निकाल
पारीत दिनांकः- 17/04/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी दि. 18/8/2006 रोजी त्यांच्या पत्नीस डॉ. पाटणकर नर्सिंग होम येथे तपासणीकरीता नेले असता, तेथील डॉ. मेधा पाटणकर यांनी तक्रारदारांच्या पत्नी या दोन महिन्याच्या गर्भवती असल्याचे सांगितले. दि. 18/8/2006 ते 22/2/2007 या कालावधीमध्ये ज्या-ज्या वेळी डॉक्टरांनी सांगितले त्या-त्या वेळी तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीस जाबदेणार यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले होते. तक्रारदारांच्या पत्नीची पहिली सोनोग्राफी दि. 14/9/2006 रोजी करण्यात आली, त्यावेळेस त्या 11 ते 12 आठवड्यांच्या गर्भवती होत्या व सोनोग्राफीचा अहवाल जाबदेणारांनी ‘नॉर्मल’ दिला. त्यानंतर दि. 23/11/2006 रोजी दुसरी सोनोग्राफी करण्यात आली, त्यावेळेस अहवाल ‘नॉर्मल’ असा दिला. दि. 5/2/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नीची तीसरी सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळी त्या 30 ते 31 आठवड्यांच्या गर्भवती होत्या, त्यावेळेसचाही सोनोग्राफीचा अहवाल ‘नॉर्मल’ असा देण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दि. 24/3/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांनी जाबदेणार हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला, परंतु डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, म्हणून त्यांच्या पत्नीस दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर दि. 27/3/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नीच्या प्रसूतीसाठी सिझेरिअन करावे लागले. तक्रारदारांचे बाळ हे अपंग अवस्थेत (with Multiple Congenital Anomaly) जन्माला आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी त्यांची व त्यांच्या पत्नीची दिशाभूल केलेली आहे व वेळोवेळी सोनोग्राफीचा अहवाल ‘नॉर्मल’ देऊन त्यांचा मानसिक छळ केला आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 45,000/- उपचाराकरीता आलेला खर्च व रक्कम रु. 2,00,000/- मानसिक छळ केल्यामुळे नुकसान भरपाई मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार ‘ग्राहक’ नाहीत. तक्रारदारांच्या पत्नी दि. 18/8/2006 रोजी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या व दि. 14/9/2006 रोजी त्यांची सोनोग्राफी केली होती, त्याचा अहवाल ‘नॉर्मल” होता. त्यानंतर तक्रारदारांच्या पत्नीस पुन्हा नोव्हे. 2006 च्या पहिल्या आठवड्यामध्ये सोनोग्राफीसाठी बोलविले होते, परंतु तक्रारदारांच्या पत्नी दि. 23/11/2006 रोजी आल्या. दि. 23/11/2006 च्या सोनोग्राफीनंतर जाबदेणारांनी तक्रारदारांच्या पत्नीस पुन्हा दि. 7/12/2006 रोजी सोनोग्राफीसाठी बोलविले, परंतु तक्रारदारांच्या पत्नी जाबदेणारांकडे न जाता दुसर्या डॉक्टरांकडे गेल्या व तेथील सोनोग्राफीचा ‘नॉर्मल’ असलेला रिपोर्ट जाबदेणारांना दाखविला. दि. 29/12/2006 रोजी तक्रारदारांच्या पत्नी जाबदेणारांकडे ‘पोटात दुखते आहे’ या तक्रारीसह आले होते, त्यावेळी जाबदेणारांनी तपासणी करुन त्यांना दि. 30/12/2006 रोजी सोनोग्राफी करण्यासाठी बोलाविले, परंतु तक्रारदारांच्या पत्नी सोनोग्राफीसाठी आल्या नाहीत व दि. 2/1/2007 रोजी त्या दुसर्या डॉक्टरांकडे गेल्या. दि. 5/2/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नी जाबदेणारांच्या हॉस्पिटलमध्ये आल्या त्यावेळी त्या 32 आठवड्यांच्या गर्भवती होत्या. त्यावेळी सोनोग्राफी केली असता बाळाची स्थिती (Position) पायाळू (Breech position) दिसून आली. या स्थितीमध्ये बाळाचा चेहरा त्याच्या पायामुळे झाकला असल्याने बाळ पूर्णपणे दिसणे कठीण झाले, याची कल्पना जाबदेणारांने तक्रारदारास दिली होती. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, सोनोग्राफीच्या अहवालामध्ये ‘Not all anomalies can be detected on sonography’ असे नमुद केले आहे. त्यानंतर तक्रारदारांच्या पत्नीने त्यांची प्रसूती राजगुरुनगर येथे करावयाची असल्याने सर्व कागदपत्रे, रिपोर्टस केस हिस्ट्री परत मागितली व ती जाबदेणारांनी तक्रारदाराच्या स्वाधिन केले. दि. 21/2/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नीने जाबदेणारांना फोन करुन पोटात दुखत असल्याचे सांगितले, त्यावेळी जाबदेणारांनी त्यांना प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले, परंतु त्या आल्या नाहीत. दि. 22/2/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नी जाबदेणारांकडे आल्या त्यावेळी जाबदेणारांनी त्यांना अॅडमिट होण्यास सांगितले, परंतु त्या अॅडमिट न होता निघून गेल्या. त्या दिवसानंतर जाबदेणारांना तक्रारदारांच्या पत्नीबद्दल काहीही माहिती नाही, त्यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमधून तक्रारदारांच्या पत्नीच्या प्रसूतीबद्दलचे कागदपत्रे मागवून घेतले. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, तक्रारदारांच्या पत्नीची दि. 27/3/2007 रोजी पूर्वनियोजित प्रसूती (planned caesarean section) करण्यात आली होती. सदरच्या कागदपत्रांमध्ये दि. 24/3/2007 रोजी तक्रारदारांच्या पत्नीच्या पोटात जबर दुखत होते असे कुठेही नमुद केलेले नाही. असे असते तर दि. 24/3/2007 रोजीच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अॅडमिट केले असते व तात्काळ caesarean section केले असते. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्याशी दि. 24/3/2007 रोजी फोनवरुन संपर्क साधला व जाबदेणारांनी दुर्लक्ष केले हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या रिपोर्ट्सवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांच्या पत्नीची आणखी एक सोनोग्राफी केलेली होती त्यामध्येही anomalies आढळल्या नव्हत्या. सोनोग्राफीच्या काही मर्यादा असतात, त्यामध्ये बाळ संपूर्णपणे दिसणे हे position of baby, maternal obesity, fullness of bladder इ. गोष्टींवर अवलंबून असते. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये बाळाचे सर्व व्यंग दिसू शकत नाहीत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांच्या पत्नीने सात सोनोग्राफींपैकी फक्त तीनच सोनोग्राफी त्यांच्याकडे केलेल्या आहेत व इतर चार दुसर्या क्लिनिकमध्ये केलेल्या आहेत. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या रिपोर्ट्सवरुन असे दिसून येते की, त्यांनी तक्रारदारास बाळाच्या व्यंगाकरीता ईलाज/शस्त्रक्रिया सुचविली होती, परंतु तक्रारदारांनी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतला व बाळास योग्य ते उपचार दिले नाहीत. या व इतर सर्व कारणांवरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, कागदपत्रे, मेडीकल लिटरेचर व मा. वरिष्ठ न्यायालयाचे प्रकरणातील निवाडे दाखल केले आहेत.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीस जाबदेणारांच्या हॉस्पिटलमध्ये त्या गर्भवती राहिल्यापासून तपासणीसाठी नेले होते. त्या दरम्यान जाबदेणारांनी तक्रारदारांच्या पत्नीची तीन वेळेस वेगवेगळ्या ट्रायमेस्टरमध्ये सोनोग्राफी केली व प्रत्येक वेळेस गर्भाची वाढ ‘नॉर्मल’ असल्याचे सांगितले, तरीही जन्मलेले बाळ व्यंगयुक्त जन्मले. त्यामुळे तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, जाबदेणारांनी त्यांच्या पत्नीची योग्य तपासणी केली नाही व त्यांची दिशाभुल केली. तक्रारदारांच्या पत्नीच्या एकुण सात सोनोग्राफी झाल्या त्यापैकी फक्त तीनच सोनोग्राफी जाबदेणार यांच्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदारांनी इतर चार सोनोग्राफी कोणाकडून केल्या त्यांचा उल्लेखही तक्रारीमध्ये केला नाही किंवा त्यांना प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये पक्षकारही केले नाही. त्याचप्रमाणे, जाबदेणारांनी तक्रारदारांच्या पत्नीची योग्य तपासणी केली नाही म्हणून बाळ व्यंगयुक्त जन्माला आले याबाबत किंवा सोनोग्राफीमध्ये बाळाचे व्यंग दिसत असूनही जाबदेणारांनी ‘नॉर्मल’ रिपोर्टस दिले याबाबतही तक्रारदारांनी कुठलाच सोनोग्राफीचा पुरावा मंचामध्ये दाखल केला नाही. जाबदेणारांच्या प्रत्येक सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये “Not all anomalies can be detected on sonography.” अशी तळटीप लिहिलेली आढळते. तसेच मेडीकल लिटरेचरनुसार, सोनोग्राफीमध्ये बाळ संपूर्णपणे दिसणे हे position of baby, maternal obesity, fullness of bladder इ. गोष्टींवर अवलंबून असते त्याचप्रमाणे सोनोग्राफीमध्ये बाळाचे सर्व व्यंग दिसू शकत नाही. म्हणून सोनोग्राफीचा अहवाल चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. मंचाच्या मते बाळ व्यंगयुक्त जन्मले, याचा दोष जाबदेणारांना देता येणार नाही. तक्रारदारांनी इतर क्लिनिकमधूनही सोनोग्राफी केल्या त्यांनीही अहवाल ‘नॉर्मल’च दिला. त्यामुळे जाबदेणारांनी सोनोग्राफीचा अहवाल चुकीचा दिला असे म्हणता येणार नाही. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी, जाबदेणारांनी त्यांच्या पत्नीची तपासणी करताना दुर्लक्ष केले व चुकीचा अहवाल दिला याबद्दल कोणताही स्वतंत्र पुरावा मंचामध्ये दाखल केला नाही, त्यामुळे तक्रारदार जाबदेणारांचा वैद्यकिय निष्काळजीपणा सिद्ध करु शकले नाहीत, असे मंचाचे मत आहे.
जाबदेणारांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मा. वरिष्ठ न्यायालयाचे खालील प्रकरणातील निवाडे दाखल केले आहेत, ते प्रस्तुतच्या प्रकरणास लागू होतात असे मंचाचे म्हणणे आहे.
1] 2010 ALL SCR 510
“Kusum Sharma & Ors
V/S
Batra Hospital & Medical Research Centre & Ors.”
2] Civil Appeal No. 5845 of 2009
“Suchita Srivastava & Anr.
V/S
Chandigarh Administration”
6] वरील सर्व विवेचनावरुन, कागदपत्रांवरुन व मा. वरिष्ठ न्यायालयाच्या निवाड्यांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.