1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्ताचे तक्रारीतील थोडक्यात कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने दि.02.01.2016 रोजी बागडोगरा ते कलकत्ता येथे जाण्याकरता विरुध्द पक्ष क्र.2 कडे नागपूर येथे विमानाचे टिकीट काढले होते. दि.10.04.2016 रोजी तक्रारकर्त्यासस दिलेल्या वेळेनुसार बागडोगरा विमानतळ येथे पोहचले व विरुध्द पक्ष क्र.2 योचेकडून निरीक्षणाची तपासणीची कारवाई करुन घेतली. तक्रारकर्त्याचे विमान बागडोगरा येथे 14.45 वाजता येणार होते व तेथून 15.55 वाजता कलकत्ता येथे निघणार होते. परंतु तक्रारकर्त्यांना असे सांगण्यांत आले की, सदर विमान थोडया वेळात विमानस्थळावर पोहचून राहीले आहे, परंतु ते बागडोगरा येथे पाहोचले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने कलकत्ता येथून नागपूर येथे येणारे प्रवासी विमान चुकले व त्याकरीता तक्रारकर्त्यांना अतिरिक्त हॉटेलचा खर्च व इतर खर्च करावा लागला. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्यास फक्त एसएमएस व्दारे कळविले की, वादातील विमान 5 तास 40 मिनीटे उशिरा आहे, ही बाब विरुध्द पक्ष क्र.2 ची तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा आहे तसेच त्याकरीता तक्रारकर्त्यांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांना कामापासुन एक दिवसाची सुटी घ्यावी लागली, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 2. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी विरुध्द पक्षांनी नुकसार भरपाई द्यावी तसेच तक्रारकर्त्यांना झालेला अतिरिक्त खर्च द्यावा व तक्रारीचा खर्च मिळण्याचा आदेश व्हावा. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्याचा आदेश पारित करण्यांत आला. विरुध्द पक्ष नोटीसची बजावणी होऊन सुध्दा प्रकरणात हजर झाले नाही म्हणून निशाणी क्र.1 वर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्द दि.06.03.2017 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. 4. तक्रारकर्त्यातर्फे दाखल तक्रार, दस्तावेज, तोंडी युक्तिवाद ऐकण्यांत आला असता पुढील कारणमिमांसे वरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यांत येतो. - // कारण मिमांसा // - 5. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून बागडोगरा येथून कलकत्ता जाण्याकरीता विमान टिकीटे खरेदी केली होती व त्याकरीता रु.6,360/- चा भरणा केला होता ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या निशाणी क्र.2 वरील दस्त क्र.1 वरुन सिध्द होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ‘ग्राहक’ आहे हे सिध्द होते. 6. तक्रारकर्त्याचे विमान बागडोगरा येथून 3 तास 50 मिनीटे उशिरा होते ही बाब दस्त क्र.3 वरुन सिध्द होते. त्यानंतर तक्रारकर्त्याला कलकत्ता येथे हॉटेलमध्ये रहावे लागले व नागपूरकरीता दुसरे टिकीट काढावे लागले ही बाब दस्त क्र. 4 ते 7 वरुन दिसुन येते. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिम त्रासापोटी विरुध्द पक्षास नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही ही बाब दस्त क्र.8 ते 10 वरुन सिध्द होते. विरुध्द पक्षांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर झाले नाही व आपली बाजू मांडली नाही. सबब तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेल आरोप सिध्द होते. विरुध्द पक्षांचे विमान अकारण विलंब झाला व त्याची माहिती एसएमएसव्दारे देण्यांत आली व त्याकरीता तक्रारकर्त्यास कलकत्ता ते नागपूर येथे येण्याकरीता विलंब झाला ही बाब विरुध्द पक्षांची तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दर्शविते व सिध्द होते. सबब खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो. - // अंतिम आदेश // - 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- अदा करावा. 3. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. 4. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी. 5. तक्रारकर्तास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. |