जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 297/2008 प्रकरण दाखल दिनांक – 02/09/2008. प्रकरण निकाल दिनांक – 28/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. महाबल पि. मोनप्पा शेटटी वय, 44 वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा.केशवराज अपार्टमेंट, विसावा नगर नांदेड. अर्जदार विरुध्द 1. सौ. कांतादेवी भ्र. रमेश सारडा रा.गणेश टॉकीज जवळ, लोहार गल्ली, नांदेड. 2. रमेश पि. किशन सारडा, गैरअर्जदार रा.गणेश टॉकीज जवळ, लोहार गल्ली, नांदेड अर्जदारा तर्फे. - अड.एस.एल.बोटलवार गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.पी.एस.भक्कड निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांचे सेवेतील अनुचित व सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदारांनी भूमापन नंबर 6401 प्लॉट नंबर 21 विसावा नगर नांदेड येथील केशवराज अपार्टमेंट येथील सदनिका नंबर 2 पहिला मजला हे विकत घेण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचे सोबत करारनामा केला. बांधकामाचे सर्व व्यवहार गैरअर्जदार क्र.2 हेच पाहतात. अर्जदार यांनी दि.28.11.2006 रोजी रु.5,00,000/- अनामत गैरअर्जदार क्र.2 यांना दिली. दि.23.02.2007 रोजी रु.100/- च्या बॉंड पेपरवर एक करारनामा करण्यात आला. ज्यात सदनिकेची किंमत रु.17,50,000/- ठरविण्यात आली. सदनिका हि आपल्याला वेळेत मिळेल असे गृहीत धरुन अर्जदार राहतात ती सदनिका नंबर 102 दस्तापूरे कॉम्प्लेक्स गणेश नगर रोड येथील मिळकत सुरेश कालेवार रा. गणेश नगर नांदेड यांना विकली. यानंतर दोन्ही गैरअर्जदारांना अर्जदार यांनी बांधकाम लवकरात लवकर करण्याची विनंती केली. बांधकाम वेळेवर न केल्यामूळे किमान सहा महिन्याचे घर भांडे रु.12,000/- अर्जदारांना विनाकारण दयावे लागले. करारनाम्याचे पोटी गैरअर्जदार यांना रु.8,50,000/- स्विकारले असून उर्वरित रक्कम घेऊन विक्री खत करुन देण्यास सांगितल्यावर त्यांना सदनिका सोडून दया म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून दि.10.12.2007 रोजी पोलिस स्टेशन शिवाजी नगर येथे त्यांचे विरुध्द गून्हा नोंदविण्यात आला. दि.20.12.2007 रोजी नोंदणीकृत विक्री खत करुन देण्याची दिनांक ठरविली असताना त्यावेळेस तक्रारदारास जास्तीची रक्कम रु.1,83,000/- तसेच मूळ करारनामा परत केल्याशिवाय विक्री खत करुन मिळणार नाही असे ठामपणे सांगितले ते सर्व कागदपञ, रक्कम मजबूरीने गैरअर्जदार यांना दयावी लागली. ती रक्कम दोन साक्षीदार महाविर भोलाराम बागडीया व सूरेश बाहेती यांचे समक्ष गैरअर्जदार यांना दिली होती. गैरअर्जदार यांनी जेव्हा नोंदणीकृत दस्ताऐवज करुन दिले त्यात रु.8,04,400/- एवढीच किंमत दाखविण्यात आलेली आहे. बाजारभावाप्रमाणे किंमत असल्यामूळे घेतलेल्या रक्कमेतून विक्री खताची किंमत वजा जाता उर्वरित रक्कम अर्जदारास परत मिळावी असे म्हटले आहे. सदनिका खरेदीच्या प्रकरणात विक्री खत करुन फसवणूक केली. सदनिकेमधील अत्यावश्यक सूवीधा पूर्णतः ठरविली असताना ज्या तळमजल्या जीवनावश्यक वस्तुंच्या सुवीधा त्यात फरशी,संडास, बाथरुमचे काम, रंगकाम, गाडी पार्किगसाठी जागा, टेरेसवर स्वतंञ पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची टाकीची सोय व सोलार साठी सुवीधा वेळावेळी तयार करुन मागितल्या असता त्यांनी सुवीधा करुन दिल्या नाहीत. त्यांना या बाबत विचाराले असताना तिन महिन्याची मूदत मागून तिही मूदत नीघून गेल्यावर राहीलेले अपूर्ण बांधकाम का केले नाही या बाबत विचारले असत त्यांनी अर्जदारास अपमानास्पद वागणूक दिली. दि.17.7.2008 रोजी गैरअर्जदार यांचा मूलगा विजय सारडा व करीम खॉ गौस खॉ यांचे विरुध्द गून्हा नंबर 93/2008 कलम 380,511 भा.दं.वि. गून्हा दाखल करण्यात आला. सदनिकेतील काम गैरअर्जदार पूर्ण करीत नसल्याकारणाने अर्जदाराने सदनिकेच्या आतील जसे की फलोरिंग, टॉयलेट रंगकाम इत्यादी काम स्वतःच्या खर्चाने पूर्ण करुन घेतले ज्यासाठी अर्जदार यांना रु.56,000/- खर्च आला ही रक्कम गैरअर्जदारांनी वापस दयावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे त्यांचेकडे टीव्हीएसची एजन्सी असल्या कारणाने घराच्या येण्याजाण्याच्या वहिवाटीच्या रस्त्यात त्यांच्या 20 ते 25 वाहनाची धूऊन स्वच्छता करतात. त्यामूळे चीखल होतो व जाण्यायेण्यास ञास होतो. याप्रमाणे गैरअर्जदार यांनी गच्चीवर येण्याजाण्याचा रस्त्या ही बंद केला आहे. त्यामूळे गच्चीवर असलेली टाकी, कपडे वाळवीणे इत्यादी दैनदिन काम करण्यास ञास होतो. गच्चीवर सोलार देखील बसवू दिलेले नाही. त्यामूळे समाईक रस्ता व टेरेस दैनदिन कामासाठी वापरण्यास गैरअर्जदार यांना आदेश दयावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचेकडे एक कार व मोटारसायकल आहे त्यासाठी पार्कीग नाही. पार्कीगची सोय करारनाम्याप्रमणे करुन देण्याचे आदेश व्हावेत परंतु गैरअर्जदाराने पार्कीगचे जागेत बेकायदेशीर बांधकाम करुन ताबा घेतला आहे. त्यामूळे अर्जदार यांना पार्कीगही उपलब्ध करुन दयावी. टेरेसवर जाण्यासाठी ज्या सामायीक पाय-या दिलेल्या आहेत त्यात गैरअर्जदार यांनी अडथळा करु नये. सामायिक बोअरचे पाणी वापरण्यास अडथळा करु नये. पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी रस्ता बंद करु नये, टेरेसच्या दैनदिन कामासाठी उपयोग करु दयावा. करारनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे पार्कीगसाठीची जागा उपलब्ध करुन दयावी. बांधकामास विलंब झाला त्यामूळे भाडयापोटी दिलेली रक्कम रु.12,000/- मिळावी. विक्री खताच्या वेळेस जे रु.8,50,000/- जास्त घेतले ते परत मिळावेत. आगाऊची घेतलेली रक्कम रु.1,83,000/- वापस मिळावेत. तसेच झालेल्या मानसिक शारिरीक ञासाबददल रु.1,00,000/- व दावा खर्चाचे रु.25,000/- मिळावेत इत्यादी अनेक मागण्यासाठी गैरअर्जदाराचे विरुध्द आदेश व्हावा अशी मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी एकंञित म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचेकडून सेवेत कोणतीही कमतरता झाली नाही किंवा त्यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवंलब केला नाही. सदर प्रकरण हे किचकट आहे व यांचे स्वंतञ चौकशी व्हावी. तक्रार अर्जातील अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदार क्र. 1 व 2 हे पतीपत्नी आहेत व त्यांनी तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे विसावा नगर येथील दोन मजली अपार्टमेट आहे हे त्यांना मान्य आहे. तक्रारदाराला पहिल्यामजल्यावर फलॅट विक्री केला हे ही त्यांना मान्य आहे. प्लॉट नंबर 21 वर अर्धवट बांधकामसह मूळ मालक रफत अहेमद बेगम यांचेकडून त्यांचे नांवावरील बांधकाम परवानासह प्लॉट विकत घेतले व त्यावर फलॅटचे बांधकाम केले ही बाब त्यांना मान्य आहे. दि.28.11.2006 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांनी रु.5,00,000/- दिले, दि.3.1.2007 रोजी धनादेशाद्वारे रु.1,00,000/- दिले तसेच दि.23.3.2007 रोजी नगदी रु.2,50,000/- दिले, याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी सौदाचिठठी करुन दिली व सदनिका क्र.2 ही अर्जदारांना विक्री संबंधी करारनामा करुन दिला. सदनिका क्र.2 ची किंमत रु.17,50,000/- ठरलेली बरोबर आहे परंतु त्यापैकी गैरअर्जदार यांनी रु.17,42,400/- एवढी रक्कम मिळालेली आहे. उर्वरित रु.6600/- अर्जदाराकडून येणे बाकी आहे. विक्री खत करतेवेळेस सदरील फलॅटची सरकारी किंमत रु.8,10,400/- एवढी होती परंतु वास्तविक किंमत रु.17,50,000/- एवढी आहे. अर्जदाराना विक्री खताच्या 6 टक्के प्रमाणे रु.1,05,000/- एवढे लागू लागले त्यामूळे तो खर्च कमी करण्यासाठी सरकारी किंमतप्रमाणे विक्री खत करुन दिले. त्यामूळे अर्जदारयांचे रु.56,000/- चा फायदा झाला. उर्वरित रक्कम त्यांना वापस मागता येणार नाही. विक्री केलेला फलॅट छताच्या आतील बाजूने वापरण्यास अधिकारासह विक्री केलेला आहे. त्यामूळे बाहेरील कोणत्याही भागाची विक्री केलेली नाही. सदरील इमारतीतील छातावर विक्रेत्याचा हक्क आहे. त्यामूळे घेण्या-याचा हक्क राहणार नाही असे स्पष्ट केलेले आहे. या विक्री खतावर तक्रारदार व गैरअर्जदार यांचे सहया आहेत. तक्रारदाराला छतावर सोलार बसविण्याचा अधिकार नाही. छतावर पिण्याच्या पाण्याची टाकी बसविण्याचा अधिकार नाही तसेच पार्कीगच्या जागेमध्ये फरशी करणे,संडासबाथरुमचे काम,रंगकाम इतयादी करण्यास सांगण्याचा अधिकार नाही. तक्रारदाराला स्वतंञ पिण्याच्या पाण्याचा नळ आहे. त्यामूळे तक्रारदाराने केलेले आरोप हे खोटे आहेत. छताची पूर्ण मालकी गैरअर्जदार यांची आहे असे असताना अर्जदारानेवर डीश अन्टीना बसविला.गैरअर्जदार यांचेमूळे रस्त्यावर चीखल होत आहे व येण्याजाण्यास ञास होत आहे हे आरोप खोटे आहेत. तक्रारदाराला जाण्याकरिता तिन फूट रुदीच्या पाय-या आहेत. त्या पाय-या समाईक आहेत व सदरील पाय-यावर जमीन मजल्यावर लॉबी आहे व ती लॉबी रस्त्यापर्यत मोकळी आहे त्यामूळे गैरअर्जदार यांनी कोणताही अडथळा केलेला नाही. गैरअर्जदार हे वहीवाटीतील रस्त्यात वाहने धूतात ही बाब खोटी आहे. उलट तक्रारकर्ता पाण्याची टाकी ओव्हरफलो करुन पाणी रस्त्यावर सोडतात त्यामूळे अर्जदार यांना छतावर जाऊन दैनदिन काम करण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदार यांचे छतावर बरेच सामान आहे त्यामूळे छताला कूलूप लावावे लागते. अर्जदार यांना स्वतंञ टाकी उपलब्ध आहे. त्यामूळे टाकी साफ करु शकतात. अशा कामासाठी एक वेळ ठरवून महिन्यातून एक दिवस छतावर जाऊन आवश्यक ती कामे करुन घेता येतील. त्या कालावधीत कूलूप उघडता येईल. गैरअर्जदार हे इमारतीत स्वतः राहणार आहेत त्यामूळे त्यांना स्वतःसाठी अतिरिक्त सोयी करुन घ्यावी लागणार आहेत. तक्रारदारास छतावर जाण्याचा अधिकार दिल्यास गैरअर्जदाराच्या स्वांतञाला अडथळा येईल. सदरचा फलॅट विक्री करताना पार्कीगचे रक्कम देण्यास इन्कार केला त्यामूळे पार्कीगचा सौदा रदद करुन फलॅटची पैसे देऊन विक्री खत करुन दिलेले आहे. विक्री खताचे नंबर 16 मध्ये सदरील सदनिकेमध्ये पार्कीगसाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही असा उल्लेख आहे. अर्जदार हे जाणूनबूजून ञास देण्याचे उददेशाने पोलिसाना हाताशी धरुन खोटया तक्रारी दाखल करतात व धमकी देत आहेत. त्यामूळे गैरअर्जदारांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन तक्रारदारास विक्री खत करुन दिलेले आहे. त्यामूळे खर्चासह अर्जदाराचा दावा फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. अर्जदार हे किती नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहेत ? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अ) अर्जदार यांची पहिली तक्रार प्लॉट नंबर 21 मध्ये विसावा नगर येथील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.2 हे विकत घेण्यासाठी करारनामा केला. त्यात विक्रीची किंमत रु.17,50,000/- दाखविण्यात आली. याप्रमाणे गैरअर्जदार यांना पूर्ण रक्कमही मिळाली व ते ती कूबलही करतात. करारनाम्यावर बॉड घेतल्याची दि.20.2.2007 अशी असून करारनामा केव्हा केला त्यामध्ये दिनांकाचा उल्लेख नाही परंतु यानुसार दि.20.12.2007 रोजीचे विक्री खत करुन दिले त्यावर सरकारी किंमत रु.8,10,400/- अशी दाखवून विक्री ,खत करण्यात आलेले आहे. यामूळे रजिस्ट्रीसाठी लागणा-या खर्चात अर्जदार यांचा फायदा झालेला आहे. करारनाम्यात सदनिकेची किंमत ठरलेली आहे त्याचप्रमाणे व्यवहार झालेला आहे यावीषयी संशय नाही. देण्याघेण्याचे जे उर्वरित व्यवहार आहेत त्या विक्री खताच्या दिवशीच पार पडले असेल त्यामूळे उर्वरित रक्कमे वीषयी आता वाद नीर्माण करणे गैर राहील. म्हणून आता ती उर्वरित रक्कम अर्जदार यांना वापस मागता येणार नाही. ब) अर्जदाराची दूसरी तक्रार विक्री खत करते वेळेस अर्जदाराकडून रु.1,83,000/- जास्तीचे घेतले आहेत असे म्हणणे आहे. जेव्हा मूळातच अर्जदार म्हणण्याप्रमाणे रु.8,50,000/- जास्त दिले आहेत असे असेल तर रु.1,83,000/- आता अधिकचे अर्जदार देतील हे खरे वाटत नाही. अर्जदारानी समक्ष रककम दिली ते दोन साक्षीदार यांचे समोर रक्कम दिली या बाबत त्यांचे शपथपञ दाखल करु शकले असते पण ते शपथपञ दाखल करण्यात आलेले नाही किंवा रु.1,83,000/- ची पावती ती ही दाखल करण्यात आलेली नाही. त्यामूळे गैरअर्जदारांनी अशा प्रकारची रक्कम घेतली हे मान्य करता येणार नाही. क) अर्जदार यांनी पार्कीगसाठी जागा मिळावी असे म्हटले आहे व दिलेल्या रक्कमातच ती रक्कम अडजेस्ट करण्यात यावी असे म्हटले आहे. करारनामा पाहता असे दिसते की, पार्कीगसाठी वेगळी रक्कम पर स्क्वेअर फूट रु.800/- दिली पाहिजे असे म्हटले आहे. त्याप्रमणे अर्जदाराने त्यावेळेस पैसे दिलेले नाहीत. विक्री खत नंबर 16 वर सदर बिल्डींगमध्ये पार्कीगसाठी कूठलीही जागा उपलब्ध नाही व खरेदीदाराला पार्कीगची कोणतीही जागा विकली नाही असे स्पष्ट लिहीलेले आहे व यावर अर्जदाराची सही आहे म्हणून आता पार्कीगसाठी जागा दिली नाही असे अर्जदार यांना म्हणता येणार नाही. एकंदरीत प्रकरण पाहिले असता पार्कीगचे जागेवर गैरअर्जदारांनी बांधकाम केलेले दिसते. त्यामूळे आता पार्कीगसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामूळे अर्जदाराची ही मागणी मान्य न करता येण्याजोगी आहे. ड) अर्जदाराची अशीही तक्रार आहे की, गैरअर्जदारांनी फलॅटचे बांधकाम लवकर केले नाही व फलॅटचे पझेशन देण्यास खूप उशिर केला. ज्यामूळे अर्जदार यांना भाडयापोटी स्वतःच्या विकलेल्या फलॅटमध्ये राहण्यासाठी रु.12,000/- दयावे लागले. करारनामा पाहिला असता असे दिसते की, करारनाम्यामध्ये कधी बांधकाम सूरु करुन कधी अर्जदार यांना पझेशन देण्यात येईल यांचा उल्लेख केलेला नाही. त्यामूळे यात गैरअर्जदार यांचेकडून किती उशिर झाला, जर दोन तिन महिने उशिर झाला तर बांधकाम करताना थोडा उशिर झाला तर तो उशिर मान्य करण्या जोगा आहे. म्हणून भाडयापोटी रु.12,000/- अर्जदार यांना वापस मागता येणार नाहीत. त्यामूळे त्यांची ही मागणी अमान्य करण्यात येते. इ) अपार्टमेंटमध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यापैकी समाईक पाय-या व समाईक बोअर ही सर्वाना वापरण्यासाठी आहे. त्या वापरासाठी गैरअर्जदार अडथळा करु शकणार नाहीत. दूस-या मजल्याचे जे ओपन टेरेस आहे ते सर्व फलॅट धारकाना दैनदिन वापरासाठी वापर करण्यास मिळाले पाहिजे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास या बाबत बराच ञास दिल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी करारनाम्यात व विक्री खतात ओपन टेरेसवर त्यांचा मालकी हक्क आहे असा उल्लेख केलेला आहे व तो बरोबरही आहे. गैरअर्जदार यांचे मालकी हक्का बददल वाद नाही. जर गैरअर्जदारांना यावर अजून बांधकाम करावयाचे असेल तर ते बांधकाम उचलू शकतात व यानंतर जे ओपन टेरेस राहील ते सर्व फलॅटधारकाना उपलब्ध करुन दयावे लागेल परंतु सद्य परिस्थितीत गैरअर्जदार ओपन टेरेसवर कोणतेही बांधकाम करीत नाहीत त्यामूळे ओपन टेरेस वापरण्यासाठी अर्जदार यांना दैनंदिन वापर जसे की, कपडे वाळू घालणे, गच्चीवर असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी जाता येणे, टी.व्ही. साठी अन्टीना बसवीणे, सोलारसाठी प्लेट बसवणे इत्यादी कामासाठी ओपन टेरेसचा वापर करण्याचा अधिकार राहील. त्यात गैरअर्जदार अडथळा आणू शकत नाहीत. गैरअर्जदार यांनी गच्चीवर जाण्यायेण्याचा रस्ता बंद केला आहे हे सिध्द होते. त्यामूळे हे प्रकरण दाखल झाल्यावर एक अंतरिम आदेशाद्वारे अर्जदार यांना ओपन टेरेसवर जाण्यासाठी मूभा देण्यात आली होती.यासाठी एक तर सर्व फलॅटधारकाजवळ वरच्या दरवाजाच्या चाव्या पाहिजे किंवा त्यांनी बसून ऐकमेकाच्या संमतीने कोणातरी एका व्यक्तीकडे चावी ठेवली पाहिजे, त्यामूळे सर्वाना वर जाता येईल अशा प्रकारची मूभा गैरअर्जदार यांनी दिली नाही व देण्यास इन्कार केला. येथे गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी होते हे सिध्द होते. अर्जदार यांची अजून एक तक्रार अशी आहे की, विसावा नगर येथील प्लॉट नंबर 21 वर सदनिका नंबर 2 वर त्यांचा ताबा देताना मधील काम अपूर्ण होते. त्यात फलोरिंगचे काम, टॉयलेटचे काम, रंगकाम शिल्लक होते. अर्जदार यांचे मते त्यांनी गैरअर्जदार यांचे संमतीने ही कामे स्वखर्चाने पूर्ण करुन घेतली आहेत व त्यासोबत अर्जदारांनी बिल वगैरे दाखल केली नाहीत. ती सर्व बिले गैरअर्जदार यांना दिले पण एकंदर खर्च हे रु.56,000/- आला तो गैरअर्जदाराकडून वापस मागितला. यास्तव गैरअर्जदाराने कोणताही इन्कार केलेला नाही किंवा आक्षेपही घेतलेला नाही. अर्जदाराने सांगितलेली रक्कम त्यांचे पंसतीप्रमणे काम केले व मटेरियल वापरले असे गृहीत धरुन त्यातून जास्तीचा भार 20 टक्के रक्कम जर कपात केली तरी रु.45,000/- मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. अर्जदाराच्या तक्रारीमध्ये अजून एक बाबीचा उल्लेख करता येईल तो म्हणजे गैरअर्जदार यांचेकडे टीव्हीएस ची एजन्सी आहे येण्याजाण्याचा रस्तात रोज वाहन धूऊन चीखल होतो, त्यामूळे त्यांना ञास होतो. गैरअर्जदार यांना अशा प्रकारची कृती करुन लोकांना ञास देता येणार नाही, म्हणून अशा कृतीस प्रतिबंध घालण्यात येतो. यूक्तीवादाचे वेळी देखील गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत यूक्तीवाद करीत असताना काही गोष्टी कबूल केल्या आहेत. त्यात यापूढे कोणतेही वाहन रस्त्यात धूणार नाही शिवाय समाईक पाय-यामध्ये अडथळा नीर्माण करणार नाही, टेरेसवर जाण्यास प्रतिबंध करणार नाही. ओपन टेरेसचा वापर करताना अर्जदार व गैरअर्जदार यांचेत बरीच भांडणे झालेली दिसतात यांचा पूरावा म्हणजे दोघानीही एकमेका विरुध्द गून्हे दाखल केली आहेत. त्यामूळे त्यांचे संबंध बीघडलेले आहेत. या गोष्टीसाठी दोघानीही सामजस्याने घ्यावे, तसेच राहीलेल्या कॉमन गोष्टी आहेत त्यासाठी त्यांचे संमतीने एक मध्यस्थी ठेऊन मूलूभत हक्का वीषयीच्या उपयोगात असणारे प्रश्न सामजस्याने सोडवावेत. कारण दोघानांही एकाच ठिकाणी रहावयाचे आहे.संबंध खराब करण्यापेक्षा सांमजस्याने एकमेकाना समजून राहणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना ज्या मूलभूत सोयी करुन दयावयाच्या आहेत त्यात अर्जदार यांना दूस-या मजल्यावरील ओपन टेरेसवर जाण्यास प्रतिबंध करु नये, अर्जदार यांना गच्चीवर दैनदिन कामासाठी जसे की, पाण्याची टाकी साफ करणे, रोजचे कपडे वाळवीणे, टीव्हीचा अन्टीना बसवणे, सोलार साठी प्लेट बसवीणे, इत्यादी कामासाठी अडथळा करु नये. वरील टेरेसचा दरवाजा अंतरिम आदेशाप्रमाणे सर्व फलॅटधारकाना वापरण्यासाठी खूला ठेवावा किंवा तो बंद करावयाचा असल्यास त्यांला कूलूप लावून प्रत्येक फलॅटधारकाकडे त्यांची एक चावी दयावी किंवा सर्व समंतीने एक मध्यस्थी नेमून त्यांचेकडे गच्चीच्या दरवाजाची चावी ठेवण्यात यावी व गरजेनुसार पलॅटधारकांनी ती चावी घेऊन ती वापस मध्यर्स्थीकडे ठेवावी. परंतु असे करीत असताना अर्जदारास वर ओपन टेरेसवर कोणत्याही प्रकारचे पक्के काम करता येणार नाही. सर्व कामे टेमंपररी स्वरुपाची असावीत. ज्यावेळेस गैरअर्जदार यांना वर बांधकाम करावयाचे असेल त्यावेळी अर्जदारांनी ओपन टेरेस मोकळे करु दयावेत. 3. गैरअर्जदार यांनी येण्याजाण्याच्या रस्तात त्यांचे एजन्सीची वाहन धूण्यास प्रतिबंध करण्यात येतो. 4. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदनिका नंबर 2 चा ताबा देताना जी किरकोळ व अर्धवट काम राहीली होती ती अर्जदाराने स्वःखर्चाने पूर्ण केल्यामूळे त्यापोटी रु.45,000/- व त्यावर प्रकरण दाखल केल्यापासून म्हणजे दि.02.09.2008 पासून 12 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 5. मानसिक ञासाबददल रु.15,000/- व दावा खर्चा बददल रु.5,000/- मंजूर करण्यात येतात. 6. संबंधीना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |