तक्रारदारातर्फे : प्रतिनिधी वकील शैलेश मोरे
सामनेवालेतर्फे : प्रतिनिधी वकील राधा वेद
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
आदेश - मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
आदेश
1. सामेनवाले क्रमांक 1 हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादक आहेत, तर सामेनवाले क्रमांक 2 विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सामेनवाले क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेला एल.सी.डी.टी.व्ही. संच दिनांक 03/05/2010 रोजी सामेनवाले क्रमांक 2 यांचेकडून रक्कम रुपये 25,900/- या किंमतीस खरेदी केला. टी.व्ही संचाचा हमी कालावधी एक वर्ष होता. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सदर टी.व्ही संच दिनांक 5/7/2010 रोजी अचानक बंद पडला, व सामेनवाले क्रमांक 2 चे प्रतिनिधींनी तो दुरुस्त करुन दिला. त्यानंतर पुन्हा दिनांक 11/7/2010 रोजी टी.व्ही. संच बंद पडला, व त्यामध्ये चित्र दिसत नव्हते व आवाज येत नव्हता. सामेनवाले क्रमांक 2 चे प्रतिनिधी यांनी दिनांक 18/7/2010 रोजी टी.व्ही. दुरुस्त केला, व सर्किट बोर्ड बदलला. दिनांक 20/7/2010 रोजी पुन्हा टी.व्ही बंद पडला, तो सामेनवाले क्रमांक 2 चे प्रतिनिधींनी दुरुस्ती करुन दिला. त्यानतंर पुन्हा दिनांक 5/8/2010 रोजी टी.व्ही.संच बिघडला व सामेनवाले क्रमांक 2 चे प्रतिनिधी यांनी काही दुरुस्ती केली. याप्रकारे सामेनवाले यांचेकडून विकत घेतलेल्या टी.व्ही. संचामध्ये वारंवार दुरुस्ती करावी लागली, यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना विक्री केलेला टी.व्ही.संच सदोष आहे. त्यामध्ये मुलभूत उत्पादनातील दोष आहेत असे तक्रारदारांचे कथन आहे.
2. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे सामेनवाले क्रमांक 2 चे प्रतिनिधी श्री. आलवीन यांनी दिनांक 25/8/2010 रोजी तक्रारदारांना दूरध्वनी संदेश पाठवून दिनांक 30/8/2010 पूर्वी नविन टी.व्ही.संच पुरविण्यात येईल असे कळविले व हमी कालावधी देखील वाढविण्यात येईल असे कळविले. तथापि श्री. आलवीन यांनी दोन दिवसांनंतर म्हणजेच दिनांक 27/8/2010 रोजी आजारी असल्याने येऊ शकत नाही असे कळविले, व त्यानंतर काहीच कार्यवाही केली नाही. त्यानंतर सामेनवाले क्रमांक 2 चे प्रतिनिधी श्री. आलवीन यांनी तक्रारदारांना असे कळविले की, टी.व्ही.संचाची पाहणी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत करण्यात येईल व टी.व्ही.संचात काही बाहय दोष नाहीत याची खात्री झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याप्रमाणे सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने टी.व्ही.संचाची पाहणी केली होती, त्यानंतर देखील सामनेवाले यांनी पुढील कार्यवाही केली नाही.
3. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दिनांक 7/9/2010 रोजी पत्र पाठवून सदोष टी.व्ही.संच बदलून द्यावा अशी मागणी केली त्यास सामेनवाले यांनी दिनांक 27/9/2010 रोजी उत्तर देऊन तक्रारदारांची मागणी नाकारली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सामेनवाले यांनी टी.व्ही.संचाची किंमत रुपये 25,900/- 12 टक्के व्याजासह परत करावी अथवा टी.व्ही.संच बदलून द्यावा, तसेच तक्रारदारांना नुकसानभरपाई रुपये 5000/- अदा करावी अशी दाद मागितली.
4. सामेनवाले क्रमांक 1 म्हणजे टी.व्ही.संचाचे उत्पादक यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये टी.व्ही.संचात मुलभूत दोष होते या तक्रारदारांच्या कथनास नकार दिला. त्याचप्रमाणे टी.व्ही.संचास एक वर्षाचा हमी कालावधी होता व त्या दरम्यान टी.व्ही.संच वेळोवेळी दुरुस्त करुन देण्यात आला व टी.व्ही.संच व्यवस्थित चालू आहे असे देखील कथन केले. सामेनवाले यांचे कर्मचारी श्री. आलवीन यांनी तक्रारदारांना टी.व्ही.संच बदलून देण्याचे आश्वासन दिले होते या तक्रारदारांच्या कथनास सामनेवाले यांनी नकार दिला. याप्रकारे टी.व्ही.संचाच्या संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झाली या कथनास सामेनवाले यांनी नकार दिला.
5. सामेनवाले क्रमांक 2 यांनी आपले वेगळे कैफीयतीचे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये सामेनवाले क्रमांक 2 केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करतात, व विशिष्ट वस्तूमध्ये दोष असल्यास त्याबद्दल उत्पादकांना दोषी धरण्यात यावे असे कथन केले.
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले, सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांची कैफीयत ही शपथपत्रावर प्रमाणित आहे. सामेनवाले क्रमांक 2 यांच्या कैफीयतीसोबत वेगळे शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही बाजूंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद. तसेच सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांची कैफीयत, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले त्यावरुन तक्रारीच्या न्यायनिर्णयाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले क्रमांक 1 यांनी सामनेवाले क्रमांक 2 यांचेमार्फत तक्रारदार यांना सदोष टी.व्ही. संच विक्री करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर कली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय |
2 | तक्रारदार त्याबद्दल टी.व्ही.संच बदलून मिळणेस अथवा नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, नुकसानभरपाई |
3 | अंतीम आदेश? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी दूरदर्शन संचाच्या नादुरुस्त होण्याच्या संदर्भात ज्या घटना नमूद केलेल्या आहेत त्यास सामनेवाले यांनी नकार दिलेला नाही. परंतु सामनेवाले यांचे प्रतिनिधींनी वेळोवेळी टी.व्ही.संच दुरुस्त करुन दिला असे कथन केले. सामनेवाले यांचा भर हमी कालावधीत झालेला बिघाड या मुद्दयावर सामनेवाले यांच्या कथनाप्रमाणे हमी कालावधीमध्ये जर टी.व्ही.संच नादुरुस्त झाला तर ग्राहक विक्रेत्याकडून त्या टी.व्ही.संचाची दुरस्ती विना खर्च मागू शकते, परंतु टी.व्ही.संच बदलून मिळावा अशी मागणी करु शकत नाहीत असे सामनेवाले यांचे कथन आहे.
9. प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रम असे दर्शवितो की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून खरेदी केलेला दूरदर्शन संच वारंवार बंद पडत होता, व तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडे सूचना देऊन तो पुन्हा दुरुस्त करुन घ्यावा लागे. हा घटनाक्रम असे दर्शवितो की, सामनेवाले क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेला टी.व्ही.संच सदोष होता असा निष्कर्ष नोंदविण्यात येतो. वरील निष्कर्षास एका अन्य मुद्दयावरुन पुष्टी मिळते. तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 9 मध्ये असे कथन केलेले आहे की, सामनेवाले यांचे प्रतिनिधी श्री. आलवीन यांनी तक्रारदारांना दिनांक 25/9/2010 रोजी दूरध्वनी केला व 30/8/2010 राजी टी.व्ही.संच बदलून देण्यात येईल अस सांगितले. एवढेच नव्हे तर 1 वर्ष हमी कालावधी वाढवून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तक्रारदारांनी परिच्छेद क्रमांक 9 मध्ये असे कथन केले आहे की, दोन दिवसांनंतर म्हणजेच दिनांक 27/08/2010 रोजी श्री. आलवीन यांनी तक्रारदारांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संक्षिप्त संदेश पाठविला व आजारी असल्याने पत्र पाठविण्यात येत नाही असे तक्रारदारांना कळविले. तक्रारदारांचे परिच्छेद 10 मध्ये असे कथन आहे की, श्री. आलवीन यांनी तक्रारदारांना दूरध्वनी करुन त्यांचे प्रतिनिधी टी.व्ही.संचाची तपासणी करतील असे सांगितले व त्याप्रमाणे सामनेवाले यांचे प्रतिनिधी यांनी दिनांक 3/9/2010 रोजी टी.व्ही.संचाची पाहणी केली परंतु पुढील कार्यवाही केली नाही.
10. सामनेवाले क्रमांक 1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तक्रारदारांचे परिच्छेद क्रमांक 9 व परिच्छेद क्रमांक 10 यामधील कथनास नकार दिला. परंतु दिनांक 3/9/2010 रोजी सामनेवाले यांचे प्रतिनिधी यांनी टी.व्ही. संचाची तपासणी केली ही बाब मान्य केली.
11. येथे एक बाब नमूद करणे आवश्यक आहे की, सामनेवाले क्रमांक 1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये कुठेही श्री. आलवीन हे त्यांचे कर्मचारी/प्रतिनिधी नव्हते असे कथन केलेले नाही. या परिस्थितीमध्ये श्री. आलवीन हे सामनेवाले क्रमांक 1 यांचे कर्मचारी आहेत असा निष्कर्ष काढावा लागतो. त्या परिस्थितीमध्ये सामनेवाले क्रमांक 1 यांनी आपल्या कैफीयतीसोबत अथवा त्यानंतर श्री. आलवीन यांचे शपथपत्र तक्रारदारांचे तक्रारीतील पृष्ठ क्रमांक 9 व 10 च्या संदर्भात दाखल करणे शक्य होते, परंतु सामनेवाले क्रमांक 1 यांनी श्री. आलवीन यांचे शपथपत्र दाखल केले नसल्याने तक्रारदारांचे परिच्छेद क्रमांक 9 व 10 मधील कथन सत्य आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. त्या परिस्थितीमध्ये सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना विक्री केलेला टी.व्ही.संच सदोष होता ही बाब मान्य केली होती असा देखील निष्कर्ष काढावा लागतो.
12. तरी देखील प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांचा टी.व्ही.संच सतत बंद अवस्थेत आहे, निरुपयोगी व अडगळीस पडलेला आहे असे तक्रारदारांचे सद्यस्थितीबद्दलचे वेगळे शपथपत्र नाही. तक्रारदारांनी वर्ष 2010 नंतर नविन टी.व्ही.संच खरेदी केला असा देखील पुरावा नाही. तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असल्याने टी.व्ही.संचाची सुविधा त्यांच्याकरीता अत्यावश्यक ठरते. या परिस्थितीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना टी.व्ही.संच बदलून द्यावा असा आदेश देण्या ऐवजी सदोष टी.व्ही. विक्रीबद्दल व तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रास, कुचंबना व गैरसोय याबद्दल नुकसानभरपाई अदा करावी असा आदेश देणे योग्स व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
13. प्रकरणाचा एंकदरीत विचार करता ही नुकसानभरपाईची रक्कम रुपये 50,000/- असावी असे मंचाचे मत आहे. टी.व्ही.संचाची मूळची किंमत रुपये 25,900/- होती ही बाब मंचाने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करतांना विचारात घेतली आहे.
14. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 573/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले क्रमांक 1 यांनी सदोष टी.व्ही.संच उत्पादीत करुन सामनेवाले क्रमांक 2 यांचेमार्फत तो टी.व्ही.संच तक्रारदारांना विक्री केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
3) सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना टी.व्ही.संचाची किंमत व नुकसानभरपाई, तसेच तक्रारीचा खर्च याबद्दल एकत्रितपणे रुपये 50,000/- न्यायनिर्णयाची प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाच्या आत अदा करावी अन्यथा त्यावर मुदत संपल्यापासून 9 टक्के दराने व्याज अदा करावे असा आदेश सामनेवाले क्रमांक 1 यांना देण्यात येतात.
4) तक्रारदार सामनेवाले क्रमांक 2 यांच्याविरुध्द रद्द करण्यात येते.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 29/01/2014