न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी दि.27/12/14 रोजी वि.प. कंपनीचा सोनी 6802 सी या मॉडेलचा मोबाईल रक्कम रु.19,000/- या किंमतीस वि.प.क्र.2 यांचेकडून खरेदी केला होता. सदर मोबाईलची सेवा हमी ही खरेदी तारखेपासून 1 वर्षे होती. सदर मोबाईल संच वारंवार नादुरुस्त होत होता. म्हणून तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 कडून त्याची वारंवार दुरुस्ती करुन घेतली होती. सदरचा फोन वारंवार नादुरुस्त होतो म्हणून वि.प.क्र.2 यांनी सदरचा मोबाईल फोन परत घेवून दि. 8/10/15 रोजी सोनी ई – 5363, सी-4 हा रु. 24,435/- किंमतीचा मोबाईल फोन तक्रारदारास दिला. सदरचा बदलून दिलेला फोनही वारंवार नादुरुस्त होत होता म्हणून तक्रारदारांनी तो अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून दुरुस्त करुन घेतला आहे. वि.प.क्र.1 यांनी सदरचा फोन बदलून देतो असे सांगितले. परंतु तसे न करता जुना दोषयुक्त फोनच तक्रारदारास परत केला. तदनंतर सदरचा फोन नादुरुस्त झाल्याने तक्रारदाराने दि. 22/12/16 रोजी तो पुन्हा अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीस दिला असता तो दोष दूर न करताच तक्रारदारास दि. 28/12/16 रोजी परत दिला. तो आजअखेर चालू नाही. सबब, सदरचे मोबाईलची किंमत रु. 24,435/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, गैरसोयीपोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत मोबाईल खरेदीची बिले, फोन बदलून दिलेबाबतचे बिल, फोन दुरुस्तीसाठी दिल्याबाबतच्या पावत्या, वि.प.क्र.1 यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोहोचपावती, वि.प.क्र.2 यांनी नाकारलेली नोटीसची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 3 यांनी ता. 25/6/18 रोजी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने पूर्णपणे नाकारली आहेत. वि.प.क्र.3 यांनी सदरचे मोबाईलची वॉरंटी 1 वर्षाची दिली होती. त्याकारणाने वि.प.क्र.3 यांची जबाबदारी ही वॉरंटीतील अटी व शर्तीनुसार आहे. तक्रारदार यांनी सदरचा फोन हा 10 महिने वापरल्यानंतर ते पहिल्यांदा वि.प. यांचेकडे वॉरंटी व टचपॅडची तक्रार घेवून आले. सदर सर्व्हिस सेंटरने कोणतीही दिरंगाई न करता सदरचा मोबाईल तपासला. सदर मोबाईलचे निरीक्षण केलेवर सर्व्हिस सेंटरने Front cover Assy White हा मोबाईल रिप्लेस करुन दिला. सदरची रिप्लेसमेंट कोणताही मोबदला न देता केलेली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. 28/9/16 रोजी बॅटरी व हँगींग याची तक्रार सर्व्हिस सेंटरकडे केली. त्यानुसार सर्व्हिस सेंटरने सदर मोबाईलची बॅटरी कोणताही मोबदला न घेता बदलून दिली. शेवटी ता. 22/12/16 रोजी तक्रारदार वि.प. यांचेकडे Hanging & Heating ही तक्रार घेवून आले. सदर मोबाईलची वॉरंटी संपली होती. सर्व्हिस सेंटरने सदरची तक्रार दाखल करुन घेतली तथापि सदरचा मोबाईल योग्यरित्या काम करत होता. त्यामध्ये कोणताही बिघाड नव्हता. सदरची बाब तक्रारदार यांना माहिती असून देखील केवळ चुकीची तक्रार दाखल करुन चुकीची मागणी वि.प. यांचकडून ते करीत आहेत. सदरचे मोबाईलमध्ये उत्पादित दोष होता या अनुषंगाने तक्रारदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्या कारणाने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी. वि.प. यांनी तक्रारदार यांना पूर्णपणे सहकार्य केले असलेने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा असे वि.प.क्र.1 ते 3 यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. वि.प. क्र.1 ते 3 यांनी म्हणणेसोबत इन्व्हॉईस, Sony Service terms व Authority letter इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. वि.प. क्र.2 यांनी याकामी दि.7/10/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल करुन तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी घेतलेला सोनी 6802 सी या मॉडलेचा फोन नादुरुस्त झालेनंतर वि.प.क्र.1 यांनी तो संच आपलेकडे घेतला व तक्रारदार यांचे मागणी प्रमाणे सोनी ई 5363-सी-4 हा संच जुन्या मोबाईलची किंमत वजा करुन नवीन मोबाईलची होणारी किंमत रु. 6,501/- तक्रारदाराकडून घेवून तक्रारदारास दिला. सदरचे नवीन मोबाईल संचाची कोणत्याही प्रकारची विक्री वि.प.क्र.2 यांनी केलेली नाही. वि.प.क्र.1 यांचे सांगणेवरुन वि.प.क्र.2 यांनी सदरचा संच तक्रारदारास दिला. केवळ तांत्रिक अडचण होवून नये म्हणून तक्रारदारांना वॉरंटीचे बिल वि.प.क्र.1 चे सांगणेवरुन वि.प.क्र.2 यांनी दिले. वि.प.क्र.2 यांनी सदरचे संचाची विक्री तक्रारदारास केलेली नाही. सदरची रक्कम तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे जमा केली आहे. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारास सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. तक्रारदारांनी मोबाईलचे उत्पादक कंपनीस याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. तक्रारदाराने घेतलेल्या मोबाईलची वॉरंटी ही दि. 7/10/16 रोजी संपली आहे. सदरचे वॉरंटी कालावधीत तक्रारदार हे वि.प. यांचेकडे कधीही मोबाईल संचाची तक्रार घेवून आलेले नव्हते. वि.प.क्र.1 हे कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर असून मोबाईल संचाची दुरुस्ती करणेची जबाबदारी ही त्यांची आहे. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
वि.प.क्र.2 यांनी याकामी पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे मोबाईलची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी दि. 27/12/14 रोजी वि.प. कंपनीचा सोनी 6802 सी या मॉडेलचा रक्कम रु.19,000/- किंमतीचा मोबाईल वि.प.क्र.2 यांचकेडून खरेदी केला होता. त्याचा आय.एम.ई.आय. नं. 357656053618847 असा होता. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. सदरचे मोबाईलची वॉरंटी एक वर्षाची होती. सदरचे मोबाईल संचामध्ये वारंवार नादुरुस्त होत होता. त्या कारणाने तक्रारदार याने वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रार केली. सदरचा मोबाईल वारंवार नादुरुस्त होतो म्हणून वि.प.क्र.2 यांनी ता. 8/10/15 रोजी सदरचा मोबाईल परत घेवून तक्रारदार यांना मोबाईल सोनी ई-5363 सी-4 या मॉडेलचा रक्कम रु. 24,435/- चा मोबाईल दिला. सदरची पावती नि.3 सोबत असून अ.क्र.2 ला दाखल आहे. सदर दोन्ही पावत्यांवर वि.प.क्र.2 चे नांव नमूद आहे. सदरचा बदलून दिलेला मोबाईल वारंवार नादुरुस्त होत होता. सदरचा फोन वारंवार वि.प.क्र.1 यांचेकडून दुरुस्त करुन घेतला. तथापि सदरचा फोन पूर्ण क्षमतेने कार्य करीत नव्हता. तक्रारदार यांचा फोन साधारण अडीच महिने वि.प.क्र.1 यांचेकडे होता. परंतु वि.प. यांनी तक्रारदार यांचा फोन बदलून न देता जुना दोषयुक्त फोन परत दिला. सबब, सदरचा दोषयुक्त फोन देवून व तक्रारदार यांचा फोन बदलून न देवून वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणणेचे अवलोकन केले असता सदरचा फोन तक्रारदार यांनी 10 महिने वापरल्यानंतर वि.प. यांचेकडे तक्रार केलेली आहे. सदरचा मोबाईल तक्रारदार यांना रिप्लेस करुन दिलेला असून त्याचा कोणताही मोबदला घेतलेला नाही. ता.22/12/16 रोजी तक्रारदार मोबाईल Hanging + Heating तक्रार घेवून आले. सदर मोबाईलची वॉरंटी संपलेली होती. मोबाईलमध्ये कोणताही बिघाड नव्हता. मोबाईलमध्ये उत्पादित दोष होता, या अनुषंगाने तक्रारदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्याअनुषंगाने वि.प.क्र.1 व 3 यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वि.प.क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार यांना नवीन संचाची कोणत्याही प्रकारची विक्री वि.प.क्र.2 यांनी केलेली नाही. वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांचे सांगणेवरुन सदरचा मोबाईल तक्रारदार यांना दिला तथापि वि.प.क्र.2 यांचे सदर कथनाचे अनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल नि.3 सोबत अ.क्र.2 ला रिप्लेस करुन दिलेचे मोबाईलची पावती दाखल केलेली आहे. सदर पावतीवर वि.प.क्र.2 यांचे नाव नमूद आहे. यावरुन सदरचा नवीन रिप्लेस मोबाईल वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांना विक्री केलेचे स्पष्ट होते.
7. प्रस्तुतकामी दाखल कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता, अ.क्र.1 व 2 ला सदरचे मोबाईलचे बिलाची पावती दाखल आहे. अ.क्र.3 ला वि.प. यांनी फोन बदलून दिलेबाबत बिल अ.क्र.4 ते 7 ला जॉबकार्ड हजर केलेले आहे. अ.क्र.4 चे जॉब कार्ड कागदपत्रांवरुन सदरचे मोबाईलला Consumer complaint – Hanging other IA-warranty ता. 20/4/16 ते 22/4/16 पर्यंत साधारण 3 दिवस, अ.क्र.5 ला ता.5/8/6 ते 2/9/16 पर्यंत साधारण 30 दिवस, अ.क्र.6 ला ता. 28/9/16 ते 6/10/16 पर्यंत म्हणजे 9 दिवस, अ.क्र.7 ला ता. 22/12/16 ते 28/12/16 पर्यंत म्हणजे 7 दिवस वि.प.क्र.1 यांचेकडे सदरचा मोबाईल दुरुस्तीसाठी होता. सदरचे जॉब कार्ड वरुन तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल वि.प.क्र.1 यांचेकडे साधारण 4 ते 5 वेळा दुरुस्तीसाठी दिलेला होता. यावरुनच सदरचे मोबाईलमध्ये दोष असलेचे सिध्द होते. वि.प.क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये 10 महिन्याने तक्रारदार यांनी पहिल्यांदा फोनमध्ये तक्रार घेवून आले असे नमूद केले आहे. तथापि दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी दि. 8/10/15 रोजी सदरचा मोबाईल फोन खरेदी केला. अ.क्र.4 चे कागदपत्रांवरुन ता. 20/4/16 रोजी म्हणजेच साधारण 5 महिन्यांचे आत सदरचा मोबाईल वि.प.क्र.1 यांचेकडे दुरुस्तीकरिता दिला.
8. सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा मोबाईल वि.प. यांचेकडे वारंवार बिघाड निर्माण होत असलेने दुरुस्ती करणेसाठी द्यावा लागला. सदरचा मोबाईल हा वॉरंटी कालावधीतच असलेचे त्यावेळी वि.प. यांनी विनामोबदला सदरचा मोबाईल दुरुस्ती केला. वि.प.क्र.1 यांनी सदरचा फोन तक्रारदार यांना बदलून देतो असे सांगितले होते. त्याकरिता फोन साधारण अडीच महिने वि.प.क्र.1 यांचेकडे होता असे तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केले आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचा फोन बदलून न देता जुना दोषयुक्त फोन परत केला. बदलून दिलेला मोबाईल नादुरुस्त झाला म्हणून ता. 22/12/16 रोजी दुरुस्तीसाठी वि.प.क्र.1 यांचेकडे जमा केला तथापि फोनचे दोषाचे निवारण न करताच ता. 28/12/16 रोजी सदरचा फोन वि.प. यांनी तक्रारदार यांना दिला. सदरचा फोन दिले तारखेपासून आजअखेर चालू नाही. कोणत्याही उत्पादनाची विक्री करीत असताना विक्रीपश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी प्रिव्हीटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट (Privity of contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व विक्रेत्याची असते. सदरची बाब केवळ उत्पादन व विक्री करणेपुरती मर्यादित नसून विक्रीपश्चात सेवा देणेची आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन सदरचा मोबाईल विक्री केलेनंतर सेवा देणेची संपूर्ण जबाबदारी ही वि.प. यांची होती. त्यासाठी वि.प.क्र.1 ते 3 हे संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांना मोबदला देवून देखील सदरचे मोबाईलमध्ये वारंवार दोष उत्पन्न झाले. सबब, सदरचा सदोष मोबाईल वि.प. यांनी तक्रारदार यांना देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
9. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुत अर्जात तक्रारदार यांनी सदरचे मोबाईलची किंमत रक्कम रु. 24,435/- ची मागणी केली आहे. तथापि सदरचा मोबाईल हा तक्रारदार यांचे ताब्यात असलेचे तक्रारीत कथन केलेले आहे. याचा विचार करता तक्रारदारांनी त्यांचे ताब्यात असलेला सदरचा मोबाईल वि.प. यांना परत करावा व तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्तिकरित्या सदरचे मोबाईलची खरेदीची किंमत रक्कम रु.24,435/- मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 05/8/17 रोजी पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्तुत कामी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श -
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- तक्रारदार यांनी त्यांचे ताब्यात आलेला सदरचा मोबाईल वि.प. यांना परत करावा.
- वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना सदरचे मोबाईलची किंमत रक्क्मरु. 24,435/- अदा करावी व सदर रकमेवर तारीख 05/08/17 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.