ग्राहक तक्रार क्र. 161/2012
अर्ज दाखल तारीख : 05/07/2012
अर्ज निकाल तारीख: 13/01/2015
कालावधी: 02 वर्षे 06 महिने 09 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मनिषा रमेश पवार,
वय-35 वर्षे, धंदा –नौकरी,
रा.उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. सौ. विजया धर्मवीर कदम,
वय.40 वर्षे, धंदा-व्यवसाय,
रा.उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.डी.जरंगे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.अविनाश मैंदरकर.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) विरुध्द पक्षकार (विप) ने आपले घर भाडयाने देतांना जे डिपॉझिट घेतले होते ते घर सोडल्यानंतर परत न देऊन सेवेत त्रुटी केली असा आक्षेप घेऊन भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ती (तक) हिने हि तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात असे की ती उस्मानाबाद येथे प्राध्यापक म्हणून नोकरी करते. बदली झाल्यानंतर उस्मानाबाद येथे तिला राहण्यासाठी घर नव्हते म्हणून शोध चालू केला. विप हिचे ज्ञानेश्वर मंदीरामागे बंगल्यातील तळमजल्यावरच्या चार खोल्या रिकाम्या होत्या ता.20/07/2010 रोजी ते घर दरमहा रु.5,500/- भाडयाने घेण्याचा ठराव झाला. विप हिने रु.10,000/- डिपॉझिट घेऊन 11 महीन्यासाठी घर भाडयाने दिले. ती मुदत संपल्यावर आणखी 11 महीन्यासाठी घर भाडयाने देण्याचे ठरले तसा करार रु.100/- चे स्टँम्प पेपरवर लिहीला गेला. करारानूसार चालू स्थितीतील तीन फॅन,चार टयूब, वायरींग, पडदे रॉड, देण्याचे ठरले होते. मात्र एक फॅन व एक टयूब नादुरुस्त होते. तक ने ता.25/07/2010 रोजी ‘माऊली इलेक्ट्रीकल्स‘ यांच्याकडून फॅन व टयूब बदलून घेतले व जुने तक यांना दिले. पहीला करार दि.01/07/2011 रोजी संपल्यानंतर 11 महीन्यासाठी पुढे वाढवण्यात आला. करारामध्ये स्वतंत्र मिटरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे ठरले असतांना विप यांनी तक यांच्या मिटरवरुनच आउट हाऊसमध्ये राहणा-या विदयार्थ्यासाठी राहणा-या विदयांर्थ्यांना वीज पुरवठा दिला. तक्रार केली असता विप ने तक ला घर सोडण्यास सांगितले. नाईलाजाने तक ने ता.02/05/2012 रोजी घर सोडले. तक ला तिने बसविलेला फॅन व टयूब नेण्यास विप ने प्रतिबंध केला. डिपॉझिटचे रु.10,000/- तसेच फॅनचे रु.1,850/- व टयूबचे रु.350/- असे एकूण रु.12,200/- मागितले असता आठ दिवसांनी पैसे देण्याचे कबूल केले. तक चे मामा 'विलास टकले' यांना पाठविले असता पैसे देण्यास विप ने नकार दिला. त्यानंतर तक यांनी विप यांची भेट घेतली असता खोल्या खराब केल्यामुळे रंगरंगोटी व इतर खर्चासाठी रु.25,000/- खर्च येत असल्यामुळे तसेच फॅन व टयूब यांचेच असल्यामुळे पैसे देण्यास विप यांनी नकार दिला. तक यांनी दि.21/05/2012 रोजी विप यांना नोटीस दिली असता दि.30/05/2012 रोजी विप ने खोटया मजकूराचे उत्तर दिले. अशा प्रकारे विप ने त्रुटीयूक्त सेवा दिली आहे. म्हणून डिपॉझिटचे रु.10,000/-, विदयूत उपकरणांचे रु.2,200/-, जादा वीज वापराचे रु.9,600/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व कायदेशीर खर्चापोटी रु.3,000/- दयावे म्हणून ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीसोबत तक ने दि.20/07/2010 च्या कराराची प्रत, दि.21/05/2012 च्या नोटीसीची प्रत, दि.25/07/2010 चे माऊली इलेक्ट्रीकल्सचे बिल, दि.30/05/2012 चे नोटीस उत्तर हजर केले आहे.
2) विप यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्याप्रमाणे सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदीत बसत नसल्यामुळे रदद होण्यास पात्र आहे. विप हे भाडयाने घर देण्याचा व्यवसाय करतात हे म्हणणे नाकारले आहे. करारात शेवटी 'लिव्ह अॅण्ड लायसेंन्स' असे स्पष्टपणे म्हंटलेले आहे. एक फॅन व एक टयूब नादुरुस्त स्थितीत होते हे नाकबूल केलेले आहे. तक हिने घराचा वापर दि.01/08/2010 ते 20/05/2012 पर्यंत केला होता. तक ने हजर केलेली पावती ही त्यानंतरची आहे. करारात स्पष्टपणे लिहिले आहे की घरामध्ये चालू स्थितीत तीन फॅन व चार टयूब आहेत व त्या घर सोडतांना चालू स्थितीत परत द्यायच्या होत्या. तक ने घर अतीशय रफ पध्दतने वापरले. करारात स्पष्टपणे नमूद आहे की बोअरचा विदयूत पुरवठा तक चे मिटरवरुन केला जाईल. वास्तविक पाहता कराराची मुदत दि.01/07/2011 पर्यंत असतांना तक बेकायदेशीरपणे दि.02/05/2012 पर्यंत घरात राहीला. विप ने तिला घराबाहेर जाण्यास सांगितले हे कबूल नाही. तक ला घरास रंग देण्यासाठी रु.8,000/- खर्च आला. तक ने विप ला चार महिन्याचा किराया रु.22,000/- दिलेला नाही. अशा प्रकारे तक कडून विप स रु.26,320/- यामध्ये अदा न केलेले विदयूत देयक रु.820/- असे येणे आहे. तसेच झालेल्या त्रासापोटी व खर्चापोटी रु.10,000/- येणे आहे. हे तक कडून वसूल होऊन मिळणे जरुर आहे.
3) तक ची तक्रार तिने दाखल केलेली कागदपत्रे तसेच विप चे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात व त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) तक हे विप चा ग्राहक होते काय ? होय.
2) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? अंशत: होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? अंशत: होय.
4) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 :
4) विप यांच्या तर्फे विधीज्ञ श्री. मैंदरकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक ही विप ची ग्राहक होऊ शकत नाही. सर्व्हीस ची व्याख्या ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (ओ) कडे श्री. मैंदरकर यांनी आमचे लक्ष वेधले, ज्यामध्ये बोर्डींग व लॉजिंग अंर्तभूत आहेत पण घर भाडयाने देणे अंर्तंभूत नाही असे श्री. मैंदरकर यांचे म्हणणे आहे. मात्र कोणत्याही प्रकारची सेवा मोबदला घेऊन दिली असेल तर ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत सेवा धरली जाईल हे उघड आहे. त्यामुळे भाडेतत्वावर विप चे घर तक ने वापरले ही विप ने तक ला मोबदल्यासाठी दिलेली सेवा होती. असे आमचे मत आहे म्हणून आम्ही मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र.2
5) विप ने तककडून घर भाडयाने देतांना दि.20/07/2010 रोजी डिपॉझिट म्हणून रु.10,000/- घेतले या बददल दोन्ही पक्षकारांमध्ये वाद नाही. तसा मजकूर करारपत्रात नमूद केलेला आहे. तक ने दि.25/07/2010 च्या माऊली इलेक्ट्रीकल्स ची पावती हजर केलेली आहे. ज्याअन्वये तिने फॅन व टयूब यासाठी रु.2,400/- खर्च केले. विप तर्फ या पावतीची प्रत हजर केली असून त्यावर तारीख 25/07/2012आहे मात्र बाकीच्या प्रतीमध्ये पावतीची तारीख स्पष्टपणे 25/07/2010 दिसून येते. म्हणजेच विप ने आपले कडील पावतीवरील तारीख बदलल्याचे दिसून येते. तथापि करारामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की घरामध्ये तीन फॅन व चार टयूब चालू स्थितीत होते. एक फॅन व एक टयूब बंद असल्याबददल करारामध्ये लिहीण्यास तक ने आग्रह धरला नाही. ज्या पावती खाली हया वस्तू घेतल्या त्यांचा वापरघरामध्येच झाला हे दाखविण्यास तककडे काहीही पुरावा नाही. शिवाय घर सोडतांना विदयूत उपकरणे चालू स्थितीत ठेवण्याची तक ची जबाबदारी होती. त्यामुळे तक ला विदयूत उपकरणाबददल तक्रार करता येणार नाही.
6) तक ने दि.01/01/2012 पासून दि.02/05/2012 पर्यंत चार महीन्याच्या किरायापोटी रु.22,000/- दिले नाहीत तसे विप चे म्हणणे आहे. पहीला करार 11 महिन्यांनी जुलै 2011 मध्ये संपला. पहिल्या करारातच हे नमूद आहे की जुलै 2011 नंतर पुढील 11 महीन्यासाठी करार वाढवण्याचा होता. असे दिसते की नंतर पक्षकारांमधील संबंध ताणले गेले व शेवटी दि.02/05/2012 रोजी तक ने विप चे घर सोडले. तक चे म्हणणे आहे की तिचा फॅन व टयूब मिळण्यास विप ने प्रतिबंध केला. मात्र हे पटण्यासारखे नाही. या उलट विप चे म्हणणे की तक ने दि.01/01/2012 पासून कोणतेही भाडे दिले नाही. हे खरे आहे की तक ने भाडे दिल्याच्या कोणत्याही पावत्या हजर केलेल्या नाहीत. या उलट विप ने हिशोबाच्या दोन वहया हजर केलेल्या आहेत. मात्र हे रोजच्या रोज लिहलेले हिशोब दिसत नाहीत तर नंतर तयार केलेले हिशोब वाटतात. कारण मधील पाने कोरी ठेवलली आहेत व दिवसाच्या किंवा महिन्या शेवटी ताळेबंद काढण्यात आलेला नाही. दुस-या वहीमध्ये काही तुरळक नोंदी केल्या असून एक जानेवारी 2012 रोजी तक ने डिसेंबरचा किराया रु.5,500/- दिल्याचे लिहिले असून तक ला ताबडतोब घर सोडण्याची ताकीद दिली असे ही नमूद केलेले आहे. पुढील महीन्याच्या एक तारखेच्या नोंदीप्रमाणे तक ने संपलेल्या महिन्यात किराया दिलेला नाही अशी मुद्दाम नोंद केली आहे. अशा त्रोटक नोंदीच्या आधारे विप हे शाबीत करु इच्छीते की तक ने जानेवारी 2012 पासून चार महिन्याचा किराया तिला दिला नाही. मात्र याबददल दिवाणी दावा दाखल का केला नाही या बददल विप ने चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे विपचा हा बचाव मान्य करता येणार नाही.
7) पुढे जाता विप चे म्हणणे कि तक ने घराचा वापर नीट केला नाही, भिंती खराब केल्या. त्यामुळे घराला रंग देण्यास रु.7,000/- खर्च आला. तसेच शेवटच्या महीन्याचे लाईट बिल रु.820/- तक ने दिले नाही. विप ने भिंतीचे फोटो हजर केले असून काही रेघोटया मारल्याचे दिसते. रंग खरेदी पावती रु.6,403/- व मजूरी पावती रु.880/- ची हजर केली आहे. त्या पावत्या जुलै 2010 च्या आहेत. तसे दि.07/05/2012 ची रु.2,095/- ची पावती हजर केलेली आहे. हे खरे आहे की भाडेकरुने भाडयाची जागा व्यवस्थित पणे वापरली पाहीजे. मात्र जागेची दुरुस्ती करणे हे घरमालकाचे काम आहे. असे दिसते की तक ने घराच्या भिंतीवर रंग रेघोटया पाडल्या. मात्र त्यानंतर भाडेकरु देतांना विप ला घराला रंग देण्याची जरुरी पडली असणार. आमच्या मते रंग रेघोटीचा रु.5,000/- खर्च तक ने सोसणे जरुरी आहे. ही रक्कम वजा जाता डिपॉझिटपैकी रक्कम रु.5,000/- मिळण्याचा तक ला हक्क आहे. एवढया अनुतोषास तक पात्र आहे. किरायदाराकडून डिपॉझिट घेतल्यास घरमालकाने घर रिकामे केल्या नंतर किरायदारला ते परत देणे बंधनकारक असते. येथे विप हिने तक शी संबंध बिघडल्यामुळे निरनिराळया तक्रारी करुन डिपॉझिट परत न देता चुकविण्याचा प्रयत्न केला आहे. तसा प्रयत्न योग्य असल्याचे मान्य करता येणार नाही. म्हणून आम्ही मुददा क्र.2 व 3 चे उत्तर अंशत: होय असे देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) विप ने तक ला डिपॉझिटपैकी रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) दयावेत.
3) विप ने तक ला वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 दराने व्याज दयावे.
4) विप ने तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/-(रुपये एक हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(सौ.विद्युलता जे.दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.