विमान फेरी रद्द केली. या प्रकारे केवळ तांत्रिक कारणाने हया प्रमाणे फेरी रद्द करावी लागली असे सा.वाले यांनी कथन केले. त्यानंतर कैफीयतीचे परिच्छेद क्र.6 चे मध्य भागात सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, संध्याकाळी 7.00 वाजता विशाखापट्टनम ते मुंबई करीता सुटणारे विमानाचे फेरीमध्ये फेरबदल ( Re schedule ) करण्यात आला. व ती विमानफेरी फक्त विशाखापट्टनम ते हैदराबाद इथपर्यत नेण्याचे ठरविण्यात आले. व त्याप्रमाणे प्रवाशांना सूचना करण्यात आली. सा.वाले यांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदारांच्या तिकिटाचे रु.10,758/- सा.वाले क्र.2 प्रवासी कंपनी यांचे खात्यामध्ये तक्रारदारांना अदा करणेकामी जमा करण्यात आली.
13. सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथनास तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये नकार दिलेला आहे. व त्यामध्ये शपथपत्राचे परिच्छेद क्र.3-ब च्या शेवटच्या भागामध्ये तक्रारदारांनी असे कथन केलेले आहे की, सा.वाले यांच्या कैफीयतीतील परिच्छेद क्र. 4 व 5 ही कथने चुकीची व खोटी आहेत. तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, बरीच प्रतिक्षा केल्यानंतर सा.वाले यांनी विशाखापट्टनम विमानतळावर अशी घोषणा केली की, 402 क्रमांकाची विमान फेरी विशाखापट्टनम ते हैदराबाद पर्यत चालेल व ती हैदराबाद ते मुंबई पुढे जाणार नाही व त्यानंतर प्रवाशांना दिलेले पूर्वीचे बोर्डींग पास परत घेण्यात आले व नविन बोर्डींग पास केवळ हैदराबाद ते मुंबई पर्यत देण्यात आले. तक्रारदारांचे प्रति उत्तराचे शपथपत्र दिनांक 6.8.2011 या मधील वरील स्वरुपाचे कथन सा.वाले यांच्या कैफीयती मधील परीच्छेद क्र.10 VII या मधील कथनातून पुष्टी मिळते. त्यामध्ये सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, 402 विमान फेरीतील प्रवाशांना विशाखापट्टनम विमानतळावर असे कळविण्यात आले होते की, ती विमान फेरी फक्त हैदराबाद इथपर्यत चालेल व काही तांत्रिक कारणाने ती हैदराबाद हे मुंबई अशी चालणार नाही. ज्या प्रवाशांना केवळ हैदराबाद पर्यत जाण्याची इच्छा असेल त्यांनी 402 विमान फेरीचे विमानाने प्रवास करावा असे देखील कळविण्यात आले होते. सा.वाले यांचे या स्वरुपाचे कथन त्यांच्या कैफीयतीमधील परिच्छेद क्र.4 मधील कथनाचे विरुध्द जाते. तेथे सा.वाले यांनी असे कथन केले आहे की, विमान उड्डाण घेण्याचे काही क्षणापूर्वी विमानामध्ये तांत्रीक दोष असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने प्रवाशाचा व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन सा.वाले यांनी ती विमान फेरी रद्द केली. कैफीयतीमधील परिच्छेद क्र.10 VII मधील कथन असे दर्शविते की, विमान सुटण्यापूर्वी व प्रवाशांनी विमानात बसण्यापूर्वी विशाखापट्टनम ते मुंबई ही विमान फेरी रद्द करण्यात आलेली होती. या वरुन विमानामध्ये अचानक बिघाड झाल्याने ती विमान फेरी रद्द करावी लागली हे सा.वाले यांचे कथन चुकीचे आहे असे दिसून येते.
14. तक्रारदारांनी तक्रारीसोबत त्यांच्या तक्रारीतील कथनाचे पृष्टयर्थ कागदपत्रे जोडली आहेत. त्यामध्ये विशाखापट्टनम ते हैदराबाद या प्रवासाकरीता विमान फेरी क्र.402 च्या दिनांक 9.1.2010 च्या बोर्डींग पासाची प्रत जोडलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, सा.वाले यांनी 402 क्रमांकाची विमानफेरी विशाखापट्टनम ते मुंबई अशी करण्याचे ऐवजी फक्त विशाखापट्टनम ते हैदराबाद येवढी मर्यादित ठेवली. व त्यानंतर तक्रारदार व अन्य प्रवाशांना दिलेले विशाखापट्टनम ते मुंबई या प्रवासाचे बोर्डींग पास परत घेण्यात आले व विशाखापट्टनम ते हैदराबाद असे नविन बोर्डींग पास देण्यात आले. तक्रारदारांनी तक्रारी सोबत निशाणी-ब येथे विशाखापट्टनम ते हैदराबाद या बोर्डींग पासची प्रत जोडलेली आहे. सा.वाले यांनी कैफीयतीचे परिच्छेद क्र.4 मध्ये ज्या प्रमाणे कथन केलेले आहे ती परिस्थिती असती तर सा.वाले यांनी तक्रारदारांना विशाखापट्टनम ते हैदराबाद असा अर्धवट प्रवासाचा बोर्डींगपास देण्याची आवश्यकता नव्हती. कैफीयतीचे परिच्छेद क्र.4 मध्ये सा.वाले असे कथन करतात की, विमान उड्डान करण्याचे पूर्वी काही क्षण वैमानिकाचे असे लक्षात आले की, विमानामध्ये तांत्रिक दोष आहे त्यामुळे प्रवाशांचे व
कर्मचा-यांचे सुरक्षिततेचा विचार करुन ती विमानफेरी रद्द करण्यात आली. या स्वरुपाचे सा.वाले यांचे कैफीयती मधील कथन पुराव्याचे विरध्द आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये व प्रति उत्तराचे शपथपत्रात असे स्पष्ट कथन केले आहे की, सा.वाले यांनी विशाखापट्टनम ते हैदराबाद अशी मर्यादित प्रवासाची घोषणा नंतर केली व तत्पुर्वी सा.वाले यांनी फेरी रद्द झाल्याची घोषणा केली व सुधारीत घोषणेनंतर प्रवाशांना नविन बोर्डींग पास विशाखापट्टनम ते हैदराबाद असे देण्यात आले. तक्रारदारांचे हे कथन पुराव्याशी सुसंगत दिसते.
15. त्यातही महत्वाची बाब म्हणजे सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.8 VII या मध्ये तक्रारदारांच्या तक्रारीचे परिच्छेद क्र.3 VII ही कथने मान्य केलेली आहेत. त्या परिच्छेदामध्ये तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, सा.वाले यांनी विमान फेरी 402 ही फक्त विशाखापट्टनम ते हैदराबाद इथपर्यत जाईल अशी घोषणा नंतर केली. तक्रारदारांचे या स्वरुपाचे कथन मान्य केल्यानंतर सा.वाले असे कथन करु शकत नाहीत की, विमान उड्डान करण्याचे काही क्षणापूर्वी वैमानिकाचे लक्षात विमानातील तांत्रिक दोष दिसून आला व त्यामुळे विमान फरी रद्द करण्यात आली. वास्तविक तक्रारदारांनी तक्रारीमध्ये व प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये असे कथन केलेले आहे की, वैमानिक उपलब्ध नसल्याने सा.वाले यांना विमान फेरी रद्द करावी लागली. सा.वाले यांनी विमानफेरी विलंबाची घोषणा वारंवार करुन व त्यानंतर विशाखापट्टनम ते मुंबईचे ऐवजी विशाखापट्टनम ते हैदराबाद या मर्यादित प्रवासाची विमानफेरी सुरु ठेवणे हया बाबी तक्रारदारांच्या तक्रारीस पुष्टी देतात. या वरुन विमानातील तांत्रिक बिघाडामुळे नव्हेतर सा.वाले यांच्या प्रशासनातील गोधळामुळे ती विमानफेरी रद्द करावी लागली असा निष्कर्ष काढावा लागतो.
16. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये प्रवासाचे कराराचे कलम 3 उधृत केलेले आहे. त्यामध्ये विमान प्रवासास उशिर झाल्यास, विमानफेरी रद्द झाल्यास, अथवा विमान फेरीचा मार्ग बदलल्यास विमान प्रवासाची सेवा देणारी कंपनी प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असणार नाही अशी सबब नमुद आहे. या स्वरुपाची विमानफेरी रद्द करुन अथवा उशिर कुठल्या कारणाने क्षम्य होऊ शकतो ही बाब देखील त्याच कलमामध्ये नमूद आहे. ती बाब विमानसेवा पुरविणा-या कंपनीच्या क्षमतेच्या पलीकडे असली पाहिजे ( Beyond control ) असे स्पष्ट नमुद आहे. विमानामध्ये तांत्रिक बिघाड दिसून येणे अथवा वैमानीक अथवा अन्य कर्मचारी उपलब्ध नसणे हया बाबी विमान सेवा पुरविणा-या विमान कंपनीच्या क्षमतेच्या पलीकडे होते असा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. विशिष्ट विमान फेरीकरीता वापरले जाणारे विमान तांत्रिकदृष्टया निर्दोष आहे व त्यामध्ये कुठलाही दोष नाही याची तपासणी विमान फेरीच्या वेळेच्यापूर्वी विमान सेवा देणारी कंपनी, कर्मच्या-यांनी करणे आवश्यक आहे. त्यात जर ढिलाई झाली व विमानामध्ये उड्डाणापूर्वी काहीक्षण दोष निर्माण झाल्यास तर तो अचानक झालेला बिघाड म्हणता येणार नाही. प्रस्तुतची विमान फेरी वाईट हवामानामुळे, कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विमानतळावर दंगल माजणे, परकीय आक्रमण अशा कारणामुळे रद्द करण्यात आलेली नव्हती. तर सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथनाप्रमाणे विमानामध्ये तांत्रिक दोष दिसून आल्याने ती विमानफेरी रद्द करण्यात आली. या प्रकारची सबब अटी व शर्ती मधील कलम 3 याचेशी सुसंगत असू शकत नाही.
17. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना विमानफेरी क्र.402 विशाखापट्टनम ते मुंबई असे तिकिट सा.वाले क्र.2 यांचे मार्फत विक्री केले व तक्रारदार विमानतळावर निच्छित वेळेपूर्वी पोहोचले असतांना त्यांना दोन तासापेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावयास लावून अचानक ती विमानफेरी रद्द केली व त्यानंतर विशाखापट्टनम ते हैदराबाद इथपर्यत विमानफेरी करण्यात येईल असे घोषीत केले. तक्रारदार विमानतळावर संध्याकाळी 6.00 पासून प्रतिक्षा करीत असल्याने व रात्रीचे 9.00 उलटून गेल्याने व अन्य विमान सेवेच्या फेरी उपलब्ध नसल्याने तक्रारदारांना विमान सेवेच्या सुधारीत घोषणेप्रमाणे मर्यादीत विमानफेरी विशाखापट्टनम ते हैदराबाद स्विकारण्याशिवाय पर्याय नव्हता. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या विमानाने विशाखापट्टनम ते हैदराबाद हा प्रवास केला या वरुन तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द तक्रार करण्याचा हक्क सोडून दिला असा निष्कर्ष काढता येत नाही.
18. तक्रारदार हैदराबाद विमानतळावार पोहोचले तेव्हा मध्यरात्र उलटून 1.00 वाजले होते. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे अन्य विमानसेवा देणा-या कंपन्यांची विमानफेरी त्या रात्री उपलब्ध नव्हती, अथवा त्यामध्ये रिकामी जागा नव्हती. त्यामुळे तक्रारदारांना दुस-या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 10.1.2010 एअर इंडीयाचे दुपारी 4.00 वाजता सुटणारे विमानाचे तिकिट आरक्षीत केले. तक्रारदारांना रात्री मुक्काम करणेकामी हॉटेलमध्ये थांबावे लागले व प्रत्येक तक्रारदारांना हॉटेलचे बिल रु.4,200/- अदा करावे लागले. त्याची पावती तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. तक्रारदारांना एअर इंडीयाच्या दिनांक 10.1.2010 चे विमान प्रवासाकामी सर्वसाधारण दर्जाचे तिकिट उलपब्ध नव्हते व तक्रारदारांना प्रथम श्रेणीचे तिकिट काढावे लागले. त्याकामी रु.15,535/- येवढे खर्च करावे लागले. या प्रकारे तक्रारदारांना ज्यादा तिकिटा बद्दल रु.15,535/- व एकूण मुक्कामाबद्दल रु.4,200/- खर्च करवा लागला. असे एकूण रु.19,735/- येवढा जादा खर्च करावा लागला. त्यापैकी सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना रु.10,758/- परताव्यापोटी प्राप्त झाले. परताव्याची रक्कम वजा केल्यास तक्रारदारांना पडलेला अधिक भार हा रुपये 8,977/- असा होतो. या व्यतिरिक्त तक्रारदारांना संपूर्ण प्रवासाचे दरम्यान गैरसोय, कुचंबणा व मानसीक त्रास सहन करावा लागला. तक्रारदारांना त्यांचे कंपनीचे कामाकरीता कोठल्याही परिस्थितीत रविवारी मुंबई येथे पोहोचणे आवश्यक होते. सा.वाले यांनी तक्रारदारांची हैदराबाद येथे मुक्कामाची व्यवस्था केलेली नाही. या प्रकारे सा.वाले यांनी संपूर्ण विमान प्रवासाचे दरम्यान तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. तक्रारदारांना पडलेला अधिकचा भार रु.8,977/- तसेच तक्रारदारांना सोसावा लागलेला मानसीक त्रास,कुचंबणा व गैरसोय या बद्दल एकत्रित नुकसान भरपाई रु.35,000/- देणे योग्य व न्याय्य राहील असे मंचाचे मत झाले आहे. त्या व्यतिरिक्त सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्चा बद्दल रु.10,000/- अदा करावेत असाही आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
19. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 681 व 682/2010 अंशतः मंजूर करण्यात येतात.
2. दोन्ही तक्रारीमधील सामनेवाले क्र.1 यांनी दोन्ही तक्रारीतील तक्रारदारांना विमान प्रवासाचे संबंधात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. दोन्ही तक्रारीतील सामनेवाले क्र.1 यांनी प्रत्येक तक्रारीतील प्रत्येक तक्रारदारांना ज्यादा आर्थिक भार व नुकसान भरपाई या बद्दल रु.35,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 यांनी प्रत्येक तक्रारीतील प्रत्येक तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. सामनेवाले क्र.1 यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी. अन्यथा मुदत संपल्यापासून सदरहू रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.