निकाल
दिनांक- 23.07.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हा उस्मानाबाद शासकीय नौकर म्हणून कार्यरत आहे. जयश्री ही तक्रारदारांची पत्नी आहे. तिला HT with TBM with Electronic Imbalance हा आजार आहे. तिने दि.10.03.2009 ते 31.03.2009 पर्यत डॉ यशवंत खोसे एम.डी. (मेडीसीन) यांचेकडे औषधोपचार घेतला. तक्रारदाराची पत्नी सदर आजाराने मयत झाली. तक्रारदारांने तक्रारीमध्ये दिल्याप्रमाणे वेळोवेळी डॉक्टरांचे बिलाप्रमाणे जी बिले दिली ती त्यांनी सामनेवाला यांना दिली आहेत. एकूण त्रेचाळीस बिले असून त्यांची एकूण रक्कम रु.49,909/- आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदार यांना जी बिले दिली ती सर्व हेतूपुरस्कर बिलावरती डुप्लीकेट असे लिहून बिले दिली आहेत. तक्रारदारांचे म्हणणे की, तक्रारीत नमूद सर्व बिलांचे मेडीसीन त्यांनी सामनेवाला यांचेकडून घेतली आहेत व त्यापोटी सर्व रक्कम सामनेवाला यांना अदा केली आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक असून, सामनेवाला यांनी डूप्लीकेट बिले देऊन तक्रारदार यांना सेवा देण्यास त्रूटी केली आहे. सामनेवाला यांनी ग्राहक संरक्षण कायदयाचे उल्लंघन केले आहे. सामनेवाला यांनी डूप्लीकेट असा शेरा मारल्यामुळे त्यांचे कार्यालयाने त्यांचे वैद्यकीय बिल मुळ पावत्या नसल्यामुळे अनुज्ञेय नाही म्हणून परत केले आहे. सामनेवाले यांच्या खोडसाळपणामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना मुळ पावत्या मागितल्या असता त्यांनी मुळ पावत्या देण्यास नकार दिला, त्यामुळे तक्रारदारांस तक्रार दाखल करण्यास कारण घडले आहे.
तक्रारदाराने तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे, डुप्लीकेट पावत्यामुळे झालेले नुकसान रु.49,909/- व्याजासह तक्रारदारास दयावे, तसेच सेवेतील त्रुटीबददल आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रासापासेटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.50,000/- सामनेवाले यांना देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाला यांनी दि.06.05.2013 रोजी हजर होऊन त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांचे म्हणणे की, ज्या ज्या वेळी तक्रारदाराने त्यांचे कडून औषधे खरेदी केले त्या त्या वेळी सामनेवाला यांनी त्यांना बिलाच्या मुळ पावत्या दिलेल्या आहेत. नंतर तक्रारदाराने त्यांना विनंती केली की, त्यांच्या मुळ पावत्यास गहाळ झाल्या आहेत, त्यांना सदर औषधांचे बिल त्यांचे कार्यालयातून मिळणार आहे म्हणून औषध खरेदीच्या पावत्यांची दुसरी प्रत (डूप्लीकेट) देण्यात यावी. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना मुळ पावत्या दिलेल्या असताना सुध्दा त्यांना डूप्लीकेट पावत्या दिलेल्या आहेत. सामनेवाला यांचे म्हणणे डूप्लीकेट पावती म्हणजे बोगस बिल होत नाही.सामनेवाला यांनी कोणत्याही प्रकारची त्रूटीची सेवा दिलेली नाही. तक्रारदाराने पावत्या गहाळ झाल्याबाबत सांगितले असते तर त्यांना डूप्लीकेट पावत्या ख-या व बरोबर आहेत याबाबतचे प्रमाणपत्र व स्वतःचे शपथपत्र कार्यालयास सादर करण्यासाठी दिले असते. तक्रारदारांचे प्रतिपूर्ती बिल न मिळण्याचे नेमके कारण हे त्यांनी जाणूनबूजून मंचापासून लपवून ठेवले आहे.तक्रारदारांची तक्रार खोटी असून ती सामनेवाला यांना मान्य नाही. तक्रारदारांने विनाकारण खोटी, चुकीची व बिनबुडाची तक्रार दाखल केली आहे त्यामुळे सामनेवाला यांना मानसिक व आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे त्यामुळे सामनेवाला यांना नुकसान भरपाई रु.10,000/- तक्रारदार यांनी दयावेत अशी मागणी केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, देयक मंजूर अर्ज, डिस्चार्ज कार्ड, प्रमाणपत्र, प्रतिपूर्ती मागणीपत्र, दवाखान्याच्या पावत्या, वास्तव्याचा दाखला, तक्रारदाराचा लेखी म्हणणे,इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. सामनेवाला यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ सौ.उज्वला यशवंतराव खोसे यांचे शपथपत्र दाखल केले आहे
तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, सामनेवाला यांनी
त्यांना सेवा देण्या मध्ये त्रूटी केली आहे ? नाही.
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांनी पुरावा पृष्टयर्थ आपले स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीतील कथन सिध्द करण्यासाठी खालील नमूद केलेली कागदपत्रे दाखल केली आहेत.
1. छायाप्रत वैद्यकीय प्रतीपूर्तीचे देयक मंजूर करणे बाबत आदेश.
2. श्री.तिरुपती हॉस्पीटल यांनी दिलेली डिसचार्ज कार्डची छायाप्रत.
3. वैद्यकीय प्रमाणपत्र प्रतिपूर्ती मागणी पत्र.
4. औषधे खरेदी केल्या बाबतच्या पावत्याच्या छायाप्रती.
5. तक्रारदार यांचा लेखी यूक्तीवाद.
वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले. तसेच तक्रारदार यांचे वकील श्री.एम.एम.जोशी यांचा तोंडी यूक्तीवाद ऐकला.
सामनेवाला यांनी शपथपत्र दाखल केले व सामनेवाला यांचे वकील श्री.के.आर.टेकवाणी यांनी केलेला यूक्तीवाद ऐकला.
तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्यात कथन केले आहे की, त्यांनी सामनेवाला यांचे मेडीकल स्टोअर्स मधून वेळोवेळी औषधे खरेदी केले आहे. तक्रारदार यांची पत्नी सौ.जयश्री सर्जेराव लोखंडे हया श्री तिरुपती हॉस्पीटल मध्ये दाखल होत्या. त्यांचा औषधोपचार घेत असताना मृत्यू झाला. तक्रारदार यांचे पूढे कथन की, त्यांनी सामनेवाला कडून वेळोवेळी घेतलेल्या औषधोपचाराची सर्व बिले चुकती केली आहेत. सामनेवाला यांनी विकत घेतलेल्या औषधोपचाराचे मुळ बिले देण्याचे कर्तव्य होते. सामनेवाला यांनी बिले देताना त्यावर डूप्लीकेट असा शेरा मारला त्यामुळे तक्रारदार यांनी ते ज्या सरकारी विभागात नौकरीला होते त्या विभागाकडून वैद्यकीय प्रतिपुर्ती मिळाली नाही. त्यांचा क्लेम नाकारण्यात आला. सामनेवाला यांचे मुळ बिल देण्याची जबाबदारी असतानाही त्यांनी डूप्लीकेट बिले देऊन सेवेत त्रूटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी एकूण रु.49,909/- चे नुकसान सोसावे लागले व मानसिक त्रास झाला.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था ता.भुम या कार्यालयात वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जासोबत त्यांने तिरुपती हॉस्पीटल यांचे डिसचार्ज कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, वेळोवेळी घेतलेल्या औषधोपचाराचे बिले, तसेच डॉक्टरने वेळोवेळी घ्यावयाच्या औषधोपचाराची सुची दाखल केल्याचे आढळून येते. सामनेवाला यांनी तक्रारदाराने त्यांचे दूकानातून औषधे खरेदी केली आहेत ही बाब मान्य केली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेली सर्व बिले छायाकींत प्रती मध्ये आहेत. तक्रारदाराचे प्रतिपूर्ती बिल ते नौकरी करीत असलेल्या विभागाने औषधे खरेदीच्या सर्व पावत्या डूप्लीकेट आहेत, त्या पावत्या मुळ स्वरुपात असणे आवश्यक आहे हे कारण देऊन प्रतिपूर्ती अनुज्ञेय नाही असे कळविले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे पुराव्यात कथन केले आहे की, तक्रारदार यांनी त्यांचे मेडीकल शॉप मधून वेळोवेळी औषधे खरेदी केली आहेत व त्यांचे मुळ बिल वेळोवेळी तक्रारदार यांना देण्यात आले आहे. सामनेवाला यांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदार हे त्यांचे दुकानात आले व त्यांना सांगितले की, मुळ पावत्या त्यांचेकडून हरवल्या आहेत व त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी डूप्लीकेट पावत्याची गरज आहे. तक्रारदार यांचे विनंतीवरुन सामनेवाला यांनी खरेदी केलेल्या पावत्याची दूसरी प्रत (डुप्लीकेट) तक्रारदार यांना दिल्या आहेत. सदरील दूसरी प्रत ही मुळ प्रतीचीच प्रतिलीपी आहे. तक्रारदार यांनी मुळ पावत्या अगोदरच दिल्यामुळे व त्या त्यांच्याकडून हरवल्यामुळे डूप्लीकेट पावत्या दिल्या आहेत. त्यामुळे सदरील कृती ही सेवेतील त्रुटी नाही. तसेच सामनेवाला यांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदार यांनी ज्या डूप्लीकेट पावत्या दिल्या आहेत त्या बोगस पावत्या नाहीत, गरज पडल्यास सामनेवाला औषध खरेदी बिलाच्या पावत्या या ख-या व बरोबर आहेत याबददलचे शपथपत्र देण्यास तयार आहेत व तसेच शपथपत्र तक्रारदाराच्या कार्यालयात ही देण्यास तयार आहेत. तसेच तक्रारदार यांचे बिल कोणत्या तरी वेगळया कारणामुळे नामंजूर झाले आहे असे कथन केले आहे.
वर नमूद केलेल्या पुराव्यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराला जे डूप्लीकेट वैद्यकीय बिले दिली आहेत ते देताना सेवेमध्ये त्रुटी अवलंबविली आहे काय हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारदार यांनी आपले यूक्तीवादाचे कलम 2 मध्ये ही बाब मान्य केली आहे की, सदरचे औषध खरेदीच्या मुळ पावत्या या सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिल्या आहेत. त्यानुसार सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांनी औषधे खरेदी केले हे सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून औषधे खरेदी केली आहेत ही बाब वादात नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना औषधे खरेदी केले त्याचवेळी मुळ पावत्या दिल्या होत्या किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी मुळ पावत्या दिल्या होत्या ही बाब लेखी यूक्तीवादात मान्य केली आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदार यांना डूप्लीकेट बिलाच्या पावत्या दिल्या आहेत यावरुन एक बाब सिध्द होते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मुळ पावत्या अगोदरच दिल्या होत्या. जर मुळ पावत्या तयार केल्या नसेल तर त्यांची डूप्लीकेट करताच येणार नाही. तक्रारदार यांनी ते ज्या विभागात नौकरी करतात त्या विभागात वैद्यकीय देयके हजर करते वेळेस मुळ वैद्यकीय बिले दाखल करणे आवश्यक होते तसे त्यांनी केलेले नसल्यामुळे त्यांचे वैद्यकीय देयक नामंजूर करण्यात आले व त्या नंतरच सदरील तक्रार दाखल करण्यात आली. सर्व दाखल कागदपत्र व पुरावा यांची छाननी केली असता असे निदर्शनास येते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मुळ औषधी खरेदीच्या पावत्या वेळोवेळी दिल्या आहेत व त्या पावत्या तक्रारदार यांचेकडून हरवल्या अगर गहाळ झाल्या असणार, त्यामुळे त्यांनी सामनेवाला यांचेकडे डूप्लीकेट पावत्याची मागणी केली व त्यानुसार सामनेवाला यांनी डूप्लीकेट पावत्या तक्रारदार यांना दिल्या आहेत. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रूटी केली असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना डूप्लीकेट बिल का दिली याबददल कधीही नोटीस दिली नाही अथवा विचारणा केली नाही. असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी स्वतःच बिले गहाळ करुन निष्काळजीपणा केला आहे व त्यामुळे त्यांचा दोष सामनेवाला यांचेवर ठेवता येणार नाही.
वरील सर्व विवेचनावरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रूटी केलेली नाही.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.