श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार वि.प.ने विमान प्रवासा संबंधित दिलेल्या सेवेतील त्रुटिमुळे ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, त्यांनी 01 एप्रिल ते 10 एप्रिल, 2016 पर्यंत भारताच्या उत्तर पूर्व भागात सहल आयोजित केली. त्याकरीता त्यांनी मेक माय ट्रीप द्वारे 2 जानेवारी 2016 ला हवाई तिकिट घेतले. नागपूरला परत येतांना त्यांचा प्रवास हा बोगडोगरा ते कोलकाता आणि कोलकाता ते नागपूर असा संलग्न हवाई प्रवास होता व त्याकरीता त्यांनी वि.प.कडून हवाई तिकिटे घेतली होती. बागडोगरा ते कोलकाता हा प्रवास 14.45 ते 15.55 वाजेपर्यंत व कोलकाता ते नागपूर INDIGO 6E-626 हे विमानाने ते 17.55 ला दि.10.04.2016 रोजी प्रवास करणार होते. त्यामुळे त्यांना या दोन प्रवासा दरम्यान बराचसा वेळ मिळणार होता. वि.प.नेही त्यांचे विमा नेहमी वेळेवर पोहोचवित असल्याचे सांगितल्याने काळजीचे कारण नव्हते. तक्रारकर्ते बागडोकरा विमानतळावर गेले व वि.प.क्र. 2 जे वि.प.क्र. 1 च इंचार्ज ऑफिसर होते त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विमान योग्य वेळेवर आहे, त्यामुळे सर्व औपचारिकता पूर्ण करुन घ्यावायास सांगितले. परंतू विमानाची वेळ होऊनही विमान नियोजित वेळेत पोहोचण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यावर चौकशी केली असता विमान अर्धा तास उशिरा पोहोचत असून 4.30 वा. कोलकाता येथे पोहोचविण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतू वारंवार विचारणा केल्यावरही समाधानकारक उत्तरे व परिस्थिती दिसून येत नव्हती. शेवटी वि.प.ने एस एम एस पाठवून संध्याकाळी 7.30 वा. विमान सुटण्याची सुचना दिली. वि.प.च्या सदर माहितीमुळे तक्रारकर्ते संभ्रमात पडले कारण कोलकाता ते नागपूर हवाई तिकिटे ते रद्द करु शकत नव्हते. त्यामुळे त्या विमानात त्यांना “No-Show” दर्शविले. तक्रारकर्त्यांनी वि.प.क्र. 2 ला त्यांची तिकिटे दुस-या दिवशीच्या विमानाकरीता ट्रांसफर करण्यात यावी व राहण्याची सोय करावी असे सांगितले कारण कोलकात त्यांच्याकरीता नविन ठिकाण होते. परंतू वि.प.क्र. 2 ने सरळ नकार दिला व तशी सोय ते करु शकत नाही असे लेखी दिले. अशाप्रकारे तक्रारकर्ते कोलकाता येथे रात्री 9.05 वा. 5 तास 40 मिनिटे उशिरा पोहोचले. त्याकरीता त्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा, खाण्याचा, जाण्या-येण्याचा खर्च करावा लागला. तसेच नविन तिकिटे खरेदी करावी लागली. परतीचा प्रवास असल्याने त्यांच्याकडे पूरेसे पैसे नसल्याने त्याची सोय नागपूर येथून करावी लागली. तक्रारकर्ता क्र. 1 हे व्यावसायिक असल्याने त्यांचे व्यवसायात नुकसान पोहोचले व तक्रारकर्ती क्र. 2 हीचे पगारात नुकसान झाले. तक्रारकर्त्यांनी वि.प.वर नोटीस बजावला असता त्यांनी तक्रारीस उत्तर दिले नाही, म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल केली रु. 2,42,688/- चा दावा मागितला आहे, तसेच वकिलांच्या फीदाखल रु.20,000/- ची मागणी केली आहे.
3. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 वर बजावली असता त्यांना नोटीस प्राप्त होऊनही ते गैरहजर राहिल्याने प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
4. प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद त्यांच्या अधिवक्त्यामार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष –
5. तक्रारकर्त्याने दि. 01.04.2016 ते 10.04.2016 दरम्यान नागपुर –(इंडिगो)- दिल्ली -(इंडिगो)- बागडोगरा – (स्पाइस जेट) - कोलकाता – (इंडिगो) - नागपुर प्रवासासाठी विविध विमान कंपन्यांचे मेक माय ट्रीप या ऑनलाइन तिकीट बूकिंग पोर्टल द्वारे नागपुर येथे तिकीटे आरक्षित केल्याचे दिसते. मेक माय ट्रीप या ऑनलाइन तिकीट बूकिंग पोर्टल हे विविध विमान कंपन्यांचे वतीने ऑनलाइन तिकीट बूकिंग सेवा देते. त्यामुळे तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष दरम्यान ‘ग्राहक’ व ‘सेवा पुरवठादार’ संबंध असल्याचे स्पष्ट होते. सदर बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 1 व 2 नुसार दिसते. सबब तक्रारकर्ता ग्रा.सं.कायदा 1986, कलम 2(1)(d) नुसार विरुध्दपक्षांचा ‘ग्राहक’ असल्याचे सिध्द होते.
6. तक्रारकर्त्याने तिकीट बूकिंग नागपुर येथे इंटरनेट द्वारे काढले असल्याने व त्यासंबंधी कराराची स्वीकृती नागपुर येथे मिळाल्याने, प्रस्तुत तक्रार मंचाच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रात (territorial jurisdiction) असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यासाठी अन्य समांतर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी वरील विरुध्दपक्षांविरुद्ध नोंदविलेल्या खालील निरीक्षणांवर भिस्त ठेवण्यात येते. सदर निरीक्षणे प्रस्तुत प्रकरणात देखील तंतोतंत लागू असल्याचे स्पष्ट होते.
SPICEJET LTD. Gurgaon, Haryana – Versus- Ranju Arey Chandigarh, Revision Petition No. 1396 of 2016, Judgment Dated 07 Feb 2017.
14. In so far as the issue of territorial jurisdiction is concerned, the State Commission have aptly brought out in the impugned order that part of the cause of action arose at Chandigarh, because with booking of the travel tickets on the internet, the acceptance of the contract was received by the complainant through internet at his place of business/residence. We have no reasons to differ with the view taken by the State Commission that the State Commission at Chandigarh had the territorial jurisdiction to handle the complaint.
7. तक्रारकर्त्याचे दि 10.04.2016 रोजी बागडोगरा ते कोलकता जाणारे विमान 5 तास 45 मिनीटे उशिरा निघाल्याने (दुपारी 1445 hrs ऐवजी संध्याकाळी 1955 hrs) त्याचे नागपूरला जाणारे विमान (संध्याकाळी 1755 hrs) निघून गेल्याने तक्रारकर्त्याला कोलकता येथे रात्रभर मुक्काम करून एक दिवस हॉटेलमध्ये रहावे लागल्याचे व त्यासाठी त्याने दस्त क्र. 4 नुसार रु 2000/-, दस्त क्र.5 नुसार रु 340/- व दस्त क्र. 6 नुसार नागपूरकरीता दि 11.04.2016 च्या प्रवासासाठी दुसरे तिकीट काढावे लागल्याने रु 13558/- खर्च केल्याचे दिसते. त्याव्यतिरिक्त तक्रारकर्त्याने जेवण नाश्ता व टॅक्सी साठी रु 2630/- खर्चाची व वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिसचे रु 4500/- मागणी केल्याचे दिसते पण त्यासाठी कुठलाही दस्तऐवज सादर केल्याचे दिसत नाही.
8. तक्रारकर्त्याच्या निवेदनानुसार दि.10.04.2016 रोजी बागडोगरा ते कोलकाता विमान उशिरासंबंधी वि.प.क्र. 2 जे वि.प.क्र. 1 च इंचार्ज ऑफिसर यांना विलंबाबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तरे व कुठलीही माहिती दिली नाही आणि शेवटी वि.प.ने एस एम एस पाठवून संध्याकाळी 7.30 वा. विमान सुटण्याची सुचना दिली. वि.प.च्या कृतीमुळे तक्रारकर्ते कोलकाता ते नागपूर हवाई तिकिटे रद्द करु शकले नाहीत. त्यामुळे इंडिगो नागपूरला जाणार्या विमानात त्यांना “No-Show” दर्शविले. तक्रारकर्त्यांची त्यांची तिकिटे दुस-या दिवशीच्या विमानाकरीता ट्रांसफर करण्यासाठी व राहण्याची सोय करण्यासाठी वि.प.क्र. 2 ने कुठलीही मदत केली नसल्याचे दिसते. विमानाच्या विलंबासाठी वि.प. ने तांत्रिक व परिचालन कारण दर्शवून (Technical/ Operational) घेतलेला बचाव मान्य करण्यायोग्य वाटत नाही कारण डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन यांनी विमान रद्द/विलंब प्रकरणी प्रवाश्यांना योग्य माहिती देण्याविषयी व त्यांची योग्य सोय करण्यासंबंधी स्पष्ट निर्देश जारी केले आहेत तरी देखील प्रस्तुत प्रकरणात त्यांचे पालन झाल्याचे दिसत नाही व त्याबद्दल मान्य करण्यायोग्य उपाययोजना/बचाव वि.प. ने केल्याचे दिसत नाही. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी विरुध्द पक्षास नोटीस पाठविल्याचे व सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्दपक्षांनी त्याची कोणतीही दखल घेतली नसल्याचे दस्त क्र. 8 ते 10 वरुन स्पष्ट होते. त्यावरून वि.प. ची ग्राहका सेवेप्रती असलेली उदासिनता स्पष्ट दिसते. विरुध्दपक्षांचे विमान अकारण विलंब झाल्याबद्दल योग्य माहिती तक्रारकर्त्यास दिली नसल्याचे स्पष्ट होते. प्रस्तुत प्रकरणात वि.प.ची संपूर्ण कृती तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दर्शविते व ग्रा. सं. कायद्या अंतर्गत कलम 2(1)(g) नुसार सेवेतील त्रुटि असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. प्रस्तुत तक्रारीत वि.प.2 विरुद्ध वैयक्तिक नावाने तक्रार असल्याचे दिसते पण त्यांची कुठलीही वैयक्तिक जबाबदारी नसल्याने वि.प.2 विरूद्धची तक्रार खारीज करण्यात येते.
9. विरुध्द पक्षांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर झाले नाही व आपली बाजू मांडली नाही. सबब तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद आक्षेप सिध्द होतात व ते योग्य असल्याचे गृहीत धरण्यास मंचास हरकत वाटत नाही. वि.प. च्या वरील वर्तणूकी नुसार ग्राहक सेवेप्रती व ग्राहक सरंक्षण यंत्रणेविषयी असलेली अनास्था देखील स्पष्ट होते.
10. तक्रारकर्त्याने वि.प. च्या सेवेतील त्रुटिमुळे झालेल्या आर्थिक, मानसिक, आणि शारीरिक त्रासापोटी रु. 2,42,688/- नुकसानभरपाई मागणी केल्याचे दिसते पण त्यासाठी मान्य करण्यायोग्य विवरण दिले नाही. तक्रारकर्ता क्रं. 1 व्यवसायिक असल्याने एक दिवस व्यवसायात नुकसान झाल्याचे व तक्रारकर्ती क्रं. 2 चे एक दिवस पगाराचे नुकसान रु 4200/- असल्याचे नमूद केले. तसेच त्याबाबत सुनावणी दरम्यान खुलासा करताना निवेदन दिले व नंतर दि 10.12.2018 रोजी तक्रारकर्ती क्रं. 2 ची ऑगस्ट 2018 पगाराची स्लीप दाखल केली. सर्व बाबींचा विचार करता तक्रारकर्त्याची रु. 2,42,688/- नुकसानभरपाईची मागणी विवरण दिले नसल्याने अवाजवी असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब फेटाळण्यात येते पण तक्रारकर्त्यांस झालेल्या आर्थिक, मानसिक, आणि शारीरिक त्रासापोटी एकत्रित माफक नुकसान भरपाई रु 50,000/- व तक्रारीचा खर्च रु 5,000/- मिळण्यास उभय तक्रारकर्ता पात्र असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
- आ दे श –
उभय तक्रारकर्त्याची तक्रार एकत्रितपणे अंशतः मंजूर करण्यात येते.
1. विरुध्द पक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्यांस झालेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- द्यावे.
2. वि.प.क्र. 2 विरूद्ध तक्रार खारीज करण्यात येते.
3. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.