तक्रारदारानी गैरअर्जदारा कडुन चहाची टपरी चालविण्यासाठी दिनांक 26/02/1008 रोजी रु 40,000/- 16% दराने कर्ज घेतले होते.त्यानंतर तक्रारदार हे नियमितपणे गैरअर्जदाराच्या पिग्मी एजंटकडे कर्जाची परतफेड म्हणुन रककम देत होते. तक्रारदारास तक्रार दाखल करेपर्यंत त्यांनी किती परतफेड केली अजुन किती शिल्लक आहे, याचे Statememt , कर्जाचा करारनामा,कागदपत्रे गैरअर्जदाराने दिली नव्हती. तक्रारदाराने अनेक वेळा मागणी करुन सुध्दा गैरअर्जदाराने तक्रारदारास कागदपत्रे दिली नाहीत. म्हणून माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला. त्यानंतर राज्य जन माहिती अधिकारी यांचेकडे अपील केलें त्यानंतर सहायक दुयम निबंधक,यांचेकडे तक्रार दाखल केली त्यानंतर विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, यांचेकडे अपील केले.त्यानी गैरअर्जदारास आदेश देवुनही गैरअर्जदाराने तक्रारदारास कागदपत्रे दिली नाहीत. म्हणुन तक्रारदाराने कर्ज प्रकरणाची माहिती हिशोब व कागदपत्रे मिळण्यासाठी सदरील तक्रार दाखल केली आहे.तक्रारदार नुकसान भरपाई म्हणून रु 1,00,000/- मागतात.
तक्रारदाराने शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदाराने कागदपत्रे दाखल केली.त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराकडे रु 13,500/- येणे बाकी आहे. गैरअर्जदाराने जे स्टेटमेन्ट दाखल केले.त्यावर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेचा शिक्का नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने जी कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याच्या सत्यतेबद्यल साशंकता निर्माण होते म्हणुन मंच ती मान्य करीत नाही. गैरअर्जदारातर्फे शाखाधिकारी विजयश्री जाधव हया युक्तीवादाचे वेळेस हे मान्य करतात की, त्यांनी तक्रारदारास कर्ज प्रकरणातील करार पत्र ,हिशोब,कर्ज परतफेडीचे विवरणपत्र तक्रादारास दिले नव्हते. ते मंचातच दाखल करण्यांत आले यावरुन तक्रारदार म्हणतात ते बरोबर असल्याचे मंचाचे मत आहे.
तक्रारदारास कर्ज देवुन त्याची सर्व कागदपत्रे,हिशोब न देणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारदार ही माहिती मिळविण्यासाठी दिनांक 01/04/2009 पासुन सर्व प्रकारे उदा RTI,मंच व अनेक कार्यालयात गेलेले दिसुन येतात.त्यामुळे तक्रारदारास साहजिकच मानसिक व आर्थिक त्रास झाला असावा. म्हणुन मंच गैरअर्जदारास असा आदेश देते की,गैरअर्जदार पतसंस्थेने कर्ज प्रकरणातील सर्व कागदपत्रे,करारनामा,खातेउतारा यांच्या प्रमाणित प्रति 06 आठवडयाच्या आत तक्रारदारास द्यावेत व नुकसान भरपाई म्हणून रु 5000/- व तक्रारीचा खर्च रु 1000/- द्यावा.
आदेश
गैरअर्जदार देवगिरी नागरी सह.पतसंस्था यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास कर्ज प्रकरणातील सर्व कागदपत्रे, नुकसानभरपाई म्हणुन रु 5000/- व तक्रारीचा खर्च म्हणुन रु 1000/- द्यावा.
(श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख)
सदस्य अध्यक्ष