निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार रंजीत पि. रामब्रिक्श शर्मा हे नांदेड येथील रहिवासी आहेत व ते रेल्वे हॉस्पीटलमध्ये काम करतात. अर्जदाराने सोनी कंपनीचा Sony Experia C White, Model C2305 हा मोबाईल इंटरनेटवरील स्नॅप डिलच्या माध्यमातून मागवला. सदर मोबाईलसाठी Cash on Delivery अशी अट ठरलेली होती. अर्जदारास दिनांक 27.9.2014 रोजी स्नॅपडीलच्या कर्मचा-यांकडून सदर मोबाईल मिळाला व अर्जदाराने मोबाईलची किंमत 15,920/- दिली व पावती घेतली. अर्जदाराच्या सदर मोबाईलचा IMEI No. 353267067076636 असा आहे. सदर मोबाईलची 12 महिन्याची वॉरंटी होती व बॅटरी आणि चार्जरचीही 6 महिन्याची वॉरंटी होती. सदर मोबाईल हा विकत घेतल्यापासून सदोष असल्याचे अर्जदारास आढळले. तो वेळोवेळी आपोआप गरम होत होता. अर्जदाराने सदर बाब गैरअर्जदारांना तोंडी सांगितली पण गैरअर्जदारांनी तो आपोआप ठिक होईल असे सांगितले म्हणून अर्जदाराने त्याचा वापर चालू ठेवला. दिनांक 24.11.2014 रोजी मोबाईलचा आपोआप स्फोट झाला. गैरअर्जदार क्र. 2 यांना ही बाब सांगितली व मोबाईल दाखविल्यावर गैरअर्जदाराने तो त्याच्याकडे जमा करु घेतला व दिनांक 3.12.2014 रोजी दुरुस्त न करता तसाच परत केला. मोबाईल फिजिकली डॅमेज झालेला आहे. त्यामुळे 14,500/- रुपये दुरुस्तीचा खर्च दिल्यास मोबाईल दुरुस्ती करुन मिळेल असे सांगितले. अर्जदाराने मोबाईल व्यवस्थीत हाताळला आहे. मोबाईलचा स्फोट होऊन मोबाईल नादुरुस्त झालेला आहे. असे असून देखील गैरअर्जदार यांनी अर्जदारास मोबाईल बदलून दिलेला नाही म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा मोबाईल बदलून देण्याचा अथवा त्याची किंमत रक्कम रु. 15,920/- दिनांक 27.9.2014 पासून 18 टक्के व्याजासह अर्जदारांना देण्याचा आदेश करावा. तसेच अर्जदारास झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल रक्कम रु. 50,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्च बद्दल रक्कम रु. 5,000/-ची मागणी अर्जदाराने केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. गैरअर्जदार 1 व 3 यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे.
गैरअर्जदार 1 ही एक कंपनी कायदया अन्वये अंमलात आलेली एक कंपनी असून गैरअर्जदार क्र. 3 हे गैरअर्जदार क्र. 1 चे अधिकृत सेवा केंद्र आहे. यापुढे दोघांना संयुक्तीकरित्या संबोधण्यात येईल. अर्जदाराने सदर मोबाईल हा त्याचे वैशिष्ट व कार्य यांची माहिती घेऊन व प्रदर्शन पाहून व त्याचे समाधान झाल्यानंतर खरेदी केला. गैरअर्जदार 1 हे आपल्या उत्पादनाची मुळ खरेदी वेळेपासून एका वर्षापर्यंती हमी अटी व शर्तीस अधीन राहून देते. सदर अटी व शर्ती मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. उत्पादनाच्या देखरेखीसाठी दिलेले निर्देशानुसार वापर न केल्यास किंवा साधारण तुटफूट किंवा गैरवापराप्रमाणे झालेल्या कोठल्याही नुकसानीचा वॉरंटीमध्ये समावेश नाही. तसेच अपघात, उत्पादनात केलेल्या सोईस्कर बदलामुळे किंवा द्रव पदार्थामुळे उत्पादनात आलेला निकामीपणा हे सदर हमीत समावेश नाही. अर्जदार पहिल्यांदा दिनांक 3.12.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे नो-डिस्प्ले या कारणामुळे संपर्क केला पण तपासणी केल्यानंतर सदर मोबाईलचे स्क्रिन/ डिस्प्ले हे अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे फुटल्याचे निदर्शनास आल्याने तेव्हाच ते अर्जदारास दाखविण्यात आले. सदर फुटलेल्या डिस्प्लेचे सह मोबाईलचे छायाचित्र जबाबासोबत देण्यात आली आहेत. स्वतः तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रस्तुत हमीत समावेश होत नाही. तरीही अर्जदाराने हॅन्डसेट विनामुल्य दुरुस्ती करुन देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे अर्जदार हा कुठल्याही मागणीस पात्र नाही. गैरअर्जदार यांनी मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा.
3. गैरअर्जदार क्र. 2 हयांना मंचाची नोटीस तामील होऊन देखील त्यानी मंचात हजर होऊन आपले म्हणणे दाखल केलेले नाही म्हणून त्याच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या दिनांक 27.9.2014 च्या पावतीवरुन स्पष्ट आहे व ते गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदाराचा मोबाईल हा दिनांक 24.11.2014 रोजी नादुरुस्त झाल्यावर अर्जदाराने सदर मोबाईल हा गैरअर्जदार यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर बालाजी इन्टरप्राईझेस यांच्याकडे दिनांक 24.11.2014 रोजी दिला. परंतू गैरअर्जदार यांनी त्यांच्या म्हणण्याच्या परिच्छेद क्र. 3 मध्ये असे कथन केले आहे की, अर्जदाराने प्रथम दिनांक 03.12.2014 रोजी त्यांच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे नो-डिस्प्ले तक्रारीसाठी मोबाईल आणला. सदरचे गैरअर्जदाराचे कथन चुकीचे आहे कारण गैरअर्जदाराच्या सर्व्हीस सेंटरने अर्जदारास दिलेल्या पावतीचे अवलोकन केले असता सदर पावतीचा दिनांक 24.11.2014 असल्याचे स्पष्ट आहे. तसेच सदर पावतीत Display Damage असल्याचा उल्लेख आहे. सदर मोबाईल हा दिनांक 3.12.2014 पर्यंत गैरअर्जदार यांच्या सर्व्हीस सेंटरकडेच होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या Service Job Sheet वरुन स्पष्ट आहे. जर अर्जदाराची तक्रार योग्य नव्हती व फक्त फिजिकल डॅमेज होता तर गैरअर्जदाराने अर्जदाराचा मोबाईल दिनांक 3.12.2014 पर्यंत ठेवून न घेता दिनांक 24.11.2014 रोजीच परत अर्जदारास दयावयास हवा होता. यावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार यांनी स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी मोबाईल फिजीकली डॅमेजचे कारण दिलेले आहे. तसेच गैरअर्जदाराच्या सर्व्हीस सेंटरने देखील अर्जदाराची तक्रार गंभीर असतांना सुध्दा मोबाईल तपासणीसाठी कंपनीकडे पाठवलेला नाही. तसेच अर्जदाराने थेट कंपनीस पत्र पाठवल्यानंतर गैरअर्जदार कंपनीने देखील मोबाईलची तपासणी केल्याचे दिसून येत नाही. असे करुन अर्जदारास सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु. 14,485/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.